टीव्ही मनोरंजन : मायाजाल आणि आपण

युवा विवेक    18-Oct-2021   
Total Views |

टीव्ही मनोरंजन : मायाजाल आणि आपण


tv_1  H x W: 0  

नव्वदच्या दशकात मनोरंजनाच्या खासगी वाहिन्यांचे पर्व सुरू झाले. तोपर्यंत दूरदर्शन हा एकमेव पर्याय प्रेक्षकांसमोर होता. वाहिन्या सुरू झाल्या आणि मनोरंजनाचा एक वेगळा पट प्रेक्षकांसमोर उलगडला. या मालिकांनी दैनंदिन धबडग्यात शिणून जाणाऱ्या मनांना थोडावेळ रिझवण्याचे काम केले; पण मनोरंजनपूर्ण मालिका नावाच्या दलदलीत आपला पाय रूतत गेला व ओटीटीसारखे पर्याय येऊनही त्यातून आपण बाहेर पडू शकलेलो नाही हेच खरे आहे.

खरं तर, या वाहिन्यांनी सुरुवातीला अत्यंत दर्जेदार मालिकाही दिल्या. टीचर, सैलाबसारख्या मालिकांनी भारतीय विचारांची रुजवण केली. येथील वैचारिक खुंटा अधिक बळकट केला. दुसरीकडे दूरदर्शनवरील १००चा पुढचा भाग वाटावा अशी सीआयडी मनोरंजन क्षेत्रात विक्रम प्रस्थापित करत होती. खासगी वाहिन्या येण्यापूर्वी दूरदर्शन प्रादेशिक वाहिनी सह्याद्रीने अनेक उत्तमोत्तम मालिकांचा वारसा प्रस्थापित केला होता. चिमणराव, गोट्या, गजरा, द्रष्टा, महाश्वेता, चाळ नावाची वाचाळ वस्ती, कल्याणी, टिळक आगरकरांवरील एक मालिका (नाव आठवत नाही) अशा दर्जेदार मालिकांनी मराठी नाटकांइतक्याच सशक्त कथानकांचा आणि त्याला तुल्यबळ अशा अभिनयाचा अनुभव प्रेक्षकांना दिला.

झी, ई-टीव्ही (आताची कलर्स) अशा प्रादेशिक वाहिन्यांनी सुरुवातीच्या टप्प्यात सह्याद्रीचाच वसा चांगल्या मालिकांच्या माध्यमातून या वाहिन्यांनीही पाळला. म्हणजे हिंदी मालिकांचं कुटुंबप्रधान वा स्त्रीप्रधान मालिकांचं वारं हळूहळू इथेही वाहू लागलं असलं तरी आत्मसन्मान, स्वाभिमान यांना तीलांजली दिली गेली नव्हती आणि भारतीय विचारांचा सकस पुरवठा या मालिकांच्या माध्यमातून केला गेला. आभाळमाया पहिल्या मल्टिस्टार दैनंदिन मालिकेतून सुकन्या कुलकर्णी, मनोज जोशी आणि संजय मोने यांच्यासारखे तगडे व रंगभूमीची पार्श्वभूमी असणारे कलाकार दैनंदिन मालिकांमध्ये आले. पेशाने प्राध्यापक असणारी सुधा जोशी. नवऱ्याच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल समजल्यावर त्याच रात्री घराबाहेर काढणारी आणि आपला अपमान न विसरणारी. पण त्याच संबंधातून जन्मलेल्या मुलीला पोटाशी धरणारी सुधा जोशी ही मला बंडखोर वाटली होती. प्रपंच ही खऱ्या अर्थाने कौटुंबिक मालिका. तुमच्या माझ्या घरात घडणाऱ्या घटना दर्शवणारी. आपल्या मुलीला सासरी त्रास होतोय हे समजल्यावर तिच्या पाठीशी ठाम उभं राहणारं कुटुंब यात दाखवलं होतं. ज्याला खरोखर मल्टीस्टारर आणि मल्टिलेयर्ड म्हणता येईल अशा मालिका म्हणजे वादळवाट. अगणित पात्र, अगणित उपकथानकं असूनही कुठेही धागा सुटला नाही. वकील, तत्त्वनिष्ठ संपादक, डॉक्टर, पोलीस अशा कितीतरी पात्रांनी भरलेली ही मालिका. श्रीयुत गंगाधर टिपरे हा लॉकडाऊनच्या काळात तितक्याच ओढीने पाहिली गेली. घरात घडणाऱ्या बारीक बारीक घटना तपशीलांसह दाखवणारी मालिका होती. अवंतिका, असंभव, अंकूर, एका लग्नाची दुसरी गोष्ट, दिल दोस्ती दुनियादारी या मालिकाही झीने दर्जा न गमावता दिल्या. दुसरीकडे ई-टीव्हीसारख्या वाहिन्यांवरही झोका, भूमिका, सोनियाचा उंबरा (ही कानडी मालिकेचा रिमेक होती) अशा मालिका प्रसारित होत होत्या. प्रतिमा कुलकर्णींसारखी दर्जेदार दिग्दर्शिका या मालिका रसिकांना देत होती.

