रंग रंग मेरे रंग रंग मे

युवा विवेक    13-May-2021   
Total Views |

colour_1  H x W 
रंगांची दुनिया डोळ्यांना, मनाला भुरळ घालणारी असते. इतके सगळे रंग कसे निर्माण झाले असतील, कुणी तयार केले असतील, त्यांना इतकी छान-छान नावं कुणी दिली असतील असे प्रश्न न पडणारी व्यक्ती विरळच! त्यात वसंत ऋतूचं आगमन झालं की, विचारायलाच नको. मोहरणाऱ्या आंब्यापासून बहरणाऱ्या पळसापर्यंत आणि नाजूकपणे फुलणाऱ्या अबोलीपासून ते घमघमत सुटणाऱ्या मोगऱ्यापर्यंत सगळ्या रंगांनी आपला ताबा घेतलेला असतो. मग येते होळी – रंगांचा सण! सण म्हणजे धमाल, मजा-मस्ती, थट्टामस्करी तर आलीच; शिवाय नवीन नाती जुळणं, अबोला सोडून एकमेकांना एकमेकांच्या रंगात भिजवणंदेखील आलं. तरुणाईसाठी तर हा सण खास. रंग लावतालावता मनाचा कौल, अंदाज घेणं, डोळ्यांच्या खुणांचे अर्थ मनाशी लावून एकमेकांना जोखणं आणि मैत्री, प्रेम किंवा त्यापुढच्या घडामोडींना हक्काने एक संधी द्यायची ही एक संधी. हिंदी किंवा मराठी चित्रपटातली होळीवरची गाणी हासुद्धा खरं तर स्वतंत्र विषय पण त्याबद्दल नंतर केव्हातरी!
आजचा विषय होळीशी प्रत्यक्षरीत्या संबंधित नसलेल्या पण रंगांच्या जादुई दुनियेशी ओळख करून देणाऱ्या एका गाण्याचा. 2002 मध्ये आलेल्या दीप मेहता दिग्दर्शित ‘बॉलीवूड हॉलीवूड’ या चित्रपटातलं हे गाणं. कौटुंबिक, हलकी-फुलकी प्रेमकथा आणि भारतीय आणि पाश्चिमात्य संस्कृतीचं मिश्रण असलेली गाणी, पटकथा, पात्ररचना यांच्यामुळे हा चित्रपट बराच गाजला. त्यातलंच संदीप चौटा यांचं संगीत, अजय विरमानी यांचे शब्द असलेलं आणि सोनू निगम आणि अलिशा चिनॉय या द्वयीने गायलेलं हे धमाल गाणं –
रंग रंग मेरे रंग रंग में, रंग जाएगी तू रंग
संग संग मेरे संग संग में, संग आएगी संग
रंग-संग मेरा मिल जाएगा, अंग-अंग तेरा खिल जाएगा
रंग-संग मेरा...
रंग रंग मेरे रंग रंग...
या गाण्याची बरीच वैशिष्ट्ये सांगता येतील. हे गाणं सुरू होतानाच फास्ट ऱ्हिदममध्ये सुरू होतं. त्यात श्वास घ्यायला वेळ फार कमी आहे. शब्दांचे खेळ, कसरती करतकरत, धमाल मूडमध्ये गात सोनू निगमने या गाण्यात कमाल केली आहे. या गाण्याच्या निमित्ताने सोनू फक्त स्लो, रोमॅंटिक गाणीच गाऊ शकतो हा गोड गैरसमज पुन्हा एकदा मोडीत निघाला. अलिशा चिनॉय इंडि-पॉपची क्वीन म्हणून ओळखली जाते; तिचा आवाज लिसासाठी जमला आहेच, पण सोनूलाही तिने उत्तम साथ केली आहे. मुख्य म्हणजे या गाण्याला एकीकडे शुद्ध भारतीय आणि दुसरीकडे वेस्टर्न, पण तरीही कुठेतरी ‘देसी घी’चा स्वाद असलेला आवाज गरजेचा होता, ते काम सोनू आणि अलिशा यांनी फत्ते केलं आणि हे गाणं लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन बसलं.
