काश्मिरी दम आलू

युवा विवेक    01-Jan-1900
Total Views |


काश्मिरी दम आलू

 

बटाट्याच्या भाजीवर काय लेख लिहायचा? असं दोनचारदा मनात आल्यावरही लिहितेय कारण आपल्यापर्यंत ज्या मोजक्या रेसिपीज पोहोचल्या आहेत, त्यातली ही एक. बऱ्याच रेस्टारंटमध्ये काश्मिरी दम आलू आणि काश्मिरी पुलाव मिळतो. काश्मिरी पुलाव लोक खातात; पण दम आलू कोणाला ऑर्डर करताना मी तरी पाहिले नाही. हा पदार्थ मी बहुदा लग्नसमारंभात खाल्ला आहे. एके दिवशी मैत्रिणीने पाठवला आणि आवडला. तिला रेसिपी विचारून करूनही पाहिली. छान जमली. मसालेदार बटाट्याची भाजी सर्वांना आवडली, पण अजून रिसर्च केल्यावर समजले की यात कांदा, लसूण नसतो. काश्मिरी पंडितांनी केलेली पाककृती असल्याने काही मसाले, दही आणि फारतर आले इतकेच असते. तशी पारंपरिक पाककृती मी तरी करून पाहिली नाही, पण त्यानिमित्ताने यावर लेख लिहायचा हे ठरवले.

दम बिर्याणीमध्ये जसं मंद आचेवर शिजवतात, तसंच यातही करतात म्हणून दम! माझ्या मते बटाटा हा जगातील सर्वांत आवडती भाजी असावी. कोणत्याही भाजीत, पदार्थात देश-विदेश याची पर्वा न करता आपले स्थान मिळवून ते टिकवून ठेवणारा बटाटा. काश्मिरी दम आलू ते केरळच्या डोस्यातील भाजी सगळीकडे सामावला जातो असा बटाटा. असो आता बटाटापुराण संपवून दम आलूकडे वळू या. हा पदार्थ फार जुना नाही, कारण बटाटा भारतात आला १५०८ च्या दरम्यान.

लहान किंवा मध्यम आकाराचे बटाटे पाण्यात शिजवून त्यांची साले काढली जातात. बरेच लोक अगदी लहान बटाटे साले न काढता वापरतात. अर्धे शिजलेले बटाटे तेलात तळले जातात. त्याआधी बटाट्याना काटेचमच्याने किंवा सुरीने छिद्र पाडतात, जेणेकरून मसाला आतपर्यंत जाईल. कमी तेलात बटाटे तळले जात असतील तर त्यावरच दह्याचे रोगन टाकून मंद आचेवर शिजवतात अथवा वेगळ्या भांड्यात शिजवले जाते. दह्याची ग्रेव्ही असते, त्याला रोगन म्हणतात. यात दही, काश्मिरी मिरची, आले, मीठ आणि मसाले असतात. मंद आचेवर बटाटे मसाल्यात मुरतात आणि दही फाटत नाही. पूर्वी बटाटे शिजवायला तेलाऐवजी तूप वापरायचे. दह्याचा वापर पाहून मला हिमाचलची आठवण आली. तिथेही भाज्या दह्यात शिजवायची पद्धत आहे. गरमागरम दम आलू भातासोबत खातात.

हा पदार्थ भारतभर वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. उत्तर प्रदेशमध्येही हा पदार्थ लोकप्रिय आहे. यात दह्यासोबत टोमॅटोची प्युरी, बडीशेप टाकली जाते. हा दम आलू मुख्यतः सकाळी पुरीसोबत खातात. इतका जड नाश्ता थंड प्रदेशातील लोकच करू शकतात. बटाटाप्रेमी बंगालनेही या पदार्थाला आपल्या पद्धतीने वापरले. तिकडे याला अलोर दम म्हणतात. यासोबत रंगली मऊ पुरी खाल्ली जाते. आजकल यात कांदालसू पेस्टही टाकली जाते. चव छान असली तरी पाककृती जुनी नाही. ही प्रथा पंजाबी, हरियाणवी पदार्थांमुळे सुरू झाली. ग्रेव्ही असते ना त्यांच्या भाज्यांमध्ये तसाच! साधी, सोपी आणि कोणालाही आवडणारी ही पाककृती नक्की करून बघा.

 
सावनी