नातं

युवा विवेक    13-May-2021   
Total Views |

relationship_1   
“आशुतोष.. खूप छान झाली व्हायवा!” नेहा तिच्या हॉस्पिटलसमोरच्या कॅफेचं दार उघडतानाच जोरजोरात ओरडत आत गेली. आपण आत वाट बघत बसलो आहोत, असा मेसेज त्याने अर्धा तासापूर्वीच नेहाला केला होता. ती आत गेली तर, आशुतोष चक्क तिच्या स्वागतासाठी उभा राहिला. त्याचे डोळे स्पष्टच सांगत होते की, तू बोल.. मी सगळं ऐकतोय. नेहाला तर कधी एकदा सगळं रंगवून रंगवून, अगदी पहिल्यापासून आशुतोषला सांगतेय असंच झालं होतं. तिच्या प्रोजेक्टला मान्यता मिळाली होती. आता दीड महिन्यांनी परीक्षा झाली की, ती सर्जन होणार होती!
“यू वोन्ट बिलीव्ह... वीस मिनिटं माझं प्रेझेंटेशन आणि नंतर एक तास फक्त प्रश्न! पण झालं एकदाचं! या अडीच वर्षातलं सगळ्यात महत्त्वाचं काम आज झालं आशुतोष!” हे बोलता बोलता ती न राहवून त्याच्या गळ्यात पडली. आपण कॅफेत आहोत, लोक आपल्याला बघतील याचा कसलाही विचार न करता. आशुतोषनं ही तिला मिठीत सामावून घेतलं. त्याचे हात तिच्या डोक्यावरून फिरत असताना तिच्या विचारांचा आवेग झपाट्यानं कमी झाला. काहीच बोलायची गरज आता उरली नव्हती. त्या मिठीनं बोलायचं आणि ऐकायचंही काम केलं होतं. त्या भारावलेल्या अवस्थेत नेहाला चक्क रडू आलं. सगळं टेन्शन अचानक हलकं झाल्यावर आनंद होऊन अवचित रडायला येतं ना.. तसंच. आशुतोषला ते जाणवलं आणि त्यानं त्याचा हात अलगद तिच्या डोक्यावर नेला, अगदी हळूवारपणे त्याने तिला थोपटलं. मन थोडं शांत झाल्यावर नेहा हळूच मिठीतून बाहेर आली.
‘आजची मिठी वेगळी का वाटली?’ घरच्या वाटेवर गाडी चालवताना नेहाच्या मनात विचार चालू झाले. ‘आवेग, आवेश आणि बरंच काही आपण आशुतोषच्या मिठीत अनुभवलं आहे, पण आज काहीतरी नवीन आहे.. हे बरोबर आहे का?” मनातल्या विचारांना अपराधीपणाची किनार आली.
आजच्या मिठीमुळे इतके महिने, जवळजवळ एक वर्ष ती जाणीवपूर्वक दूर थोपवू बघत असलेला विचार वर येत होता.
आतासुद्धा हा विचार थांबवायलाच तिनं दूध घ्यायला गाडी थांबवली. दुकानात सहज दिसली आणि आनंदाची बातमी होती म्हणून पाव किलो बर्फीसुद्धा घेतली. परत गाडीवर बसण्याआधी फोन बघितला तर, त्यावर आशुतोषचे दोन लागोपाठ मेसेज होते.
“उद्या संध्याकाळी जेवायला घरी येशील? मुलांशी ओळख करून देतो.”
“खूप दिवसांपासून मनात आहे, पण तुझ्यावर खूप ताण होते. अजूनही परीक्षा झाली नसली तरी, एक टप्पा पार झालाय. म्हणून हे एक पाऊल पुढे जाण्याचं (अवघड) निमंत्रण..”
डोक्यात लख्खं प्रकाश पडला आणि अपराधीपणाची भावना गडद झाली. घटस्फोटित आशुतोषला आपल्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा मुलगा आणि आपल्याच वयाची मुलगी आहे. आपण अशा माणसाच्या प्रेमात हे अनैसर्गिक आहे का? घरी पोहोचेपर्यंत नेहाच्या मनात विचारांचं जंजाळच झालं.
