लोकेशन आणि बजेट

युवा विवेक    06-Aug-2021   
Total Views |

location_1  H x लोकेशन आणि बजेट
लोकेशन (चित्रिकरणाचे स्थळ)
हृतिक रोशनचा पहिला वहिला चित्रपट ‘कहो ना प्यार है’ ...च्या काही गाण्यांमध्ये वापरली गेलेली चित्रीकरणाची स्थळे अत्यंत लोभस होती. अर्थातच ती परदेशातली होती. त्याला आलेला खर्चही अफाट होता. त्यानंतर परदेशात चित्रीकरण करण्याचा ट्रेंड वाढू लागला. एखाद्याच गाण्यासाठी निर्माते देशाबाहेरील लोकेशनला प्राधान्य देऊ लागले.
चित्रीकरणस्थळे प्रचंड बोलकी असतात. रामसेबंधूंच्या भयपटात ही गोष्ट उठून दिसते. त्यांनी वापरलेल्या हवेली आतूनही आणि बाहेरूनही भयावह वाटायच्या. "पुरानी हवेली" या चित्रपटात दाखवली गेलेली हवेली 'मुरुड पॅलेस' जंजिरा येथे आहे. रामसेबंधूनी याच लोकेशनचा वापर त्यांच्या अजून दोन ते तीन चित्रपटात केला. महाबळेश्वर, पाचगणी, वाई सतत वापरात आलेले लोकेशनही आता प्रेक्षकांच्या ओळखीचे झाले आहेत.
 
