बिटकॉइन नाती

युवा विवेक    13-May-2021   
Total Views |

relations_1  H  
"तुमच्या पिढीला नात्यांची किंमतच नाही," इथून सुरवात झालेल्या लेक्चरची पुढची वाक्ये सगळ्यांना पाठ असतील. मजेची गोष्ट म्हणजे जवळपास प्रत्येक पिढीने नवीन पिढीला हे वाक्य ऐकवले आहे. आता इतक्या पिढ्यांपासून नात्यांची किंमत जर कमी होते तर, आतापर्यंत शून्य किंवा निगेटिव्ह व्हायला हवी, पण तसं नाहीये, माणूस आहे तोपर्यंत नाते राहतीलच. त्याची किंमतही राहील फक्त स्वरूप बदलेल. आधी कसं सगळे व्यवहार रोख रक्कम देऊन होतात पण हळूहळू क्रेडिट, डेबिट कार्डपासून मोबाईल वॉलेट आलेत तसंच.
मागील पिढीतील लोक नेहमी म्हणतात, "आम्ही आजोळी जायचो, आमचे इतके नातेवाईक होते. कधी कोणत्या गावाला गेलो तर नातेवाईकांकडेच उतरायचो, काही ऑकवर्ड वगैरे वाटायचे नाही. तुमच्या पिढीच्या मुलांचे नखरेच फार!!" यात चुकीचं तसं काही नाही पण त्यालाही कारणे आहेत. कोणतेही नाते टिकायला दोन गोष्टी महत्वाच्या असतात, समाज आणि इच्छा. कसं ते पाहू.
आपल्या आयुष्यातील बरीचशी नाती फक्त समाजाच्या बंधनांमुळे किंवा नियमांमुळे टिकून असतात. आई-वडील, भाऊ-बहीण यासारखी जवळची रक्ताची नाती तर असतातच पण दूरच्या नात्यांशी वागताना, पण समाजाच्या नियमांचे पालन करावे लागते. यामुळेच पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती टाकायची. यात कमावणारे, घरातील काम करणारे लोक मोजकेच असायचे. जे वयाने मोठे असायचे, त्यांच्यावर जबाबदारी जास्त, काम जास्त आणि बाकीचे आरामात जगायचे. आजी-आजोबांना विचारले तर लक्षात येईल, की संपूर्ण आयुष्य काहीही न करता आरामात घालवलेले लोक होते. त्यांची लग्ने, मुले, संसारही झाले. फक्त इतकेच नाही तर शेजारी राहणारे लोक एकमेकांना मदत करायचे कारण ते एकमेकांवर अवलंबून असायचे. दूरचे नातेवाईक, शेजारचे लोक सणावार, लग्नकार्य, अडी-अडचणीला उपयोगी पडतील म्हणून त्यांच्याशी संबंध जोडले जायचे आणि ते टिकूनही राहायचे. लोकांकडे पैसे, सोयीसुविधा कमी होत्या त्यामुळे एकमेकांचा आधार लागायचा. हि व्यावहारिक कारणे असली तरी त्यातून छानसे नातेही तयार व्हायचे, आपुलकी असायची, सहवासाने माणसांची मने जवळ यायची आणि मग फक्त गरजेपुरती सुरू झालेली नाती आयुष्यभरासाठी टिकून राहायची. या सगळ्यात समाजाचा धाक असायचा, निदान सुरवातीला तरी. त्याविरुद्ध आवाज उठवायला किंवा ते नियम झिडकारून टाकण्याइतके स्वातंत्र्य, हिंमत आणि पैसा नव्हता.
नोकरी, शिक्षणानिमित्त लोकांनी गावं सोडली आणि विभक्त कुटुंबपद्धतीचा उगम झाला. कमावणारे हात वाढले, एकमेकांवर अवलंबून राहण्याची गरज उरली नाही आणि मग त्यामुळे जोडली गेलेली नाती विरळ होऊ लागली, पण लोकांच्या आयुष्यात लोकंच नव्हते असं नाही. नवीन मित्रपरिवार, ऑफिसमधील सहकारी, नवीन शेजारी वगैरे मंडळी होतीच. आता हे सगळे आवडीनिवडी, वैचारिक आणि आर्थिक समानता यामुळे तयार झालेले मग या गोष्टी संपल्या किंवा बदलल्या की नातेही संपुष्टात येते. शिवाय एकमेकांवर काही उपकाराचे ओझे नसल्याने नाते तोडणे सोपे होते. इथे सामाजिक नियमांचा धाक वाटत नाही, लोक काय म्हणतील याची पर्वा वाटत नाही. मग निष्कर्ष निघतो, "आजकाल नात्यांची किंमत उरली नाही."
