शाळा उभारणारे तीन ‘कप’

युवा विवेक    13-May-2021   
Total Views |

school_1  H x W 
‘लख्ख चांदणं दिसण्यासाठी सभोवतालचा अंधार गडद असावा लागतो,’ अशा अर्थाची एक पर्शियन म्हण आहे. याच म्हणीचा आधार घेऊन पुढे असं म्हणता येईल की, यशाच्या, ध्येयपूर्तीच्या चांदण्याची पखरण आपल्यावर व्हावी, असं वाटत असेल, तर तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग अंधारातूनच जात असतो. एखाद्या ध्येयाने झपाटून जाऊन आपले आयुष्य त्याचसाठी वेचणारी अनेक महान व्यक्तिमत्वे आपल्या समाजात आहेत. अशाच एका ध्येयवेड्या माणसाची गोष्ट म्हणजे ‘थ्री कप ऑफ टी’ हे पुस्तक. ग्रेग मॉर्टेसन हे त्या ध्येयवेड्याचे नाव.
ग्रेग हा मूळचा अमेरिकी गिर्यारोहक. १९९३ मध्ये पाकिस्तानच्या सीमेवरील (आताचा पीओके - पाकव्याप्त काश्मीर) चढाईसाठी अवघड समजले जाणारे ‘केटू’ शिखर सर करण्यासाठी तो तिथे जातो आणि त्याचा दुर्दैवी अपघात होतो. त्या डोंगराळ भागाच्या कोर्फे गावातील लोक त्याला मरणाच्या दाढेतून बाहेर काढतात. तेथे काही दिवस राहिल्यावर त्याच्या लक्षात येते की, त्या गावात नियमित शाळा भरतच नाही. आठवड्यात दोन वेळा कशीबशी शाळा भरते. याचं त्याला वाईट वाटतं आणि आश्चर्यसुद्धा. तेथील गावकर्‍यांनी आपल्याला केलेल्या मदतीची जाणीव ठेवून तो गावासाठी शाळा उभारायची हेच ध्येय घेऊन अमेरिकेत परत.
शाळा उभारण्याचा त्याचा प्रवास अनेक अडचणींनी भरलेला असला, तरी त्याला कठोर जिद्दीची झालर आहे. शाळा उभारण्यासाठी लागणारा पैसा गोळा करताना त्याने केलेली खटपट, समाजातील महत्त्वाच्या व्यक्तींना लिहिलेली अनेक पत्रे, त्यातूनच एका दानशूर माणसाने अचानक दिलेले बारा हजार डॉलर, हे सर्व प्रसंग वाचणंदेखील विलक्षण आहे. शाळा उभारणीसाठी सर्व साहित्य खरेदी केल्यावर ग्रेगच्या लक्षात येतं की, ते सर्व साहित्य गावात नेण्यासाठी आधी एक पूल बांधण्याची गरज आहे. पुलावरूनच साहित्य गावात आणता येईल आणि मग शाळा बांधता येईल. पुन्हा हताश मनाने तो अमेरिकेत परततो, पण ध्येयाचा पाठलाग सोडत नाही. पैसे उभे करून पुलासाठीचे सर्व साहित्य जमवून तो जातो ते थेट पाकिस्तानातच. तिथे जाऊन आपण दिलेला शब्द खरा करण्यासाठी त्याचं कार्य सुरू होतं.
स्मार्टफोन, इंटरनेट, व्हॉट्सअॅप किंवा कोणताही सोशल मीडिया रूढ न झालेला हा काळ आहे. या सर्व प्रवासात त्याला येणार्‍या भाषेच्या अडचणी, आर्थिक मदत उभी करताना होणारा त्रास, स्थानिक व स्वार्थी राजकारण्यांची लुडबुड, अमेरिकी असल्याने लोकांकडून दाखवला जाणारा अविश्वास, लोकांनी त्याला लुबाडण्यासाठी आखलेले डाव आणि या सर्व अडचणींचं चक्रव्यूह भेदून त्याने तिथे उभारलेली शाळा... हा प्रवास नव्हे नव्हे संघर्षगाथा वाचताना नकळत आपल्याही डोळ्यात आनंदाश्रू उभे राहतात.
