'नाही' म्हणायला शिकू या!

युवा विवेक    10-Jan-2022   
Total Views |

'नाही' म्हणायला शिकू या!


nahi mhanayla shiku ya 

नको हं तुझी नकारघंटा किंवा याने/हिने एकदा नाही म्हटलं ना की काम रखडलंच किंवा कधीही काम सांगा, नकारच ठरलेला..... असे संवाद आपल्याला अनेकदा आजूबाजूला ऐकू येत असतात. अनेकदा त्यावरून तिला/त्याला आजच्या भाषेत 'ट्रोल'ही केलं जातं; पण या नकाराकडे थोड्या सकारात्मकतेने पाहणं आणि त्याचं महत्त्व लक्षात घेणं आवश्यक आहे. मुळात आपली नकाराकडे बघण्याची दृष्टीच नकारात्मक झाली आहे, हे स्वतःच्या मनाशी मान्य करायला हवं. नाहीम्हणायला शिकणं ही अनेकांसाठी एक मोठी ॲचिव्हमेन्ट असते. प्रत्येक गोष्टीला होकार देणं हादेखील त्याच्या/तिच्या प्रगतीतला, एकंदर विकासातला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिक शांतता यातील अडथळा ठरू शकतो. नकार न देण्याच्या वृत्तीनं वाढत जातं ते टेकन फॉर ग्रॅन्टेडअसणं किंवा गृहीत धरलं जाणं आणि हे गृहीत धरलं जाणं अनेकदा आपण स्वतःबाबतही करत असतोच हं!

 

मी संसार घरातल्या सगळ्या कामांसहव्यवस्थित करू शकते, मुलंही एकटीनं वाढवू शकते, ऑफिसातही जबाबदारी पूर्ण करू शकते, नातेसंबंध उत्तम प्रकारे हाताळू शकते, मी अंगात ताप असला तरी स्वयंपाक करू शकते, माझ्या घरातले माझ्यावर पूर्णपणे अवलंबून आहेत याचं मला कौतुक आहे, स्वयंपाकीण बाईंनी केलेला स्वयंपाक घरच्यांना आवडत नाही; माझ्याच हातचा लागतो, ऑफिसमध्ये माझ्याशिवाय कोणतंही काम पूर्ण होत नाही अशा अनेक समजा-गैरसमजातून नकार न देण्याची वृत्ती वाढत आणि वाढतच जाते.

 

एखादी गोष्ट आपण करू शकत नाही म्हणजे काय याचा भयंकर त्रास स्वयंपरिपूर्णतेचा सुपरवुमन सिंड्रोम असणाऱ्या पेशंटना होतो. एखाद्या गोष्टीला नकार देऊन त्याबद्दल आयुष्याला It’s OK म्हणण्याची संधी आपण गमावतो. यामुळे अनेकदा ऐन चाळिशीत स्त्रियांना आजारपणं गाठतात, मेनोपॉजच्या काळात खूप त्रास होतो, परिस्थितीच्या जुळवाजुळवीत प्रचंड कुतरओढ होते, पण मुळातच एखादं काम करायला नकार देणं किंवा स्वतःचा एखादा ताण कमी करायला मदतनीसांवर अवलंबून राहण्यात काय गैर आहे? याने दोन गोष्टी होतील शारीरिक तसंच मानसिक स्वास्थ्य सुधारेल आणि या सिण्ड्रोमपासून चार हात दूर रहायला मदत होईल.

 

अनेक घरात स्त्रीला घरगुती हिंसाचाराला सामोरं जावं लागतं, तर काही घरात पुरुषांनाही मानसिक त्रास सहन करावा लागतो. लैंगिक संबंधांसाठी तिची/त्याची तयारी आहे वा नाही याचा विचारही जोडीदाराच्या मनातही अनेकदा येत नाही. अशा वेळी आपली तयारी नसल्यास ठाम नकार देणं हे स्वतःचं शोषण करून घेण्यापेक्षा योग्य आणि सोयीचं नाही का!

 

अनेकांना सामाजिक परिघातही अनेकांना गृहीत धरलं जातं. अमुक व्यक्तीला सांगा, तो कामाला नाही म्हणणार नाही. हा तिच्यावरील विश्वास असला तरी हे असं गृहीत धरलं जाणं, त्या व्यक्तीच्या व्यक्तिस्वातंत्र्यावरील घाला नाही का? अशा वेळी आपल्यावरील विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून अनेकदा आपण अशी कामं ओढावून घेत असतो, पण जर शक्य नसेल तर शांतपणे आणि कारण सांगून नकार देणं हे स्वतःच्या दृष्टीने किती योग्य असतं, नाही का?

