शिरा/ हलवा

युवा विवेक    27-Jan-2022   
Total Views |

शिरा/ हलवा


shira 

माझ्या मते शिरा हा भारतात अगदी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रसाद म्हणून दिला जातो. महाराष्ट्रात मुख्यतः शिरा, उत्तर भारतात 'हलवा' आणि दक्षिण भारतात 'केसरी' या नावाने हा पदार्थ देवासमोर ठेवला जातो. साधारण तेराव्या शतकात हा पर्शियन पदार्थ भारतात आला आणि इथलाच झाला अशी माहिती इतिहासाची पाने सांगतात. कोणत्याही शिऱ्याचा एक बेस असतो त्यासोबत तूप, साखर आणि पाणी/दूध. हा बेस धान्याचा (कणिक, रवा, डाळी) किंवा भाजी/फळाचा (गाजर, दुधी भोपळा) किंवा ड्रायफ्रुटसचा असतो. इतकेच नव्हे तर मांस किंवा अंडी वापरूनही हलवा बनवतात. आपल्या महाराष्ट्रात हलवा हा संक्रांतीला वाटतात, तो वेगळा!

 

धान्य तुपात खरपूस भाजून घ्यायचे मग त्यात दूध किंवा पाणी घालून छान शिजवायचे आणि शेवटी साखर/गूळ घालून छान वाफ आणायची. इतकी सोपी पाककृती आहे. मुगाच्या डाळीचा शिरा बनवतांना सर्वांत जास्त तूप लागते. आजही बऱ्याच लग्नांमध्ये ही स्वीटडिश असते. मोठमोठ्या मंदिरात, विशेषतः गुरुद्वारामध्ये कडा प्रसाद म्हणून गव्हाचा शिरा मिळतो. हा प्रसाद कोणालाही बनवता यावा इतकी सोपी कृती आणि साधे जिन्नस वापरले जातात. याचे प्रमाणही ठरलेले असते आणि सहज लक्षात राहील असे असते. आपल्या महाराष्ट्रात सत्यनारायणाच्या शिऱ्याचे म्हणजेच प्रसादातील सर्व साहित्य हे सव्वा वाटी/किलो या प्रमाणात मोजले जाते आणि त्यात केळी कुस्करून घातली जाते. पहिल्यांदा प्रसाद भाजला तेव्हा मला समजले की, एरवी करतो तो शिरा वेगळा का असतो. लहानपणी मला नेहमी प्रश्न पडायचा, सत्यनारायणाला शिराच का असतो? गणपतीलाही मोदक नसला तरी लाडू, करंजी किंवा खिरापत चालते पण सत्यनारायणाची पूजा झाली कि शिराच हवा, असा प्रोटोकॉल आहे. जगातल्या तमाम प्रसादासारखा हा प्रसादही अविस्मरणीय चव घेऊन जन्माला येतो.

 

'गाजर का हलवा' हा बॉलीवूडकरांनी किती फेमस केला यावर मी वेगळं बोलायला नको, गाजराइतकाच या विषयाचा किस पडलेला आहे. त्या काळी सगळ्या सीझनमध्ये हे लोक गाजर कुठून विकत आणायचे हा प्रश्न नेहमीप्रमाणे लेखकांना पडत नसावा. बायकांनी सिनेमाच्या स्क्रिप्ट लिहिल्या असत्या तर जरा गोडधोडात व्हरायटी मिळाली असती. गाजर, दुधी भोपळा, गंगाफळ (लाल भोपळा), बीटरूट, बटाटा, रताळे या भाज्यांचा किस कमी तुपात भाजून, दुधात शिजवून त्याचा हलवा बनतो. सफरचंद, आंबा, अननस या फळांचा आणि बदामासारख्या ड्रायफ्रुटचा हलवा प्रसिद्ध आहे. कर्नाटकातील भटकल या गावात काजू, बदाम घातलेला केळीचा शिरा मिळतो. आधीच गोड असलेल्या फळात परत साखर घालून बनवलेला हा पदार्थ दरवेळी पसंतीस उतरेल असं नाही पण न्यूट्रल चव असलेल्या भाज्यांपासून बनवलेला हलवा मात्र सर्वांना आवडतो. या हलव्यात कधीकधी खवाही घालतात, विशेषतः उत्तर भारतात. पोलंड, मिडल इस्टमध्ये तिळाचा, तर बल्गेरिया, रोमानियामध्ये सूर्यफुलाच्या बियांचा शिरा बनवतात. आपण फ्लेवरसाठी वेलची, जायफळ घालतो तर ते लोक व्हॅनिला, कोको पावडर घालतात. इराण, इराक, पाकिस्तान, इस्राईल, इजिप्त या देशांमध्येही हलवा किंवा शिरा बनवतात. पुण्यात तर चक्क हिरव्या मिरचीचा शिरा मिळतो. एखाद्या गोड आवडणाऱ्या व्यक्तीने मिरचीच्या ठेच्याचा असा बदला घेतला असावा!

