'Unposted letter'ची गोष्ट

युवा विवेक    12-Jun-2021   
Total Views |

story_1  H x W: 
'Unposted letter'ची गोष्ट
लेखक : Mahatria Ra
 
उपदेश करणे, दुसर्‍याला चार युक्तीच्या गोष्टी सांगणे हे फार सोपे काम असते; पण आपण केलेला उपदेश आवडून दुसर्‍याने तो अंमलात आणणे ह्यासाठी एक तर, त्या माणसाचा आपल्यावर खूप विश्वास असावा लागतो किंवा तो माणूस कुठल्यातरी अडचणीत असावा लागतो; अन्यथा तो उपदेश कटकट ठरण्याची शक्यता जास्त असते. आपल्याकडे अनेक धर्मग्रंथ, पुराणे, संतसाहित्य यांनी शतकानुशतके हे काम चोखपणे बजावले आहे. कसे वागावे, कसे बोलावे, कसा विचार करावा, परस्परातील नातेसंबंध कसे जपावे, आयुष्यात यशस्वी कसे व्हावे अशा अनेक गोष्टीबद्दल अशा ग्रंथामध्ये विवेचन केलेले आढळते. परंतु काळाच्या ओघात किंवा त्यातील जड भाषेमुळे हल्लीची पिढी त्या ग्रंथांपासून दूर गेले आहे. गेल्या काही वर्षांत आयुष्यात यशस्वी होण्याचे मार्ग, पॉझिटिव्ह थिंकिंग, सेल्फ हेल्प प्रकारातील अनेक पुस्तके आली आहेत. Joseph Murphy ह्यांचे Power of subconscious mind, Rhonda bryne ह्यांचे secret, Robin शर्मा ह्यांची पुस्तके याच साखळीतील काही उदाहरणे आहेत. असेच एक पुस्तक म्हणजे महात्रया रा यांनी लिहिलेले अनपोस्टेड लेटर.
दुसर्‍याला पटेल, आवडेल अशा पद्धतीने उपदेश करणे, समजावून सांगणे ही एक कला आहे आणि ती महात्रया रा यांनी व्यवस्थित साधली आहे. साध्या, सोप्या आणि आपल्याला माहीत असलेल्याच गोष्टी त्यांनी जरा वेगळेपणाने आणि प्रभावीपणे समजावून सांगितल्या आहेत.
आपण आयुष्यात जेव्हा एखाद्या वेळी खूप आनंदी असतो, तेव्हा ह्याचा अर्थ असा होत नाही की आपल्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी एकदम परफेक्ट सुरू आहेत. त्याचा एवढाच अर्थ असतो की, आपल्या आयुष्यात जे सर्वात महत्त्वाचे नाते आहे, ते सुरळीत आणि तुम्हाला हवे तसे आहे. नातं हे एखाद्या बीजाप्रमाणे असतं, त्याला जपावं आणि फुलवावं लागतं आणि अपेक्षांचा अतिरेक होऊ नये यासाठी योग्य ते भान ठेवावं लागतं. नातं हे एखाद्या बचत खात्याप्रमाणे असतं. त्यात प्रेम, विश्वास, सुखद क्षण यांचा भरपूर बॅलेन्स असेल, तर घडणार्‍या काही चुका, गैरसमज निभावून नेले जाऊ शकतात. मात्र, पण जर फक्त भांडण, वाद यांचे विड्रॉल्सच सुरू राहिले, तर ते नातं टिकणार कसं? म्हणूनच सोपा उपाय म्हणजे तुमच्या नात्याचा बॅन्क बॅलन्स सतत टिकवून ठेवणे.
एखाद्यावर प्रेम करणे आणि प्रेमात एखाद्याचे फाजील लाड करणे यात खूप फरक असतो. बर्‍याचदा नात्यात समोरच्याला बदलण्याचा प्रयत्न करणे, सुधारण्याची अपेक्षा करणे, असंही होताना दिसतं. मात्र, त्या माणसाला तो जसा आहे तसं स्वीकारणे म्हणजे खरे प्रेम. प्रेम हे तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह बदल घडवून आणतं. मात्र, केवळ फाजिल लाड तुम्हाला अजून कमकुवत करतात. तुमच्यावर जे प्रेम करतात, ते तुमचा अहंकार, तुमची समाजातील पत ह्या कशाचीही पर्वा न करता तुमच्यात सुधारणा होण्यासाठी प्रसंगी वाईटपणा घेऊनसुद्धा प्रयत्न करतात. प्रेम हे ध्यान करण्यासारखं असतं. तुम्हाला वाटतं की, काहीच होत नाहिये, पण ते तुमच्यात हळूहळू खूप पॉझिटिव्ह बदल घडवून आणत असतं
वर उल्लेखलेल्या दोन गोष्टींसारख्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी या पुस्तकात थोडक्यात मांडण्यात आल्या आहेत. फक्त नातेसंबंध किंवा प्रेम नाही तर आयुष्यातले अनुभव, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन, आपल्या कामाप्रती आपले योगदान कसे असावे ते एखाद्या मोठ्या कंपनीचा टर्नओव्हर, नफा वाढविण्यासाठी किती छोट्या आणि सोप्या गोष्टी करता येऊ शकतात, असे विविध विषय पुस्तकात हाताळलेले आहेत. एका प्रकरणाची लांबी दोन पानांपेक्षा जास्त नाही. छोटी छोटी, इंग्रजी भाषेतली सोपी वाक्ये, विषयाची थेट, मुद्देसूद आणि उदाहरणे देऊन केलेली मांडणी, अशी ह्या पुस्तकाची रचना आहे. खूप मोठे तत्त्वज्ञान अत्यंत सोप्या भाषेत, उदाहरणांसह समजावून सांगितलेले आहे.
आपल्या रोजच्या आहारात जीवनसत्त्वे ज्याप्रमाणे थोड्याच प्रमाणात आवश्यक असतात त्याचप्रमाणे ही जीवनमूल्ये आहेत. एका वेळी, एका बैठकीत सगळे पुस्तक वाचावे, असे हे पुस्तक नाही; पण तुम्ही कधीही, तुमच्या मनाच्या कोणत्याही अवस्थेत ह्यातील एखादा छोटासा धडा वाचला तरी तुम्ही त्याच्याशी जोडून घेऊ शकता आणि हेच या पुस्तकाचे यश आहे. लेखकाने प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक तुमच्या आयुष्यात नक्कीच चांगला बदल घडवून आणू शकते.
- तन्मयी जोशी