“बाबा, माझं प्रोजेक्ट स्वीकारलं आहे. आता फक्त परीक्षेची तयारी. एका आठवड्यानं माझी रजा सुरु होईल.” टीव्हीवर कसला तरी भडक सिनेमा लावून, हातात ग्लास घेऊन समोरच्या ताटलीतला चकणा खात असलेल्या वडिलांसमोर तिनं बर्फीचा बॉक्स धरून सांगितलं. “एवढंच ना? मग सर्जन झाल्याच्या थाटात आतापासूनच मिठाया कशाला वाटायच्या? आता नको मला, आणलीच आहेस तर नंतर घेईन.”
टीव्ही पॉज करायचंसुद्धा लक्षात न आलेल्या वडिलांनी कडवटपणे सांगितलं. नेहा शांतपणे तिथून निघून आपल्या खोलीत गेली. या अशा वागण्यानं निराश वगैरे होणं तिनं केव्हाच सोडलं होतं. नेहाच्या आठवणीत आई कधीच नव्हती. नेहा लहान असतानाच ती निघून गेली होती. ‘निघून गेली’ याचा अर्थ कळायचं नेहाचं जेव्हा वय नव्हतं तेव्हापासून ती वडिलांकडून हे ऐकत होती. वडिलांचं आणि तिचं नात तिला आठवत होतं तेव्हापासून हे असंच होतं. बाहेरच्या जगाला दाखवण्यासाठी वेगळं आणि प्रत्यक्षात वेगळं. अकरावीतच ती शिकायला बाहेर पडली. मुलीची अडवणूक न करणारे वडील म्हणून मिरवून घ्यायचं असल्यानं तिला ते करता आलं. तिचा परत या घरातच काय शहरात यायचा सुद्धा विचार नव्हता. पण MBBS नंतर MS साठी तिला नेमकं इथलंच हॉस्पिटल मिळालं. नाईलाजानं तिला घरी राहावं लागलं. लोक काय विचार करतील? या भीतीनं. तशी घरी राहायची वेळ जास्त यायची नाहीच. रात्रीचा दिवस करून ड्युटी, अभ्यास करावा लागायचा. आठवड्यातून एक-दोन वेळाच घरी यायची ती. उरलेल्या वेळात चक्क हॉस्पिटल समोरच्या कॅफेमध्ये जाऊन बसायची. तिथेच तिची आशुतोषशी ओळख झाली होती. अविनाश ही वेळ घालवायला तिथे येऊन बसायचा. वयातलं अंतर कापत मैत्री, त्यातून प्रेम आणि मग प्रेमाच्या एकेक पायऱ्या असा प्रवास झाला होता, पण इतके दिवस जाणूनबुजून दुर्लक्ष केलेली गोष्ट आज जाणवली होती.
आपल्या खोलीत येऊन उशीवर डोकं ठेऊन शांतपणे पडल्यावरदेखील तिला आशुतोषचा स्पर्श आठवत होता. यापूर्वी ही त्याचा स्पर्श कितीतरी वेळा तिला झाला होता, पण तो तिला हवाहवासा असा प्रियकराचा स्पर्श होता. आणि आज? मगासचा विचार परत मनात डोकावू लागला.
‘काहीतरी चुकतंय का?’
इतक्यात फोन वाजला
“जास्त विचार करू नकोस, काळजी घे पिल्लू..”
आशुतोषचा मेसेज. नेहानं मेसेज वाचून फोन खाली ठेवला, तिच्या चेहऱ्यावर मोठं हसू पसरलं.. मगासच्या दोन मेसेजमध्ये फक्त प्रियकर होता.. आणि यात?
‘आता नाही, पण आतापर्यंत चुकत होतं’ डोक्यात परत लख्खं प्रकाश पडला
“उद्या संध्याकाळी तुझ्या घरी भेटू जेवायला..” तिने मेसेज पाठवला.
आशुतोष आणि तिच्या नात्याबद्दल तिच्या मनात काहीच शंका उरली नव्हती. एका नात्यात एकापेक्षा जास्त नाती दडलेली असतात ही कल्पना खूप सुखावणारी होती.
यामुळेच तिला आतापर्यंत माहीतच नसलेल्या स्पर्शाचा अर्थ गवसला होता.. वात्सल्याचा स्पर्श..
- मुग्धा मणेरीकर