राम जन्मला गं सखी

युवा विवेक    14-May-2021   
Total Views |

six_1  H x W: 0 
राम जन्मला गं सखी, राम जन्मला
चैत्रमास, त्यांत शुद्ध नवमी ही तिथी
गंधयुक्त तरिहि वात उष्ण हे किती
दोन प्रहरी का गं शिरीं सूर्य थांबला?
राम जन्मला गं सखी, राम जन्मला
रामजन्माचं गाणं म्हणजे शुद्ध स्वरात भिजलेल्या मिश्र मांड ह्या रागातील हे माझ्या अत्यंत आवडत्या गाण्यांपैकी एक गाणं. संपूर्ण चित्र आपल्या डोळ्यांसमोर येतं की अयोध्यानगरातील स्त्रिया श्री रामजन्माचं गीत गाताना तिथल्या प्रासादात, उपवनात, राजमार्गावर चालल्या आहे. श्रीरामाच्या जन्माची शुभवार्ता आपल्याला स्त्रियांच्या मार्फत सांगण्याची सुरेल कल्पना ज्या वेळी गदिमांना सुचली असावी तो किती भाग्याचा क्षण असावा. रामजन्माचा घटिकेचे तंतोतंत वर्णन कारणात गदिमा सांगतात की - चैत्रातील शुद्धनवमी ही ती तिथी आहे, ज्या वेळी संपूर्ण वातावरण सूर्याच्या दाहकतेमुळे उष्ण झालं आहे तरी प्रभू अवतार घेत आहे त्यामुळे एक वेगळंच चैतन्य एक वेगळाच गंध चहूकडे पसरला आहे. गदिमा रामजन्माचा क्षणाचं वर्णन करताना सांगतात की दुसऱ्या प्रहरींचा तळपणारा सूर्य अगदी माथ्यावर आला आहे आणि तिथेच तो क्षणभरासाठी स्तब्ध झाला आहे तो सुवर्णक्षण अनुभवण्यासाठी. प्रभूंचं आगमन मर्त्यभूमीवर होणार आहे, त्यांच्या अभिनंदनासाठी सूर्य क्षणभर थांबला आहे..आणि हीच ती योग्य घटिका आहे ज्या वेळी गंधर्व - अप्सरांचं नृत्य अवकाशात सुरू झालं. देवांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली आहे. सगळ्यां स्त्रिया आपल्या आपल्या सखींना जिव्हाळ्याने प्रेमाने एकमेकांना सांगतायेत की - राम जन्मला गं सखी, राम जन्मला....
कौसल्या राणी हळूं उघडी लोचनें
दिपुन जाय माय स्वतः पुत्रदर्शनें
ओघळले आंसु, सुखे कंठ दाटला
राम जन्मला गं सखी, राम जन्मला
भगवंताने आपल्या पोटी जन्म घेतला आहे ही अनुभूती - ही कल्पना किती सुखद आहे. प्रसववेदनेच्या कळांनी सुटका झाल्यावर हळूहळू कौसल्या राणी आपले डोळे उघडतात आहे शेजारी आपला पुत्र आहे. ज्या सुखासाठी इतके कष्ट सहन केले, लोकांच्या कुचेष्टा ऐकल्या, इतके नवस उपास तापास केले त्या साऱ्यांचे पुत्ररूपी फळ आज भगवंताने माझ्या झोळी घातले आहे. काही क्षणासाठी भूतकाळात कौसल्या राणी रममाण झाल्या. आपण संततीहीन होतोपासून आज संतती झाली ह्यापर्यंतच्या प्रवासाचा मागोवा क्षणक्षणांमध्ये कौसल्या राणी घेत होत्या. वात्सल्य - मातृत्व किती मोठं असतं ह्याच अलौकिक दर्शन साक्षात त्यांना होत होतं. मी आई झाले मला देखील पान्हा फुटला आहे. ही दिव्य अनुभूती कौसल्या राणींना होत होती. नकळतच त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागली. आपल्या हातांच्या वलयात त्यांनी आपल्या पुत्राला सामावून घेतलं. जगाचं सर्वात मोठं दान सर्वात मोठं वैभव विधात्याने त्यांच्या परडीत घातलं होतं, सुखाच्या ह्या क्षणी त्यांच्या ओठांतून शब्द फुटत नव्हते... वात्सल्याच्या भावनेमुळे अश्रूंसोबत त्यांचा कंठ देखील दाटला होता... अश्रूंसोबत... गळ्यांतील दाटलेल्या वाणीसोबत एकाच हुंकार उमटत होता - राम जन्मला गं सखी, राम जन्मला..
