सरयू तिरावरी अयोध्या...

युवा विवेक    14-May-2021   
Total Views |

two_1  H x W: 0 
बिलावल थाटातले दिवसाच्या प्रथम प्रहरी गाणाऱ्या मिश्र देसकार रागात बाबूजींनी गीत रामायणातील द्वितीय
गीतांच्या ओळींना सुरात गुंफलं आहे. थोडा अभ्यास केला तर असं दिसून येतं की देसकार रागात सजवलेली गाणी म्हणजे जास्त करून कोणत्यातरी आद्य दैवताला जागृत करण्यासाठी संगीतामार्फत केलेली उपासना किंवा स्तुती. घनश्याम सुंदरा, प्रभाती सूर नभी रंगती, उठी श्रीरामा पहाट झाली यांसारखी सुमधुर गीते भूप आणि देसकार रागात बांधलेली आहेत. गीत रामायणातील हे गाणं म्हणजे फार खास गाणं आहे. ह्या रागाद्वारे बाबूजी तिथल्या वास्तुदेवताला - नदीरूपी देवीला आपल्या संगीताने जागृत करतायेत. ह्या एका गाण्यात वास्तूतील, निसर्गातील आणि भोवतालीच्या परिसरातील स्त्रीअंशाबद्दल गदिमांनी मोठ्या खुबीने मनोरथ, सौंदर्य, कलाकुसर, लावण्य, स्वभाव आणि शल्य हे सारं एकाच गाण्यात गुंफलं आहे. गदिमांनी आपल्या शब्दांद्वारे सरयू तीरावर एक मोठी नगरी वसलेली आहे. सरयू नदी स्त्री स्वभावाचं द्योतक आहे आणि त्या नदीच्या समर्पक म्हणून तिच्या तीरावर गदिमांनी नगर नाही वसवलेलं तर आपल्या समोर स्त्रीसंस्कार लेवून उभी असलेली नगरी उभी केली आहे. अयोध्या नामक नगरीवर आजचे किंवा कालचे संस्कार नाही तर अयोध्या नगरी आदिम काळापासूनच्या संस्कारानी सुशोभित आहे हे फक्त “मनुनिर्मित” ह्या एका शब्दांद्वारे गदिमांनी सांगितलं
आहे.
त्या नगरीच्या विशालतेवर
उभ्या राहिल्या वास्तू सुंदर
मधुन वाहती मार्ग समांतर
रथ, वाजी, गज, पथिक चालती, नटुनी त्यांच्यावरी
अयोध्या नगरीचा परीघ नुसता पसरलेला किंवा फक्त मोठा नाही तर तो अतिविशाल आहे आणि तो जेवढा विशाल आहे तितक्याच सुंदर वास्तू, तितकेच सुंदर प्रासाद - महाल त्या अयोध्येच्या पावन भूमीवर आभूषणाप्रमाणे जडीत आहे.
गदिमांच्या एकूणच वास्तुशास्त्राबद्दलच्या अभ्यासाची आपल्याला ह्या चार ओळींमध्ये प्रचिती येते. त्या नगरीच्या समांतर वाटा ह्या थोड्या थोडक्या नाहीत तर वाहत वाहत अयोध्येच्या परिघाचा मोठा पल्ला गाठत आहे. त्या अयोध्येचे रस्ते कसे आहे? तर त्या रस्त्यांच्या दोही बाजूंनी मोठाल्या वास्तू उभ्या आहे आणि त्या रस्त्यावरून रथ, अश्व (फार कमी कवी अश्व म्हणजे वाजी ह्या शब्दाचा उपयोग करताना दिसतात), हत्ती, पथिक चालताना दिसतायेत. अयोध्येतील आर्थिक व्यवहार किती अलौकिक आहे हे ह्या चित्रशब्दांतून दिसून येत आहे. अयोध्येतील श्रीमंती आपल्या नजरेस भरावी इतकं दिव्य रूप गदिमांनी फक्त चार ओळींमध्ये दाखवलं आहे.
