मुक्ता

युवा विवेक    07-May-2021   
Total Views |

girl_1  H x W:  
मुक्ता खिन्नपणे आरशासमोर बसून होती. राजीव बेडवर बसून त्याचं काही काम आटपत होता. दोघांमध्ये संवाद होण्याची शक्यताच नव्हती. चार दिवस घरातली एकही व्यक्ती मुक्ताशी बोलली नव्हती. घरातली काय, तिच्या आई-बाबांनी आणि भावानंसुद्धा तिच्याशी बोलणं सोडून दिलं होतं. रविवारी अशी झणझणीत फॅमिली मीटिंग झाली होती की बास. त्यात मुक्ता पूर्णपणे एकटी पडली होती. या मीटिंगमधेच तिला राजीवनं तो तिच्या बाजूनं नाही हे सांगितलं होतं. तीन-चार दिवसात वातावरण निवळेल, कुणी नाही तरी राजीव तिच्याशी बोलेल, तिची बाजू ऐकून घेईल आणि दोघं मिळून यातून काहीतरी मार्ग काढतील, एकमेकांच्या आईबाबांना समजावतील असं तिला वाटत होतं, पण त्या घरात जणू मुक्त अदृश्यच आहे की, काय अशा थाटातच राजीव वावरत होता. तिच्याकडे बघायलासुद्धा तो तयार नव्हता. असं किती दिवस राहणार? त्यामुळे आजच्या आज काही तरी निर्णय तिला घेणं भागच होतं.
वास्तविक राजीव समोर आपली बाजू मांडावी हा तिचा हट्टच मुळी चुकीचा होता, कारण तिचं ते पाच वर्षांपूर्वीच करून झालं होतं. तिला मूल नको आहे, आईपण अनुभवायची इच्छा नाही हे तिनं राजीवला पहिल्या भेटीतच सांगितलं होतं. ठरवून लग्न करताना हे असे विचार मांडणं म्हणजे जरा धैर्याचंच होतं, पण नंतर काही गैरसमज नको म्हणून तिनं हे धाडसी पाऊल उचललं होतं. म्हणजे राजीवला जर तशी इच्छा असेल तर, पुढे काही बोलण्या-ठरवण्याआधीच त्याला हे समजलेलं बरं, पण त्यांच्या त्या पहिल्या भेटीत राजीवसुद्धा तिच्याच मताचा होता हे तिला समजलं. त्यानं नुसतं तिचं म्हणणं ऐकून घेतलं नाही तर, तिला तू तुझं करिअर कर, मी माझं करतो आणि मग पन्नाशीला दोघं रिटायर होऊ.. ना कसली गुंतागुंत न कसली जबाबदारी हे त्याचं नियोजनसुद्धा त्यानं सांगितलं. मुक्ताला हे काही म्हणजे काही अपेक्षितच नव्हतं त्यामुळे तिला साहजिकच या सगळ्याचा प्रचंड आनंद झाला. लगेच लग्नाचा होकार, पुढची बोलणी, साखरपुडादेखील पार पडला.
हा निर्यण अर्थातच घरातल्यांशी बोलून त्यांनी घेतला नव्हता तसा तो त्यांनी कुणाला सांगितला सुद्धा नव्हता. वेळ आली तर बघू काय सांगायचं असंच त्यांचं ठरलं होतं. सुरुवातीची एक-दोन वर्ष गेल्यावर आजी-आजोबा होण्यासाठी आतुरलेले तिचे आई-बाबा आणि सासू-सासरे बाळाचा विषय काढू लागले. तेव्हा ती काही बोलायच्या आधीच राजीवनंच त्यांना इतक्यात काही विचार नसल्याचं ठणकावून सांगितलं होतं. खरं तर मुक्ताचं तेव्हाही हेच म्हणणं होतं की, त्यांनी उगाच सगळ्यांना आशेला न लावता त्यांचा काय तो निर्णय सांगून टाकावा, पण राजीव याबद्दल जरा साशंकच होता. त्यानं तसं ठणकावून सांगितल्यावर पुढे वर्ष दीड वर्ष त्यांच्यापाशी कुणी विषय काढलासुद्धा नाही त्यामुळे मुक्तानंसुद्धा ताणून न धरता तात्पुरता तो विषय सोडून द्यायचं ठरवलं होतं.
