शॉर्ट व्हिडिओज, रील्स यांचं वास्तव

युवा विवेक    28-Jan-2022   
Total Views |

शॉर्ट व्हिडिओज, रील्स यांचं वास्तव


short videos, reels 

आज अशा खूप कमी व्यक्ती असतील ज्यांच्या मोबाईलमध्ये कॅमेरा नाही. जवळपास प्रत्येक स्मार्ट फोनमध्ये साधा का असेना कॅमेरा असतोच. मग जसजशा आपल्या कॅमेऱ्याच्या मागण्या वाढत जातात, तसतशी मोबाईलची किंमतही वाढत जाते. मोबाईल कॅमेऱ्याने किती क्षण साठवून ठेवण्याची संधी उपलब्ध करून दिली. बरं, ते केवळ आपल्या गॅलरीत असले तरी पुरतात, डेव्हलप करायची गरज नाही. कॅमेऱ्यातून फोटो काढता काढता हळुहळू आपण व्हिडिओही काढू लागलो. ते समाजमाध्यमांवर शेअर करू लागलो. खरं तर अनेक सुंदर क्षणांना कैद केल्याबद्दल आणि आठवणींच्या गाठोड्यात जोडल्याबद्दल या सुविधेचे कितीही आभार मानले तरी ते कमीच आहेत. पण अर्थात जिथे वरदान असतं, तिथे शापही पाठीला पाठ येतोच अनेकदा.

 

व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओजच्या रुपात काही जण वेगवेगळ्या गाण्यांच्या पार्श्वभूमीवर अनेकजण आपले रेकॉर्डिंग करतात, काही जण वेगवेगळ्या आविर्भावात, वेगवेगळ्या क्षणांची साक्ष म्हणून, विचार मांडण्यासाठी, अभिव्यक्त होण्यासाठी व्हिडिओज तयार करतात. पण अनेकदा या माध्यमांचा दुरुपयोगही होताना दिसतो. टिकटॉक नावाच्या एका ऍपवर काही काळापूर्वी बंदी आली, हे तुम्हाला माहिती असेलच. जेव्हा बंदी येणार अशी चिन्ह दिसत होती, तेव्हा कुतुहलीपोटी मी स्वतः टीकटॉक इन्स्टॉल केलं आणि अभ्यास म्हणून वेगवेगळे व्हिडिओज सर्च करून पाहू लागले आणि त्यात जे दिसलं ते मला हादरवणारं होतं. टिकटॉकवर बंदी असली तरी युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम यांच्यावरील व्हिडिओज जो धुमाकूळ घालत असतात तो अत्यंत बीभत्स स्वरुपाचा असा असतो.

 

धार्मिक तेढ वाढवणारे व्हिडिओज, धार्मिक कट्टरतेला आवाहन देणारी वर्णनं वा चित्रीकरणं, दोन वेगवेगळ्या समाजातील अल्पवयीनांची प्रेमप्रकरणं, त्यांचे विवाह, मुलामुलींची एकमेकांशी प्रतारणा केल्याचे चित्रण करणारे व्हिडिओ, स्त्रियांवरील अत्याचार, अगदी लहान मुलांचे अश्लील अर्थाच्या बीभत्स आविर्भावातील नाच, लहान मुलांच्या तोंडी वयाला न शोभणारे संवाद, जोडप्यातील एक व्यक्ती अल्पवयीन; प्रसंगी लहान असणे अशा प्रकारची प्रेमप्रकरणं, अर्वाच्य भाषेतील म्हणजे शब्दशः शिव्या असणारे संवाद, अगदी अश्लील किंवा ज्याला सेमी पॉर्न म्हणता येईल अशा स्वरुपाचे चित्रीकरण, काही बी ग्रेड सिनेमांतील अश्लील कटआऊट, मारामाऱ्यांचे सीन, विनोदी म्हणवले जाणारे पण मनावर दूरगामी परिणाम करणारे संवाद, गाण्यांच्या पार्श्वभूमीवर पती पत्नी, मित्र-मैत्रिणी, प्रियकर-प्रेयसी यांचे अश्लील हावभावांचे रील्स, उत्तान कपड्यांतील चित्रिकरण केलेले व्हिडिओ, स्त्रियांवरील अश्लील कमेण्ट्स, रॅगिंगचे व्हिडिओज, ज्याला वाईट म्हणता येतील अशा खुणा अशा अगणित व्हिडिओजचा समावेश या रील्समध्ये वा शॉर्ट व्हिडिओजमध्ये असतो. विशेष म्हणजे, यांना काही लाखांमध्ये व्ह्यूज असतात. लहान लहान मुलांना मोबाईलवर व्हिडिओज तयार करणं तंत्रज्ञानाने इतकं सोपं करून ठेवलं आहे की, चालताबोलता हे व्हिडिओ ती तयार करत असतात.