आपल्या माणसांपासून, देशापासून हजारो मैल दूर राहणार्‍या परक्या लोकांसाठी आपले तन, मन, धन अर्पून दिलेला शब्द पूर्ण करणे आणि स्वप्न सत्यात आणण्याची गोष्ट सांगणारे हे पुस्तक जितके विलक्षण तितकेच प्रेरणादायी आहे. हे पुस्तक कादंबरी स्वरूपात लिहिलेले असून, ग्रेग आणि प्रसिद्ध पत्रकार डेव्हिड रेलिन यांनी एकत्रितपणे लिहिले आहे. १९९३ ते २००२ पर्यंतचा काळ यातून उलगडतो. त्या भागातील दहशतवादी संघटना, राजकारण, ९/११ नंतर अमेरिका, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील बदलती समीकरणे याचाही वेध पुस्तकात घेतला आहे. बदललेल्या राजकीय परिस्थितीतही डगमगून न जाता, वेळप्रसंगी तिथल्या अशिक्षित आणि दहशतवादाकडे झुकणाऱ्या टोळ्यांच्या प्रमुखांना समजावून शाळा उभारण्याचे काम थांबू नये यासाठी प्रसंगी जीव धोक्यात घालणार्‍या ग्रेगला आपण मनातल्या मनात अनेकदा सलाम करतो.
रस्ते, पाणीपुरवठा, वीज, फोन, शाळा, दुकाने अशा नागरी जीवनात आवश्यक समजल्या जाणार्‍या गोष्टींपासून लांब असलेला वझिरीस्तान हा पाकिस्तान - अफगाणिस्तान सीमेवरील डोंगराळ भाग, अफूची तस्करी करणे हा लोकांच्या जगण्याचा स्रोत, तेथील टोळीप्रमुखाच्या भेटीसाठी ग्रेग जातो, तेव्हा त्याने अनुभवलेली पाच दिवसांची कैद, 9/11 नंतर ओसामा बिन लादेनच्या शोधासाठी अमेरिकन यंत्रणांकडून झालेली चौकशी हे त्याच्या आयुष्यातील प्रसंग चित्रपटात शोभावे असेच आहेत.
हा शाळा उभारण्याचा प्रवास एका शाळेपुरता मर्यादित न राहता आता ही एक मोठी चळवळ झाली आहे. केवळ पाकिस्तान नाही तर, तालिबानींच्या दहशतीला न जुमानता अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तान येथील दुर्गम अशा डोंगराळ भागांतही ह्या सेंट्रल एशिया इन्स्टिट्युटने आजवर ३०० पेक्षा जास्त शाळा उभारल्या आहेत.
कोणाशीही मैत्री होण्यासाठी कशाची गरज असते, भाषा, स्वभाव, आवडी-निवडी जुळण्याची...? छे.... फक्त तीनदा एकत्र चहा प्यायलात की, तुमची मैत्री होतेच, असे सोपे तत्त्वज्ञान ग्रेगला कोर्फे गावाचा अशिक्षित, म्हातारा सरपंच देतो आणि हेच सोपे तंत्र मनात घोळवत स्थानिकांशी मैत्री करून शाळा आणि पर्यायाने शिक्षणाचा प्रसार करण्याचे कार्य ग्रेग करत जातो.
शिक्षण आणि त्यातही मुलींचे शिक्षण हाच त्या भागातील दहशतवादाला समूळ नष्ट करण्याचा मार्ग आहे ह्या तत्त्वावर वाटचाल करणार्‍या ह्या संस्थेची माहिती www.centralasiainstitue.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- तन्मयी जोशी