प्री-वेडिंग फोटोशूट, करावं, पण जपून !

युवा विवेक    06-Dec-2021   
Total Views |

प्री-वेडिंग फोटोशूट, करावं, पण जपून !


pre wedding_1   

गेल्या दोन वर्षांत विवाहेच्छुकांना आनंदाशी खूप तडजोडी कराव्या लागल्या. काहींना लग्न पुढे ढकलावं लागलं तर, काहींना ते कमीतकमी पाहुण्यांच्या उपस्थितीत करावं लागलं. आता तुळशीच्या लग्नानंतर पुन्हा एकदा सनई-चौघडे वाजू लागतील. घरोघरी उपवर मुलामुलींचे विवाहसोहळे होतील. गेल्या काही वर्षांत लग्नाचा ट्रेंडही बदलला असून, पारंपरिक विधींची जोड मिळाली आहे ती बॅचलर्स-स्पिनस्टर पार्टी, मेहंदी-संगीत, प्री-वेडिंग गेटटुगेदरची ! अर्थात हे क्षण आधुनिक परंपरेतले असले तरी, आपल्या आनंदात भरच घालत असतात. यात गेल्या साधारण आठ वर्षांत आणखी एका परंपरेची भर पडली आहे. ती म्हणजे प्री वेडिंग फोटोशूटची.

 

हल्ली कोणत्याही विवाह सोहळ्याला गेलो तर, तिथे एक स्क्रीन आणि त्यावर वरवधूच्या प्री-वेडिंग फोटोशूटचे रेकॉर्डिंग प्ले होत असते. आनंददायी क्षण कॅमेऱ्यात कैद करून जपून ठेवावेसे वाटणं यात काहीच गैर नाही. पुढे हीच छायाचित्र आठवणी जागृत करतात. काही वेळा दुखावलेल्या किंवा थकलेल्या मनाला रमवतात. वेडिंग फोटोग्राफी ही अनेक दशकं केली जात असली तरी, भारतात प्री-वेड फोटोग्राफीला साधारण दहा वर्षांपूर्वी सुरुवात झाली. समाजमाध्यमांवर मित्र मैत्रिणींच्या प्री-वेडचे फोटो पहायला सुरुवातीला गंमतही वाटली, पण कालानुसार होत जाणारा प्रत्येक बदल हा अनेकदा दुधारी असतो. काही वेळा तो सकारात्मक असतो तर, काही वेळा जन्मभराची ठसठसणारी जखम होऊन बसतो.

 

लग्न ठरल्यानंतर ते होईपर्यंतचा काळ, ज्याला आपण कोर्टशिप पीरियड म्हणतो तो अत्यंत स्वप्नवत आणि आयुष्यात एकदाच अनुभवायला मिळणारा काळ असतो. यातले अनेक क्षण हे अत्यंत हवेहवेसे, खासगी आणि मुठीत लपवल्या जाणाऱ्या मोत्यांसारखे प्रेशियस म्हणता येतील असे असतात. स्मार्ट तंत्रज्ञानाच्या युगात प्री-वेडिंग फोटोशूटच्या निमित्ताने असे क्षण कॅमेऱ्यात कैद करायला सुरुवात झाली. सुरुवातीला श्रीमंत वर्गात सुरू असणारा हा ट्रेंड हळूहळू सर्वच वर्गांमध्ये पसरू लागला. यामुळे मार्केटिंगचा एक नवा आयाम छायाचित्रकारांसाठी खुला झाला, पण काही वेळा खरोखरच छायाचित्रकार या क्षणांना आपल्या कल्पनाशक्ती आणि तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करून अक्षरशः प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कटअसं रूप देतात.