पटकथेचा आधारावर आपले लोकेशन निवडताना काही महत्त्वाच्या बाबी आपण लक्षात ठेवाव्या.
१. लोकेशन निवडताना ते सर्वांच्या सोयीचे असावे. हॉटेल आणि वाहतुकीची सोय तिथून जवळ असल्यास उत्तम. निवडलेल्या लोकेशनवर सतत काम (Continue Schedule) होणार असेल (सात-आठ दिवसांच्या वर) तर, रोजच्या प्रवासाचा खर्च अनाठायी वाढू शकतो.
२. लोकेशन शक्यतो खर्चाच्या मर्यादेत असावेत. लोकेशन भाडेतत्वावर असेल तर, चित्रीकरणाचा खर्च वाढू शकतो. गरज असेल तरच भाडेतत्वावर लोकेशन घ्यावे.
३. चित्रीकरण करताना स्थानिक प्रशासन आणि पोलीस यांच्याकडून परवानगी घेणे केव्हाही हितकारक ठरते. एसटी स्टँड, दवाखाना, रेल्वे स्टेशन इत्यादी ठिकाणी चित्रीकरण असल्यास तिथल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी परवानगीची एक प्रत जवळ ठेवणे उत्तम.
४. लोकेशन हंटींगसाठी जाताना पटकथाकार, दिग्दर्शक, कार्यकारी निर्माता आणि छायाचित्रकार सोबत असणं केव्हाही चांगलं.
५. नेहमी एकास दोन असे पर्याय ठेवावे.
६. लोकेशन बघताना तेथून मूलभूत गरजा किती अंतरावर आहेत हेही पाहिलं पाहिजे. उदा. पाणी, जेवायची सोय, हॉस्पिटल, मुख्य बाजारपेठ इत्यादी.
७. मुख्य कलाकार, सहकलाकार यांचा लोकेशनपर्यंतचा येण्या-जाण्याचा खर्च बऱ्याचदा निर्मात्यांना करावा लागतो. त्यामुळे या खर्चाचा अंदाज घेऊन लोकेशनची निवड करावी.
८. लोकेशन जर एखादे घर किंवा बंगला असले तर, त्या जागामालकाशी योग्यरीत्या करार करून मगच ते वापरण्यास घ्यावे. त्यामुळे गोष्टी कायदेशीररीत्या राहतात.
९. काही ठिकाणी चित्रीकरण करताना मध्येच मालकाशी न पटल्याने अथवा काही तरी वाद झाल्याने ऐन वेळी, किंवा चित्रीकरण सुरू असताना ते बंद करण्याची वेळ येते. याउलट बरीच मंडळी चित्रीकरण पार पडल्यावर त्या लोकेशनचे तोंडी ठरलेले भाडे बुडवून निघून जातात. यामुळे लोक आता आपली वास्तू चित्रीकरणासाठी देण्यास कंटाळा करू लागले आहेत. याच कारणासाठी दोन्ही बाजू कायद्याने भक्कम करून घ्याव्यात.
१०. एखादं लोकेशन सिझनलसुद्धा असतं. पाऊस, थंडी आणि उन्हाळा याचा अंदाज घेऊन चित्रीकरण ठरवावे.
११. जर लोकेशन लांब आणि रीमोट एरियामध्ये (गावाबाहेर किंवा निर्जन स्थळी) असेल तर, लोकेशनवर जायच्या तीन-चार दिवस आधीच प्रत्येक डिपार्टमेंटने आपल्या घेऊन जायच्या सामानाची यादी तयार करून ठेवावी. कला, मेकअप, वेशभूषा, लाइट्ससाठी ही यादी खूप महत्त्वाची ठरू शकेल. एखादी महत्त्वाची गोष्ट राहिली तर, तिची ने-आण करणं खर्चिक ठरू शकतं.
१२. चित्रपटाबद्दल सामान्य लोकांच्या मनात खूप तीव्र भावना असतात. त्यामुळे चित्रीकरण सुरू असताना स्थानिक लोक त्रास देऊन चित्रीकरण थांबवतात, असेही अनुभव येतात. त्यातून वादाचे प्रसंगही उद्भवू शकतात.
१३. लोकेशनवर पार्किंगची मुबलक व्यवस्था असावी.
वरील मुद्यांचे होईल तितके पालन करण्याचा प्रयत्न करावा.
इनडोअर आणि आउटडोअर अशी दोन्ही प्रकारची चित्रीकरणस्थळे सध्या प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहेत. साहजिक त्या लोकेशन्सचा मालकी हक्क असलेल्या लोकांच्या व्यावसायिक अपेक्षाही उंचावल्या आहेत. चित्रपटात गेली कित्येक वर्षे तीच ती स्थळे पाहून प्रेक्षकांना कंटाळा येणं साहजिक आहे. हा शोध अखंड सुरू रहातो आणि काळानुसार तो बदलतोही. डोळ्याला सुखद वाटणारी लोकेशन्स पटकथेला शोभणारी असावीत. लोकेशनचा पूर्ण वापर करायचा असल्यास, त्याची पूर्ण रेकी करणं आवश्यक असतं. लोकेशन शोधून झाल्यावर आपल्याला काय करणं गरजेचं आहे.
 
इनडोअर लोकेशन
१. कॅमेरा, लाइट्स, रिफ्लेक्टर्स आणि कला साहित्य बसेल इतकी जागा असावी.
२. कलाकारांना फिरण्यास रूम (मोकळी जागा) असावी.
३. गरज असल्यास Cheat Scenes घेण्यासाठी जागा सोडावी.
४. कॅमेरा, त्याची ट्रॉली फिरू शकेल, एवढी मोकळी जागा असावी.
५. चित्रकरण करताना आपण सरकारी वीज वापरत नाही. त्यामुळे जनरेटर व्हॅन आणि प्लग्स सोयीस्कररीत्या पोहचू शकतील, अशी व्यवस्था असावी.
६. इनडोअर लोकेशन्समध्ये इमारत असल्यास सोसायटीची परवानगी घेऊनच चित्रीकरणास सुरुवात करावी. फ्लॅट असल्यास फ्लॅटधारक, बंगला असल्यास मालकाची परवानगी घ्यावी.
७. निवडताना तळ-मजला किंवा पहिला मजला निवडावा म्हणजे सामानाची ने-आण करण्यास सोपं जातं.
८. चित्रीकरणाच्या एकदिवस आधीच सगळी साधनं आणि सामान पोहोच करून ठेवावे. याने वेळेची खूप बचत होते.
९. कला, रंगभूषा, वेशभूषा, साउंड, एडिटिंगचे सामान मावेल अशाच पद्धतीची रचना असावी. मेकअपरूम, स्वच्छतागृह या मूलभूत व्यवस्थाही असाव्यात.
 