राजगृहीं येई नवी सौख्य पर्वणी,
पान्हावुन हंबरल्या धेनू अंगणी,
दुंदुभिचा नाद तोच धुंद कोंदला
राम जन्मला गं सखी, राम जन्मला
इक्ष्वाकू कुळात उत्सवांचा सण सुरू झाला आहे. राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न असे चार तेजस्वी पुत्र जन्माला आले आहे, अयोध्यावासियांच्या आनंदाला पारावर उरला नाही. खऱ्या अर्थाने इक्ष्वाकू कुळ राजगृह जाणवतंय. चहूकडे जितकेही वात्सल्याचे मूर्तिमंत साक्षात्कार होतायेत ते सारे विधात्याने रचून ठेवले आहे. वेली, फुले, कळ्या वासरू, फुलपाखरू, वृक्षांवर असलेल्या पक्षिणी सगळ्यांमध्ये विधात्याने वात्सल्य भरभरून दिले होते तेच वात्सल्य आज तिन्ही राण्यांना त्याच विधात्याने देऊ केले. अंगणात असलेल्या गोमातांना पान्हा फुटला आहे त्यामुळे त्यांच्या हंबरण्यात आज व्याकुळता नसून वात्सल्याचा - मातृत्वाचा गंध येत आहे. चहूकडे वाद्यांचा गजर चालला आहे. राजगृहातील नृत्यांगनांनी आपल्या नुपूरांच्या मधुर झंकारानी वातावरण मंत्रमुग्ध केले आहे. वासरू, पाखरू, वाऱ्यावर डौलणाऱ्या कळ्या गायींना, पक्षिणींना आणि वेलींना लगडून एकच सांगत होत्या की - राम जन्मला गं सखी, राम जन्मला..
पेंगुळल्या आतपांत जागत्या कळ्या
'काय काय' करित पुन्हा उमलल्या खुळ्या
उच्चरवें वायू त्यांस हसून बोलला
राम जन्मला गं सखी, राम जन्मला
गदिमांनी रामजन्माच्या आनंदोत्सवाला काय सुंदर शब्दांची जोड दिली आहे आणि त्याचसोबत बाबूजींनी त्यांच्या स्वर्गीय स्वरात आपल्याला नखशिखांत भिजवून श्रीरामाच्या जन्मकथेच्या शेल्याची वीण अजूनच घट्ट केली आहे. रामजन्मामुळे निसर्गात किती चैतन्य भरून राहिलं आहे, परंतु ह्या क्षणांच्या आधी निसर्ग कसा उदासीन होता हे गदिमा पुढे सांगतात की - प्रखर उन्हामध्ये साऱ्या वेलींच्या वृक्षांच्या कोवळ्या फांद्यांवर उमललेल्या कळ्या झोपी गेल्या होत्या, इथल्या आयुष्यांमध्ये वृत्ती नसून पुनरावृत्ती आहे हेच त्या सांगत होत्या. उदासीनता अयोध्येत कणाकणात भासत होती. आपल्या चहुकडच्या वातावरणात मानवीय स्वभावांची छटा सर्वात प्रथम दिसते. वृक्ष - वन - कानन - श्वापदे - नद्या - माणसे - स्त्रिया - मुलं - पक्षी आदींची कांती स्वभावाने फार मलूल दिसत होती, कोणाच्याही कर्मात आनंद दिसत नव्हता. अयोध्येतील सरयू पण काही काळ संथ झाली होती, जणू तरलता हा तिचा स्वभाव असूनही प्रवाहात कसं यायचं हे ती विसरलीच होती. फुलपाखरू पुष्पाच्या मरंदावर बसायला आणि त्या पुष्पाचं रसपान करायला देखील धजावत नव्हती. अयोध्येच्या स्वभावात उदासीनता इतकी काठोकाठ भरली असताना अक्षरशः दैवी संकेत मिळावा त्या प्रमाणे अयोध्येत चराचरात समाहित असणारा वारा आपल्या उपस्थितीने दाहीदिशेत चैतन्य प्रवाहित करत वायूंच्या हुंकाराचा नाद काढत हासून ह्या उदासीन असणाऱ्या सर्वांना सांगू पाहत होता कि - उठा! आपापली कर्म करून प्रभूंच्या अगत्यासाठी सिद्ध व्हा. वाऱ्याच्या ह्या बातमीमुळे पेंगलेल्या साऱ्या कळ्या कुठली आनंदाची बातमी आली म्हणून बावरलेल्या अल्लडश्या मुलीप्रमाणे "काय काय" खुळ्यासारख्या उमलून पुन्हा पुन्हा विचारू लागल्या आणि स्वानंदात बेहोष असणारा वारा सांगू लागला की - राम जन्मला गं सखी, राम जन्मला...
