दिवाळी – कवितांमधली, गीतांमधली....

युवा विवेक    01-Nov-2021   
Total Views |
दिवाळी – कवितांमधली, गीतांमधली....

diwali_1  H x W
नवरात्रीच्याही आधीपासून घराघरांत दिवाळीच्या तयारीची चर्चा सुरू होते. दिवाळी म्हणजे उटणं-अभ्यंग स्नान-नवेकोरे कपडे, दिवाळी म्हणजे पणत्या-रांगोळी-सजावट, दिवाळी म्हणजे गोडधोड चविष्ट फराळ, दिवाळी म्हणजे दिवाळीअंक. दिवाळी रंगात उमटते, फटाक्यांनी दणाणते, शुभेच्छापत्रांनी, भेटवस्तूंनी बहरते, तशीच दिवाळी पारंपरिक गीतांतून, लोकवाङ्मयातून, नाट्य-सिनेमागीतांतून सांस्कृतिक वारसा ही जपत जाते.
दिन दिन दिवाळी, गायी म्हशी ओवाळी, गायी म्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या,
लक्ष्मण कोणाचा, श्रीरामाचा....
हे गाणं म्हटलं नाही तर, दिवाळी ही दिवाळी वाटतच नाही. आपल्याकडे अनेक गीतांचे निर्माते हे आजही अज्ञात आहेत. तशातलंच हे फूलबाजी उडवण्याला लय मिळवून देणारं एक गीत. अगदी गावखेड्यापासून ते थेट शहरांपर्यंत सर्वच मराठी मुलं हे लोकगीत गाताना आढळतात. केवळ लोकवाङ्मयात नव्हे तर संतवाङ्मयातही आपल्या सणउत्सवांचं प्रतिबिंब आढळून येतं. ज्ञानोबामाऊलींनी ज्ञानेश्वरीत ओव्यांद्वारे दिवाळीचे किंवा दिव्याचे/प्रकाशाचे महत्त्व विशद केले आहे.
मी अविवेकाची काजळी।
फेडोनी विवेक दीप उजळी॥
ते योगिया पाहे दिवाळी । निरंतर॥
किंवा
सूर्ये अधिष्ठिली प्राची ।
जगा जाणीव दे प्रकाशाची ।
जैशी श्रोतया ज्ञानाची ।
दिवाळी करी ।।
या ओव्या आपल्याला विशेष परिचित आहेत.
संत जनाबाईंनी
आनंदाची दिवाळी।
घरी बोलवा वनमाळी॥
घालीते मी रांगोळी।
गोविंद गोविंद॥ अशा शब्दांत दिवाळीच्या दिवशी श्रीकृष्णाला म्हणजेच वनमाळीला घरी बोलवण्याचं आवाहन केलं आहे. अर्थात इतकं या दिवसाचं महत्त्व आहे.
साधू संत येती घरा। तोची दिवाळी दसरा॥ हा तुकोबांच्या अभंगातील भाग आपण वाक्प्रचाराप्रमाणेच वापरतो. यातून दसरा दिवाळी या सणांचा मानवी मनावरील प्रभावच प्रकटतो. साधुसंतांचं आपल्या घरी होणारं आगमन हे दिवाळीपेक्षा कमी नाही असं ते यात म्हणतात. त्याचप्रमाणे दिवाळी-दसरा तोची आम्हा सण। सखे संतजन भेटतील॥ असंही ते म्हणतात.
कवी केशवसुत अर्थात कृष्णाजी केशव दामले यांनी आपल्या कवितेतून ग्रामीण भागातील दिवाळीचं दर्शन घडवलं आहे. शरद ऋतूत शेतीची कामं संपलेली असतात. घरं धनधान्यानं भरल्याने सर्वत्र समाधानाचं वातावरण असतं, पाऊस पडून गेल्यानं निसर्ग हिरवाईने नटलेला असतो. अशा वातावरणात येणारा सण हा निश्चितच उत्साहाने भारलेला, समृद्धीने नटलेला असाच असणार. या कवितेत दिवाळीस शरद ऋतूची राणी असं म्हटलं आहे.
जो गोपाळ गमे प्रभात समई गाई वनीं चारितां,
वाटे रव्यूदयी नदीवर मुनी अर्घ्यास जो अर्पिता,
जो भासे दिवसा कृषीवलशिरी खोवूनिया लोंबरे,
तो आता ऋतू शारदीय बहुदा शेतांतुनी संचरे
राजा जो धनधान्यदायक असे साचा कुबेरापरी,
त्या श्रीमंडित शारदीय ऋतुची राणी दिवाळी खरी
रूपैश्वर्यगुणाढ्य ती जवळ ये; द्याया तिला स्वागता सारेही शुभयोजनात गढले - काही नुरो न्यूनता!
(ही कविता कवी इंद्रजीत भालेराव यांच्या फेसबुक वॉलवरून संग्रहित)
दिवाळी वसुबारसेलाच सुरू होते. त्यानंतरचा धनत्रयोदशी हा दिवस आणि ‘लाविते मी निरांजन’ नाट्यगीत हे एक अद्वितीय समीकरण आहे. ज्या ज्या घरात नाट्यसंगीताची आवड आहे त्या त्या घरात ‘वाहतो ही दूर्वांची जुडी’ संगीतनाटकातील या गीताची आणि गायिका कै. माणिक वर्मा यांची आठवण अवश्य काढली जाते.