 

कार्यालयांमध्ये अनेकदा मोटिव्हेशनलकार्यशाळांचं आयोजन केलं जातं. एम्प्लॉईने प्रत्येक काम हे कंपनीच्या हिताचा विचार करून जबाबदारीपूर्वक करावं असा हेतू त्यामागे असतो. कंपनीच्या हिताचा विचार करणं हे आपलं कर्तव्य आहेच. पण ऑफिसमध्ये अशा अनेक व्यक्ती आपल्याला सापडतात ज्या गाढवमेहनत करीत असतात. आपण इतरांचीही कामं त्यासाठी ओढावून करत असू किंवा आपण नाही म्हणणार नाही म्हणून इतर काही जण आपल्यावरच कामं ढकलत असतील तर सावधान! काही वेळा योग्यवेळीच कामांना नकार देणं हे श्रेयस्कर असतं. कारण अनेकदा काही कामं ही आपल्या क्षमतेच्या मर्यादेपलिकडील किंवा आपण ज्या पदावर काम करतोय त्यामानाने रिस्की असू शकतात. अशी कामं ओढावून घेणं म्हणजे आपलं मनस्वास्थ्य बिघडवून घेणं. अशा वेळी सत्य परिस्थितीची जाणीव कंपनीला करून देणं आणि आपल्या क्षमतांच्या आत काम करणं हे योग्य असतं. काही वेळा स्वतःला नकाराची, मर्यादांची जाणीव करून देणं हे आपल्यासाठी रोजगाराच्या किंवा व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी कारकही ठरू शकतं. कार्यालयांमध्येही अनेकदा कर्मचाऱ्यांना लैंगिक शोषणाचा सामना करावा लागतो. अशा वेळी ठाम नकार देणं हे आपलं कर्तव्य असतं, आपल्या स्वाभिमानरक्षणासाठी ते आवश्यक असतं हेही प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे.

 

नकार देणं किंवा नाही म्हणणं हे केवळ मध्यमवयीन नोकरदार महिला, पुरुष यांच्यासाठीच आहे असं अजिबात नाही. किशोर वयातील मुले, वयोवृद्ध नागरिक यांच्यासाठीही हे अत्यंत महत्त्वाचं आहे. किशोरवयातील मुले-मुली यांना सहाध्यायींकडून, शिक्षकांकडून, ओळखीच्या व्यक्तींकडून त्रास होतो. काही वेळा त्यांना ब्लॅकमेलिंग-लैंगिक शोषणालाही सामोरं जावं लागतं. अशा वेळी त्या गोष्टी पालकांना सांगणं तसंच कोणी त्रास देत असेल किंवा चुकीच्या गोष्टींसाठी प्रवृत्त करत असेल तर त्याला/तिला नकार देणं योग्य आहे याचे संस्कार घरातून होणं आणि घरातल्यांनी मुलांवर पूर्ण विश्वास ठेवणं आवश्यक आहे. मीना नाईकांचं वाटेवरती काचा गंनावाचं या विषयावर एक नितांतसुंदर नाटक रंगभूमीवर येऊन गेलं आहे.

 

वयोवृद्ध नागरिक अनेकदा आपल्या शारीरिक क्षमतांचं कारण न देता घरातील आपापल्या जबाबदाऱ्या पूर्ण करत असतात. काही घरांत तर वाढत्या वयाच्या नातवंडांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जाते. पण त्यांना ते झेपतं आहे किंवा नाही हे विचारायचंच लक्षात येत नाही. अशा वेळी आपल्या वयाची, मर्यादित क्षमतांची आणि या वयात आवश्यक असणाऱ्या मोकळिकीची, आयुष्य मनासारखे जगण्याच्या गरजेची जाणीव घरातल्या व्यक्तींना करून देणं आवश्यक असतं. समजूतदार असतील तर नक्की समजून घेतील. अशा वेळी घरात मदतनीस ठेवणं, वरकामाला माणसं ठेवणं किंवा ज्येष्ठांना आराम देण्याच्या सोयीने ठरावीक वेळ मुलांना पाळणाघरात ठेवणं असे पर्याय शोधता येतात. ज्येष्ठांनी जर त्याची जाणीव करून दिली नाही, तर काय उपयोग? घरातील हार्मनी सांभाळणं अनेकदा या साध्याशा नकाराने साधलं जाऊ शकतं.

 

नकार देणं हे प्रत्येक वेळी वाईटच असतं असं नाही. अनेकदा एखादा नकार आयुष्यात सकारात्मक बदल घडवून जातो. स्वयंपरिपूर्णतेच्या सिण्ड्रोमची बेडी तुटेल, घरात-नोकरीच्या ठिकाणी आत्मविश्वास परत मिळेल, मनस्वास्थ्य सुधारेल, त्याची परिणिती शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यात होईल, लैंगिक शोषण-घरगुती हिंसाचारापासून मुक्ती मिळेल, समोरचा प्रतिउत्तर देऊ शकतो याची जोडीदाराला जाणीव होईल, किशोरवयीन मुले वाईट गोष्टींपासून दूर राहतील, आपल्याशी संवाद साधतील, आयुष्यभर कष्ट केल्यानंतर उतारवयात थोडीशी मोकळीक, मनाप्रमाणे जगण्याची मुभा मिळेल..... मित्रांनो, ही यादी फार फार मोठी आहे. पण सुखावणारी आहे, मन शांतावणारी आहे.

 

- मृदुला राजवाडे