घराघरावर रत्‍नतोरणें
अवती भवती रम्य उपवनें
त्यांत रंगती नृत्य गायनें
मृदंग वीणा नित्य नादती, अलका नगरीपरी
अयोध्या नगरीचे आर्यावर्तातील चित्र उभं करताना गदिमा त्याच्या खास शैलीत वर्णन करतात की अयोध्या नगरीच्या प्रत्येक प्रासादावर रत्नांची माणिकांची तोरणे आहे, निसर्ग चहूबाजूला बहरलेला आहे आणि त्या निसर्गाचे अलंकारिक रूप म्हणजे भव्य दिव्य रम्य असे उपवन आपल्या नजरेस शीतलता प्रदान करीत आहेत त्या उपवनामध्ये नृत्य गायन यांसारख्या कलांची मांदियाळी आहे. कविकुलगुरू कालिदासांनी मेघदूताचा पूर्वमेघाच्या सातव्या श्लोकात लिहून ठेवलं आहे की - “गंतव्या ते वसतिरलका नाम यक्षेश्वराणाम्”. तर अलका नगरी कशी आहे तर ती मुळात यक्षांची नगरी आहे. तिथलं वातावरण मोठं आल्हादायक आहे. मातीचा सुवास तिथे कायम दरवळतो, वृक्ष आणि वेलींच्या दार्शनिक प्रणयक्रिडेत निसर्ग देखील रममाण आहे, पक्ष्यांच्या किलबिल मधुर नादाने संपूर्ण आसमंत निनादत आहे. समीपच गंगेचा अवखळ प्रवाह सजीव जीवनसृष्टीला मंत्रमुग्ध करतो. त्या अलकानगरी प्रमाणे अयोध्यापुरीच्या आसमंतात देखील मृदूंगाच्या - वीणेचा अनाहत नाद आनंदाच्या स्वरलहरी निर्माण करीत आहे. व्यवहार - कला आणि सौंदर्याच्या त्रिवेणी संगमावर अयोध्या नगरी नांदत आहे. मला असं वाटतं की गदिमांनी अयोध्येचे अलंकारित वर्णन करण्यासाठी “विप्रलंभ शृंगार”;
रसाची मदत घेतली असावी आणि हा शृंगाररस मेघदूताएवढा माधुर्यपूर्ण कुठल्याही काव्यात नाही.
स्त्रिया पतिव्रता, पुरुषहि धार्मिक
पुत्र उपजती निजकुल - दीपक
नृशंस ना कुणि, कुणि ना नास्तिक
अतृप्तीचा कुठें न वावर, नगरिं, घरीं, अंतरीं
गदिमा अयोध्येबद्दल पुढे सांगू पाहतात की - अयोध्या कोणामुळे समृद्धशाली झाली तर तिथल्या माणसांमुळे त्यांच्या वर्तनामुळे, त्यांच्या मनातील वाहणाऱ्या प्रेमाच्या - वात्सल्याच्या खळाळत्या झऱ्यामुळे. इथल्या स्त्रिया पतिव्रता आहे. त्याच सोबत पुरुषही धार्मिक संस्कारानी परिपूर्ण आहे. इथे जन्म घेणारे मुलं देखील त्यांच्या सदैव तेजोमय आहेत. मानसशास्त्रातील स्वभावविशेष सांगताना गदिमा लिहितात की - इथल्या माणसांमध्ये कोणी क्रूर नाहीये, कोणी नास्तिक नाहीये. सगळ्यांच्या स्वभावांमध्ये समाधान आहे. अतृप्ती कुठेच नाहीये..गदिमांनी तीन शब्दांत अवघा तृप्ती- अतृप्तीचा गुंता सोडवला आहे...ही अतृप्ती माणसांच्या मनात एकमेकांसाठी नाही, त्यांच्या घरात देखील नाही आणि नगरीत ही अतृप्तीचा कुठेही लवलेश नाही.
