Atlas Shrugged

युवा विवेक    07-Aug-2021   
Total Views |
#Between_the_lines

Atlas Shrugged_1 &nb
कादंबरीचे नाव : Atlas Shrugged - भाग १
लेखिका : Ayn Rand
पृष्ठसंख्या : १०६९
माणूस हा सामाजिक प्राणी आहे. माणसांनीच समाज घडतो आणि तो समाजच मग माणसाला घडवतो. धर्म, धार्मिक संकल्पना, जातीव्यवस्था, समाजातील भेदाभेद या सगळ्या गोष्टी एखाद्या समाजाचा, एखाद्या भौगोलिक प्रदेशाचा अथवा देशाचा विकास, त्याची आर्थिक प्रगती ह्यांना कारणीभूत ठरत असतात. त्याचबरोबर, जग ज्या दोन तत्त्वांमुळे दोन भागात विभागले गेले ती म्हणजे, भांडवलशाही किंवा भांडवलशाहीचा स्वीकार केलेले देश आणि त्याच्याच विरुद्ध तत्त्वाचा म्हणजे समाजवादाचा स्वीकार केलेले देश.
अमेरिका, युरोप हे मुक्त अर्थव्यवस्था, व्यक्तिस्वातंत्र्य आणि पर्यायाने 'इंडिव्ह्युजिअलिझम'चा पुरस्कार करणारे देश तर, रशिया, चीनमध्ये समाजवादाला जास्त महत्व असते. तिथे व्यक्तिस्वातंत्र्यावर निर्बंध असतात. समाजाच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासासाठी ह्यापैकी कोणत्या विचारसरणीचा उपयोग करावा हा कायमच एक मोठा प्रश्न राहिलेला आहे. हा प्रश्न केवळ त्या देशापुरता मर्यादित न राहता गेल्या शतकात अमेरिका विरुद्ध रशिया हे शीतयुद्धही ह्याच गोष्टीमुळे झाले.
 
अर्थव्यवस्था आणि त्यावर आधारित समाजाची मानसिकता ह्यावर एवढे विवेचन देण्याचे कारण, आजच्या भागातले पुस्तक आणि त्याची लेखिका, Ayn Rand. Ayn Rand ची विचारसरणी, तिचे तत्त्वज्ञान, तिची मानसिकता, तिचे जगणे आणि तिचे लिखाण हे आपल्याला वेगळे करताच येत नाहीत, इतके ते एकरूप आहेत. तिने जी तत्त्वे मानली, त्यालाच अनुसरून ती जगली आणि त्यांचेच प्रतिबिंब तिच्या लिखाणात दिसले. Ayn चा जन्म कट्टर समाजवादी रशियामध्ये झाला. सामाजिक हितासाठी स्वार्थाचा त्याग, हा आदर्शवत विचार असला तरी त्याच्या अंमलबजावणीनुसार त्याचे व्यापक हित ठरते, अन्यथा व्यक्तिस्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्य ह्या गोष्टी भरडल्या जाण्याची शक्यता जास्त असते.
 