लावितें मी निरांजन तुळशीच्या पायापाशी।
भाग्य घेऊनिया आली आज धनत्रयोदशी॥
घरोघरी दीपज्योती वरसाचा मोठा सण।
क्षणोक्षणी होते आई आज तुझी आठवण॥
धनत्रयोदशी या सणाची आठवण करून देणारं हे बहुदा एकमेव गीत असावं. सासरी गेलेल्या लेकीला दिवाळीच्या निमित्ताने आपल्या आईची होणारी आठवण आपल्याही डोळ्यांच्या कडा ओलावून जाते. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी रेडिओवर सकाळी हे गीत आवर्जून वाजवलं जातं. अशाच एका धनत्रयोदशीच्या पहाटे हे गीत वाजत असतानाच माणिक वर्मा यांनी अखेरचा श्वास घेतला हाही एक विलक्षण योगायोग म्हणायला हवा.
दिवाळी म्हणजे चार दिवस नुसती धमाल असते. या निमित्ताने नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या गाठीभेटी होतात. या चार दिवसात नात्यातील ऋणानुबंध अधिक दृढ करणारे दिवस म्हणजे पाडवा आणि भाऊबीज. प्रियकर प्रेयसीच्या नात्यावर, त्यांच्यातील प्रेमावर अनेक कविता, गाणी आहेत. पण पतीपत्नीच्या नात्यातील गोडवा प्रकट करणारं ते माझे घर या गाजलेल्या चित्रपटातील पुढील गाणं दिवाळीच्या निमित्ताने अनेक कार्यक्रमांत गायलं, ऐकलं जातं.
तबकामध्ये इथे तेवती निरांजनाच्या वाती,
दिव्या-दिव्यांची ज्योत सांगते तुझी न माझी प्रीती अशीच या गाण्याची सुरुवात आहे.
समईसंगे आज उजळल्या या नयनांच्या वाती
आकाशातील नक्षत्रांच्या लक्ष लागल्या ज्योती
सुवासिनी मी वाट पाहते घेऊन पूजा हाती
आज उगवला दिन सोन्याचा हितगुज येई ओठी, अशा शब्दात या गीतात पती-पत्नीतील नात्याचा वेध घेतला आहे.
बहीण-भावाच्या नात्याचा वेध घेणारं,
भाऊबीजेवरील सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती हे गीतही विशेष प्रसिद्ध आहे. द्रौपदीला जसा कृष्ण मिळाला, तिच्या पाठीशी कायम उभा राहिला, पृथ्वी आणि चंद्राचं नातं जसं अबाधित राहिलं तसंच आपलंही नातं कायम अबाधित राहो अशी मागणी बहीण या गीतात करते आहे. भाऊबीज या चित्रपटातील हे गीत असून संजीव यांनी लिहिलं आहे. याच गाण्यांसह आली दिवाळी मंगलदायी, आली दिवाळी आली दिवाळी, ओवाळीते मी लाडक्या भाऊराया ही गाणीदेखील मराठीत विशेष प्रसिद्ध आहेत.
दिवाळीत दिव्याला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. दीपावली या शब्दातच दीप आहे. पणत्या लावून आपणही अंगण सुशोभित आणि प्रकाशमान करतोच की. लखलख चंदेरी या गीतात दिव्यांच्या प्रकाशामुळे उजळलेल्या धरतीचं वर्णन केलं आहे. कवी वि. म. कुलकर्णी यांच्या 'आधी होते मी दिवटी', या कवितेत दिव्यांच्या बदललेल्या रूपांचं वर्णन करतानाच त्याचं महत्त्वही विशद केलं आहे.
एकच ठावे काम मला, प्रकाश द्यावा सकलांला । कसलेही मज रूप मिळो, देह जळो अन्‌ जग उजळो।
तर.
जेथे ज्योती तेथे लक्ष्मी,
उभी जगाच्या सेवाधर्मी
दिशादिशांतुन या लक्ष्मीच्या
दिसती पाउलखुणा,
अशा शब्दांत 'शुभंकरोति म्हणा' या गीतातही असंच वर्णन केलं आहे.
कवी शंकर रामाणी यांनी ‘तमाच्या तळाशी दिवे लागले’ या आपल्या कवितेत एखाद्याचं आयुष्य प्रकाशमान झालं तर किती फरक पडतो हे स्पष्ट केलं आहे. हे थेट दिवाळीचं गाणं वा कविता नसली तरी, प्रकाशाचं आपल्या आयुष्यातलं महत्त्व मात्र, ही कविता नक्की अधोरेखित करते.
दिवाळी ही अशी शब्दात उमटली, सुरांत नटली आणि रमणीय झाली. सणाच्या निमित्ताने या सांस्कृतिक संचिताचा हा ओझरता आढावा तुमचीही दिवाळी आनंदाची करेल अशी आशा आहे.
- मृदुला राजवाडे