जगण्याच्या मॅरेथॉनमध्ये हवा थोडासा ब्रेक

युवा विवेक    21-Oct-2022
Total Views |

jaganyaacyaa marathonmadhye hawa break
 
 
 
जगण्याच्या मॅरेथॉनमध्ये हवा थोडासा ब्रेक
लाईफ इज रेस, इफ यू डोण्ट रन फास्ट, यू विल बी लाईक ब्रोकन अंडा.... आठवतोय का व्हायरसच्या तोंडचा हा संवाद. खूप हसलो होतो आपण थिएटरमध्ये बोमन इराणीच्या तोंडून हे ऐकताना. पळत रहा, थांबलात की तुमचं अस्तित्व संपलं हेच तर सांगतो हा संवाद. साधारण सत्तरच्या दशकात बबन प्रभू लिखित ‘पळा पळा कोण पुढे पळे तो’ या प्रहसनात्मक नाटकाने रंगभूमीवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. हे नाटक म्हणजे एक क्रेझी कॉमेडी होती. कथेतील घटनांमुळे रंगमंचावर जो काही धुमाकूळ चालत असे तो अक्षरशः वेड लावणारा होता. पण आज या शीर्षकाचा मला वेगळ्याच अर्थाने उल्लेख करावासा वाटतो. दैनंदिन आयुष्यात आपण सगळे अनिर्बंध वेगात पळत सुटलो आहोत. हा वेग थोपवणं आपल्याच हातात आहे.
 
मित्रांनो, थ्री इडियट्समध्ये राजू रस्तोगी आणि फरहान म्हणतात, दोस्त फेल हो जाए तो दुख होता है, लेकिन दोस्त फर्स्ट आ जाए तो ज्यादा दुख होता है. आपले शिक्षक, आईवडील नेहमीच आपल्याला शिक्षणासाठी प्रोत्साहन देत असतात. पर हे भगवान, ये दुख काहे खतम ही नहीं होता. मग आपण धाऊ लागतो गुणांच्या रेसमध्ये. वेगे वेगे धावत मार्कांची ही शर्यत आपल्याला जिंकायचीच असते. मला आठवतंय, आम्ही लहान असताना गुण हे टक्क्यांमध्ये येत. पण हळुहळु स्पर्धा इतकी तीव्र होत गेली की, महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी ४९५, ४९६, ४९७ असा गुणांच्या बेरजेचा आकडा महत्त्वाचा ठरू लागला. प्रवेशानंतर सुरू होते ती सर्वात वरच्या क्रमांकावर टिकून राहण्याची चढाओढ. मग रात्र रात्र जागून अभ्यास, वेगवेगळे क्लासेस हे प्रकार सुरू होतात. ग्रूप क्लासेस, प्रायव्हेट क्लासेस, वेगवेगळ्या विषयांना वेगवेगळे क्लासेस, कमीत कमी मेहनतीत जास्तीत जास्त गुण मिळवून देणारे क्लासेस ही यादी संपेनाशी होते.
 
अगदी बालवाडीपासूनच घड्याळ्याच्या काट्यावर जगताना शाळा-कॉलेज, वेगवेगळे ह़बी क्लासेस, प्रॅक्टिकल्स, क्लासेस, मित्रमैत्रिणींसोबतचे चॅटिंग, सोशल मीडियावर घालवलेला वेळ या सगळ्या उठाठेवीत जगायचं पार राहूनच जातं. शिक्षण संपलं की, नोकरीतही तेच. सगळ्यांच्या पुढे जाण्यासाठी सगळ्यांपेक्षा उत्तम, सगळ्यांच्या आधी कामं पूर्ण करण्याच्या, सतत दुसऱ्यांना स्वतःचं बिझी असणं जाणवून देण्याच्या नादात नादात स्वतःची स्पेस हरवूनच बसलोत आपण. जितका अधिक पैसा हवा तितके अधिक श्रम, तितकी मोठी स्पर्धा आणि तितकंच मोठं ती जिंकण्याचं आव्हान. जगण्यासाठी पैसा हवा हे बरोबर, आपली स्वप्नं त्याची गरज असते हे ही बरोबरच असतं. ही जागेपणीची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण धावतो आहोत. पण त्यासाठी आनंददायी झोपेत पडणाऱ्या स्वप्नांना तीलांजली का द्यायची.
 