अलिसा हे तिचे मूळ नाव, १९०५मध्ये एका ज्यू कुटुंबात तिचा जन्म झाला, १९१७मध्ये झालेल्या ब्लोशेविक क्रांतीत तिच्या कुटुंबाला स्थलांतर करावे लागले, ज्याचा मोठा परिणाम तिच्या मनावर झाला. पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेताना, ॲरिस्टॉटल, प्लेटो ह्यांच्या विचारांशी तिची ओळख झाली आणि त्यावर आधारित तिने स्वतःच्या तत्त्वाज्ञानाची बांधणी केली, ज्याचे नाव 'ऑब्जेक्टिव्हिझम'. 'ॲयन रॅन्ड' यामागचं तत्त्वज्ञान उलगडून सांगताना ती असं म्हणते की, वस्तुनिष्ठतेचा सोपा अर्थ हाच की, स्वत:चा आनंद हेच आपल्या जीवनाचे निखळ उद्दिष्ट हवे, उपयुक्त नवनिर्मिती हेच ध्येय हवे. शूर माणसाची संकल्पना ही त्याच्या आयुष्यातील नैतिक ध्येय हाच त्याचा आनंद आहे हे सांगणारी आहे, त्याचे उत्पादक यश म्हणजे त्याने केलेले उमदे कार्य आहे आणि तेच त्याचे निरपेक्ष रूप आहे. या तत्त्वाचे चार खांब म्हणजे वस्तुनिष्ठता, व्यक्तिस्वातंत्र्य, निरपेक्ष कार्यकारणभाव आणि सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय असलेली मुक्त अर्थव्यवस्था आणि बाजारपेठ. बुद्धिवाद हाच महत्त्वाचा असून, व्यापार करताना, संस्था चालवताना किंवा आयुष्यात यशस्वी होण्यासाठी फक्त बुद्धीची कास धरायला पाहिजे. समाजाच्या हितासाठी व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी करणे हे चूक आहे. प्रत्येक माणसाचे ध्येय त्याच्यासमोर स्पष्ट असावे आणि ते साध्य करणे हेच त्याच्या आयुष्याचे कारण असावे. कमी अथवा मध्यम दर्जाचे काम करणे हा गुन्हा असून, सर्वानी सदैव उत्तमतेचाच ध्यास धरायला हवा. अर्थव्यवस्था आणि बाजारपेठ ही खुली असेल तरच त्यात योग्य ती स्पर्धा तयार होऊन ग्राहकांचा फायदा होईल.
 
Ayn Rand च्या ह्या तत्त्वांचा उल्लेख केल्याशिवाय तिच्या साहित्यनिर्मीतींविषयी बोलणे कठीण आहे,
कारण तिच्या ह्या तत्त्वावर चालणारी माणसांनाच तिने आपल्या व्यक्तिरेखा केले आणि त्यांच्या भोवती गोष्टी विणल्या. ज्या कादंबरीविषयी आपण ह्या आणि ह्यापुढील भागात वाचणार आहोत.. तिचे नाव आहे Atlas Shrugged. ग्रीक पुराणात ॲटलास नावाचे एक पात्र आहे, ज्याला सर्व जग आपल्या खांद्यावर तोलून धरण्याची शिक्षा मिळालेली असते. To Shrug ह्या शब्दाचा अर्थ खांदे उडवून दुर्लक्ष केल्यासारखे... 'मला काय त्याचे,' असे म्हटल्यासारखं. Ayn Rand ची अशी संकल्पना आहे की, हे जग काहीच थोडे प्रज्ञावंत हुशार लोक चालवत असतात... आणि बाकीचे जग त्यांच्यावर विसंबून असते स्वतः च्या अस्तित्वासाठी. अगदी साध्या भाषेत सांगायचे झाले तर, कुठलीही संस्था, कार्यालय असो, तिथे काही मूठभर माणसे अशी असतात ज्यांचे आपल्या कामावर प्रेम असते, त्यांना आपले काय काम ते माहित असते आणि त्यांना ते उत्तम प्रकारे जमत असते.
 
