शत्रू उंबरठ्याच्या आत आलाय....!

युवा विवेक    25-Oct-2021   
Total Views |

शत्रू उंबरठ्याच्या आत आलाय....!

 
app_1  H x W: 0

औरंगाबादमधील धक्कादायक घटना नुकतीच वाचनात आली. मित्र नसल्यामुळे आलेला एकाकीपणा घालविण्यासाठी वेबसीरीज पाहात असलेल्या डॉ. राजन शिंदे यांच्या मुलाने चक्क त्यांचीच हत्या केली. हत्या करण्यापूर्वी त्या अल्पवयीन मुलाने संगणकाच्या, स्मार्ट फोनच्या आधारे बालहक्कांचा, संरक्षण कायद्याचा पुरेसा अभ्यास केला होता, याचीही माहिती पोलिसांना मिळाली आहे. आपल्या पित्याची, खरं तर कोणाचीही हत्या करणं वाईटच, पण जितक्या थंड डोक्याने - ज्याला कोल्ड ब्लडेड मर्डर म्हटलं जातं - त्या मुलाने हे कृत्य केलं. ते मात्र धक्कादायक आहे. घरात वादविवाद असणं हे योग्य नसलं तरी, अनेक घरांत दिसून येणारं चित्र आहे, पण आई-वडिलांच्या वादाला कंटाळून तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्यक्ष वडलांच्या हत्येचा कट रचणं आणि तो पूर्णत्वाला नेणं हे दोन्ही समूळ हादरवणारं आहे.

दूरदेशी गेला बाबा, गेली कामावर आई, हे असं चित्र आज अनेक कुटुंबांमध्ये दिसून येतं. त्याला कारणंही अनेक आहेत. काही जण गरज म्हणून, तर काही करिअर म्हणून आपापल्या वाटा शोधत असतात. काही वेळी अशा परिस्थितीत मुलं मात्र एकलकोंडी होत जातात. त्यावर उत्तर शोधण्याची प्रकर्षाने गरज निर्माण झाली आहे. या अशा कृत्यांकडे मुलं वळतात तरी कशी, त्यांच्या या प्रेरणा जागृत होण्याचं कारण काय हे लवकरात लवकर शोधून, त्यावर उपाययोजना करणं आवश्यक आहे.

गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून जगभरातील अथांग माहितीचा समुद्र स्मार्टफोनच्या रूपात अगदी समोर आला आहे. अगदी मागच्या सात ते आठ वर्षांपूर्वीपर्यंत घरोघरी लॅपटॉप नव्हते. प्रोजेक्ट किंवा तत्सम कामासाठी सायबर कॅफेमध्ये जावं लागे. तिथे वेळेचं आणि निवडक संकेतस्थळांचं बंधन होतं. अल्पवयीनांकरिता बंदी असणाऱ्या, सज्ञान असण्याचे बंधन असण्याच्या वेबसाईट पाहण्यास परवानगी नसे. परंतु गेल्या काही वर्षांत घरोघरी संगणक, लॅपटॉप आले. घरात कोणी नसल्याने काय पाहावं व काय पाहू नये याच्यावर बंधन राहिलं नाही. आवश्यकतेपेक्षा अधिक व वेळेच्या आधी सगळंच ज्ञान त्या माध्यमातून आज मुलांना मिळू लागलं आहे.

सोशल मीडिया नावाचा आणखी एक पैलू आपल्या जीवनाशी जोडला गेला आहे. सोशल मीडियावर असणं हे तर आजच्या घडीला सामान्य आहे, पण किशोरवयीन मुलांच्या बाबतीत सोशल मीडियावर निरनिराळे अपडेट्स टाकणं, ते न टाकल्यास नैराश्य येणं, सेल्फी चांगला येईपर्यंत क्लिक करत राहाणं. लाईक्स, कमेंन्टस, रीचसाठी धडपडणं. वेगवेगळे हॅशटॅग चालवणं हे नेहमीचं झालं आहे, पण त्यापेक्षा धोकादायक आहे ते फिअर ऑफ मिसिंग आऊटचे भूत. सोशल मीडियावर नसल्याचा न्यूनगंड वाटणं, सोशल मीडियावर प्रतिसाद न मिळणं, या समुद्रात आपली नोंद घेतली जाईल की नाही याची चिंता वाटणं हे आज वाढलं आहे.

