यज्ञ – भाग ५

युवा विवेक    02-Sep-2021   
Total Views |
 
Sacrifice_1  H
अनुजाने प्रियाला सांगायचे ठरवले, पण त्यानंतर तीन-चार दिवस त्या दोघींची भेटच झाली नाही. प्रिया नवऱ्यासोबत तीन दिवसांच्या ट्रीपवर गेली होती मग अनुजाला तिला डिस्टर्ब् करायची इच्छा झाली नाही, शिवाय तिला हे प्रत्यक्ष भेटून सांगायचे होते. शेवटी आज त्या दोघी शॉपिंगसाठी संध्याकाळी मॉलमध्ये जाणार होत्या.
‘तुला काय शॉपिंग करायची आहे?’
‘ग्रोसरी गं. काही विशेष नाही. मॅरीड लोक आम्ही. तुला काय घ्यायचंय?’
‘मला एक-दोन टॉप्स आणि इअररिंग्ज.’
‘अरे वा! हम्म. काय विशेष?’ प्रियाने हसून विचारले.
‘असं स्पेशल काही नाही खरंतर. ‘ अनुजा तिला महेशविषयी सांगणार तितक्यात प्रिया म्हणाली, 'कसं ना, आधी काही कारण नसतांना शॉपिंग करावीशी वाटते, मी पण करायचे. लग्न झाले की, इंटरेस्ट जातो लाइफमधला.’ हा स्वर नेहमीचा नव्हता. अनुजाने ओळखले काहीतरी बिनसले आहे. प्रिया आधी शांत बसली; पण थोडे खोदून विचारल्यावर तिने सांगितले.
‘कंटाळा आलाय आम्हाला दोघांना रूटीनचा. त्याला वेळ नसतो माझ्यासाठी. उरलेल्या वेळात आज काल सतत मित्रांशी बोलतो, त्यांना भेटतो नाहीतर सोशल मीडियावर असतो. म्हणजे माझ्याशी वाईट वागतो असं नाही; पण स्पार्क नाहीये. त्याचसाठी आम्ही ट्रीपला गेलो होतो. एक दिवस छान गेला. मग याचे सतत फोटो काढणं आणि पोस्ट करणं. माझ्या कॉम्प्लिमेंटची किंमत कमी झालीये असं वाटतं आता.’
‘अगं, रिलेशनशिप कधीकधी मोनोटोनस होते, पण होईल सर्व ठीक!’
‘माहीत आहे गं! हा लग्नाआधी वागायचा तसा वागणार नाही हे माहित होतं पण इतका बदल?? माझा समजूतदारपणा आड येतो असं वाटतं.’ प्रियाला पहिल्यांदा अनुजा असं उदास पाहत होती. ती जमेल तशी प्रियाची समजून घालायचा प्रयत्न करत होती पण आज तिचा मूड ऑफच राहिला. त्यानंतर महेशबद्दल काही बोलायची तिची काही इच्छा उरली नाही.
त्या प्रसंगानंतर बरेच दिवस दोघींच्या बोलण्याचा टॉपिक एकच होता. प्रियाची बरीचशी वाक्ये, ‘मी तुला घाबरवत नाहीये पण लग्नानंतर ना...’ आणि मग पुढे लग्न आणि त्याचे दुष्परिणाम. आता हे संभाषण दर वेळी सीरियस नसायचं, मजाही चालायची; पण सध्या प्रिया लवकर भावनिक होते, पटकन रिॲक्ट होते हे
अनुजाच्या लक्षात आलं होतं. महेशनेही प्रियाच्या वागण्यातील बदलाबद्दल अनुजाला विचारले.
‘प्रियाला काय झालंय? माझा राग आलाय कि काय?’
‘का? काही बोलली?’
‘बोलतच तर नाहीये फार. काय केलं मी?’ 'तुझं काही नाही रे. तिचा मूड आजकाल ठीक नसतो. कधीकधी खूप शांत असते तर कधीकधी खूप बोलते. रिलेशनशिपचे प्रॉब्लेम्स’ अनुजाने जीभ चावली. ‘आपण इतकं पर्सनल सांगायला नको होतं का? पण महेशच तर आहे माझा! म्हणजे अजून नाहीये पण..’ तिचे विचार वेगळ्याच ट्रॅकवर गेले.
‘हम्म. असं नको व्हायला ना. मी बोलेन तिच्याशी. एकमेकांना समजून घ्यायला हवे त्यांनी.’ या मुद्यावरून प्रियाच्या जवळ जाता येईल हा विचार नकळत महेशच्या मनात आला तर त्याचा समजूतदारपणा पाहून अनुजाला तो अजूनच आवडला. ‘याच्याशी लग्न झालं तर, हा मलाही असंच समजून घेईल.’