 

टीकटॉक बंद झालेले असले, तरी फेसबुक, इन्स्टाग्रामवरील व्हिडिओज तुमच्या पाहण्यात येतात. काहीवेळा दुसरे काही शोधण्याच्या प्रयत्नात हे व्हिडिओज आपल्या पाहण्यात येतात. किंवा सध्या फेसबुक व इन्स्टाग्रामची रचनाच अशी आहे की, ते तुम्हाला पाहावेच लागतात/दिसण्यात येतात. टिकटॉकवरचा शालिनतेच्या आणि सभ्यतेच्या सीमा ओलांडणारा व्हिडिओ कंटेंट हल्ली अनेकदा फेसबुकवर शॉर्ट व्हिडिओजच्या रूपात दिसून येतो. या शॉर्ट व्हिडिओजच्या प्रदर्शनाची रचना अशी असते की, ते एकामागोमाग एक येतच राहतात आणि तुमचा प्रेक्षक म्हणून बराच वेळ हा त्यात गुंतलेला राहातो. तुमच्याही नकळत पाचाची पंचवीस मिनिटं कशी निघून जातात ते कळत नाही.

 

इन्स्टाग्राम केव्हाच टिकटॉकच्या वाटेवर गेलं होतं, हळूहळू यूट्यूब आणि सर्वांचं लाडकं समाजमाध्यम फेसबुक हेही त्याच वाटेवरचा प्रवासी झालं आहे. यातील अनेक व्हिडिओज हे अक्षरशः 'सॉफ्ट पॉर्न' किंवा 'सेमी पॉर्न' म्हणता येतील, असे असतात. अनेक व्हिडिओजमध्ये अन्याय अत्याचाराची भाषा असते, सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणारं चित्रीकरण असतं.

 

मुळातच काही वर्षांपूर्वीपर्यंत असणारा चार ते दहा मिनिटांच्या व्हिडिओजचा ट्रेण्ड हळूहळू मागे पडला असून, काही सेकंद ते जास्तीत जास्त दोन ते तीन मिनिटं असा ट्रेण्ड तयार झाला आहे. त्यातही लोकांच्या भावना चाळवणारं, मन प्रक्षोभित करणारं, अन्याय अत्याचाराचं चित्रिकरण करणारं, प्रेमाचा त्रिकोण-चौकोन-व्यभिचार यांना खतपाणी घालणारं असंच विश्व या रिल्समध्ये दिसून येतं.

 

अत्यंत दर्जाहीन; पण भडक अशा या कंटेंटचे प्रेक्षक सर्व वयोगटात आहेत. ज्या अर्थी लहान मुलं असा व्हिडिओ तयार करतात, त्याचाच अर्थ ते प्रेक्षक म्हणून असे व्हिडिओ नियमित पाहात ही असणार. ज्यांचं मनाची मशागत होण्याचं वय असतं अशी वाढत्या वयाची, किशोरवयीन मुलं, अनेक नोकरदार स्त्रिया-पुरुष, कामासाठी समाजमाध्यमं वापरणारे, मोकळा वेळ असणारी मंडळी, धार्मिक व्हिडिओज पाहणारी मंडळी, अश्लील कंटेंट प्रसारित करणारी मंडळी असे अनेक जण हे लहान मोठे रिल्स पाहात असतात.

 

विशेषतः किशोरवयीन आणि लहान मुलांच्या मनावर या व्हिडिओजचा अत्यंत वाईट परिणाम होऊ शकतो. त्यांच्या हातातील सहा इंचाच्या त्या यंत्रात ते काय पाहात असतील याचा अंदाज पालक, शिक्षक म्हणून लावणं कठीणच आहे. त्यातही अनेकांचे आईवडिल अशिक्षित असू शकतात, अशा वेळी ते अधिक कठीण होऊन बसतं. प्रत्यक्ष या व्हिडिओज तयार करण्याच्या व्यसनाला बळी पडणारी अनेक महाविद्यालयीन मुलं, स्त्रिया, पुरुषही आहेत. व्हिडिओचा प्रेक्षक असणारा एक मोठा गट या विळख्यात अडकत चालला आहे. आपल्या वेळेच्या बदल्यात ते व्हिडिओ तयार करणारा, चॅनलवर-अकाऊंटवर प्रसारित करणारा पैसे कमावत असतो हेच आपण अनेकदा विसरतो. ते आपलं नाही, तर नकळत आपणच त्यांचे गिऱ्हाईक होऊन जातो.

 

झोप, मनस्वास्थ्य, वेळ, शांतता, एकाग्रता या सगळ्यावर या रिल्सचा परिणाम होताना दिसत आहे. बीभत्स स्वरुपाच्या या रिल्स, व्हिडिओपासून मोबाईलधारकांचा बचाव करण्यासाठी खरोखरच कठोर पाऊल उचलणं, कंटेंटवर अधिकाधिक निर्बंध घालणं, माणसांतील विवेक जागृत करणं, सोशल मीडिया नामक भ्रामक जगाचा फोलपणा त्यांना लवकरात लवकर जाणवून देणं अत्यंत आवश्यक आहे. 

- मृदुला राजवाडे