A Thousand splendid suns

युवा विवेक    04-Sep-2021   
Total Views |

#betweenthelines
Thousand splendid suns_1&

कादंबरीचे नाव: A Thousand splendid suns

लेखक: Khaled Hossini

पृष्ठसंख्या: 400

Between the lines सदरात मी खालिद हुसेन यांच्या काइट रनर ह्या पुस्तकावर आधी लिहिले होते. हल्लीच काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानात झालेले बदल, तिथल्या लोकांची अवस्था, बायकांची दारुण स्थिती, विमानतळावर जीव वाचविण्यासाठी आलेली माणसे हे पाहून मला त्यांच्या अजून एका कादंबरीची आठवण झाली, ती कादंबरी म्हणजे A Thousand splendid suns.

1975 ते 1990, हा तसे पहायला गेल्यास अफगाणिस्तानाचा आधुनिक काळ. याच कालखंडात काबूलसारख्या शहरात बायका शिकत होत्या, नोकरी करत होत्या. 1978 ला डाव्या विचारांच्या नूर महंमद तराकीने रशियाच्या मदतीने समाजात बरेच आधुनिक विचार आणण्याचा प्रयत्न केला. रशियाने मदतीच्या नावाखाली घुसखोरी करून 1979 साली अफगाणिस्तानावर हल्ला केला. रशियन लोकांना हरवण्यासाठी अनेक घरातील तरुण लढायला उतरले. हेच तरुण म्हणजे मुजाहिदीन. या मुजाहिदीनांना अमेरिकेने मदत पुरवली आणि त्यांनी रशियाचा पराभव केला. अफगाणिस्तान हादेश अजूनही तो विविध टोळ्यांमध्ये विभागला गेला आहे. पश्तून ही सर्वांत मोठी आणि ताकदवान जमात, ताझिकी, हजारा, पठाण या इतर जमाती. रशियाशी लढताना ह्या सगळ्या टोळ्या एकत्र आल्या. रशियन सैन्याला देशाबाहेर

घालवल्यावर अफगाणिस्तानात आपल्या टोळीचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांचे एकमेकांशी युद्ध सुरू झाले, आणि नागरिकांच्या हालाला सीमा उरली नाही. रोज देशात कुठेही बॉम्बस्फोट, जाळपोळ, गोळीबार, खाण फुटणे यामुळे अनेक लोक मरण पावले तर, कित्येक जखमी, अपंग झाले. हळूहळू नागरिक आपल्या देशाबाहेर, मुख्यतः पाकिस्तानात पळून जाऊ लागले. पाकिस्तान अफगाण सीमेवर निर्वासितांचे लोंढे येऊन राहू लागले, तिथल्याच मदरसांमध्ये शिकून तयार झालेले आणि आपल्या देशात मुस्लिम धर्माला अनुसरून राज्य चालवण्यासाठी आलेले तरुण म्हणजे तालिबान. तालिबान, त्यांनी लागू केलेला शरीया कायदा हे सर्व बहुतेकांच्या वाचनात आले असेलच.

अफगाणिस्तानच्या अलीकडील इतिहासाच्या पटलावर मरीयम आणि लैला ह्या दोन बायकांची ही काल्पनिक गोष्ट ह्या पुस्तकात उलगडत जाते. दोघींमध्ये साधारण वीस-पंचवीस वर्षांचे अंतर, पण एका विचित्र परिस्थितीमुळे त्या एकत्र आलेल्या असतात. मरीयम ही अफगाणिस्तानाच्या हेरात ह्या प्रांतात जन्मलेली अनौरस, अशिक्षित मुलगी. तिचे लग्न काबूलमध्ये राहणार्‍या रशीद ह्या तिच्याहून 20 वर्षे मोठे असलेल्या माणसाशी होते. घरकाम, नवर्‍याची सेवा, स्वयंपाक इत्यादी करणे हेच तिचे आयुष्य असते, परंतु मूल होऊ न शकल्यामुळे रशीद तिच्यावर सतत नाराज

असतो, तिला मारहाण करत असतो. लैलामरीयमहून 15 वर्ष लहान असणारी, काबूलमधील सुशिक्षित घरात जन्माला आलेली, शाळेत जाणारी, जगाची जाण असलेली एक आधुनिक मुलगी. तारीक नावाच्या एका मुलावर तिचे प्रेम असते, पण त्याचे कुटुंब अफगाणिस्तान सोडून निघून जाते आणि ती एकटी पडते.