इक्ष्वाकू-कुल-कीर्ती-भूषण
राजा दशरथ धर्मपरायण
त्या नगरीचें करितो रक्षण
गृहीं चंद्रसा, नगरिं इंद्रसा, सूर्य जसा संगरी
सूर्याच्या तेजाप्रमाणे ज्यांची कीर्ती - प्रसिद्ध आणि जाज्वल्य होत चाललीये असा अयोध्यानरेश दशरथ हा एक धर्मपरायण राजा आहे, जो त्याच्या मौलिक तत्वांनी, संपत्तीने, कुशल माणसांमुळे, व्यवहारकुशल अर्थतज्ञांमुळे एकूण राज्याचा धुरा योग्य प्रकारे सांभाळत आहे. कोणत्याही राज्यातील राजा किंवा कर्तापुरुष कसा असावा ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजा दशरथ होय. एक राजा वेगळ्या वेगळ्या क्षणी निरनिराळे कर्तव्य बजावीत असतो. तो घरी त्यांच्या परिवारासमवेत चंद्रासारखा शीतल असतो जेणेकरून बाहेरची दाहकता घराच्या उंबरठ्यात प्रवेश करत नाही. तो राजा त्याच्या अयोध्येत इंद्रासारखा राज्यकारतो जेणेकरून धन-धान्य, संपत्ती ह्यांचा त्याच्या राज्यात ऱ्हास होत नाही आणि हाच राजा प्रसंगी आपल्या राज्याच्या सीमेचे रक्षण त्या युद्धभूमीमध्ये तळपणाऱ्या सूर्याप्रमाणे करतो....गृहीं चंद्रसा, नगरिं इंद्रसा, सूर्य जसा संगरी...
दशरथास त्या तीघी भार्या
सुवंशजा त्या सुमुखी आर्या
सिद्ध पतीच्या सेवाकार्या
बहुश्रुता त्या रूपशालिनी, अतुलप्रभा सुंदरी
त्या राज्याच्या दशरथाच्या तीन राण्या आहे. त्या पत्नी कशा आहेत, तर एका उच्चकुलीन वंशात ज्यांचा जन्म झालेला आहे.
कौसल्या कौशल वंश, कैकयी अश्वपतीचा वंश आणि सुमित्रा काशीनरेश यांच्या वंशावळीतली सुमुखी पुत्री आणि
कालांतराने सुविद्य पत्नी झाल्या. सिद्ध पुरुषाच्या तिन्ही राण्या पतीच्या आणि राज्याच्या सेवाकार्याप्रती समर्पित होत्या.
पाककला, युद्ध निपुणता, व्यवहार कुशलता, कुशाग्र बुद्धिमत्ता, अर्थकारण- राजकारण - समाजकारण यासारख्या अनेक विषयांची माहिती असलेल्या तिन्ही राण्यांची “बहुश्रुता”; ह्या एकमेव शब्दसंयोजनेवरून गदिमांनी मोठी सुंदर अशी बांधणी केली. तिन्ही राण्या बुद्धिमत्तेसोबत अतुलनीय तेजस्वी आणि परमसुंदर होत्या तरी त्यांच्या स्वभावाला गर्वाचा स्पर्श देखील नव्हता.. त्या पराकोटीच्या रूपशालीन सौंदर्यवती होत्या.
तिघी स्त्रियांच्या प्रीतिसंगमीं
तिन्ही लोकिंचें सुख ये धामीं
एक उणें पण गृहस्थाश्रमीं
पुत्रोदय पण अजुनी नव्हता, प्रीतीच्या अंबरी
तिन्ही राण्यांनी आपल्या प्रेमाने - वात्सल्याने राजा दशरथासोबत संपूर्ण अयोध्यापुरीला न्हाऊ घातलं होतं. जसं काही तिन्ही लोकांच्या सुखांनी आपल्या तुषारांनी अयोध्येला चिंब भिजवून ठेवलं होतं. तिन्ही राण्यांच्या लाडाने कौतुकाने संपूर्ण प्रजा भारावून गेली होती. प्रजेतील स्त्रियांना मुलांना त्या राण्यांचा प्रचंड लळा लागला होता. त्याच प्रमाणे कलावंत, व्यवहारकुशल, तज्ज्ञ नागरिकांच्या प्रति राजा दशरथाचा स्नेहभाव वाखाण्याजोग होता. इतकं सगळं असलं तरी तिन्ही राण्यांच्या आणि दशरथ राज्याच्य गृहस्थाश्रमाला कायम रुखरुख असायची की त्यांची झोळी ईश्वराने अजुनी रिक्त ठेवली आहे. ज्या अयोध्येवर तिथल्या प्रजेवर ह्या रघुवंशातील राजा राण्यांनी निस्वार्थ प्रेम केलं, आपल्या स्नेहाचे रांजणसाठी रिक्त केले त्यांच्या गृहस्थाश्रमाच्या बागेत एक पुत्ररूपी एक सुंदर पुष्प उमलू नये?
