झाडांशी निजलो आपण...

युवा विवेक    11-Oct-2022
Total Views |

zaadanshi nijalo aapan...
 
 
 
झाडांशी निजलो आपण...
 
कोणतीही गोष्ट आवडण्या न आवडण्याची काही कारणं असतात, पण काही काही गोष्टी विनाकारणच असतात असं मला तरी वाटतं.
जेव्हा माझ्या कानावर हे गाणं पडलं असेल तेव्हा माझं वय किती होतं हे मी नक्की सांगू शकत नाही. तेव्हा सकाळी सकाळी आई रेडिओ लावायची. 'राम चरित मानस'साधारण सकाळची सहा ची वेळ असायची. तेव्हा पासून एका मागोमाग एक बरेच कार्यक्रम असायचे तेव्हा कधीतरी नकळत्या वयात मी हे ऐकलं होतं आणि माझी आई सुंदर गाते. ती ते नेहमी गुणगुणत असे. ते तिने गायलेलं मला प्रचंड आवडायचं.
 
"भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते
ते झरे चंद्र सजणांचे,ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया.."
 
हे गाणं मला का आवडतं याचा अर्थ काय किंवा शब्द ही नीटसे कळत नव्हते. पण या शब्दांची या आवाजाची आणि या संगीताची प्रचंड ओढ मात्र होती हे खरं. जस जसं वय वाढत गेलं तसं तसे प्रत्येक वयाच्या टप्प्यात या गाण्याचे वेगवेगळे अर्थ लागत गेले, अगदी आजही या गाण्याविषयी लिहायचे म्हणून पुन्हा ऐकले तेव्हा पुन्हा नव्याने काहीतरी गवसल्याचे भासले. हे गाणं ऐकतात अगदी प्रत्येकवेळी मी मला नव्याने सापडत गेले आणि तो प्रवास कधी संपेल असं वाटतही नाही.
लहान असताना निष्कारण आवडायचं थोडी मोठी झाल्यावर शब्दांची जादू अनुभवण्याची सवय लागली आणि तसं पहायला गेलं तर हे गाणं अक्षरशः जादुई आहे. तारुण्यात या गीतातला ओढ लावणारा विरह जाणवला, दुखरी तरीही हवीहवीशी वाटणारी सल जाणवली. आर्तता आणि प्रचंड गूढता जो ग्रेसांच्या लेखनाचा स्थायी भाव आहे तो ओढ लावत गेला. शब्दांचे शब्दशः अर्थ आणि त्यामागचे गर्भितार्थ हा वेडा छंद मला या गाण्याने लावला. माझ्या मते जगण्याचा सार म्हणजे हे गाणं आहे. इथे गीतात काही ओळी कमी आहेत पण मूळ कविता म्हणजे अक्षरशः जगण्याचा सार वाटते.
भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते.
तसं पहायला गेलं तर ग्रेस कुणाला कळला असेल की नाही शंकाच आहे. ते त्याच्या कोणत्याच रचनेचा अर्थ सांगायचे नाहीत म्हणे. त्याच्या म्हणण्यानुसार तो ज्याने त्याने आपापला लावायचा असतो आणि किती खरं. असं आहे की, प्रत्येकाचा अनुभव वेगळा दृष्टिकोन वेगळा तेव्हा त्याचे अर्थही वेगळे असूच शकतात.
मन म्हणलं की भय, चिंता, काळजी प्रत्येक जिवाच्या मनाला व्यापणाऱ्या भावना आहेत. अशावेळी 'जी व्यक्ती आपल्या जवळची आहे तिची आठवण येते आहे असे आधी वाटायचे '
पण वय परत्वे आज मात्र असे वाटते की; ती प्रिय व्यक्ती नसून आपलेच अंतर्मन आहे. जेव्हा भय वाटते तेव्हा आपण आपल्याच अंतर्मनाला साद घालत असतो.
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते
पूर्वी वाटायचे संध्याकाळ झाल्यावर दिवसभराचा शीण होतो. तो घालवण्यासाठी मी तुझे म्हणजे प्रिय व्यक्तीचे स्मरण करून त्याने जे सांगितले शिकवले ते पुन्हा त्याच्या स्मरणात आठवणे पण आता आयुष्याचा बऱ्यापैकी अनुभव आल्यावर असे वाटते की, या ओळीतली संध्याकाळ म्हणजे आयुष्याची संध्याकाळ असावी. आयुष्याने जे जे अनुभव दिलेत त्या अनुभवाने मी शहाणा होऊन आयुष्याचे हे गीत आयुष्य सरताना मी शांतपणे गात आहे.