आजच्या घडीला तुम्ही बाई असा वा पुरुष असा, पाच वर्षांचे असा वा पन्नास वर्षांचे असा, स्वतःच्याही नकळत सर्वोत्कृष्ट असण्याच्या शर्यतीचा भाग झालेले आहात. पण या शर्यतीत धावताना शारीरिक आणि मानसिक आंदोलनं सांभाळणं व त्यासाठी वेळ घेणं हे अत्यावश्यक आहे. आपल्या मुलाला दैनंदिन अभ्यासाबरोबरच वेगवेगळ्या छंदवर्गांना घालणारे पालक हे अनेकदा त्याचा स्वतःचा म्हणून वेळ शिल्लक ठेवत नाहीत. हीच गत तरुणांचीही आहे. सहावी सातवीपासून महाविद्यालयीन जीवन पूर्ण होईपर्यंत आपल्या दैनंदिन रुटीनमध्ये मुलं इतकी बिझी होतात की, आपला स्वतःचा म्हणून वेळ असला पाहिजे ही जाणीवच त्यांच्यात उरत नाही.
 
मुळात शालेय, महाविद्यालयीन शिक्षण किंवा वयाच्या २५ वर्षांपर्यंतची उमेदीची वर्षं ही आयुष्याचा पाया पक्का करण्यात मोलाची भूमिका बजावतात. हा पाया करिअरिस्टिक दृष्टीने मोलाचा तर असतोच. त्याच वेळी तो ज्ञान, शारिरीक क्षमता, मानसिक भावभावनांचं जाणिवानेणिवांचं पोषण या दृष्टीनेही महत्त्वाचा असतो. काही वेळा या प्रेशर घेण्याच्या आणि वेगाने धावण्याच्या नादात आपल्या आरोग्यावर होणारे परिणाम आपल्याला जाणवतच नाहीत. अनेकदा आपली झोप बिघडलेली असते. वेळीअवेळी खाण्यामुळे पित्तासारखे त्रास सुरू होतात. व्यायाम नसल्यामुळे वजन वाढतं. मुलींच्या बाबतीत मासिकपाळीचं चक्र बिघडण्याचे त्रास होतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिविचारांमुळे मन थाऱ्यावर नसतं. आवश्यकतेपेक्षा जास्त काम मेंदूला करावं लागतं आणि इथे सगळी गोची होते. मुळात आपल्या क्षमता ओळखणं आणि स्मार्ट वर्क पद्धतीने ताण न घेता आपलं काम करत राहाणं हे सगळ्यात मोठं स्किल आहे. याचसोबत आवश्यक असते ती मनःशांती.
 
तरुणपणीच्या या काळात अभ्यासा-छंदवर्गाबरोबर, मित्रमैत्रिणींचा सहवास-लोकमाध्यमावरील वावराबरोबरच वाचनासारखे छंद, आरोग्यासाठी योग्य आहार व ठराविक व्यायाम, सार्वजनिक जीवनातला वावर, थोडीफार समाजसेवा हे ही आपल्यासाठी आवश्यक असतं. आज मी काम, अभ्यास काहीही करणार नाहीये किंवा आज मला कोणतंही प्रेशर नाहीये किंवा आज मी लोकमाध्यमाची पाटी कोरी ठेवणार आहे असा निश्चय स्वतःसाठी करण्यात काही गैर नाही. धावत असलात तर थांबा, एक दीर्घ श्वास घ्या. मोबाईल, हेडफोन्स घरातच ठेवून स्वतःशीच गप्पा मारत साधत साधत एक लांबसा वॉक घ्या. पुस्तकांच्या कपाटातून एखादं दिल खूष करणारं पुस्तक निवडा आणि मस्त वाचत बसा. किंवा मस्तपैकी स्वयंपाकघरात जाऊन काहीतरी पदार्थ करा आणि आईला सरप्राईज द्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जगण्याचा आनंद घ्या, शिक्षणाचा आनंद घ्या. जगण्याची मॅरेथॉन जिंकण्यापेक्षा तो प्रवास मनात साठवा. कधीतरी थोडसं थांबून जीवनमार्गातला हा ब्रेकही अनुभवा. अभ्यास, स्पर्धा ही यशस्वी होण्यासाठी नव्हे तर सक्षम होण्यासाठी करा. शेवटी काय, बाबा रणछोडदासनी सांगूनच ठेवलंय, कामयाब होने के लिये नहीं, काबिल होने के लिये पढो. कामयाबी पीछे आ ही जाएगी. जय बाबा रणछोडदास.
 
मृदुला राजवाडे