रिॲलिटी शो की भावनांचा बाजार...

युवा विवेक    13-Dec-2021   
Total Views |

रिॲलिटी शो की भावनांचा बाजार...

 
reality show_1  

स्पर्धकांच्या गरिबीचं हलाखीचं वर्णन, स्पर्धकांच्या आणि परीक्षकांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू, स्पर्धकांच्या घरापर्यंत जाऊन त्यांच्या परिस्थितीचं केलेलं वर्णन, त्याच्या पार्श्वभूमीवर करूणरस प्रकट करणारं पार्श्वसंगीत, भले मोठे पॉझेस हे प्रकार हल्ली जवळपास प्रत्येक रिॲलिटी शोमध्ये पहायला मिळतात. याबाबत, मोकळेपणे भावना व्यक्त करायला वाव मिळाला याचा आनंद मानावा की भावनांचा हा बाजार आहे असं वाटून खेद व्यक्त करावा अशा संमिश्र भावना अशा वेळी मनात येतात.

 

साधारण २५ वर्षांपूर्वी रिॲलिटी शो नामक प्रकारांनी भारतीय मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला. खासगी वाहिन्यांच्या आरंभानंतर सुरु झालेले झी वरील सारेगम, अंताक्षरी आणि सोनीवरील डान्सचा शो बुगीवुगी हे भारतातले पहिले रिॲलिटी शो मानता येतील. अत्यंत दर्जात्मक आणि सकस अशा या शोज नी अनेकांना कला आणि मनोरंजन क्षेत्रात प्रगतीची दारं खुली केली. अनेक नामवंत पार्श्वगायक, संगीतदार, गीतकार, शास्त्रीय-उपशास्त्रीय गायक, लोकगीत गायक असे अनेक मान्यवर या कार्यक्रमांना परीक्षक म्हणून उपस्थित असत. सोनू निगमसारखा गायक तेव्हा उमेदवारीच्या काळात होता आणि सिनेसंगीत क्षेत्रात स्थिरावू पाहात होता. 'बुगीवुगी'सारख्या डान्स रिॲलिटी शो ने अनेक आघाडीचे नर्तक-नृत्य दिग्दर्शक कला क्षेत्राला दिले. परीक्षकही आपापल्या क्षेत्रात ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ स्थानी पोहोचलेले असेच होते.विशेष म्हणजे, सारेगम सारख्या रिॲलिटी शो किंवा ज्याला आपण 'टॅलेंट हंट शो'ची प्राथमिक फेरीच अत्यंत कठीण असे. अशा दोन तीन टप्प्यांच्या फेऱ्या पूर्ण केल्यावरच तुम्हाला प्रक्षेपित होणाऱ्या शोमध्ये स्थान मिळत असे. त्यानंतरच्या टप्प्यातही अत्यंत परखडपणे परीक्षण केलं जाणं हा अनेक वाहिन्यांसाठी महत्त्वाचा विषय होता.

 

कालांतराने वाहिन्या वाढत गेल्या, तसतसे रिॲलिटी शोजही वाढत गेले. इंडियन आयडल आणि डान्स इंडिया डान्स (१), झी वरील मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरू झालेले सारेगम यांनी पुन्हा एकदा सर्वसामान्यांसाठी माध्यमांची दारं खुली केली. सुरुवातीच्या टप्प्यात आकर्षक वाटणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये हळुहळू स्पर्धकाचे नातेवाईक, परिचित यांनाही बोलण्याची संधी मिळू लागली. यामुळे स्पर्धेला एक भावनिक वलय प्राप्त होण्यास सुरुवात झाली. जवळपास प्रत्येक वाहिनीवर तीन ते चार प्रकारचे रिॲलिटी शोज सुरू झाले आणि हा प्रवास आजही तसाच सुरू आहे. नृत्य, गायन, समूहनृत्य, त्यातही मोठ्यांचे आणि छोट्यांचे असे वेगवेगळे शो सध्या अनेक प्रादेशिक आणि हिंदी मनोरंजन वाहिन्यांवर सुरू असतात.