ते झरे चंद्र सजणांचे ती धरती भगवी माया
आधी वाटायचे झरे, चंद्र,साजणा, धरती प्रियकराच्या प्रेमाची रूपकं असावीत, पण दर वेळी वेगळा अर्थ लागतो आता वाटते की मानवी मनाचे ,प्रिय स्वप्नांचे,प्रेमाचे प्रतीक सांगणारे चंद्र, झरे या प्रतिमा आहेत तसचं दुसरीकडे मानवी मनाबरोबर बुद्धीचा ती धरती भगवी माया या ओळीने उत्तम समतोल साधला आहे धरती चे भगवेपण म्हणजे ऊर्जा किंवा व्यवहारी जीवन असावे असे वाटते.
झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया
बालिश मनास वाटायचे संध्याकाळी दमून झाडाखाली झोपून सकाळी तिथूनच उठायचे,
पण आज कळते आहे याचा अर्थ थेट आपल्या जन्म-मरणाशी अन पुन्हा जन्म घेण्याशी आहे किंवा एखादे फळ खाली पडते ,बी रुजते,रोपांचे झाड होते पुन्हा फुलते, फळते अन पुन्हा तेच चक्र चालू राहते.
तो बोल मंद हळवासा ,आयुष्य स्पर्शूनी गेला एखाद्या प्रिय व्यक्तीने कधीतरी काहीतरी प्रेमळ बोललेले आज विरहात ते आठवून आपण आपली समजूत काढायची आणि त्या शब्दांचा आधार मनाला सुखावणारा आहे पण नव्याने लागलेला अर्थ आपलेच अंतर्मन आपल्याला चांगले योग्य काही तरी सांगून जाते जे त्या वेळी आपण दुर्लक्षिलेले आज कठिण समयी आधार देणारे असते याची जाणीव होऊन आयुष्याची आपण दिशा बदललेली असते.
सीतेच्या वनवसातील जणू अंगी राघव शेला
जसे सीतेला वनवासात रामाच्या नुसत्या स्मरणाने ही बळ मिळते भावनाच्या, दुःखाच्या अपमानाच्या पराधीनतेच्या वादळात रामाचा स्मरण रुपी शेला जसा सीतेला आधार देणारा आहे .तसे तिथे सीतेसाठी राम आणि आपल्यासाठी रामाची भूमिका अंतर्मन करते .
स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे
आपल्या शरीरातली गात्र अन गात्र नजाणो कोणकोणती आणि कुणकुणाची दुःख गुणगुणत आहेत इथे दुःखा पलीकडे काहीच नसावं असं वाटत असताना विरक्तीचा भाव नकळतपणे हे कडवं ऐकताना दाटून येतो इतकी विरक्ती दाटनाच अचानक पराकोटीची आसक्ती ही दाटून येते या दोन ओळीं मधला हा प्रचंड विरोधाभास माझ्या तरी समजण्या पलीकडचा आहे .
असं हे वेड लावणारं, शाहण करणारं नकळत्या वयापासूनच मला सोबत करणारं गाणं.
हे गाणं ऐकताना तरंगायला होतं काही ओळींवर मन भरून येतं कुठे हळवी जाणीव देतं अजूनही प्रत्येक वेळी नवं वाटतं काहीतरी शोधायला भाग पाडतं आणि मी पुन्हा पुन्हा या गाण्याच्या प्रेमात पडते,वेड्यासारखी ...
आज सकाळपासूनच "झाडांशी निजलो आपण.."
ही ओळ गारूड करुन होती.. बघता बघता दिवस सरला तशी मनात रुतत चालली होती.. उगाच काही घडत नसतं जगात! काही कारणास्तवच असेल पण मला ठाऊक नाही की ओळ माझं अंतर्मन एवढं का ढवळून काढतेय ..!
एक सत्य आहे जे ठाऊक तर आहे पण जाणत नाहीत आपण..
संपुर्ण ब्रह्मांडात कोणतीही एनर्जी वेगळी अशी निर्माण होत नाही तशी ती नष्टही होत नाही..
हां फक्त त्या एनर्जीने रूपे मात्र बदललेली असतात..
 
अव्याहतपणे हे चक्र चालू असते.. जिथे शेवट तिथून पुन्हा ऋजूवात! आपण फक्त भाग असतो कणभरा इतका या अनंताचा.. कालचक्राने नेमून दिलेली इतीकर्तव्ये संपवून ठरल्या वेळी देहाचे विसर्जन करणे नि लागणे पुन्हा नव्या प्रवासाला..
म्हणजेच
"झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया.."
अमिता पेठे पैठणकर