आत्मशोधाच्या वाटेवरचा 'सिद्धार्थ'

युवा विवेक    14-May-2021   
Total Views |

siddharth_1  H  
जगातील सर्वांत खडतर अथवा कठीण प्रवास कोणता, असा प्रश्न विचारला तर, कदाचित त्या व्यक्तीचे वय, अनुभव आणि मनोवस्थेनुसार वेगवेगळी उत्तरे मिळतील, पण जरा खोलवर विचार केल्यावर एकच उत्तर मिळते ते म्हणजे आत्मशोध! 'स्व' चा शोध, आत्म्याचा शोध, आपण नक्की कोण आहोत, शरीर, मन ह्यापलीकडचे आपले अस्तित्व जाणून घेण्याचा प्रवास, हाच सर्वात अवघड प्रवास आहे. कारण ह्याचे उत्तर मिळवायचे अनेक मार्ग आहेत, कोणता चांगला हे कोणालाच माहीत नाही आणि शेवटी तुम्ही ज्ञात्याच्या अवस्थेपर्यंत पोहोचाल का याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही.
एका जन्मामागून दुसरा जन्म, एक शरीर त्यागून दुसरे शरीर, हा आत्म्याचा प्रवास अखंड असाच सुरू राहणार का, शरीर आणि मनापलीकडे माझे काही अस्तित्व आहे का? माझ्या आयुष्यात घडणार्‍या घटनांमागे, माझ्या जीवनात येणार्‍या विविध व्यक्तींमागे काही कार्यकारणभाव आहे का ? मला, इतरांना येणार्‍या विविध अडचणी, दुःख ह्यातून त्यानीच स्वतः मार्ग काढायचा की, मदत करणारी, हे सर्व जग चालवणारी अशी काही वेगळी शक्ति आहे? ह्या जगात ईश्वर अस्तित्वात आहे की, आत्मा हाच ईश्वर? मग ईश्वराचे नक्की स्थान काय की, ती फक्त एक संकल्पना आहे, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात आणि आपण आपल्या बुद्धीनुसार, क्षमतेनुसार त्यांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो.
असेच प्रश्न 'त्या'लाही पडतात. त्याचं नाव आहे 'सिद्धार्थ'. ही त्याची गोष्ट आहे. म्हणून त्याचंच नाव कादंबरीला देण्यात आलं आहे. ही कादंबरी लिहिली आहे Hermann Hesse यांनी. सिद्धार्थ हा एका ब्राह्मण घराण्यात जन्माला आलेला मुलगा. गौतम बुद्ध ह्यांच्या कालखंडात त्याचा जन्म होतो. ब्राह्मण घरात जन्म झाल्याने, जात्याच बुद्धिमान असणारा सिद्धार्थ, वेद, उपनिषदांचे मनापासून अध्ययन करतो. शास्त्रात सांगितल्यानुसार मनन, चिंतन, ध्यान, दान अशी आदर्श वागणूक असूनही मनातून असमाधानी असतो.
शास्त्रानुसार अशी समजूत आहे की, गाढ झोपेत असताना आपला आत्मा आणि आपण ह्यात एकरूपता असते, पण ह्या एकरूपतेचा अनुभव घेणे आणि सतत त्याच अवस्थेत राहणे, ह्या भिन्न गोष्टी आहेत. सिद्धार्थला त्याची जाणीव असते, ध्यान करतानाचा अनुभव ही असतो, परंतु ती अवस्था तो सतत जगू शकत नाही म्हणून तो असमाधानी असतो. त्याला ओढ असते, तहान असते ती निर्वाण प्राप्त करण्याची आणि त्यासाठी त्याची वाटेल ते करायचीही तयारी असते.
निर्वाण प्राप्त करण्यासाठी तो आधी घरदार सोडून संन्यासी होतो आणि जंगलात राहू लागतो. इतर संन्याशांबरोबर राहून, उपास, तप करून बरीच विद्या, तंत्र साध्य करतो. ध्यान करणे, आपला आत्म्याचा दुसर्‍याच्या शरीरात प्रवेश करून त्याचे जीवन अनुभवणे अशा विद्याही तो प्राप्त करतो, पण तरीही तो मनात असमाधानीच असतो. त्यात तो एक दिवस गौतम बुद्धाची ख्याती ऐकतो आणि आणि त्याचा सखा गोविंद ह्याच्या सोबत गौतम बुद्धाचा शिष्य बनायला जातो. तिथे त्याची साक्षात गौतम बुद्धांशी भेट होते, पण त्यांची शिकवण, अष्टांगमार्ग हे सामान्य, संसारी लोकांसाठी जीवन जगायला उपयोगी असून मोक्ष प्राप्तीसाठी त्याचा उपयोग नाही असे वाटल्याने तो बुद्धाचे शिष्यत्व पत्करत नाही.