 

इथपर्यंत सारं काही ठीक, पण मुळात फोटोग्राफरसारख्या परक्या व्यक्तींसमोर आपले खासगी क्षण कोणत्या पातळीपर्यंत उघड करायचे याचं भान अनेकदा राहात नाही. आपण नेटवर शोधलं तर, अनेकदा अश्लीलतेकडे झुकणारे फोटो प्री वेडिंगच्या निमित्ताने काढले जातात. फोटोग्राफरने कल्पना सुचवली तरी, आपण त्यातलं काय स्वीकारायचं आणि काय नाही हे ही ठरवायला हवं. मध्यंतरीच्या काळात एक प्रीवेडिंग अत्यंत खासगी क्षणांचं प्रीवेडिंग फोटोशूट एका किल्ल्यावर करण्यात आलं. अशा वेळी त्या वास्तूचं, त्या देदीप्यमान इतिहासाचं गांभीर्य आणि पावित्र्य भंग होतं, इतकी महत्त्वपूर्ण बाब आपल्याकडून कशी दुर्लक्षित राहते? अशाच घटनांमुळे आता अनेक किल्ल्यांवर प्रीवेडिंग फोटोशूटला बंदी करण्यात आली आहे. हल्ली प्री वेडिंगप्रमाणेच मधुचंद्राचे फोटोही काढण्याचा ट्रेण्ड आहे. त्यातही खासगी क्षणांचं चित्रीकरण करताना भान सांभाळणं अत्यंत आवश्यक आहे.

 

आपण केवळ आपल्या कोर्टशिप पीरियडमधील सुखद स्मृती जपण्यासाठी हे करतोय हा विचार एक वेळ प्री वेडिंग फोटोशूट करताना मान्य करू, पण हे फोटो समाजमाध्यमांवर टाकून लाइक्स मिळवण्याचा अट्टाहास हा अत्यंत खेदकारक आहे. पब्लिक डोमेनमध्ये आलेले फोटो, व्हिडिओ हा सुटलेला आणि परत न येणारा बाण आहे. खरं तर प्रत्येक विवाह हा यशस्वी व्हावा अशीच आपली इच्छा असते, पण कधी स्वभाव जुळत नाही, तर कधी परिस्थिती त्यामुळे काही जोडपी लग्नानंतर विभक्त होतात. अशा वेळी या खासगी फोटोंचा वापर हा ब्लॅकमेलिंग किंवा कोर्ट केसमध्ये पुरावा किंवा तत्सम कारणांसाठी केला जाऊ शकतो. काही वेळा हे फोटोच पुनर्विवाहास अडथळा ठरू शकतात किंवा पुनर्विवाहाची मानसिकता तयार होण्याला अटकाव करू शकतात.

 

आपली समाजामध्ये, घरामध्ये, नातेवाईकांमध्ये, ज्या घराशी आपण जोडले जाणार त्या घरात, आपल्या कार्यालयात, विविध सार्वजनिक ठिकाणी आपली अत्यंत चांगली प्रतिमा असते. अनेकदा या खासगी क्षणांना सोशल मीडिया नामक चावडीवर आणल्यामुळे या प्रतिमेस तडे जाऊ शकतात. त्यामुळे प्रीवेडिंग फोटोशूटमधील नेमके कोणते फोटो आपण या चावडीवर टाकावेत हे भान आपणच सांभाळलं पाहिजे. त्याचप्रमाणे लग्नाच्या दिवशी असे फोटो वा व्हिडिओ मोठ्या स्क्रीनवर दाखवणं घरातल्यांना कानकोंडं ठरू शकतं. मागच्या पिढीतील नातेवाइकांना ते खटकू शकतं किंवा प्रसंगी नापसंतही असू शकतं. त्यामुळे त्यातही कोणते फोटो असावेत याचे निकष नवदाम्पत्याने निश्चित करायला हवेत.

 

अर्थात, या ट्रेण्डला आपला नकार आहे असं मात्र अजिबात नाही. एक दोन वर्षांपूर्वी एका प्रीवेडिंग फोटोशूटमध्ये त्या दाम्पत्याने महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाईंचा वेष परिधान करून, अत्यंत सांस्कृतिक वातावरणात केलेलं चित्रीकरण आकर्षणाचा विषय ठरलं होतं. असे अनेक यापुढे येतच राहतील. त्यातलं काय निवडायचं आणि कशाला विरोध दर्शवायचा, हे त्या वधू-वराने ठरवायला हवं. सुशिक्षित आपण आहोतच, आता थोडे सजग होऊ या. क्षण एक पुरे प्रेमाचा असं म्हणत रमणीय आठवणी कॅमेऱ्याप्रमाणेच मनातही जपू या, वाढवू या, सांभाळू या.

 

- मृदुला राजवाडे