त्या संभाषणानंतर महेश रोज प्रियाविषयी चौकशी करायचा. प्रियाच्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम आहे हे पाहून त्याला कुठे तरी समाधान वाटत होते, आशा होती आणि किंचित अपराधीही वाटत होते. त्या वेळेपुरता का होईना, पण हॉर्मोन्स अशा वेळी ओव्हरपॉवरिंग असतात. अनुजाला त्याच्याशी बोलायला चांगले निमित्त मिळाले होते. प्रियाबद्दल काळजीपोटी तो जे बोलायचा त्यात तिला निखळ मैत्री, समजूतदारपणा आणि चांगला स्वभाव दिसायचा. त्याच्या बॉडी लँग्वेजकडे, एकूण एक शब्दाकडे तिचे लक्ष असायचे, पण ते सगळे ती स्वतःसाठी गृहीत धरून चालत होती. प्रेमात असलो की, सगळं छानच आणि आपल्यासाठी चाललंय असं
दिसतं. महेशचं या सगळ्याकडे लक्ष नव्हतं, प्रियाच्या मनाच्या जवळ कसं जाता येईल याचा तो सतत विचार करायचा. प्रिया स्वभावाने मोकळी असली तरी पर्सनल प्रॉब्लेम्स अनुजाव्यतिरिक्त कोणाकडे बोलायची नाही, कामाच्या ठिकाणीही प्रोफेशनल वागणं. आज मात्र महेशला संधी मिळाली होती. तो आणि प्रिया एका रेस्तराँत बसले होते. प्रिया कित्येक दिवसांपासून चढवलेला ‘सगळं ठीक आहे’ चा मास्क चेहऱ्यावर चढवून वावरत होती, बोलत होती. एका क्षणी महेशने तिच्या डोळ्यात पहिले आणि म्हणाला, 'माझ्यासमोर ॲक्टिंग करायची गरज नाही. काहीतरी बिनसलंय तुझं हे कळतंय मला’
प्रिया एकदम दचकली. ‘याला कसं कळलं?’ तो दोन क्षणांचा पॉझ महेशसाठी पुरेसा होता.
'हे बघ. उगाच आता खोटं बोलू नको कि सगळं ठीक आहे वगैरे. मला जाणवतंय. घरी काही टेन्शन, सर काही बोलले का? की नील काही बोलला?'
त्या शेवटच्या प्रश्नाने आणि त्याच्या हळुवार बोलण्याने तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. त्याला हे अनपेक्षित होतं, त्याने टेबलावर असलेला तिचा हात हातात घेतला. 'आता सांग बरं. काय झालंय? मी आहे ना, काळजी करू नको',
डोळे पुसत, हळूहळू तिने बोलायला सुरवात केली. नीलचं तिच्याकडे होणारं दुर्लक्ष, कमी झालेला संवाद आणि अशा वेळी ज्या लहान-सहान गोष्टीही खटकतात, ते सगळं सांगून झालं. तो शांतपणे ऐकत होता. वरवर आनंदी दिसणारे हे जोडपे इतके दु:खी असेल आणि प्रिया इतकी इमोशनल होऊन पटकन बोलेल हे त्याला वाटले नव्हते. तिचा हात अजूनही त्याच्या हातात होता, बोलणं संपलं तशी प्रियाला याची जाणीव झाली आणि तिने पाण्याचा ग्लास उचलायचा म्हणून हात सोडवून घेतला.
'आपण मार्ग काढू यावर, पण तू सगळं असं मनात का ठेवतेस? सांगायचे ना. आज मी विचारले नसते तर?'
'तर... मी अजून काही दिवस लपवले असते आणि काहीतरी सोल्युशन काढले असते.”
'आता मी पण आहे तुझ्यासोबत. काहीही टेन्शन आले की, मला सांगत जा. तू आनंदी छान दिसते, असं रडतांना नाही.' 'हो. फक्त लहान बाळं रडतांना क्युट दिसतात', यावर दोघेही हसले आणि वातावरणातला ताण कमी झाला.
****
महेश आज खूप आनंदी होता. प्रिया दुःखात होती, पण ती मोकळेपणी त्याच्याशी बोलली याचा आनंद त्यापुढे मोठा होता. तिला मदत करायची म्हणजे काय करायचं हे त्याला समजत नव्हतं. नीलशी बोलणं, अनुजाची मदत घेणं, प्रियाला एखाद्या कौन्सिलरकडे पाठवणं हे सोपे आणि योग्य मार्ग होते, पण त्यात प्रिया कदाचित त्याच्यापासून दूर गेली असती. त्यापेक्षा स्वतःच तिच्याशी संवाद वाढवायचा हे त्याने ठरवलं.
****
प्रिया काम करताकरता विचार करत होती. आज तिचा मूड चांगला होता, महेशशी बोलून तिला बरं वाटत होतं. ‘अनुजाशीही बोलले मी. हा तर नवीन मित्र आहे तरी, मला त्याच्याशी बोलून जास्त मोकळं वाटलं.’ असं का? काहीतरी कनेक्शन आहे आमच्यात. माझ्या कॉलेजच्या मित्रमंडळींशी बोलतांना वेगळा फ्रॅन्कनेस
असतो, हे काही तरी वेगळं आहे. त्याला माझे घरातले विशेषतः नीलची तक्रार करणं बरोबर नाही. पुढच्या वेळी सांभाळून आणि कमी बोलायला हवं. या वेळी खूपच इमोशनल झाले’; महेशच्या निर्णयाच्या एकदम
विरुद्ध निर्णय तिने घेतला होता.
क्रमशः