आत्मज्ञान प्राप्तीचे सर्व प्रयत्न फोल ठरल्यानंतर तो स्वतःच स्वतःचा शिष्य व्हायचे ठरवतो आणि जीवनाच्या ह्या टप्प्यात तो एका कमला नावाच्या सुंदर गणिकेला भेटतो. मग कामास्वामी नावाच्या एका श्रीमंत व्यापाराला भेटतो आणि नवीन दृष्टिकोनातून आयुष्याचा अनुभव घ्यायला त्यांच्यात मिसळू पाहतो. तो त्यांचासारखा होतो तरी, कमलेवर प्रेम करताना अथवा व्यापार करताना ' इदं न मम' म्हणणारा त्याच्या आतला संन्यासी काही वर्षे जागाच असतो. मात्र, कुंभाराने फिरवलेले चक्र जसे हळूहळू फिरत थांबते, तसेच त्याचेही होते आणि सामान्य माणसासारखा तोही संसारात गुरफटतो.
संसारात गुरफटलेला सिद्धार्थ ह्यातून परत बाहेर पडून मुक्तीच्या मार्गावर कसा चालायला लागतो, त्याला भेटलेला वासुदेव नावाचा नावाडी त्याला काय शिकवण देतो आणि त्याला आत्मज्ञान कधी आणि कसे होते हे मुळातून वाचण्यासारखे आहे. आयुष्य हे नदीसारखे प्रवाही असते, आपले आयुष्य हा आत्मशोधाच्या मार्गातील अडथळा नसून ते मोक्षप्राप्तीच्या मार्गातले एक साधन आहे. आयुष्य म्हणजे काय, तर जो क्षण आपण जगत आहोत तो क्षण. आपल्याला ऐलतीरावरून पैलतीरावर हीच नदी ओलांडून जायचे आहे, तेव्हा ह्या नदीला अडथळा न मानता आपल्याला तिचा आवाज ऐकता यायला हवा, तरच एखाद्या कुशल नावड्याप्रमाणे पलीकडे पोचता येईल.
जर गौतम बुद्धाच्या मार्गावर चालाल तर, फक्त त्याचे अनुयायी व्हाल. स्वतः बुद्ध बनण्यासाठी आपला मार्ग आपल्यालाच निवडायला हवा. आपला स्वतःचा मार्ग निवडलेल्या सिद्धार्थला आत्मज्ञान झाल्यानंतरचा त्याने आपला सखा गोविंद ह्याच्याशी केलेला संवाद परत परत वाचून चिंतन करण्यासारखा आहे.
Hermann Hesse यांनी १९२२ मध्ये लिहिलेली ही कादंबरी काव्यात्मक शैलीत आहे. पुस्तकाची भाषा सोपी आणि ओघवती आहे. मूळ जर्मन भाषेत लिहिलेली कादंबरी Hilda Rosner यांनी नंतर इंग्रजीत अनुवादित केली. Hermann hesse (१८७७-१९६२) हे मूळ जर्मन लेखक आणि कवी असून त्यांनी Glass bead game, Narcissus and Goldmund, Journey to east अशी बरीच प्रसिद्ध पुस्तके लिहिली आहेत. १९४६ मध्ये त्यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले. सिद्धार्थ ही कादंबरी इंग्रजी साहित्यातल्या अभिजात कलाकृतींपैकी एक मानली जाते.
अवघ्या १२० पानांचे हे छोटेसे पुस्तक, पटकन वाचून संपवण्यासाठी नाहीच. ते हळूहळू वाचत, त्यातला अर्थ आपल्यात सामावून घेण्यातच मजा आहे. सिद्धार्थच्या आत्मशोधाच्या प्रवासात एक वाचक अथवा साधक म्हणुन आपल्यालाही जीवनाबद्दल, आपल्या आयुष्याच्या ध्येयाबद्दल अनेक प्रश्न पडायला लागतात, आपलीही विचारशक्ती पणाला लागते आणि हेच ह्या पुस्तकाचे यश आहे.
- तन्मयी जोशी