Atlas Shrugged - भाग 2

युवा विवेक    21-Aug-2021   
Total Views |
#बीटविनदलाइन्स
Atlas Shrugged_1 &nb
कादंबरीचे नाव : Atlas Shrugged - भाग 2
लेखिका : Ayn Rand
पृष्ठसंख्या : 1069
गेल्या भागात पाहिल्याप्रमाणे Taggart transcontinental ही मोठी रेल्वे कंपनी जिम टागार्ट आणि Dagny Taggart ह्यांच्या मालकीची असते. जिम हा ब वर्गातला, तर Dagny ही अ वर्गातली. जिम प्रत्येक गोष्टीसाठी टाळाटाळ, निर्णयाची चालढकल, दिखाऊपणा, इतरांकडे बोट दाखवणे ह्या श्रेणीतीला, तर बहीण Dagny त्याच्या उलट. कंपनीच्या दोन मोठ्या रेल्वे लाइन्स असतात, एक Rio Norte जी Colorado ह्या राज्यातून जात असते आणि दुसरी San Sebastian जी पार मेक्सिकोपर्यंत पोहोचलेली असते. मेक्सिकोपर्यंत रेल्वे लाइन नेण्यामागे हेतू असतो की, तिथे नव्याने विकसित होणार्‍या तांब्याच्या खाणी, आणि त्यांचा मालक, एक मोठा उद्योगपती फ्रान्सिस्को. जिम आणि त्याचे कंपनीतले साथीदार ही लाइन चालवण्यामागे मेक्सिकोमधील लोकांना सुविधा मिळावी, त्यांचा विकास व्हावा असे चित्र निर्माण करत असले तरी त्यांचा डोळा असतो, ती खाण आणि त्यातून मिळणारे उत्पन्न ह्यावर. त्यामुळे Colorado la जाणारी Rio Norte line अजून विकसित करू पहाणार्‍या Dagny ला त्यांचा विरोध असतो.
फ्रान्सिस्को हा हुशार, धूर्त उद्योगपती, आपल्या खाणींचे मेक्सिकोमध्ये राष्ट्रीयीकरण करतो आणि मेक्सिको सरकार तिथपर्यंत येणार्‍या रेल्वेचे अर्थात Taggart कंपनीच्या लाइनचे राष्ट्रीयीकरण घोषित करते. Taggart कंपनीचे खूप मोठे नुकसान होते. फ्रान्सिस्को हा Dagny चा बालमित्र आणि प्रियकर. तिच्यासारखेच कामात प्रचंड हुशार, आणि स्वताचे कर्तुत्व सिद्ध केलेला, त्यामुळे त्याचे हे वागणे सर्वांना बुचकळ्यात टाकते, Dagny त्याला प्रतिप्रश्न करते, पण तो तिला दाद देत नाही आणि काही दिवसांनी गायब होतो. स्वाभिमानी Dagny त्याचा नाद सोडून देते आणि स्वतःच्या हिमतीवर नवीन John Galt line सुरू करण्याचा निर्णय घेते, जी आधीच्या Rio Norte च्याच मार्गावर Colorado भागातून जाणार असते. तिच्या सारखाच कर्तुत्ववान उद्योगपती Hank Reardon तिला मदत करतो. Hank ने Reardon metal नावाच्या नवीन धातूची निर्मिती केली असते आणि त्याचाच वापर करून ही नवीन रेल्वे लाइन तयार केली जाते आणि Dagny ती यशस्वीरित्या चालवून दाखवते आणि आपल्या कंपनीला मोठे नुकसान होण्यापासून वाचवते. Dagny आणि Hank, दोघेही 'अ' वर्गातले लोक असतात. त्यांची छान मैत्री होते आणि त्यांच्यात प्रेमसंबंधही निर्माण होतात, पण या सगळ्या गोष्टी होत असताना, तिच्यासारखेच कामात तरबेज असणारी माणसे, त्यांचे उद्योग हळूहळू बंद होत असतात आणि त्या माणसांचे काय होते हे कोणालाच कळत नसते.
हे सगळे घडत असताना तिने उभारलेली नवीन रेल्वे लाइन तिला परत मूळ कंपनीला परत करावी लागते. तिच्या भावासारखे 'ब' वर्गातले लोक, आपल्या ओळखी, वजन वापरून विविध कायदे पास करून घेऊन सतत मार्गातला अडथळा बनत राहतात. कधी समानतेच्या कायद्याच्या नावाखाली सर्वांना समान संधी दिल्याचे दाखवून प्रस्थापितांना संधी देणे, कधी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी असे म्हणून धावणार्‍या रेल्वेच्या वेगावर नियंत्रण घालणे, कधी Rearden धातू हा निकृष्ट दर्जाचा असल्याचे रिपोर्ट प्रसिद्ध करून घेणे आणि ह्या सगळ्याला तोंड देत लढत राहणारे Dagny आणि Hank... पण तरीही हे सगळे कादंबरीचा फक्त एक भाग आहे.
