प्रहर

युवा विवेक    18-Oct-2022
Total Views |

prahar
 
 
मीठ मोहरी
तिन्ही त्रिकाळ,
सहा ऋतू,
अष्टो प्रहर ...
प्रसन्न सकाळ,
उदास दुपार,
हुरहुरती सांज ..
औट घटिका
कोणत्या दिशेस
भटकतेय मन..
दाही दिशा धुंडाळून झाल्या
क्षणा क्षणांना पिंजून झालं..
उंबऱ्यावरती पालथं पात्र ठेवून झालं
मीठ मोहरी उतरून झाली
चूलकांडात घालून झाली ..
ठसका बिसका उठलाच नाही
आनंदाचा घेऊन झोका
आतून आवंढा गिळला जातो
वरुन चांदणी रात्र पांघरून
अंधाराला भिडला जातो
खोपा हलतो,
खोपा डुलतो
काळ्याशार पाण्यावरती
आडवा तिडवा झुलत राहतो..
पापण्यांची पालखी करून
इवले काही अडखळते आहे..
पिवळ्या पंखाच्या पाखराचा;
मुस काही लागत नाही..
येण्या जाण्याच्या अंतराळ खुणा
हल्ली तिला दिसत नाहीत
औट घटिका,
प्रहर प्रहर..
कणा कणाने सरतो आहे..
मंदाराच्या पाठीमागे केशर बिंदू झुकतो आहे !
अमिता पेठे पैठणकर