गेले सहा महिने मात्र लग्नाला झालेली सहा वर्ष, मुक्ताच वाढत असलेलं वय या सगळ्या गोष्टी बघता तिच्या आईचं आणि सासूचं वारंवार तिचं बौद्धिक घेणं सुरू होतं. तिच्या बरोबरीच्या मुलींची मुलं किती मोठी झालीयेत, वय वाढल्यावर पुढे काय गुंतागुंत होऊ शकते या सगळ्या गोष्टी तिला दोघी येता-जाता ऐकवत होत्या. या व्यतिरिक्त बोलायला दुसरा विषयच नसल्यासारखा. राजीवसुद्धा हल्ली याबद्दल काही बोलायला तयार नव्हता. तिनं याबद्दल त्याला विचारल्यावर सुद्धा उडवाउडवीची उत्तरं द्यायला लागला होता. सासूनं तर तिच्यासाठी गायनॅकची वेळसुद्धा घेऊन ठेवली होती. शेवटी मागच्या आठवड्यात रोजची कटकट सहन न होऊन तिनं शांतपणे सासू-सासऱ्यांना समोर बसवून आपला सांगून टाकला होता. बोलताना ती जाणीवपूर्वक “आम्ही ठरवलं आहे...” “आमचा निर्यण आहे...” असं बोलत होती. हा अत्यंत वैयक्तिक निर्णय असल्यानं सासू-सासरे नाराज होतील, त्यांना वाईट वाटेल, पण शेवटी ते आहे ती परिस्थिती स्वीकारतील अशीच तिची समजूत होती. मात्र, झालं उलटंच. सासू-सासऱ्याना हा मोठा धक्काच होता त्याबरोबर या विचित्र निर्णयात आपल्या मुलाचासुद्धा सहभाग आहे याबद्दल अविश्वास. तेव्हपासून या दोघांनी तिच्याशी बोलणं सोडलंच. राजीव दोन दिवस ऑफिसच्या टूरवर होता. त्यामुळे तिनं त्याच्या कानावर हे घातलं नाही. तो आल्यावर दोघं एकत्र सगळ्यांशी बोलतील असं तिनं ठरवलं, पण इथंही झालं उलटंच. राजीव यायच्या दिवशी तिला नेमका ऑफिसमधून यायला उशीर झाला. तोवर राजीवचं आणि त्याच्या आई-वडिलांचं आणि या तिघांचं तिच्या आईवडिलांशी बोलणं झालं होतं. ती घरी आली तेव्हा दुसऱ्या दिवशीची त्यांची तिच्या माहेरी मिटिंग ठरलीसुद्धा होती. त्या रात्री राजीव दोन दिवसांनी घरी येऊनसुद्धा तिच्याशी काही बोलता झोपून गेला. त्याच्या या वागण्याची उकल तिला दुसऱ्या दिवशी सकाळी झाली जेव्हा राजीव मीटिंगमध्ये तोंड उघडायला तयार नव्हता.
“पण तुमच्या दोघांचं ठरलं आहे तर, राजीव का आता काही बोलत नाही?”
तिच्या बाबांनी जरा रागातच विचारल्यावर तिनंही राजीवकडे बघत काहीतरी बोलण्याची खूण केली.
“मला वाटलं की, तो तुझा तात्पुरता निर्णय होता म्हणून मी तेवढ्यापुरतं हो म्हटलं, पण काही वर्षांनी तुझा निर्णय बदलेल असच मला वाटतं होतं.”
“राजीव काहीही बोलू नकोस , सात वर्षात तू मला एकदाही ह्याबद्दल काही विचारलं नाहीस मग आता का असा फिरतोयस?”
“कारण मला प्रश्न विचारले जातात माझ्या पुरुष असण्यावर शंका घेतल्या जातात. त्यात माझ्याशी कोणतीही चर्चा न करता तू परस्पर निर्णय सांगितल्यामुळे ह्या प्रश्नांना आणि शंकांना उधाणच आलं आहे. त्यात नवऱ्याला पाठीशी घालणारी बायको म्हणून तू मिरवायला मोकळी!” या वाक्यानंतर काय ते मुक्ताच्या लक्षात आलं आणि यानंतर वाद घालण्यासारखंसुद्धा काहीच उरलं नव्हतं हे जाणवलं. कुणी, कधी, काय बोलून काय प्रश्न विचारले होते यात शिरायची तिची इच्छा नव्हती.
आतासुद्धा आरशासमोर बसून हाच प्रसंग तिच्या डोळ्यांसमोर तरळत होता. एकीकडे तिनं...तिनं आणि राजीवनं घेतलेला निर्णय, पाहिलेली स्वप्ने होती आणि दुसरीकडे लोकांच्या चार प्रश्नांच्या भीतीनं बदललेला राजीव. दोन्हीतलं नक्की काय स्वीकारायचं हे तिच्यापुढे आव्हानच होतं. पहिल्या भेटीपासून ते मागच्या सात वर्षातला प्रवास तिला आठवत होता. या स्वतंत्र विचारांच्या जमान्यात आपल्यावर हा प्रसंग ओढावेल, मातृत्वाला असलेलं अनाठायी महत्त्व सगळ्या नात्यांच्या आड येईल याची तिला पुसटशीसुद्धा कल्पना नव्हती. तिनं एकदा आरशातूनच दिसणाऱ्या राजीवकडे बघितलं. त्याच्या चेहऱ्यावर कसलेच भाव तिला दिसले नाहीत किंवा ओळखू आले नाहीत. दुसऱ्यांना खूश करायला आयुष्यभराची जबाबदारी स्वीकारायची का आपल्या निर्णयाचा आदर आपण स्वतःच ठेवायचा? आरशात स्वतःकडे बघून ती ओळखीचं हसली.
ती मुक्ता होती.. तिचा निर्णय झाला होता...
- मुग्धा मणेरीकर