नवीन आले साल आजला

युवा विवेक    03-Jan-2022   
Total Views |

नवीन आले साल आजला

 
new year

अखेर २०२१ला निरोप देत आपण २०२२मध्ये प्रवेश केला. आपली संस्कृती वेगळी असली, दिनदर्शिका वेगळी असली तरी वर्षातील दोन तारखांचा मोह पडल्याशिवाय राहात नाही. एक, ग्रेगरियन दिनदर्शिकेप्रमाणे येणारा आपला वाढदिवस आणि वर्षाचा पहिला दिवस म्हणजे १ जानेवारी. एका दिवशी आपण डोळे उघडून या जगात प्रवेश केला आणि दुसऱ्या दिवशी काळ एका वर्षी पुढे सरकण्याचा दिवस. आपण सर्वांनी आनंदाने आणि उत्साहाने नव्या वर्षाचं स्वागत केलं. पण यंदाही गेल्या दोन वर्षांप्रमाणे कोरोनाचं सावट पुन्हा एकदा देशावर घोंगावू लागलंय. ३१ डिसेंबरला लोकांच्या उत्साहात काही फरक दिसून आला नाही याचबद्दल त्यांचं कौतुक करावं की कोविडच्या नियमांना फासलेला हरताळ पाहून खंत व्यक्त करावी हे खरंच कळेनासं झालंय.

 

२०१९च्या अखेरीपासून संपूर्ण जग एका वेगळ्याच चिंतेने ग्रासलं. कोविड-१९ महामारीशी झुंजता झुंजता विश्वातील महासत्तादेखील जेरीस आलेल्या असताना प्रचंड मोठ्या लोकसंख्येच्या भारताने मात्र या आजाराला चांगलीच टफ फाईट दिली. प्रचंड मोठी रुग्णसंख्या ते अतिशय कमी रुग्णसंख्या, ऑक्सिजनची उपलब्धता ते कमतरता, आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी साधलेला स्वार्थ ते देशबंधूंना मदत करण्यासाठी सर्वस्व पणाला लावणारे स्वयंसेवक-कार्यकर्ते, अन्नधान्याच्या कमतरतेमुळे दुकानांसमोर उडालेली झुंबड ते स्वतःहून पुढाकार घेऊन मदतीचा डोंगर उभा करणाऱ्या संस्था-संघटना असे दोन्हीही आलेख आपण अनुभवले.

 

दोन वर्षं झुंजल्यानंतर आता तरी सारं सुरळीत होईल असं म्हणता म्हणता शत्रूने पुन्हा आपलं दार ठोठावायला सुरुवात केली आहे. गेल्या दोन वर्षांत माणसं थकून, वैतागून गेली आहेत. आयुष्यात वाईटात वाईट काय होऊ शकतं याचा प्रत्यय अनेकांनी घेतला आहे. समाजातील संवेदनशीलतेचाही अनेकांनी अनुभव घेतलाय. पहिल्या लॉकडाऊनमध्ये भांबावलेले आपण दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये साऱ्यालाच सरावलो आणि लसीकरणाच्या मोठ्या अभियानातही सहभागी झालो. भारताने जगाच्या पाठीवर उल्लेखनीय स्वरुपाचं लसीकरण अभियान राबवलं. पण तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा गरज निर्माण झाली आहे ती सकस जीवनशैलीचा अंगीकार करण्याची.

 

आपल्या आजूबाजूला अनेकांनी कोविडवर मात केली. यात कोव्हिड काळात आपल्यावर असलेल्या आरोग्याची काळजी आणि पूर्णपणे घरचा आहार या दोन्ही बाबींचा महत्त्वपूर्ण सहयोग होता. आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा अंगीकार ही केवळ कोविड काळाचीच नव्हे तर भविष्यकाळाचीच गरज झाली आहे. कोविडच्या काळात लागलेल्या या आहाराच्या चांगल्या सवयी आपण कायमस्वरुपी अंगीकारणं आवश्यक आहे.

 

दिवसाला ठराविक व्यायाम करणं, भारतीय पद्धतीचे योगशास्त्रासारखे व्यायामप्रकार शिकणं-सराव करणं, कोविडच्या काळात अनेकांना श्वसनाचा त्रास झाला, त्यासाठी प्राणायाम करणं, दिवसाचे ठराविक तास ठराविक ताण घेऊन काम करणं, ओव्हरस्ट्रेस न होणं, फार तेलकट-तुपकट-मसालेदार न खाता घरी शिजवलेलं सौम्य पण रूचकर जेवण घेणं, लहान मुलांनाही या सवयी लावणं, वाहनांचा वापर कमी करून प्रदुषण कमी करणं, घरच्यांसोबत कटकट न करता चोवीस तास राहाणं, मुलांना वेळ देणं, निसर्गाच्या सान्निध्यात वेळ व्यतित करणं हे सगळं जीवनात किती महत्त्वाचं आहे याचा चांगलाच पाठ कोव्हिडने शिकवलाय.