वार्ता ही सुखद जधीं पोंचली जनी,
गेहांतुन राजपथी धावले कुणी?
युवतींचा संघ एक गात चालला
राम जन्मला गं सखी, राम जन्मला
ज्या दिवशी ज्या क्षणी श्रीरामजन्माची मंगलवार्ता साऱ्या अयोध्येत वाऱ्याप्रमाणे पसरली त्याच क्षणी सगळीकडे आनंदी आनंद होती. प्रजेच्या मरगळलेल्या मनांवर आनंदाच्या बातमीचे तुषार शिंपडले गेले. साऱ्या अयोध्यावासियांची शक्ती कोण्यातरी अदृश्य राक्षसाने नेली ती शक्ती ह्या बातमीने पुन्हा आली असाच भास त्यांना होतं होता. गदिमांची एक विशेषता आहे - कोणताही क्षण असो ते इतक्या बखुबी मांडतात, त्यांच्या भावनांमध्ये शब्दांमध्ये आपण भावनिकरित्या कधी बंदिस्त होऊन जातो आपल्याला देखील कळत नाही. रामजन्माचा गीतांमध्ये कौसल्येला काय वाटलं, त्या नंतर तिथल्या निद्रिस्त असलेल्या निसर्गाला काय वाटलं, प्रजेला काय वाटलं, अंगणातील धेनूची अवस्था हि बातमी ऐकल्यावर काय झाली असा सगळ्यांच्या भावनांचा वेग-आवेग गदिमा इतक्या सुंदररित्या मांडतात कि आपण त्यांच्या शब्दांच्या त्यांच्या भावनांचा अधीन होऊन जातो. राजगृहातून ज्यावेळी रामजन्माची बातमी अयोध्येत पसरली त्या वेळी प्रजा आपल्या आपल्या गेहांतुन (घरातून - 'गेह' हा गदिमांच्या शब्दकोशातील खास शब्द आहे, अनेक जागी तो वेगळ्यावेगळ्या अंगाने प्रस्तुत होतो) तो सुवर्ण क्षण अनुभवण्यासाठी राजपथावर धावत सुटले. सगळीकडे स्त्रियांचे - मुलींचे घोळके दिसू लागले होते. ह्या साऱ्या जणी रामजन्माचा आनंदगीत गात राजपथावरून राजदरबाराकडे निघाल्या होत्या... सर्वांच्या मुखांतून एकच नामघोष दुमदुमत होता - राम जन्मला गं सखी, राम जन्मला
पुष्पांजली फेकी कुणी, कोणी भूषणे
हास्याने लोपविले शब्द, भाषणे
वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला
राम जन्मला गं सखी, राम जन्मला
चैत्रातील शुद्ध नवमीला देव गंधर्व किन्नर अप्सरा ह्या साऱ्यांनी स्वर्गातून पुष्पवृष्टी केली त्याच प्रमाणे अयोध्यावासी देखील चारी पुत्रांवर फुलं उधळतायेत. ज्याच्या हाती जी सुंगधित टवटवीत फुले लागली त्यांनी त्या त्या फुलांनी राण्यांवर राजांवर आणि चारही राजपुत्रांवर आपल्या प्रेमाची बरसात केली आहे. प्रजेच्या प्रेमापोटी सारेच भारावून गेले. एकमेकांनी ज्यांना ज्यांना ही शुभवार्ता दिली त्यांना आभूषणे देऊन त्यांचा सन्मान केला आहे. लोकांना काय बोलावं ते सुचत नाहीये. प्रत्येकजण स्वान्त सुखाय प्रमाणे आनंदी आहे, साऱ्याच अयोध्यावासियांच्या कांतीवर अवर्णनीय आनंद भरून ओसंडून वाहतोय. साऱ्यांचे चेहरे श्रीरामादिक भावंडांच्या तेजाने अजूनच तेजस्वी झाले आहे. किती सुंदर वर्णन केलं आहे गदिमांनी - माणूस ज्या वेळी भावविभोर असतो - अतिशय आनंदी असतो त्या वेळी त्याच्या कंठातून शब्द प्रकट होत नाही, प्रकट होतात त्या भावना, चेहऱ्यावर चैतन्य असतं, सुरेल स्वर्गीय असं हास्य असतं. प्रत्येकाच्या आपला आनंद प्रकटीकरणाच्या तर्हा होत्या. अनेक लोकं वाद्य वाजवून आपला आनंद व्यक्त करत होते. संगीत हे आपला आनंद व्यक्त करण्याचं द्योतक प्राचीन काळापासून आहे. संगीत त्रिकालाबाधित आहे- असं म्हणतात ते का उगाच नाही. डफ, मृदूंग, तालवाद्य, बासरी, ज्यांच्या हाती जे जे वाद्य लागले त्यांच्या मधुर सुरांनी त्यांनी वातावरण भिजवून टाकलं..प्रत्येक वाद्यातून, सुरांतून, सुरावटीतून एकाच घोष घुमू लागला...राम जन्मला गं सखी, राम जन्मला...