लॉकडाऊनच्या काळापासून ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईल पूर्ण वेळ हातात आला आहे. शिक्षणासाठी त्याचा उपयोग होतोच आहे निश्चित, पण स्मार्टफोनच्या माध्यमातून निरनिराळ्या प्रक्षोभक वेबसीरीज पाहणं, एकांतात असताना अश्लील फिल्म्स, व्हिडिओ क्लिप्स पाहाणं, तसा कंटेंट एकमेकांना पाठवणं. तसे न करणाऱ्याला बाजूला सारणं, त्यामुळे येणारं नैराश्य हे देखील वरचेवर दिसून येतं. काही काळापूर्वीच बॅन झालेल्या टीकटॉकच्या माध्यमातूनही अशा व्हिडिओजना विशेष पेव आलं होतं. केवळ अश्लील कंटेंटपुरता हा विषय संपत नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना निरनिराळी चॅलेंजेस दिली जातात. पोकिमॉन गो, ब्लू व्हेल चॅलेंज गेम अशा अनेक खेळांवर यापूर्वीच बंदी आली असली तरी अनेक गेम्स आजही किशोरवयीनांना उद्दीपित करण्याचं काम करत आहेत. फारशा शिक्षित नसलेल्या पालकांच्या स्मार्टफोनच्या आधारे नकळत किंवा जाणीवपूर्वक आर्थिक व्यवहारही मुलांनी केल्याच्या घटना

कोणत्याही तंत्रज्ञानाकडे वरदान म्हणून पाहताना त्याच्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पालकांनी ते आधी समजून घेतले पाहिजेत. परिणामांच्या कक्षेतून या तंत्रज्ञानाच्या उपयोजितेचा विचार केला पाहिजे. त्याचप्रमाणे मुले आपल्यासमोर वा एकांतात काय करतात याकडे जागरूक पालक म्हणून लक्ष देणंही तितकंच आवश्यक आहे. स्मार्टफोन तसेच लॅपटॉपचा वापर करून काय करू नकोस यापेक्षा त्याचा योग्य वापर कसा करावा याचं भान मुलांना दिलं. वेबसीरीजमध्ये दिसून येणारी लैंगिकता, आक्रमक वागणूक, स्वैराचाराच्या पायावर रचली गेलेली कथानकं म्हणजे मनोरंजन नाही हे वारंवार मनावर ठसवलं पाहिजे. लैंगिकता ही योग्य बाब असली तरी ती कोणत्या वयात योग्य आहे, लैंगिकतेमागील भारतीय विचारांचं अधिष्ठान काय याचीही माहिती वेळोवेळी मुलांना मिळाली तर, किशोरवयीन मुले या सगळ्यापासून नक्की दूर राहतील. केवळ पालकच नाही तर, वयाच्या या टप्प्यातून पुढे गेलेली त्यांची भावंडं, मित्र हेदेखील या सगळ्यापासून त्यांना दूर ठेवू शकतात. एक समाज म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

दहा वर्षांपूर्वी शत्रू उंबरठ्यावर आहे, त्याला कसं थोपवावं याची चर्चा केली जात असे, पण कालौघात शत्रूने उंबरठ्याच्या आत पाऊल टाकलं आहे. आता त्याला योग्य दिशा देणं ही काळाची गरज आहे. केवळ पालक नव्हे तर संपूर्ण समाजानेच तो वसा घेतला तर, औरंगाबादसारख्या घटना नक्की टाळता येतील.