दिग्दर्शक

युवा विवेक    03-Sep-2021   
Total Views |

दिग्दर्शक -२
director_1  H x

"अगं बाई अरेच्चा !" हा केदार शिंदेचा चित्रपट म्हणजे एक हलकी-फुलकी मनोरंजक पर्वणीच! एका दिग्दर्शकासाठी सभोवताली काय-काय सापडू शकतं आणि त्याचा वापर चपखलपणे कसा करायचा याचं सुंदर उदाहरण हा चित्रपट ठरू शकतो. त्याच्या मांडणीत असलेला साधेपणा भावून जातो. प्रत्येक लोकेशनचा वापर लक्षात रहातो. प्रत्येक पात्र मनात घर करून रहातं. जे काही घडतंय, ते आपल्याच बाजूला घडतंय यावर विश्वास बसतो. दिग्दर्शक जिंकतो तो इथेच!

चित्रपटाच्या प्रत्येक डोमेन चा सूत्रधार दिग्दर्शक असतो. कथा, पटकथा, संवाद, पात्र, गीत-संगीत, छायाचित्रण यासोबत रंगभूषा, वेशभूषा यावर दिग्दर्शकाचं थेट नियंत्रण आवश्यक असतं. चित्रपट म्हणजे पत्रांचं किंवा एखाद्या घटनेचं नाटकीय विस्तारीकरण असतं. ते कागदावरून पडद्यापर्यंत येताना त्यात अनेक बदल करावे लागतात. अॅडिशन असतं, डीलिशन असतं! विस्तार करताना मूळ कथेला धक्का न लावता त्यात काही जोडकथा जोडाव्या लागल्या तर, त्यांची लांबी मूळ कथेला धरून असणं गरजेचं आहे. दिग्दर्शकाचं सगळ्यात मोठं काम हेच आहे.

१. पात्र - पटकथा झाल्यानंतर पात्र निवड करण्याची पारंपरिक पद्धत आहे. कोणत्या पात्राला कोणता अभिनेता / अभिनेत्री असू शकेल याचा विचार आधी करावा लागतो. कलाकार फक्त एखाद्या प्रसंगात असेल तर, निभावून जातं, पण मुख्य पात्राला चित्रपट शेवटपर्यंत ओढून न्यायचा असतो. प्रत्येक प्रसंगात आपण निवडलेला अभिनेता बसू शकतो का ? याचा अभ्यास केल्याशिवाय पात्रांची निवड केली, तर पुढे संकट वाढतं. एखाद्या पात्राला वेगळी भूमिका दिली की ती आधी टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक कलाकारात असलेले भाव वेगळे असतात. दिग्दर्शकाने हे हेरून पात्र निवडलं पाहिजे. यासाठी पात्र-परिचय लिहून घेतल्यास सोपं जातं. पात्रांचे स्वभाव, त्यांची भाषा, त्यांचं राहणीमान या प्रारंभिक बाबी लक्षात असल्या की, ते पात्र आणि त्यावरचे प्रसंग डिझाईन करणं सोपं जातं, पण हे सगळं कथेला आणि पटकथेला धरून असावं.

२. कथा- पटकथा - दिग्दर्शकाची स्वतःची कथा-पटकथा असेल तर उत्तम! कथेला विस्तार देताना ती रटाळ होता कामा नये याची काळजी पटकथेत घेतली पाहिजे आणि पटकथा पडद्यावर येताना ती विस्कळीत होता कामा नये, याची काळजी दिग्दर्शकाने घेणं गरजेचं आहे.

३. छायाचित्रीकरण - कॅमेरामन हे जरी पूर्ण वेगळं प्रोफाइल असलं तरी, ते बऱ्याच अंशी दिग्दर्शकावर अवलंबून असतं. एखाद्या संवादात कॅमेरा नेमका कुणावर असावा, कुणाच्या चेहऱ्यावरचे भाव टिपायचे यापासून ते Frame To Frame presentation कसं असावं हे दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर यांनी संगनमताने ठरवणं गरजेचं असतं.

पडद्यावर जे काही दिसतं ते भावतं. तेच पुढे इतर प्रेक्षकांना सांगितलं जातं. त्यामुळे दिग्दर्शक आणि छायाचित्रकार यांच्यात मेळ असणं खूप गरजेचं असतं. पडद्यावर भव्यता निर्माण करावी लागते. लोकेशन, संवाद, property , पात्र, Costume आणि Make-up याचा पूर्ण वापर ज्याला व्यवस्थित जमला तो परिपूर्ण दिग्दर्शक आणि हा वापर पडद्यावर दाखवून ज्याने प्रेक्षकांचे डोळे जिंकले तो परिपूर्ण सिनेमॅटोग्राफर !

९० च्या दशकात ज्यांचा बोलबाला राहिला अशा हिंदीतील काही नामांकित दिग्दर्शकांचा उल्लेख इथे आवर्जून करणं गरजेचं आहे.

१.राजकुमार संतोषी - 'घायल', 'घातक', 'दामिनी' यांसारखे अॅक्शनपट तयार करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांची चित्रपट बनवण्याची शैली आजही प्रसिद्ध आहे. StarCast , Locations, संवाद आणि भक्कम पटकथा या सोबत छायाचित्रीकरण सुद्धा अत्यंत चपखल होतं. एक ज्वलंत सामाजिक विषय आणि त्या विषयाशी निगडित असलेली पात्रांची फौज खूप काटेकोरपणे संतोषी यांनी हाताळली. त्याच सोबत गीत-संगीत याला देखील एक जागा त्यांनी ठेवली. 'चायना गेट' या चित्रपटात कोणताही Single Lead नसतानादेखील हा चित्रपट लक्षात रहातो. त्यात 'जगिरा' हे मुकेश तिवारीने साकारलेलं पात्रही लक्षात रहातो.

