चंदा रे चंदा...

युवा विवेक    19-Oct-2022
Total Views |

chanda re
 
 
चंदा रे चंदा
अगदी अगदी लहान होते ना तेव्हापासून तुझ्याशी ओळख आहे माझी. बोलायला वगैरे येत नव्हतं तेव्हा आईच्या कडेवरुन तुला पाहिलं. मग "चांदोमामा चांदोमामा भागलास का?" गाण्यातून तुझं माझं मामा-भाचीचं नातं आहे कळलं. तू लिंबोणीच्या झाडामागून माझ्याशी लपाछपी खेळतोस, मी तुला शोधत येऊन तुझ्या पाठीत धब्बा घालतेय, हे असं कल्पनाचित्र तेव्हा मी कित्ती वेळ रंगवत बसायचे. पण तेव्हापासून तुझ्याबद्दल जे आकर्षण वाटायला लागलं ना ते कधीच कमी होणार नाही. असं कसं रे सगळ्यांचंच लाडकं होता येतं तुला?
 
 
तू इतक्या लांब...आमच्या जगात काय काय चालतं कळतं का तुला? अरे….अरे, गॉसिपिंग नव्हे बरं का हे पत्र म्हणजे. तुझं इतकं कौतुक असतं इकडे की, ते तुला कळायला हवं ना! अर्थात वरुन तू बघत असशीलच म्हणा. तुला साक्षीला ठेवूनच तर सगळ्यांचं सगळं चालू असतं. ऑ….इतकं का हसायला येतंय तुला? खरंच अरे… इथल्या प्रेमी जीवांना तर तुझाच आधार रे बाबा. तुझ्यामुळे समुद्राला भरती येते ना तशीच या लोकांच्या हृदयातल्या प्रीतीलाही येते वाटतं. मग रोजचाच चंद्र त्यांना नवा नवा भासायला लागतो आणि काय काय सांगू तुला. तुझ्यावर कविता, गाणी तर इतकी रचली गेली आहेत की बस...पण तुझ्या चांदण्यात जाम शीतलता आहे रे. मनातल्या भावना उचंबळून आल्या नाहीत तरच नवल!
 
 
लहानपणी अनुभवलेल्या कोजागिरीच्या कितीतरी रात्री मला आठवताहेत अजून. कोकणातच राहत असल्यामुळे या रात्री समुद्राच्या सान्निध्यात घालवल्या आहेत आम्ही. आकाशातले तुझे पूर्ण बिंब, खाली समुद्र आणि त्याची गाज आणि मंद वारा… आहाहा...त्यावेळी लाटांवर जी चंदेरी चकमक हेलकावत असायची ना तिच्यावरुन नजर हटायची नाही. सगळी रात्र तुमच्यासोबत घालवावी असं फार वाटायचं तेव्हा. मग इथंच आपलं घर असतं तर किंवा रोज रोज कोजागिरी पौर्णिमा असती तर किती मज्जा आली असती असलं मॅडसारखं काहीबाही डोक्यात येत राहायचं. पण कसं शक्य होणार ना ते. पण माहितेय...आमच्या अंगणातून मात्र मी रोज तुला न्याहाळायचे. उन्हाळ्यात अंगणात एक कॉट ठेवलेली असायची. रात्री सगळं आवरलं की, त्यावर निवांतपणे पहुडायचं आणि एकटक तुझ्याकडे बघत रहायचं हा तेव्हाचा उद्योग होता माझा. कोणीतरी सांगितलं होतं की, चंद्राकडे एकटक बघत राहिलं की दृष्टी सुधारते. अर्थात तेव्हा दृष्टी सुधारायला बिघडली नव्हतीच. पण ते एक वेड काही काळ लागून गेलं होतं. शेजारी कुंदाच्या झाडावर चांदण्या उमललेल्या असायच्या आणि वर तू आणि तुझ्यासोबत तुझ्या सख्या चांदण्या. वेळ कसा जायचा समजायचंच नाही. भारी दिवस होते ते…रात्री म्हणायला हवं खरंतर.
 
 
तुझ्यावर लिहिलेली बडबडगीतं, तुझ्या गोष्टी ऐकतच आम्ही सगळे मोठे झालो आहोत. तुझ्याकडचा तो ससा बघण्याचं तर फार वेड होतं मला. आणि ती गोष्ट रे...गणपती बाप्पाचं मोठं पोट बघून हसत सुटला होतास म्हणे तू. मग बाप्पाचा शाप, उ:शाप हे सगळं खरं आहे का? गणेश चतुर्थीला तुझं तोंड बघायचं नसतं हे कळल्यावर 'का' ला उत्तर म्हणून ती गोष्ट सांगितली होती मला. लहानपणी असाच कायम आसपास असायचायस तू. जसं मोठी होत गेले ना तशी तुझी अधिक माहिती होत गेली. तो ससा नसून तुझ्यावरचे दरी-डोंगर आहेत ते कळत गेलं. पुढं तर त्यांचा नकाशा, त्यांची नावंही कळली. पण खरं सांगू? या खऱ्या खऱ्या माहितीपेक्षा ना मला अजूनही तो ससा फार आवडतो. काय होतं ना...ही जी शास्त्रीय माहिती मिळालेय ना, ती तुला बघताना डोकं वर काढते. मग पूर्वीसारखं निर्भेळपणे तुझ्याकडे बघणं होत नाही. तेच खटकतं मग जरासं. तुझ्याकडे बघून शांत व्हायचं सोडून डोक्यात दंगाच सुरु होतो. ते म्हणतात ना, 'अज्ञानात सुख असतं' ते पटतं मग अशावेळी. पण तरी हरकत नाही. माहिती हवीच की सगळ्याची. ती माहिती कधी बाहेर काढायची आणि कधी कुलूपबंद ठेवायची ते शिकलेय आता मी. त्यामुळं नो प्रॉब्लेम.
तुझं कोणतं रुप मला जास्त आवडतं सांगू? तुझी बिजेची कोर आणि उगवतानाचा लालसर दिसतोस ना ते बघायला फार आवडतं मला. लाजत असतोस का रे तेव्हा तू? एका संध्याकाळी ना लोणावळ्याच्या घाटातून तू उगवताना आणि तेव्हाच मावळतीवर सूर्य मावळताना पाहिलं होतं मी. ते दृश्य कोरलं गेलंय मनावर. दोघांचे आकार साधारण सारखे, रंग तर अगदी ठरवून मॅचिंग केल्यासारखे! अक्षरशः किती बघू अन् किती नको असं झालं होतं. तू आहेसच एकदम लोभसवाणा! तुझी ती बिजेची कोर तर किती रेखीव असते रे. अलगद काढून कपाळावर चिकटवावी वाटतं आणि त्या सगळ्या चांदण्या...त्यांनाही अलवार गजऱ्यात गुंफून वेणीत माळावं वाटतं. तुझ्याबद्दल असं आणखी काय काय वाटतं ते लिहीत बसले तर तेवढ्यात तुझी पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण होईल बघ. हसू नकोस...खरंच सांगतेय. म्हणून तुला म्हणते मी "चंदा रे चंदा रे...कभी तो जमी पर आ...बैठेंगे बाते करेंगे"... शब्द दुसऱ्यांचे असले म्हणून काय झालं? भाव तर तेच आहेत ना मनात. मग...कधी येतोस? वाट बघतेय तुझी.
तुझ्या शीतलतेमध्ये न्हालेली…
 
 
जस्मिन जोगळेकर.