आता दुसरा मुद्दा पाहू. इच्छा. कधीकधी आपल्याला स्वतःला एखादे नाते जोडावे, ते टिकवून ठेवावे असे वाटते. इथे मुख्यतः आवडीनिवडी, वैचारिक समानता यासोबत नैसर्गिक ओढ असते. ही ओढ प्रेमाच्या स्वरूपात किंवा मैत्रीच्या स्वरूपात असते. बऱ्याचदा रक्ताची नातीही यामुळे टिकून राहतात, जसं कि चुलत बहीण-भाऊ, काही नातेवाईक. "तसं तर आम्ही दूरचे नातेवाईक आहोत, पण आमचं सख्ख्यांपेक्षा चांगलं पटतं." असं म्हणणारे अनेक लोक असतात. ही स्वतःच्या इच्छेमुळे तयार झालेली नाती सर्वांत चांगली असतात. टिकवायची असतील, तर दोन्ही व्यक्तींना टिकवायला प्रयत्न करावे लागतात. इथे वय, रंग-रूप, शिक्षण यासारख्या मर्यादाही नसतात. मैत्री हा या नात्यांचा पाया असतो. यात सोशल मीडियावर झालेली मैत्रीही येते. ही नाती जिजक्या लवकर बनतात तितक्या लवकर तुटूही शकतात. कारण "त्यावेळी मला केलेली मदत मी आयुष्यभर विसरू शकत नाही." अशी जोड इथे नसते. भावनिक आधार मात्र नक्कीच असतो. प्रत्यक्ष मदत, आर्थिक मदत यांच्याइतकेच भावनिक आधाराला महत्त्व देणारी माणसे मैत्री टिकवून ठेवतात. इथेही दुसरा भावनिक आधार मिळाला की माणसे दूर जाऊ शकतात. मनाच्या नात्यांचे, भावनिक आधाराचे कुठे काही पुरावे नसतात, हे तुमच्या मानण्यावर अवलंबून असते.
आज मोठ्या प्रमाणावर लग्न मोडतात त्याचेही हेच कारण आहे. पूर्वी नवरा-बायको एकमेकांवर अवलंबून होते, समाजाच्या नियमांचा धाक वाटायचा. शिवाय आयुष्य सोपे होते आणि आयुष्यभराच्या जोडीदाराच्या भोवतीच फिरणारे होते. आता परिस्थिती बदलली आहे. लग्न हा आयुष्याचा भाग आहे, पूर्ण आयुष्य नाही. हेच मित्र, करियर, नातेवाईक, इतर नाती यांना लागू होते. आता सर्वांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे, स्वातंत्र्य आहे त्यामुळे समाज म्हणतो म्हणून किंवा एकमेकांवर अवलंबून आहोत म्हणून नाती बनवायची, जपायची कोणाला गरज वाटत नाही. या नात्यांचे वय कदाचित कमी असेल कारण एकाने प्रयत्न थांबवले तरी ते नाते संपुष्टात येऊ शकते. सध्या जी नाती टिकतात, त्यातली बरीचशी फक्त त्या दोन व्यक्तींच्या इच्छेवर आणि प्रयत्नांवर अवलंबून असतात. या नात्यांवर तुमचे घर किंवा आयुष्य अवलंबून नसते. "I can live without you but I want you!" ही टॅगलाईन असलेली, मेहनतीने टिकवलेली, फारशा अपेक्षा नसलेली, बिटकॉइन सारखी नाती अधिक मौल्यवान आणि पारदर्शक नाहीत का?? अशा नात्यांची किंमत मोजणार तरी कशी? कोण म्हणतं, नात्यांना किंमत उरली नाहीय?
- सावनी