इतकी लोकप्रियता मिळण्याचं आणखी एक कारण म्हणजे हे गाणं चित्रित झालं आहे, राहुल खन्ना आणि लिसा रे यांच्यावर. आजही हे गाणं बघताना ही जोडी अतिशय फ्रेश वाटते. दोघांचाही नवखेपणा हाच या गाण्याचा यू.एस.पी. आहे. या गाण्यातल्या स्टेप्स अतिशय बेसिक असल्या तरी, अतिशय टिपिकल पद्धतीने हे गाणं चित्रित करण्याचा मोह टाळला आहे. यासाठी नृत्यदिग्दर्शकाचं कौतुक करायलाच हवं. एखादी पार्टी रंगात आली असताना एखादं छानसं कपल नाचू लागतं आणि त्यांच्या सहज, सुंदर नाचण्याकडे ओढले जाऊन जशी सहज आपलीही पावलं थिरकू लागतात. त्यांना फॉलो करू लागतात, तसंच चित्र या गाण्यात दिसतं. त्यामुळे नेहमीची कृत्रिम कवायत न दिसता एकदम उत्स्फूर्त लयीत लिसा, राहुल आणि बाकी डान्सर नाचताना बघून डोळे सुखावतात. त्यातून राहुल किंवा लिसाबरोबर जे इतर डान्सर आहेत, ते सगळे पाश्चिमात्य आहेत. त्यांना गाण्याचे शब्द किती कळले असावेत शंका येते, पण त्यांच्या खास शैलीत ते जेव्हा बॉलीवूडच्या स्टेप्स करताना दिसतात, त्याने या गाण्याला एक वेगळा तडका मिळतो आणि गाणं कायमचं लक्षात राहतं.
गाण्याचे शब्दही खास आहेत. नुसतेच र ला र किंवा ट ला ट जुळवणारे बॉलीवूड नंबर्स कमी नाहीत आणि बीटविन द लाइन्स काही तरी सांगू पाहणारी गाणीही बरीच आहेत. साधे, सोपे सहज तोंडात येणारे शब्द आणि तरीही त्यांच्यातून प्रतीत होणारा तितकाच सुंदर आणि मनाला भावणारा अर्थ हे खरं तर साठ-सत्तरच्या दशकातल्या गाण्यांचं वैशिष्ट्य वाटावं, पण बॉलीवूड-हॉलीवूड मसाला असूनही या गाण्यात सगळ्या गुणांचा सुंदर संगम आहे.
रंगों में है इश्क़-प्यार, आँखों में है मस्त बहार
हो बाँहों में है पहला यारअरे लम्हों में है इंतज़ार
होंठों पे है इक पुकारदिल में है दर्द-ए-इज़हार
होंठों पे है इक पुकारदिल में है दर्द-ए-इज़हार
रंग रंग मेरे रंग रंग...
चालीबरोबर जाणारे शब्द, ठेका द्यायला लावणारे शब्दातले खटके हे दिसतात तितके सोपे नक्कीच नाहीत. हिन्दी-उर्दू शब्दांचं मिश्रण करताना त्यात पाश्चिमात्य धरतीही दाखवावी म्हणून उगाच परकीय शब्दांचा भरणा नाही हे विशेष. ते काम गाण्याच्या अरेंजमेन्टमध्ये, कोरसमध्ये केलं आहे. त्यामुळे या गाण्याची रंगत वाढत जाते आणि मनावर रेंगाळत राहते. थोडी नोक-झोक, आवडी-निवडी जाणून घेत, हसत-खिदळत आपलंसं करणाऱ्या या गाण्याचा रंग अनोखा वाटतो.
या गाण्याची भुरळ आताच्या रीमिक्स आणि रिअरेंजमेंटच्या जमान्यात कुणाला पडली नसती तरच नवल! फोर मोअर शॉटस या वेबसिरीजच्या दुसऱ्या सीझनमध्ये हे गाणं पुन्हा एकदा रिअरेंज करून सादर करण्यात आलं आहे. हे व्हर्जन 2.0 सुद्धा तितकच छान जमलं आहे; शिवाय त्यात लिसा रे पुन्हा एकदा तितकीच सुंदर दिसली आहे हा बोनस!
काही-काही गाण्यांच्या नशिबात ‘एव्हरग्रीन’ किताब लिहिलेला असतो, त्यातलं हे एक गाणं. जाता जाता या गाण्यातल्याच शेवटच्या ओळी देऊन थांबते –
यादों को हम संभालेंवादों को हम न भूलें
यादों को हम संभालेंवादों को हम न भूले
- नेहा लिमये