वीणारव नूपुरांत पार लोपले,
कर्ण्याचे कंठ त्यात अधिक तापले,
बावरल्या आम्रशिरीं मूक कोकिला
राम जन्मला गं सखी, राम जन्मला
ज्या प्रमाणे आसमंतात अप्सरांचे नृत्य गायन सुरू होते, त्याच प्रमाणे अयोध्येत राजगृहात राजनर्तकींच्या आनंदाला उधाण आले होते. मरगळलेल्या मनांना राजनर्तकींच्या नुपूरांनी पुन्हा ताजा तजेल केलं. राजनर्तकींसोबत इतरत्र महिलांची लगबग सुरू झाली आहे, त्यांच्या पायातील नुपूरांचा आवाज सर्वत्र भरून गेला आहे. आनंदाचा प्रसंगावधान बघून संगीतात प्रमुख मानल्या जाणाऱ्या वीणेचे वादन सुरू होते, परंतु राजनर्तकींच्या आणि इतरत्र महिलांच्या पैंजणांच्या छुमछुम आवाजात वीणेचा स्वर कुठल्या कुठे लोप पावला ते देखील कळले नाही. नुपूरांच्या जुगलबंदीत कर्णे वाजवले जात आहे, कर्णे एकप्रकारचं सुषिर वाद्य आहे जे वायूंच्या प्रवाहामुळे वाजवले जाते. ह्या सगळ्या वाद्यांच्या, नुपूरांच्या आवाजामुळे वसंत ऋतूंचा सम्राट कोकीळ पक्षी बावरून गेला आहे. वसंतऋतूत स्वतःला राजा समजणार कोकीळपक्षी आपल्या कंठातील मधुर सादाने सर्वांना आपलं करून घेतो, परंतु आज हे सगळं काय घटित होत आहे - अगदीच अतर्क्य! सगळी कडून श्रीराम जन्माचे नाद ऐकू येतायेत...क्षणभरासाठी कोकीळ पक्षी देखील स्तब्ध होऊन ऐकू लागला, त्याला देखील मोह आवरला नाही ऐकण्याचा - राम जन्मला गं सखी, राम जन्मला....