संतोषी हे खूप प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून आजही ओळखले जातात. १९९० सालापासून मुख्य दिग्दर्शक प्रवाहात ते आले. पहिला-वहिला चित्रपट 'घायल' हाच ब्लॉकबस्टर ठरला. त्यानंतर 'दामिनी', 'घातक', ' लज्जा', 'चायना गेट' ,' अंदाज अपना अपना', 'खाकी' पासून ते 'अजब प्रेम की गजब कहानी'! प्रत्येक पिढीने अक्षरशः डोक्यावर उचलून धरलेले हे चित्रपट आणि राजकुमार संतोषी सारखे दिग्दर्शक म्हणजे एक अभ्यासाचा विषय आहे.

२. सुभाष घई-

अॅक्शनपट आणि सुभाष घई हे नातं भारतात प्रचलित आहे. हल्लीच्या चित्रपटांत भव्यता आणण्याचं काम त्यांनी केलं. मोठे सेट्स, लोकेशन, पात्रांच्या भवती चकरांचा गराडा, मोठ्या गाड्या, थाट, हे सगळं तर होतंच.पण संवादाने पात्रांना अजरामर ओळख देणारा दिग्दर्शक म्हणूनही घई ओळखले जातात. 'विश्वनाथ' मध्ये शत्रुघ्न सिन्हा असो, 'विधाता', 'कर्मा', 'सौदागर'मध्ये दिलीपकुमार असो, 'राम-लखन', 'मेरी जंग', 'ताल', 'त्रिमूर्ती'मध्ये अनिल कपूर-जॅकी श्रॉफ असो..! पात्रांच्या अभिनय कौशल्याचा पूर्ण वापर त्यांनी करून घेतला. माधुरी दीक्षित, मीनाक्षी शेषाद्री, महिमा चौधरी, मनीषा कोईराला यांच्यासारख्या अभिनेत्री सुभाष घई यांच्या चित्रपटात चमकून दिसल्या. त्यांचे चित्रपट म्हणजे पैसा वसूल असायचे. जिथे घई यांनी अॅक्शन, ड्रामा चित्रपट केले, तसेच 'यादें', 'युवराज' आणि 'राहुल', 'ताल', 'परदेस' यासारखे भावस्पर्शी चित्रपट देखील त्यांनी हाताळले. घई हे आजही भारतीय चित्रपट सृष्टीतील 'शोमॅन' म्हणून ओळखले जातात. चित्रपट खर्चिक असला तरी पात्र, संवाद, संगीतदेखील महत्त्वाचं असतं, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे.

३. महेश भट -

सुमधुर संगीत, हृदयाला भिडणारी गाणी, कलाकारांची अदाकारी आणि कोणत्याही पिढीतील तरुणाईला वेड लावतील असे चित्रपटाचे फॉरमेशन! महेश भट यांनी कदाचित हिंदी चित्रपटसृष्टीला अधिकांश Romantic Hits दिले असतील. त्यांनी लिहिलेल्या प्रेमकथा काल्पनिक कधीही वाटल्या नाहीत. त्याला वास्तवाची किनार होतीच ! "आशिकी", 'दिल हैं के मानता नहीं'पासून ते 'सर', 'सडक' आणि इतर काही Action-Romantic चित्रपट! महेश भट यांचं दिग्दर्शन म्हणजे एक सर्वसमावेशक चित्रपट असायचा. नकरात्मक भूमिकेलादेखील एक प्रकारचं ग्लॅमर देण्यास सुरुवात खूप आधीपासून झाली, पण भट यांच्या चित्रपटातील व्हिलन वेगळा भाव खाऊन जात असे. 'सर' चित्रपटातील वेलजी भाई, छप्पन टिकली, 'सडक' मधील महाराणी हे आजही लोकांना आठवतात.

महेश भट यांनी स्वतःची शैलीच नाही तर चित्रपटात वेगळेपण जपणारी एक पूर्ण टीम तयार केली. कधी काळी नायक-नायिकेच्या नावाने, कधी दिग्दर्शकाच्या नावाने चालणारे चित्रपट, भट Camp चं Banner असल्यानेही चालू लागले. प्रेमकथेसोबत भट Camp नी बऱ्याच सामाजिक विषयांना थेट वाचा फोडली. 'तमन्ना' हा त्यांच्याच चित्रपट एका तृतीयपंथीयाच्या जीवनप्रवासावर आहे.

Captain of the Ship म्हणाल्या जाणाऱ्या या व्यक्तीच्या खांद्यावर संपूर्ण चित्रपटाची जबाबदारी असते. चित्रपट चालला तर नायक, नायिका, गीत-संगीत अशा अनेक त्रिज्या पूढे येऊन यशाचं कौतुक घेऊन जातात. चित्रपट दुर्दैवाने पडलाच, तर बराचसा दोष दिग्दर्शकावर येतो. हे दुर्दैवी असलं, तरी खरं आहे. बरेच चांगले चित्रपट देणारा एखादा दिग्दर्शक, एखादा चित्रपट पडला की, या क्षेत्रातून बाहेर येतो. कारण निर्माते बऱ्याचदा नायक किंवा नायिकेला पुनर्जीवित करण्यासाठी पैसे लावू शकतात, पण एखाद्या दिग्दर्शकाला Second Chance देणारे निर्माते खूप कमी आहेत.

पुढच्या भागात- अजूनही काही दिगदर्शकांच्या कामांना पाहू. दिग्दर्शक या सदरात खूप काही अजूनही आहे.

- अनुराग

९५११८४१६३१