प्रसंगी ते जास्त काम, जास्त जबाबदारी, आणि आपल्या कामाचा भाग नसलेली, पण आपल्या संस्थेच्या भल्यासाठी अनेक कामे करत असतात. ह्या माणसांना फक्त कामात रस असल्याने कधी रूक्ष, कधी खडूस, कधी माजोरडे, कधी कधी वर्कोहोलिक अशी बरीच विशेषणे दिली जातात. या माणसांना आपण 'अ' वर्ग म्हणू. बाकीचे लोक कामात रस नसलेले, चालढकल करणारे, पाट्या टाकणारे असतात. ना ते हुशार असतात, ना त्यांच्यात निर्णयक्षमता असते ना कामाची धडाडी. या लोकांना आपण 'ब' वर्ग म्हणू. ह्या दोन्ही वर्गातले लोक संस्थेच्या विविध स्तरावर आढळतात. साध्या कारकानापासून त्या कार्यालयाचा प्रमुख किंवा संस्थापकपर्यंत. संस्थापकच जर अ वर्गातला असेल तर, त्याला लोभी, निर्जीव, फक्त पैसा पैसा करणारा अशी अनेक विशेषणे लावली जातात. मुळातच पैसे कमावणे म्हणजे पाप, स्वत:च्या कष्टाने, बुद्धीने कमावणे असे होऊच शकत नाही आणि पैसा कमावणारे सगळे उद्योगपती, भांडवलदार, संशोधक, कलाकार चोर असतात असे मानणारा एक मोठा वर्ग अजूनही आहे आणि तेव्हाही होता; पण आपले जग, त्याची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक उन्नती अशाच लोकांमुळे होत असते.
 
हीच माणसे ह्या जगाचे 'ॲटलास' असतात. जर ह्याच माणसांनी उर्वरित जगाला वाळीत टाकायचे ठरवले तर ? काय होईल बाकीच्या जगाचे ? हीच कल्पना मध्यवर्ती ठेवून Atlas Shrugged ही भलीमोठी १००० पानी कादंबरी लिहिली आहे. Taggart transcontinental... ही मोठी रेल्वे कंपनी चालवणारे भाऊ आणि बहीण, Jim Taggart आणि Dagny. जिम 'ब' वर्गातला असतो. त्याला परंपरेने कंपनीचे संचालकपद मिळालेले असते. Dagny ही 'अ' वर्गातली, पण स्त्री आणि वयाने लहान असल्याने कायम दुर्लक्षित आणि उपेक्षित. खानदानी असणे अशी जी संकल्पना आहे, त्यात पुढच्या पिढीला मिळणारे अधिकार आणि संपत्ती हे केवळ त्यांच्या जन्माधिकाराने मिळतात, पण ते अधिकार मिळण्यासाठी आपण लायक आहोत हे सिद्ध करावे लागते.. हे मानणार्याा काही लोकांपैकी एक असते Dagny आणि तिचा मित्र व अनेक तांब्याच्या खाणींचा वंशपरंपरागत मालक झालेला
फ्रान्सिस्को. स्टीलपेक्षा टिकाऊ एक नवीन धातू बनविणारा नवउद्योजक Hank Reardon, नवीन खाणी शोधणारा Eliss Wyatt, परंपरागत steel व्यावसायिक Orren Boyle. अशा अनेक व्यक्तिरेखांनी बनलेली ही कादंबरी असून, प्रत्येक व्यक्तिरेखेची तत्त्वे, स्वभाववैशिष्टये विस्तृतपणे लिहिली आहेत.
 
Who is John Galt?? हे त्या गोष्टीत परत परत येणारे वाक्य... हा नक्की कोण आहे, ह्याचा खुलासा होईपर्यंत कादंबरीचा तिसरा भाग येतो. Ayn Rand ही फक्त लेखिका नसून, आपल्या लिखाणाद्वारे पूर्ण जगावर प्रभाव टाकणारे एक प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे. तिचे वाचक हे वाचक किंवा प्रशंसक न राहता तिचे भक्त होत जातात.. अशी तिच्या लिखाणाची ताकद आहे. तिचे लिखाण, तत्त्वज्ञान हे तिच्या पुस्तकापुरते मर्यादित नसून तिच्या तत्त्वाज्ञानाचा अभ्यास करणारी एक Ayn Rand इन्स्टिट्युट नावाची संस्था आहे. १९५७ मध्ये प्रकाशित झालेल्या आणि अजूनही कालसुसंगत वाटणार्यात ह्या कादंबरीची उर्वरित गोष्ट वाचू पुढील भागात...
क्रमशः
 
तन्मयी रानडे-जोशी