यज्ञ - भाग ८

युवा विवेक    21-Oct-2021   
Total Views |
यज्ञ - भाग ८

Sacrifice_1  H  

पहिले सेमिस्टर संपले होते आणि महेश सुट्टीत घरी आला होता. पंधरा दिवसांची सुट्टी कमी आहे, असं त्याला वाटलं होतं पण झालं उलटंच! त्याचं घरी मन लागत नव्हतं. सकाळ-संध्याकाळ प्रियाशी मेसेजवर बोलणे सुरू होते. एक दिवसाआड त्यांचा फोनही व्हायचा. महेश पूर्णपणे प्रियाच्या प्रेमात होता. आज त्याने तिला सांगायचे ठरवले. आता लगेच कॉलेजमध्ये भेट होणार नव्हती म्हणून त्याची हिंमत थोडी वाढली. फोनवर नेहमीप्रमाणे गप्पा सुरू होत्या. ती भरभरून एका सिनेमातील पात्राविषयी बोलत होती.

इतकं सांगू नकोस. मला बोअर होईल तो सिनेमा पाहताना.”

बरं नाही सांगणार आता. कशाविषयी बोलू मग?

आपल्याविषयी बोल.”

आपल्याविषयी काय बोलणार?”

काय वाटतं तुला आपल्या रिलेशनविषयी?”

छान मित्र आहेस तू. खरं सांगू, तू आलास तेव्हा वाटलं होतं की, मला तुला कॉलेजमध्ये सांभाळून घ्यावं लागेल. मी सिनियर आहे ना म्हणून, पण तूच सपोर्ट झाला आहेस माझा.”

इतकं फॉर्मली बोलू नको ना.

खरं सांगतेय. छान मित्र सगळ्यांच्या नशिबात नसतात.

फक्त मित्र वाटतो मी?”

हो.

समजा, तुझं लग्न झालं नसतं तर?”

तर काय? मी बंगलोरला असते रे. चांगली ऑफर होती तिकडे.

अगं वेडाबाई, आपल्याबद्दल म्हणतोय मी. तुझं लग्न झालेलं नसतं तर...

तरीही छान मैत्री झालीच असती. अरे मी माझे प्रॉब्लेम्स सांगते म्हणून मैत्री नाहीये आपली, आपले स्वभाव जुळले ना.

हो ना?”

हम्म. पण माझं वेगळं मत आहे.

काय?”

स्वभावापेक्षा मन जुळतात आणि म्हणूनच तुझं लग्न झालेलं नसतं तर मी तुलाच मागणी घातली असती.

हा हा हा

हसू नको. मी सिरीयस आहे.

हो. ते जाणवलं मला आता पण आता तसं होऊ शकत नाही ना?”

का?”

का म्हणजे? तुला मी आवडतो की नाही ते सांग. आणि प्लीज मित्र म्हणून आवडतो असं म्हणू नको.

मग काय म्हणू? तेच खरं आहे ना. ती आता किंचित चिडली.

ठीक आहे. बोलू नंतर.”

त्याने राग येऊन फोन ठेवला. नंतर तिचा फोन उचलला नाही आणि मी सध्या बोलायच्या मनस्थितीत नाहीय. काळजी करू नको. नंतर बोलू.” असा मेसेज पाठवला. मी तिला आवडतो इतकंही कबूल करत नाहीये ती त्याला वैतागला.

**********

प्रियाला जरासा शॉक बसला. तिची पर्सनॅलिटी आधीपासूनच छान, स्वभाव गोड त्यामुळे सतत आसपास फिरणाऱ्या मुलांची तिला सवय होती. आता लग्न झाले, ती प्रोफेसर होती. त्यामुळे हे सगळे कमी झाले. महेशला ती आवडते याचा तिला अंदाज होताच, पण तरीही तो त्याच्या भावना बोलून दाखवणार नाही, असं तिला वाटलं. सांगितलं तरी असा चिडणार नाही, मतीत बोलेल असा अंदाज होता. पण इथे भलतंच झाल! त्याचा मेसेज पाहून तिचा जीव भांड्यात पडला होता, तरीही तिला टेन्शन आले. तिने अनुजाला फोन लावला. अनुजाशी बऱ्याच गप्पा झाल्या, पण का कोण जाणे अनुजाला याबद्दल सांगावे, असे तिला वाटले नाही. अनुजा यावर कशी रिऍक्ट होईल, तिच्याबद्दल काय विचार करेल हे विचार तिच्या मनात फिरत होते.

तितक्यात नील रूममध्ये आला. आज तो किती तरी दिवसांनी घरी होता आणि त्याने बरेच फिरायचे प्लॅन्स केले होते.

तू अजून तयार नाहीस? जायचंय ना बाहेर. तुझा मूड ठीक आहे ना?”

हो. दहाच मिनिटात निघू या.उसने हसू आणत ती तयार व्हायला निघून गेली.

नील आणि प्रिया त्या पार्कपाशी पोहोचले. लग्नाआधी दोघे इथेच भेटायचे. नील आज खूप खूश होता आणि बोलत होता.

प्रिया मात्र महेश आणि तिच्या संभाषणातून बाहेर आलेली नव्हती.

प्रिया?? अगं कुठे लक्ष आहे?

बोल ना. ऐकतेय मी.

तुला आवडणार नाही पण तुला एक सांगायचंय.

काय?”

मला तुला थँक्स म्हणायचंय. तुझा खूप आधार वाटतो गं मला. माझे सगळे मित्र सतत सांगत असतात त्यांच्या बायकांच्या वागण्याबद्दल, तक्रारी करतात. पण तू तशी नाहीस. माझे सगळे प्रॉब्लेम्स समजून घेतेस. मला वेळ देता येत नाही तरीही. हा प्रोजेक्ट झाला ना की बघ, आपण खूप फिरू. तुला हवं तिथे जाऊ.”

तो बोलत होता. प्रियाला गिल्टी वाटलं. आपण बरोबर वागतोय ना? याच किती प्रेम आहे माझ्यावर. माझंही आहेच. मग हे काय चाललंय?” घरी परत येताना तिला वाटले, “मला महेशचा आधार वाटतो आणि नीलला माझा. आजच बोलले मी त्याला आणि हा मला. काय आहे हे? आपण सतत दुसरीकडे आधार का शोधतो?”

महेशने दोन दिवस स्वतःला कामात गुंतवून घेतले आणि आज त्याने ठरवले या विषयावर राहुलशी बोलायचे.

क्रमशः