मनोरंजनासाठी एखादी गोष्ट सांगणे हा या कादंबरीचा उद्देश नाहीच, तर मूळ उद्देश आहे Ayn Rand चे तत्त्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणे. मी फक्त स्वतःसाठीच जगेन असे प्रामाणिकपणे सांगणारे लोक, स्वतःच्या कर्तुत्वावरच विश्वास असणारे लोक, कर्तृत्व गाजवणे म्हणजेच आयुष्याचे ध्येय असे मानणारे लोक, मध्यम प्रतीचे काम करणे म्हणजे गुन्हा असे मानणारे लोक, विचारांची तर्कशुद्ध मांडणी करू शकणारे लोक, आपल्या निर्णयावर ठाम राहून त्यांची जबाबदारी पेलवणारे लोक अशाच माणसांमुळे जग चालते आणि त्यांना त्यांच्या कर्तृत्वाचा, बुद्धीचा योग्य तो मोबदला मिळायला हवा हे बरोबरच झाले, पण अडचण तेव्हा येते जेव्हा ह्यापैकी काहीच न करणारे लोक आपल्या नशिबाने, वशिल्याने, बहुमताने किंवा अन्य काही मार्गानी महत्त्वाच्या जागा बळकावतात, लोककल्याण्याच्या नावाखाली आपल्या सोयीचे कायदे बनवितात आणि वर उल्लेख केलेल्या लोकांना 'स्वार्थी' हे लेबल लावून मोकळे होतात.
आपले काम मनापासून चोख करणे, त्यात अधिकाधिक सुधारणा करणे हे 'अ' वर्गाचे काम, आपल्याला दिलेले काम नीट करणे, पण त्यात काही सुधारणा करण्याची, प्रगती करण्याची कुवत नसल्याचे मान्य करणारे लोकही तेवढेच प्रामाणिक असतात. परंतु काम केल्याचे फक्त भासवणारे, प्रत्येक गोष्टीत बरोबरच्याला अडचणीत टाकणारे नियम दाखवणारे, आपण करत असलेले काम हे लोकांवर किती उपकार आहेत असे दाखवणारे, 'माणसासाठी नियम यापेक्षा नियमासाठी माणूस,' हे तत्त्वज्ञान आपल्या सोयीने वापरून इतरांची कामे अडवून धरणारे, कुठलाही निर्णय घेताना एकमेकांकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकून टाकणारे, 'ब' वर्गातले लोक समाजाच्या वाढीसाठी नेहमीच घातक असतात, शोषण करत असतात. या कादंबरीतून हाच विचार प्रामुख्याने मांडला गेला आहे.
समाजात जगताना हे असे दोन्ही प्रकारचे लोक आपल्याला पावलोपावली दिसत असतात. त्यापैकी काही तुमच्या ऑफिसमध्ये असतील, काही तुमच्या राहत्या घराच्या आजूबाजूला, मित्रपरिवार, सोशल मीडिया.. सगळीकडेच. त्यामुळेच ही कादंबरी वाचताना, आपल्याला आपल्या समाजात दिसणार्‍या घडणार्‍या चुका अधिकाधिक ठळक होत दिसत जातात आणि समाजाच्या जडण-घडणीत, नियमात असलेले दोष समोर येत जातात.
कादंबरीत, तिसऱ्या खंडात आपल्या कामासाठी विमानाने प्रवास करताना Dagny च्या विमानाला अपघात होतो आणि ते एका दरीत कोसळते. तिला किरकोळ जखमा होतात पण तिला तिथे एक वेगळेच जग दिसते. ते जग असते, ते असते John Galt ने तयार केलेले. इतके दिवस बाहेरच्या जगातून गायब झालेली माणसे, जी तिच्यासारखीच इतके दिवस बाहेर झगडत होती. सगळ्या 'अ' वर्गातल्या लोकांचे जग. जगातले सर्वोत्तम उद्योगपती, तत्त्वज्ञ, संगीतकार, संशोधक, भौतिकशास्त्रज्ञ, गणिततज्ज्ञ, लेखक, डॉक्टर, मेकॅनिक इत्यादी तिथे एकत्र राहत असतात. ते तिथे रहात असतात कारण त्या सर्वानी संप पुकारलेला असतो, उर्वरित जगाच्या विरुद्ध. अशा सर्व लोकांनी जर आपले काम, आपली जबाबदारी झटकून टाकली तर काय होईल बाकीच्या जगाचे... कारण हीच माणसे तर एका अर्थी जगाची अर्थव्यवस्था चालवत असतात..
ही अशी जागा बघून Dagny हरखून जाते, पण ह्यापुढे ती काय करते, तिथे राहते की आपल्या कंपनीसाठी परत नॉर्मल जगात जाते...? असे खरेच झाले तर, काय होईल.. जग अशा माणसांशिवाय चालू शकेल का? यासाठी ते पुस्तक वाचायला हवे.
Ayn Rand ने मांडलेली तत्त्वे, बरोबर की चूक हा नक्कीच वादाचा मुद्दा आहे. कारण तिची पात्रे पांढरा किंवा काळा ह्या दोनच रंगात आहेत. निरपेक्ष प्रेम, कारणाशिवाय प्रेम अशा कल्पना तिला मान्यच नाहीत, लहान मुले, म्हातारी माणसे अशा नॉनप्रॉडक्टिव्ह घटकांचा तिच्या जगात समावेश नाही. असे असले तरी अनेक पात्रे, आणि सशक्त कथानकाच्या आधारे Ayn Rand आपला विचार, तत्त्वज्ञान पोहोचवण्यात शंभर टक्के यशस्वी झाली आहे. तिची ही कादंबरी Fictional व्रितिंग (काल्पनिक लेखन) मधली एक महान कलाकृती मानली जाते. १९५७ ला प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकाच्या आजवर 90 लाख प्रती विकल्या गेल्या आहेत.
©️ तन्मयी रानडे-जोशी