खोल विषयाबद्दल बोलणाऱ्या 'पृथ्वीमोलाच्या गोष्टी'

युवा विवेक    11-Nov-2021   
Total Views |

खोल विषयाबद्दल बोलणाऱ्या 'पृथ्वीमोलाच्या गोष्टी'


vishay khol_1   

मानसिक आरोग्याबद्दल बोलण्याची गरज तशी पूर्वीपासून होतीच. कोव्हिडच्या साथीने जो हाहाकार माजवला, त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून ती आणखी वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर 'विषय खोल' या युट्युब चॅनेलवर 'गोष्ट आहे पृथ्वीमोलाची' ही सहा लघुपटांची मालिका नुकतीच प्रदर्शित झाली आहे. सहा वेगवेगळ्या समस्यांवर भाष्य करणारी ही मालिका अनेक कारणांनी महत्त्वाची ठरते. मानसिक आरोग्याबद्दल बोलताना अगदी सहज, त्यासोबत येणारे बोजड शब्द टाळून अतिशय सोप्या भाषेत ही मालिका आपला हेतू साध्य करते.

 

'गोष्ट अर्जुनची' हा पहिला लघुपट दारूच्या आहारी गेलेल्या तरुण अर्जुनची गोष्ट सांगतो. एकदा तो घरी येतो, तेव्हा त्याची आई त्याला दारूचा ग्लास हातात घेऊन बसलेली दिसते. तिने स्वयंपाकही केलेला नाही, हे पाहून अर्जुन चिडतो. आई गप्पांमधून त्याच्या मनात काय चाललंय, ते जाणून घेऊ पाहते. वडिलांच्या मृत्यूनंतर सैरभैर झालेल्या अर्जुनने दारूचा आधार घेतला आहे. त्यात त्याची गर्लफ्रेंड नेहा त्याला सोडून गेली आहे. या सगळ्याने खचून गेलेला तो रडू लागतो, तेव्हा आई त्याला थांबवत नाही, उलट 'रड' म्हणते. यातच सुसंवादाची सुरुवात दडली आहे. "हे सगळं माझ्याच वाट्याला का?" असं अर्जुन म्हणतो, तेव्हा आई त्याला अगदी सहज आयुष्यात मिळालेल्या चांगल्या गोष्टींकडे पाहायला सांगते. 'डेट विथ आई' हा या लघुपटाचा हॅशटॅग समर्पक वाटतो.

 

दुसरा लघुपट 'गोष्ट महेशची'. बाप आणि मुलाच्या नात्याबद्दल मोजक्याच संवादांतून अलवार भाष्य करतो. महेशचे वडील त्याला एका मुलीसोबत सेल्फी घेताना आणि गप्पा मारताना पाहतात. घरी आल्यानंतर महेशला कळतं की आई मावशीकडे गेली आहे. सुतावरून स्वर्ग गाठणारे वडील त्या मुलीबद्दल महेशला विचारतात आणि संवादाची गाडी कुठल्या दिशेने चालली आहे, हे कळताच महेशच्या डोक्यात तिडीक जाते. पण न चिडता तो वडिलांना नेमका कशाचा राग आलाय, हे विचारतो. त्यावर ते निरुत्तर होतात आणि आपल्या मनातली शंका बोलून दाखवतात. स्वतःची चूक नसल्याची खात्री असल्याने आपल्या मैत्रीवर शंका घेणाऱ्या वडिलांचा राग महेश कसा शांत करतो, हे पाहणं महत्त्वाचं आहे. 'फ्रेंड रिक्वेस्ट' हा या लघुपटाचा हॅशटॅग वडिलांच्या आणि मुलाच्या नात्यात नव्याने रुजणाऱ्या मैत्रीबद्दल काही सांगू पाहतो.

 

स्पर्धा परीक्षेमधलं सततचं अपयश, घरून लग्नासाठी वाढणारा दबाव या सगळ्यांतून बाहेर पडण्याचा मार्ग न दिसणाऱ्या एका तरुण मुलीची कथा 'गोष्ट प्रियाची' हा लघुपट सांगतो. मेसमध्ये उशिरा परतलेल्या प्रियाला मेसवाल्या मावशी दटावतात. प्रियकराच्या एका फोनने प्रियाचा मूड बिघडतो आणि ती काहीतरी टोकाचा निर्णय घेणार, इतक्यात मावशी तिच्या रूमवर येतात. तिच्याशी गप्पा मारतात. आठ वेळा प्रयत्न करूनही परीक्षा पास न झालेल्या आणि तरीही जिवंत असेपर्यंत धीर न सोडलेल्या रत्नाकरबद्दल सांगतात. स्वातंत्र्य, जबाबदारी, जगणं, परीक्षा या सगळ्याबद्दल स्वतःच्या अनुभवातून आलेलं काही प्रियाला देऊ पाहतात. "तुझी घुसमट ज्याला समजत नाही, त्याचं प्रेम तरी आहे का ग तुझ्यावर?" या त्यांच्या वाक्याने प्रिया विचारात पडलेली दिसते. एका अतिशय गोड, गमतीशीर वळणावर 'बिगिन अगेन' या हॅशटॅगसह येणारा हा लघुपट संपतो.