बजेट
चित्रपट हा शंभर टक्के व्यवसाय असून, त्यातून येणाऱ्या उत्पन्नावर आज बऱ्याच जणांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. निर्मात्यापासून ते तिकीटखिडकीवर काम करणाऱ्या काकांपर्यंत, अगदी थेटरात काम करण्याऱ्या कर्मचाऱ्याचं पोटदेखील या व्यवसायावर अवलंबून आहे. हा आकडा साधारण साडे-तीन ते चार लाखांच्या घरात आहे. एका चित्रपटाच्या सेटवर साधारण पन्नास ते सत्तर कर्मचारी राबत असतात. काही रोजंदारीवर तर, काही पगारी असतात. ठरलेल्या रकमेवर सगळे काम करत असतात. निर्मात्याने पैसे देण्यास सुरुवात केल्यावर त्याचे नियोजन व्यवस्थित झाले पाहिजे. नियोजनात चूक झाल्यास किंवा ऐनवेळी बजेट वाढल्यास निर्मात्यावर तणाव येऊ शकतो. बजेटचे नियोजन व्यवस्थित न झाल्यामुळे बंद पडलेल्या चित्रपटांची उदाहरणं खूप आहेत. निर्माता नवीन असल्यास फसवेगिरी होऊ शकते. नवीन निर्मात्याने चित्रपट सुरू करण्याआधी चित्रपट महामंडळाकडून न्यूनतम मानधनाची माहिती घेणं गरजेचं आहे.
चित्रपटात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्ती आणि कर्मचाऱ्यांच्या ठरलेल्या मानधनाची माहिती चित्रपट महामंडळाच्या स्थानिक कार्यालयात देखील मिळू शकते. त्याचा नीट अभ्यास करून पाऊल उचलावे. रोजचा पगार (पर डे), प्रॉफिट शेअर (चित्रपटाच्या एकूण गल्ल्यातून / निव्वळ फायद्यातून ठरलेली रक्कम) किंवा एकरकमी अशा काही मानधन देण्याच्या पद्धती आहेत. याचा सगळा हिशोब करून तुमच्या चित्रपटाचा एक अंदाजे खर्च तुम्हाला काढता येतो. त्यात २० ते २५ टक्के रक्कम कमी/जास्त होऊ शकते. एकदा काढलेलं बजेट, पूढे अनाठायी होणाऱ्या खर्चामुळे कोलमडू शकतं. चित्रपट बंद होईपर्यंत याचे पडसाद उमटू शकतात. त्यामुळे सुरुवातीपासून खर्चाचा नीट आराखडा मांडून ठेवावा लागतो. प्रत्येक डिपार्टमेंटसाठी आपण किती खर्च करतोय याचा नीट हिशोब ठेवणं गरजेचं आहे.
 
चित्रपटाचा एक प्रारंभिक साचा तयार झाल्यावरच आपण बजेट काढू शकतो. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आपल्याला लागणारी माणसं त्यांचे सहकारी, प्रमुख कलाकार, इतर कलाकार, गीत-संगीत, लोकेशनवर होणारा खर्च या सगळ्याचा अंदाजे आकडा आपल्याला मिळाला की, आपला प्रस्ताव तयार होतो. जर आधी बजेट तयार केलं असेल तर, त्यानुसार आपण डिपार्टमेंटमध्ये बदल करू शकतो.
अनुराग
9511841631