क्षण एक पुरे प्रेमाचा

युवा विवेक    09-Sep-2021   
Total Views |

क्षण एक पुरे प्रेमाचा
Escaping the Fragile Plan

जग नष्ट होण्याच्या विविध शक्यता वारंवार वर्तविल्या गेल्या आहेत. अलीकडच्या काही वर्षांतील वातावरणातील बदल पाहिले, तर त्या दिशेने आपली वाटचाल सुरू झाली असल्याचं आपल्या सहज लक्षात येईल. विशेषतः गेल्या दोन वर्षांतील कोव्हिडने माजवलेल्या हाहा:काराव्यतिरिक्त इतर घटनाही त्याच्याच निदर्शक आहेत. या विषयाने फिल्ममेकर्सना भुरळ न घातली, तरच नवल. लॉकडाऊनच्या काळात या विषयाला अनुसरून काही सुंदर कलाकृती तयार झाल्या.

मात्र, अलीकडेच 'एस्केपिंग द फ्रजाइल प्लॅनेट' हा कोव्हिडची साथ सुरू होण्यापूर्वी लिहून पूर्ण झालेला (संदर्भ : इंटरनेट) एक ग्रीक लघुपट पाहण्यात आला. रिलींग चित्रपट महोत्सवात २५ ते २८ सप्टेंबरदरम्यान हा लघुपट दाखविण्यात येणार आहे. मुबी या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही तो होता. तसेच अलीकडच्या कशिश चित्रपट महोत्सवातही या लघुपटाची वर्णी लागली होती.

या ग्रीक लघुपटाची कथा जग नष्ट होण्याच्या काही तासांपूर्वी घडते. गुलाबी रंगाचं धुकं पृथ्वीवर पसरत असताना दोन तरुण एकमेकांना भेटतात, प्रेमात पडतात. या विज्ञानकथेतील गुलाबी धुक्याचा जग नष्ट होण्याच्या थिअरींशी काही संबंध आहे का, हे पडताळून पाहिलं असता या लघुपटाबद्दलच्या एका लेखात याचं फार छान आणि पटेल असं स्पष्टीकरण मिळालं. ते असं की, यातलं लोकांचं घरात कोंडून घेणं, मास्क लावून बाहेर पडणं, हे कोव्हिडच्या परिस्थितीशी साधर्म्य दाखवणारं आहे.

गुलाबी रंग हा प्रेमाचं, मैत्रीचं, हळुवारपणाचं प्रतीक मानला जातो. मात्र जग नष्ट होण्याची गोष्ट सांगण्यासाठी या रंगाचा वापर केला आहे. या विरोधाभासातही प्रेमकथा रंगवून सुसंगती साधली आहे. कथेतल्या त्या दोघांना नावे नाहीत. त्यातला एकजण घरात एकटा बसला आहे. फक्त मांजरीसोबत. उरलेसुरलं सगळं कॅटफूड तिच्या समोरच्या भांड्यात तो रिकामं करतो. जग आता संपणारच आहे, तर त्या मांजरीची सगळी भूक भागवावी, हा विचार त्यामागे असेल कदाचित. तिथून तो बाहेर रस्त्यावर येतो. त्याच्या नजरेसमोर एक कबूतर गतप्राण होतं. रस्ता निर्मनुष्य आहे. सगळं वातावरण गुलाबी धुक्याने भरून गेलं आहे. एका तळघरात त्याला संगीत ऐकू येतं. तो तिथे जातो. तिथे त्याला त्या संगीताच्या दुकानाचा मालक एकटाच गाणी ऐकत मान डोलावताना दिसतो. त्या दोघांमध्ये संवाद होतो आणि जग नष्ट होत असल्याच्या पार्श्वभूमीवरची एक तरल, सुंदर प्रेमकथा आपल्याला पाहायला मिळते.

दोघांच्या गप्पांमध्ये जे विषय येतात, ते पाहण्यासारखे आहेत. दुकानाच्या मालकाला तो विचारतो, "तू असा इथे एकटा कधीपासून आहेस? मित्रांना भेटला नाहीस का?" त्यावर तो उत्तरतो, "भेटलो, पण त्यांच्या बोलण्यात भीतीशिवाय दुसरं काही जाणवत नव्हतं." नंतर एखादया पार्टीमध्ये जे लहानसहान गेम्स असतात; तसेच, कसलाही आगापिछा नसलेले प्रश्न ते एकमेकांना विचारतात. दुकानाचा मालक त्याला विचारतो, "तुला आवडणार्‍या चार गोष्टी सांग." तो म्हणतो, "फुले, आईस्क्रीम, समुद्र आणि आलिंगन.पुढच्या काही मिनिटांत हे सगळं त्याला मिळेल, याची सोय तो करतो. तो दुकानाच्या मालकाला एक जादूचा प्रयोग करून दाखवतो. मात्र, त्यामागचं गुपित सांगत नाही. काही गुपितं जग संपत असतानाही गुपितंच राहिली, तरच त्यात गंमत आहे, हेच यातून अधोरेखित होतं. शेवटी नाइलाजास्तव त्या दोघांना बेसमेंटमधून बाहेर यावे लागते. मरणाला सामोरं जाण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही आणि लघुपट संपतो. पडद्यावर फक्त इमारती, तळघर, दुकान वगैरे दिसतात.

विज्ञानकथा प्रकारात मोडणाऱ्या या लघुपटातील रंगीबेरंगी विश्व भुरळ पाडणारं आहे. विशेषतः ते दोघे फुलांमधून वाट काढत असतानाचे दृश्य डोळ्यांचं पारणं फेडणारं आहे. या सगळ्याला एका अनाम दुःखाची किनार आहे; तरी, या अराजकाच्या परिस्थितीतही हळुवार फुलणारं या दोघांचं प्रेम पाहिलं की, एक सुखद झुळूक मनावरून फिरल्यासारखी वाटते. जर सगळंच संपणार आहे, तर मिळालेले दोन क्षण एकमेकांना आनंद देण्यात घालवूया, हा विचार या लघुपटाला विज्ञानकथांच्या आखीव संकल्पनेपेक्षा वेगळं ठरवतो. काहीतरी भरीव देऊ पाहतो. गोविंदाग्रजांच्या 'क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणांचा' या काव्यपंक्तींची आठवण करून देतो.

- संदेश कुडतरकर.