 

कराची, बॉंबे, तिरुनलवेली, माहीम अशा भारतातील किंवा एकेकाळी भारतात असलेल्या शहरांच्या नावानेही हलवा प्रसिद्ध आहे. या प्रकारात स्टार्च किंवा धान्याचे पीठ हलवा बनवण्यासाठी वापरतात. दक्षिण भारतातील केसरी, उत्तर भारतातील सुजीका हलवा आणि आपला शिरा यांसारखा हा प्रकार खरपूस भाजलेला नसतो तर काहीसा जेलीसारखा असतो. स्टार्च शिजवल्यामुळे त्यातील ग्लुटॅनला जेलीसारखा आकार मिळतो. वेगवेगळ्या रंगात, ड्रायफ्रूट्स घालून केलेल्या हा हलव्याच्या वड्या पाडता येतात. तामिळनाडूमधील तिरुनेलवेली हलवा गव्हापासून बनवतात. एकेकाळी माहिमचा हलवा किंवा आईस हलवा मात्र माझ्यासाठी प्रचंड कुतूहलाची बाब होती कारण कधीतरी कोणी मुंबईला गेले तरच हा प्रकार घरी यायचा. बटर पेपरमध्ये गुंडाळलेल्या, कॉर्न स्टार्चपासून बनवलेल्या पिवळ्या, केशरी रंगाच्या पातळ चौकोनी वड्या जिभेवर लगेच विरघळतात. माहिमचा हलवा आणि आईस हलवा याच्या चवीत खूप फरक नसला, तरी हे प्रकार जोशी बुधेकाका आणि मोहनलाल मिठाईवाला यांनी विकायला सुरवात केली. १८९६ मध्ये कराचीमधील गिरीधर मावजी यांनी कॉर्नस्टार्चपासून हलवा बनवला आणि तो वड्यांच्या रूपात विकायला सुरवात केली, हाच तो कराची हलवा. फाळणीनंतर मुंबईमध्ये बनवला गेला आणि बॉंबे हलवा नावाने प्रसिद्ध झाला.

 

तिरुनेलवेली, बॉंबे, माहिमचा हलवा पॅकेज्ड फॉर्ममध्ये मिळतो. किचन्स ऑफ इंडिया या ब्रॅण्डने काजू, बदाम, मुगडाळ हलवा 'रेडी टू इट' फॉर्ममध्ये लॉन्च केला आहे. एमटीआर या ब्रँडचा 'रेडी टू कूक' असा कमी वेळात तयार होणारा केसरी हा दक्षिण भारतीय शिरा मिळतो. आशीर्वादनेही इन्स्टंट सुजीचा हलवा बनवला आहे. लिव्हिन्ग फूडचा काचेच्या जारमध्ये गाजराचा आणि गव्हाचा हलवा मिळतो. फ्रोजन प्रकारात हल्दीरामचं गाजर आणि गोल्ड ब्रँडचा पपई हलवा आहे. अजूनही काही ब्रँड्स असतील. पपई हलवा हा प्रकार जरा नवीन आहे. फ्रोजन प्रकारात अजून दुधी, बीटरूट, गाजर हलवा मिळायला हवा. भाज्या आणि फळांचे शिऱ्याचे प्रकार फ्रोजन असतील तरच स्वीकारले जातील. गाजर हलवा फ्लेव्हरचे आईस्क्रीमही मिळते. तूप, साखर असे नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह असलेल्या या पदार्थाचे प्रोसेसिंग तसे सोपे पण चव मेंटेन करणे अवघड! शिरा किंवा गाजराचा हलवा लहानश्या कपात मिळायला हवा, गुलाबजाम किंवा रसगुल्ला मिळतो तसा!

 

इतके सगळे प्रकार पाहिले, तरी माझी शिऱ्याची आठवण म्हणजे शेजारी कोणाकडे सत्यनारायणाची पूजा असली की, आईने दिलेला रुपया विष्णूच्या फोटोसमोरील पोथीवर ठेवायचा, नमस्कार करायचा, ओंजळीत दिलेले तीर्थ पटकन प्यायचे आणि केळीच्या पानाचा लहानसा तुकडा, त्यावर तुपाने ओथंबलेल्या प्रसादाची मूद, शेजारी एखादे केळीचे काप पिटुकल्या हातात सांभाळत घरी जायचे. कुठेही प्रसाद मिळाला तरी तिथेच न खाता घरी सर्वांसाठी न्यायचा ही आजीची शिकवण! आता अशी पूजा कोणी करत नाही, केली तरी खूप लोकांना प्रसादासाठी बोलवत नाही आणि घरी केलेल्या शिऱ्याला ती प्रसादाची खास चवही येत नाही!!

- सावनी