 

वर्षाच्या अखेरीस जेव्हा गेल्या दोन वर्षांच्या नातेसंबंधांच्या, वरील सवयींमुळे झालेल्या जमाखर्चाचा ताळेबंद मांडताना आपल्याला लक्षात आलं असेल की कोव्हिडने अनेक दुष्परिणाम, अनेक संकट झेलायला भाग पाडलं असेल तरी काळाचा विचार करून आपण काय करायला हवंय हेही कोव्हिडनेच शिकवलं. आजारपणात, संकटात पैसा महत्त्वाचा आहेच यात शंका नाही. पण नातेवाईक सोबत असतील तर थोडी चणचण असली तरी सगळं काही निभावून नेता येतं हे या कोविडनेच आपल्याला शिकवलंय. घरच्यांची, मुलाबाळांची, आई-वडिलांची सोबत हे खूप मोठं दान आहे देवाने दिलेलं. आठ पंधरा बाहेर फिरायला गेलो की कधी एकदा घरी येऊन आईच्या हातचा आमटीभात जेवतो असं होतं आपल्याला. 'माँ के हाथ का वह स्वाद' आपण दोन वर्षं सतत अनुभवतोय, जगतोय. ज्यांच्यासाठी आपण बाहेरच्या जगावर अवलंबून असतो अशा अनेक गोष्टी घरात करता येतात असाही अनुभव आपण या काळात घेतला. धुणीभांडी करणारी काही दिवस आली नाही तरी मॅनेज करता येतं आणि माणुसकी म्हणून तिच्या कुटुंबाला मदतही करता येते हेही आताच शिकलो आपण.

 

पूर्वी ऑफिसच्या काळात वाचन, मनन, छंद हे सारं करायला, मुलांशी खेळायला, त्यांचा अभ्यास घ्यायला आपल्याकडे वेळच नव्हता. कोविडच्या या काळात हे सारं करायला शिकलो. पूर्वी आपल्यासाठी घर म्हणजे घर, ऑफिस म्हणजे ऑफिस, शाळा म्हणजे शाळा असे ठोकताळे होते. कोविडने आपल्याला स्विच ऑन, स्विच ऑफ टेक्निकने काम करायला शिकवलं. ऑफिस घरात आणि घर ऑफिसात असू शकतं. शाळाही वर्षभर घरातून अनुभवता येऊ शकते आणि घरच एक शाळा होऊन जातं. भारतीयांसाठी हा अनुभव अद्वितीय होता. अर्थात भारतात जॉब सुरक्षितता नसल्याने अनेक ठिकाणी नोकरदारांचं शोषणंही झालं. पण याचा परिणाम असा झाला की अनेक आर्थिक स्थिती चांगली असणाऱ्या तरुण आई-वडिलांनी काही कालापुरत्या नोकऱ्या सोडून घराला, मुलांना वेळ देणं आवश्यक जाणलं. थोडीफार आर्थिक तडजोड करून आनंदाचे क्षण वेचण्याला प्राधान्य दिलं. ज्यांना थेट जाऊन छंद जोपासणं शक्य नाही त्यांनी ऑनलाईन माध्यमांचा आधार घेऊन आपले छंद पुन्हा पूर्ण करायला सुरुवात केली. कोणी गाणं शिकतंय, तर कोणी चित्रकला, कोणी आरोग्यदायी जीवनासाठी योग करतंय तर, कोणी ॲरोबिक्स, कोणी वेगवेगळ्या पाककृती करतंय तर कोणी पुन्हा शिवणकामाकडे वळलंय.

 

असं म्हणतात की, शत्रूकडूनही काहीतरी शिकावं. गेल्या दोन वर्षांतील दुःखद स्मृती झटकून या नव्या वर्षांत आपल्या ओंजळीत जमा झालेले हे कण वेचायला, स्मरायला आणि जपायला हवेत. मागचं सोडून पुढे चालू असं न म्हणता, मागचं सोबत घेऊन पुढे चालू असं आयुष्याचं रिकरिंग अकाऊंट असायला हवं. नवीन आले साल आजला, उजेड पडला नवा असं म्हणत ताजातवाना श्वास उरात भरून घ्यायला हवा आणि 'स्विच ऑन मोड'वर जीवन पुन्हा सुरू करायला हवं.

- मृदुला राजवाडे