 

'डू आय नो यू' या हॅशटॅगमध्येच चौथ्या लघुपटाचं सार आहे. 'गोष्ट अवंतीची' ही कथा विखारी नातं नाकारणाऱ्या एका धाडसी मुलीची आहे. लग्नापूर्वी जयदीप आणि अवंती एकांतात जयदीपच्या नवीन घरी भेटतात. लघुपटाच्या सुरुवातीपासूनच लग्नाची खरेदी, प्री-वेडिंग शूट यांबद्दलच्या सूचक संवादांतून जयदीपचं अवंतीला गृहीत धरणं अधोरेखित होतं. एकमेकांना जाणून घेऊ या, असं म्हणत जयदीप अवंतीच्या पूर्वायुष्यात नको तितका डोकावू लागतो, तेव्हा खटका उडतो. पुरुषसत्ताक परंपरेचा पाईक असलेल्या जयदीपला स्वतःची चूकही कळत नाही. ती चूक अवंती लक्षात आणून देते, तेव्हा त्याचा पुरुषी इगो दुखावतो. या लघुपटात ज्या विषयावर थेट भाष्य केलं आहे, त्याव्यतिरिक्तही एक फार लहानशी, पटकन लक्षात न येणारी, पण सुंदर गोष्ट आहे. जयदीपची ओळख सावनीने अवंतीशी करून दिलेली आहे, त्यामुळे तिला अपराधी वाटतं आहे. त्या वेळचं अवनीचं वाक्य फार समजूतदारपणाचं आहे.

 

आयटीमध्ये काम करणाऱ्या एका युवकाची आणि खेड्यांतून उपजीविकेसाठी मोठ्या शहरात येणारे अनेक तरुण-तरुणी जिच्याशी स्वतःला रिलेट करू शकतील, अशी कथा 'गोष्ट साईनाथची' या पाचव्या लघुपटात सांगितली आहे. कळत-नकळत आपण माणसांचे गट पाडत असतो. मग कोण आपल्या गटात आणि कोण दुसऱ्या, यावरून एकमेकांचे पाय खेचले जातात. त्यामुळे कुणाचं मानसिक खच्चीकरण होत असेल, एखादी व्यक्ती कोशात जात असेल, हे आपल्या मनातही येत नाही. कॉर्पोरेट ऑफिसमध्ये घडणाऱ्या या कथेला प्रेझेंटेशनची पार्श्वभूमी आहे. ऑफिसमधल्या एका प्रेझेंटेशनची तयारी चालू आहे आणि तरुण मुलामुलींचा एक गट त्यावर चर्चा करतो आहे. त्यात काहीतरी चुकल्यामुळे कोड नीट काम करत नाहीये. हुशार साईनाथ ती चूक दुरुस्त करतो, पण त्यामुळे त्याला त्याच्या भाषेवरून, राहणीमानावरून जोखणं त्याच्या सहकाऱ्यांनी सोडलेलं नाही. अशा वेळी त्याच्या बॉससोबत (जी एक स्त्री आहे) झालेला काही मिनिटांचा संवाद साईनाथला विचार करायला भाग पाडतो. भाषा, वर्ण, कपडे, रंग आणि इतर असंख्य गोष्टींवरून माणसामाणसांमधल्या भिंती कशा वाढत चालल्या आहेत, हे दाखवतानाच हा लघुपट त्यावरचा उपायही सांगतो. 'क्लोज्ड ब्रॅकेट्स' ही कोडिंगमधली संज्ञा इथे हॅशटॅग म्हणून वापरली आहे. ती माणसांच्या संकुचित विचारसरणीवरही नेमकं बोट ठेवते.

 

'कपल गोल्स' हा हॅशटॅग घेऊन येणारा 'गोष्ट अभि-अनूची' हा लघुपट एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या, परंतु आता वेगळं होण्याच्या मार्गावर असलेल्या एका दांपत्याची गोष्ट सांगतो. लघुपटांच्या या मालिकेचा शेवट एका सायकिऍट्रिस्टच्या थेरपी सेशन्सच्या दृश्यांनी व्हावा, ही योजना समर्पक वाटते. लोकांच्या नजरेत अप्रतिम केमिस्ट्री असलेले अभि-अनू एकमेकांचे वाभाडे काढतात, तेव्हा फार वेगळे भासतात. त्या प्रतिमेत अडकून राहायचं की वेगळं व्हायचं, हा विचार त्यांना सतावतो आहे. तरीही एका सुखद वळणावर ही कथा संपते, तेव्हा 'चलो एक बार फिर से अजनबी बन जाएँ हम दोनों' या गाण्याची आपल्याला सहज आठवण होते. 'स्वतःशी असलेलं नातं स्वच्छ नसलं, तर इतर नातीसुद्धा हळूहळू पोखरायला लागतात' हे या लघुपटातील वाक्य सगळ्या समस्यांचं उत्तर देऊन जातं.

 

या सर्वच कथांना जोडणारा एक सामान धागा आहे, तो म्हणजे संवादाचा. काही कथांमध्ये स्वतःच्या रागावर प्रयत्नपूर्वक नियंत्रण ठेवून सुसंवाद साधणारी माणसं दिसतात, तर काही कथांमध्ये टोकाच्या भूमिका घेऊ पाहणाऱ्या, हरलेल्या माणसांना सावरणारी. न जुळणारी नाती ओढत नेण्यापेक्षा ती शांतपणे तोडणारी माणसंही दिसतात. आजच्या तरुणाईसमोर असलेले नातेसंबंधांचे, स्पर्धेचे, एकटेपणाचे प्रश्न मांडणारे हे सहा लघुपट विविध विषयांना स्पर्श करत असतानाच संवादाचं महत्त्व नव्याने पटवून देतात. इतकंच नाही, तर लघुपटांच्या शेवटी मानसिक आरोग्यासाठी काही मदत हवी असल्यास हेल्पलाईन नंबर्सही दिले आहेत. लघुपट प्रदर्शित झाले, तेव्हा प्रत्येक लघुपटाला अनुसरून फेसबुक लाइव्हचेही आयोजन करण्यात आले होते. 'विषय खोल'चा हा प्रयत्न म्हणूनच स्तुत्य आणि सर्वांनी आवर्जून पाहण्याजोगा आहे.

- संदेश कुडतरकर.