मराठीत हे सगळं घडत असताना दुसरीकडे एकता कपूर नावाच्या बाईंनी हिंदी वाहिन्यांवर आपलं साम्राज्य गाजवायला सुरुवात केली होती. घरातला शोषक-शोषित संघर्ष, सासुसुना, सणवारांचं प्रस्थ, भडक मेकअप, मोठमोठ्या हवेल्या, एकमेकांची उणीदुणी आणि या साऱ्याच्या जोडीला बायकांचा अस्तित्वहीन संघर्ष, ज्या संघर्षाला उंबरठ्याबाहेर कोणते अस्तित्व नाही आणि त्या स्त्रियांनाही. हेच लोण गेली आठ-दहा वर्षे मराठी मालिकांमध्येही पसरलं आहे. अत्यंत सुमार कथानकं, सुरूवात आणि शेवटाचा नसलेला संबंध, अननुभवी नवोदित कलाकार, पुन्हा एकदा शोषक-शोषित संघर्ष, कितीही स्त्रीप्रधान मालिकांचा आव आणायचं ठरवलं तरी स्वयंपाकघराच्या बाहेर न पडणारी स्त्री. म्हणजे ती सीए असो, डॉक्टर असो, शिक्षिका असो, पत्रकार असो ती फक्त संसारच करते असं चित्र, प्रेमकथा असलीच तरी ती जोडी विजोड हवी हा अट्टाहास म्हणजे पन्नाशीचा नायक विशीची नायिका, श्रीमंत नायक-गरीब नायिका किंवा याला उलट स्थिती. वर्णद्वेष, जातीद्वेष, कौटुंबिक हेवेदावे याने मनोरंजन क्षेत्र पुरतं पोखरून गेलं आहे. ऐतिहासिक म्हणवल्या जाणाऱ्या मालिकाही यातून सुटल्या नाहीत. रिॲलिटी शोज हा एक नवा प्रकार काही वर्षांपूर्वी अस्तित्वात आला. सुरुवातीच्या काळात खूपच जेन्युईन वाटलेल्या या प्रकारातील नाटकीपणा, निकालातील संदिग्धता हे सारं प्रेक्षकांनाही लक्षात येऊ लागलं आहे.

दर्जा असला तर, मालिका या आपले महत्त्व आणि प्रेक्षक गमावत नाहीत याचा अनुभव लॉकडाऊनच्या काळात सर्वांनाच आला. पहिल्या लॉकडाऊनमध्ये मालिकाविश्व जवळजवळ ठप्प झालेलं असताना अनेक वाहिन्यांनी आपल्या जुन्या मालिका पुन्हा प्रक्षेपित केल्या आणि यांनी अक्षरशः स्वतःचेच प्रसिद्धीचे विक्रम मोडले. विशेषतः रामायण-महाभारत या मालिकांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. लॉकडाऊनच्या काळात रामायण ही जगभरात सर्वाधिक पाहिली गेलेली मालिका ठरली. १६ एप्रिल २०२०चा भाग हा भारतभरात जवळपास आठ कोटी लोकांनी पाहिला. हे आकडे इथे देण्याचे कारण हेच की, दर्जा असेल तर लोकाश्रयही मिळतो; पण सध्याच्या मालिकाविश्वात अत्यंत दर्जाहीन मनोरंजक कार्यक्रम पाहून प्रेक्षकच आपला मनोरंजनाचा आणि जनजागरणाचा मूळ हेतू विसरत चालले आहेत व जे दाखवलं जातंय तेच पाहण्यात समाधान मानत आहेत. प्रेक्षक या मायाजालात गुरफटत चालले असून, त्यामुळे वैचारिक पुरोगामित्व असणारा आणि उच्च परंपरांचा पाईक असणारा मराठी प्रेक्षक पुन्हा अनेक दशकं मागे चालला आहे. धार्मिक सणांचा, परंपरांचा मूळ उद्देश मागे पडून केवळ उपचारांना महत्त्व येत चाललं आहे. हे थांबायला हवं आणि त्याला सकस पर्यायही उपलब्ध व्हायला हवा.