दिग्गजही हलुन जरा चित्र पाहती
गगनांतुन आज नवे रंग पोहती
मोत्यांचा चूर नभी भरुन राहिला
राम जन्मला गं सखी, राम जन्मला
काही जुन्या चित्रकलेचा अभ्यास केला तर हे चित्र आपल्याला दिसून येतं की - पृथ्वीला आठ मोठ्या हत्तींनी आपल्या अंगावर तोलून धरले आहे म्हणून त्यांना 'दिग्गज' किंवा नरश्रेष्ठ असं म्हणतात. श्रीरामजन्माची मोहिनी इतकी अलौकिक आणि दिव्य आहे कि हे नरश्रेष्ठ किंवा हे आठही हत्ती आपल्या जागेवरून तसूभर विचलित होऊन श्रीराम जन्माचे सुवर्ण क्षण बघण्यात गुंग झाले आहे. आकाशामध्ये देव गंधर्व अप्सरा यांची दाटी झाली आहे. सप्ततारका, आकाशमंडळ, सप्तर्षी हा जन्मसोहळा बघण्यास अवकाशात अवतीर्ण झाले आहे. अप्सरांच्या नृत्यांमुळे त्यांच्या हवेत उडणाऱ्या उत्तरीय वस्त्रांचे इंद्रधनूसारखे रंग मेघांमध्ये मिसळून गेले आहे. आकाशातून सगळे जण विष्णूंच्या सातव्या अवताराकडे आपलं लक्ष केंद्रित करून आहे आणि जन्म होताच क्षणी सर्वानी पुष्पांजलीसोबत चांदण्याच्या रूपाने मोती उधळले आहे, असे सार्वत्रिक दृश्य दिसतंय. गदिमा कवी म्हणून किती मोठे आहे ह्याची आपल्याला क्षणोक्षणी प्रचिती येते. श्री रामाच्या जन्माच्या गीतांमध्ये गदिमांनी सगळे भाव अचूक टिपले आहेत, त्यांची उपमा देखील अप्रतिम अशी दर्शवली आहे. पृथ्वीवर लोकांचा आनंद कसा असावा त्याच प्रमाणे आकाशात देव गंधर्वांचा आनंद कसा असावा, श्वापदांना आनंद कसा झाला असावा, ह्या आनंदमहोत्सवात वाद्यांचा नाद कसा असावा ह्याचे अचूक वर्णन गदिमांनी रामजन्माच्या गीतात केले आहे. चहुबाजुंनी एकच जयघोष ऐकू येतोय...राम जन्मला गं सखी, राम जन्मला
बुडून जाय नगर सर्व नृत्यगायनी,
सूर, रंग, ताल यात मग्न मेदिनी,
डोलतसे ती ही, जरा शेष डोलला
राम जन्मला गं सखी, राम जन्मला
संपूर्ण अयोध्या नगरी श्रीराम जन्माच्या हर्षोउल्लासात बुडून गेली आहे. सर्वत्र नाच गाणे सुरू आहे, संपूर्ण जीव सृष्टी आपल्या परीने आनंद साजरी करतीये. वाद्य जलत गतीने वाजतायेत, रांगोळीच्या रंगानी पृथ्वीसोबत आकाशदेखील रंगीत झाले आहे, तालवाद्यांच्या निनादाने सगळीकडे आनंदलहरी निर्माण होत आहे. सूर रंग आणि ताल ह्यात पृथ्वी देखील मग्न आहे. ह्या साऱ्या आनंदीआनंदामुळे पृथ्वी डोलू लागली आहे त्याच कारण पुढे गदिमा सांगतात की पृथ्वी का डोलू लागली हे शेषनाग ज्या वेळी बघता त्या वेळी त्यांना समजत आपल्या प्रभूंनी सातवा अवतार घेतला आहे त्या आनंदात पृथ्वी डोलू लागली आहे; शेषनाग ज्यांनी आपल्या शिरेवर पृथ्वीला धारण केले आहे त्यांना ह्याची जाणीव आहे कि आपल्या थोड्याही अस्थिर होण्यामुळे पृथ्वी आपल्या शिरेवरून कोसळून क्षीरसागरात डुबून जाऊ शकते तरी श्री राम जन्माच्या आनंदात सराबोर झालेत आणि इतरांसोबत खुद्द शेषनाग देखील डोलू लागले आहे. श्री रामाच्या जन्माचा आनंदसोहळा अतुलनीय अवर्णनीय आणि अलौकिक असा आहे. खऱ्या अर्थाने श्रीराम जन्मापासून रामायणातील मूळ कथेतील सुरुवात झाली आहे. त्रेता युगातील सरयू तीरावरील श्री रामजन्माचा आनंद सोहळ्याच्या स्वरलहरी आपण सारे कलियुगात अनुभवतोय आहे, मनानी आपण देखील तिथल्या प्रासादांमध्ये केंव्हाच पोहोचलो आहोत समोर तिन्ही राण्या आपल्या राजपुत्रांना घेऊन बसल्या आहे, संपूर्ण प्रजा आनंदाने न्हाऊन निघाली आहे, स्त्रियांच्या जयघोषात आपण देखील सामील झालो आहोत आणि नकळत आपल्याही मुखांतून रामजन्माचा ओळी बाहेर पड्तायेत...
राम जन्मला गं सखी, राम जन्मला…
राम जन्मला गं सखी, राम जन्मला…
मृणाल जोशी
९३२०१४१२८४