शल्य एक तें कौसल्येसी
दिसे सुमित्रा सदा उदासी
कैक कैकयी करी नवसासी
दशरथासही व्यथा एक ती, छळिते अभ्यंतरी
सगळी कडून अनुरागाचा - स्नेहाचा वर्षाव होत आहे. प्रजेला त्यांच्या आवडत्या तिन्ही राण्या आणि राजाच्या प्रेमाची क्षणोक्षणी दिव्य प्रचिती येत आहे त्यांच्या वास्तपुस्त स्वभावाची आत्म-अनुभूती होत आहे.
इतकं सगळं असूनही तिघी राण्यांच्या मनातील कोरड्या खणखणीत असलेल्या खड्गाला पाझर फुटू नये हा कुठला दैवदुर्विलास आहे. तीन ओळींमध्ये गदिमांनी तिघी राण्यांच्या स्वभावाची गुणवैशिष्टये चितारली आहे. आपल्या मातृत्वतेचा सरोवर असा कोणत्या अनुतप्ततेमुळे आटला जावा ह्या शल्यात महाराणी कौसल्या दिवसेंदिवस ग्रीष्मकालीन निसर्गाप्रमाणे भकास झालेली आहे. मऊ - कोमल स्वभावाची कौसल्या आपल्या सोशिक वृत्तीने स्वतःचे दुःख स्वतःच पचवते आहे. सुमित्राची अवस्था त्याहून काही वेगळी नव्हती. एकदम सध्या स्वभावाची सुमित्रा आपलं दुःख मनामध्ये देखील ठेवू शकत नाही आणि त्या दुःखाची उघड मांडणीपण करू शकत नाही अश्या लोलकावर झुलते - ह्या मनोस्थितीत सुमित्रा राणी आरशात आपल्या अश्रूंना वाहताना बघत दिवस कुंठित होती. परंतु कैकयी ही एक योध्याची कन्या आहे. ती निश्चयी आहे. आपलं दुःख मनात ठेवून स्वतःचा कोंडमारा करून जगणं तिला अमान्य आहे. येनकेनप्रकारेण तिला मूल हवंय त्यासाठी ती भगवंताला साकडं घालून वेठीस धरायला देखील तयार आहे. अनेक नवस - उपास करून कैकयी राणी मातृदोष असलेल्या एका विराणी स्त्री समान जगत होती आणि आपल्याला एक ही पुत्र नाही किंवा ह्या राजगादीला कोणी राजकुमार नाही, ही व्यथा राजा दशरथ यांना अतोनात छळत होती, त्यामुळे त्यांचे अंतर्मन उद्विग्न होते.
राजसौख्य तें सौख्य जनांचें
एकच चिंतन लक्ष मनांचें
काय काज या सौख्य - धनाचें ?
कल्पतरूला फूल नसे कां, वसंत सरला तरी
राज्याचे सौख्य इथल्या प्रजेसाठी आहे. अयोध्येची संपत्ती, समाधान , अश्व-गज, विशाल वास्तू समुदाय, हे सगळं इथल्या प्रजेसाठी आहे ह्या साऱ्याने राजाचे राण्यांचे समाधान होत असेलही पण हे सारे भोगविलास पित्याचे - मातांचे कुलदीपक नसण्याची आंतरिक वेदनेला तसूभर देखील फुंकर घालू शकत नव्हते. सांत्वन करू शकत नव्हते. दशरथ राजा आणि तिघी राण्यांच्या मनाची अवस्था फार विकट होती त्यांचा एकच ध्यास होता संतती प्राप्ती. राजा राण्यांच्या पायाशी इतका भव्य विलासवादी पसारा असतानाही तो त्यांना आज नकोसा झाला आहे. त्या सगळ्या संपत्तीचा ह्या क्षणी काहीच उपयोग नाही. हा जीवघेणा वसंत सरला तरी मनातील इच्छा पूर्ण करणाऱ्या कल्पवृक्षांला एकही फुल उमलू नये..
हा कुठला दैवयोग म्हणावा??
- मृणाल जोशी
९३२०१४१२८४