काही दिवसांनी, स्वतःच्या कुटुंबाबरोबर पाकिस्तानात पळून जायच्या तयारीत असताना तिच्या घरावर एक रॉकेट येऊन पडते आणि ती सोडून घरातले सगळे मरण पावतात. निराधार लैलाला रशीद आधार देतो आणि आपल्या मुलीच्या वयाच्या लैलाशी लग्न करतो. सवतींमध्ये असणार्‍या नैसर्गिक ताणाने तिच्या आणि मरीयमच्या नात्याची

सुरवात होते, पण आधी नाईलाजाने आणि नंतर आपल्या मारहाण करणार्‍या नवर्‍याला विरोध करण्यासाठी त्या एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होतात.

अफगाणिस्तानात बायकांवर असलेले जाचक निर्बंध, शिक्षण, नोकरीसाठी बाहेर जायला मनाई, सतत बुरखा घालून वावरणे, घरातील पुरुषाशिवाय बाहेर जायला असणारी मनाई, गाणे, चित्र काढणे, कुठल्याही प्रकारचे मनोरंजनाच्या प्रकाराला बंदी यांचे उल्लेख कादंबरीत सतत येतात आणि त्यांच्या भयाण जीवनाची जाणीव होत जाते. लैला आणि मरीयमने पळून जाण्याचा केलेला अयशस्वी प्रयत्न, आत्यंतिक गरिबीमुळे पोटच्या मुलीला अनाथाश्रमात ठेवावे लागणे हे प्रसंग वाचताना आपलेही डोळे पाणावतात. लैलाचे बाळंतपणासाठी एका गलिच्छ रुग्णालयात भरती होणे, तेथील महिला डॉक्टरवर बुरख्याआड काम करायची असलेली सक्ती, तेथली अस्वच्छता, वेदनाशामक औषधांशिवाय झालेली डिलिव्हरी हे सर्व वाचूनच अंगावर काटा येतो आणि स्त्री म्हणून भारतात जन्माला आल्याबद्दल आपण देवाचे आभार मानतो.

काही वर्षांनी तारीक लैलाला शोधत परत काबूलमध्ये येतो. लैला त्याला भेटली हे समजताच रशीद तिला जीवे मारायला धावतो आणि त्यांच्या मध्ये पडलेल्या मरीयमकडून रशीदची हत्या होते. ह्यापुढे घडणार्‍या घटनांना हृदयद्रावक हेच एकमेव विशेषण लागू होते. नवर्‍याच्या खुनाचा आरोप असलेल्या मरीयमचे काय होते, त्यानंतर तारीक आणि लैला एकत्र येतात का, त्यांचे काय होते हे जरूर वाचावे.

1975 ते 2001 मध्ये अमेरिकेत झालेला दहशतवादी हल्ला, एवढ्या मोठ्या कालखंडाच्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी लिहिली गेली आहे. राजकीय घडामोडींमुळे मरीयम आणि लैला सारख्या अनेक सामान्य अफगाण बायकांचे आयुष्य कसे बदलत गेले याची कल्पना ही कादंबरी वाचून नक्कीच येते. मुळातच स्वभावाने गरीब असलेली अशिक्षित मरीयम, आणि हुशार, आक्रमक लैला ह्यांच्यात हळूहळू होत जाणाऱ्या मैत्री आणि त्यागाची कथा चांगली रंगवली आहे.

अफगाणिस्तानचा अलीकडील इतिहास, हा फक्त माहिती न राहता, एका कथेत गुंफल्याने अधिक रंजक होतो आणि शेवटी नवीन आशा जागवून जातो. पुस्तकाची भाषा सोपी असल्याने नव्याने इंग्रजी वाचणाऱ्यांनाही सहजतेने कळेल. लिखाणाची शैली चित्रदर्शी असल्याने अनेक प्रसंग सहज डोळ्यासमोर उभे राहतात. सध्या घडत असलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानाबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल, पण नुसती माहिती वाचायला कंटाळा येत असेल तर हे पुस्तक नक्कीच उपयोगी आहे.

© तन्मयी रानडे