 

गेल्या जवळपास सात-आठ वर्षांत एक नवा प्रकार या स्पर्धांमध्ये सुरू झाला आहे. स्पर्धेत संवेदनशीलता किंवा नाट्यमयता आणण्यासाठी वेगवेगळे स्टंट्स करणं, स्पर्धकांमधील अत्यंत क्षुल्लक वाटावेत आणि आक्षेपार्ह नसावेत असे वाद थेट प्रेक्षकांपुढे आणणं, एखाद्या स्पर्धकाची परिस्थिती खरोखरच हलाखीची असेल किंवा भारतातील अत्यंत दुर्गम आणि खडतर भागात तो राहात असेल तर त्याचं चित्रण करून ते फुटेज दाखवणं, भल्यामोठ्या सेटवर त्यांना वा त्यांच्या पालकांना अत्यंत साधारण वेशात आणणं, घरातल्या एखाद्याशी त्या स्पर्धकाचा वाद असेल तर तो सांगणं, परीक्षकांनी तटस्थपणाच्या आणि सुरांच्या वा पदलालित्याच्या निकषांकडे प्रसंगी दुर्लक्ष करून सादरीकरणाच्या प्रेमात पडून प्रतिक्रिया देणं, पावलोपावली डोळ्यातून अश्रू काढणं, अंतिम फेरीत गेलेल्या स्पर्धकांमध्ये चुरस वाढवण्यासाठी नाट्यमय वातावरण सेटवर निर्माण करणं, एखादं गाणं आवडल्यावर वा नृत्य आवडल्यावर त्या आठवड्याच्या विशेष परीक्षकांनी स्पर्धकाची एकूण खोली वा परिश्रम घेण्याची तयारी न पडताळता त्याला संबंधित क्षेत्रात संधी देणं असे अनेक प्रकार कार्यक्रमांच्या सेटवर घडताना दिसून येतात.

 

मी गेली अनेक वर्षे म्हणजे शालेय जीवनापासूनच गाण्याचे, नृत्याचे अनेक रिॲलिटी शो पाहात आले आहे. त्यात काही उपक्रम खरोखरच स्तुत्य होते. खरोखर अनेक चांगले गायक या स्पर्धांमुळे कलाक्षेत्रात स्थिरावले; पण गेल्या सात ते आठ वर्षांत या स्पर्धांमध्ये घडून आलेला बदल पाहताना वाटतं की या सगळ्या नाट्यमयतेत सूर आणि ताल कुठे तरी हरवत चालले आहेत. अनेक स्पर्धकांना कठोर परिश्रमांपूर्वीच ग्लॅमरचा अनुभव देणाऱ्या या स्पर्धा आहेत. ही स्थिती अत्यंत धोक्याची आहे. थोडं बारकाईने पाहिलं तर, आपल्या लक्षात येतं की, गेल्या आठ दहा वर्षांतील अनेक स्पर्धाविजेत्यांची नावंही आपण आज विसरून गेलो आहोत. त्यात जे सुराला पक्के होते, मेहनत करत राहिले, जे नर्तक तालाला आणि रियाजाला पकडून राहिले ते स्थिरावले. बाकीचे स्पर्धेतील तारे या नाट्याच्या आणि वेळेआधी मिळालेल्या प्रसिद्धीच्या धुक्यात हरवून गेले.

 

गेल्या तीन-चार वर्षांत ज्या ज्या गाण्याच्या स्पर्धा मी पाहिल्या, त्यातले खूप कमी स्पर्धक मला नियमित सराव करणारे आणि सुराला पक्के वाटले.(हे वैयक्तिक मत आहे.) अशा वेळी होणारं कौतुक हे त्या कलाकाराला योग्य दिशा देईल की, ही स्तुती त्याच्या सुधारणेला अटकाव करेल? अशी एक शंका मला कायम सतावते; पण मुळात महत्त्व कशाला असावं? जी कला सादर करण्यासाठी रिऍलिटी शो सुरू झाला आहे तिला की या नाट्याला? आपल्या नाट्यमयतेत सूर आणि ताल हरवत चालले आहेत का? हे नाट्य कदाचित प्रेक्षक विसरतील; पण ज्या समाजात स्पर्धक, त्यांचे नातेवाईक राहात आहे तिथे त्यांच्यासाठी ते त्रासदायक ठरू शकेल का? जर ते तयार केलेलं नाट्य असेल व मूळ परिस्थिती वेगळी असेल तर, त्यांच्यावर खोटेपणाचा कायमचा शिक्का बसेल का? ज्या ग्लॅमरची सवय आपण स्पर्धकांना लावतो आहोत, ते स्टेटस मेन्टेन करणं त्याला शक्य आहे का? या व अशा अनेक बाबींचा विचार हा भावनांचा बाजार भरवण्यापूर्वी वाहिन्यांनी करायला हवा. अन्यथा रिॲलिटी शोजच्या 'रिॲलिटी'वरच प्रेक्षकांना अविश्वास निर्माण होईल.

- मृदुला राजवाडे