इकिगाई - आनंदी दीर्घायुष्याचा फॉर्म्युला

युवा विवेक    28-Oct-2022
Total Views |

ikigai - aanandi deerghayushyaacha formula
 
 
 
इकिगाई - आनंदी दीर्घायुष्याचा फॉर्म्युला
दुसऱ्या महायुद्धात प्रचंड हानी होऊनही जपानने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून भरारी घेत स्वतःची दखल संपूर्ण जगाला घ्यायला लावली. तंत्रज्ञान, विज्ञानातील प्रगतीप्रमाणेच नागरिकांमधील अनुशासन अर्थात शिस्त, कार्यप्रणाली दीर्घायुष्य आणि सदैव आनंदी चित्तवृत्ती यासाठीही जपान विशेषत्वाने ओळखला जातो. जपानची आणि जपानींची आज जगभरात वेगळी प्रतिमा तयार झाली आहे. एवढं खास आहे तरी काय जपानी माणसांमध्ये? याचं रहस्य दडलंय त्यांना कळलेल्या इकिगाईमध्ये(IKIGAI). आहे तरी काय ही इकिगाई? इकिगाई म्हणजे काय असा प्रश्न कधीही स्वतःला विचारलेला नसतो, किंवा खरं तर हा शब्दच आपल्यापैकी अनेकांनी ऐकलेला नसतो.
 
तुमच्यापैकी किती जणांना सकाळी उठताना पुन्हा एकदा तेच रूटिन, तोच कंटाळवाणा दिवस अशी भावना येते? आता परत तेच काम, तोच बॉस, तेच शिक्षक, तेच ते रटाळ आयुष्य असं वाटतं? गजर झाल्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असते सांगा बरं? आपल्यापैकी अनेकजण अनेक गोष्टी करत असतात. काही आनंदाने, काही जण जबाबदारी म्हणून, काही जण गरज म्हणून तर काहीजण चक्क अंगावर पडलंय म्हणून एखादं काम करत असतात. अनेकजण आयुष्य संपत नाही म्हणून जगत असतात, तर काही जण समरसून त्याचा आनंद घेत असतात. काहीजण या प्रवासाचा आनंद घेतात, तर काही जण आपल्याला जिथे पोहोचायचंय त्याच्या ध्येयाने पछाडलेले असतात. काहीजण आपलं आरोग्य काटेकोरपणे जपतात तर काही जण जमेल तसं सांभाळतात. या सगळ्यातील सकारात्मक बाजूंचा परिपाक असणारी, आनंदी दीर्घायुष्य प्रदान करणारी व आयुष्याचं ध्येय ओळखायला शिकवणारी संकल्पना म्हणजे इकिगाई.
 
 
इकिगाई ही प्राचीन जपानी संकल्पना आहे. इकिगाई या संकल्पनेचा जन्म सातव्या ते अकराव्या शतकात झाला असं मानतात. जपानी परंपरेनुसार माणसाच्या मानसिक आरोग्याची कारक आणि जीवनाचं सापडलेलं ध्येय यामुळे सापडलेली आनंदाने जगण्याची कला व जगण्याचं कारण म्हणजे त्याला सापडलेली इकिगाई. इकिगाई म्हणजे जगण्याची सार्थकता. आयुष्यातील घडामोडी अनुभवणं आणि त्यामुळे सार्थक झाल्याची अनुभूती येणं यामुळे मनाला होणारा आनंद अशी मानसिकता म्हणजे इकिगाई. अनेक जपानींच्या मते इकिगाई हेच त्यांच्या जगण्याचं आणि आनंदी व निरोगी दीर्घायुष्याचं कारणं आहे. सध्या जगभरातील तरुणांमध्ये इकिगाई ही संकल्पना लोकप्रिय झाली आहे.
 
आपली इकिगाई कशी ओळखायची?
जपानींच्या मते आपल्या प्रत्येकाच्या आत एक इकिगाई दडलेली आहे. पण ही इकिगाई ओळखायची तरी कशी? इकिगाई आपण पुढील तीन टप्प्यांच्या आधारे ओळखू शकतो. यातला पहिला टप्पा म्हणजे खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधणं.
१. तुम्हाला काय आवडतं
२. तुम्हाला काय चांगल्या पद्धतीने करता येतं
३. जगाला आत्ता काय हवं आहे
४. तुम्हाला आत्ता कोणत्या गोष्टीचे पैसे मिळतात
 
दुसरा टप्पा म्हणजे आपली इकिगाई शोधणं. रोज सकाळी उठल्यावर तुमचा आदर्श दिवस कसा असेल, कसा व्यतित होईल याची कल्पना करा. तुम्ही कोणते कपडे घालणार आहात, कोणाकोणाशी बोलणार आहात. काय काय करणार आहात. या सगळ्याचा विचार करा आणि ती कल्पना लिहून काढा. या सगळ्याला वरच्या चार प्रश्नाच्या उत्तरांशी ताडून बघा. म्हणजे तुम्हाला काय आवडतं, काय चांगलं करता येतं, जगाला आत्ता काय हवंय आणि तुम्हाला कशाचे पैसे मिळतायत. ही उत्तरं शोधताना काही नकारात्मक विचार मनात आले तर येऊ द्या. ते येतीलच. पण हळुहळू आपण किती स्ट्राँग आहोत हे ही तुमच्या लक्षात येईल.
 
आता तिसरा टप्पा म्हणजे, आपली इकिगाई शोधण्यासाठी अभ्यास करा. दुसऱ्या टप्प्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या आदर्श दिवसाचं चित्र असेल. तुमचं व्हिजन आणि खऱ्या आयुष्यातील अपेक्षा यांचा शोध घ्यायला सुरूवात होईल. म्हणजे बघा हं. क्वचित तुम्हाला एखादा चांगला लेखक व्हायचं असेल आणि तुम्ही एखाद्या प्रकाशनात नोकरी करत असाल. हळुहळु तुमच्या लक्षात येऊ लागतं की लेखक होणं हे काही माझं ध्येय नाही. तुम्ही वरच्या दोन स्टेप्स पूर्ण केल्यात तर तुम्हाला तुमची इकिगाई शोधण्यास मदत होईल. कदाचित लेखक होणं ही तुमची इकिगाई नसेलच, ती काहीतरी भलतीच असेल. कदाचित आता तुम्ही जगाला काय हवंय आणि तुम्हाला पैसे कोण देतंय याचाच विचार करून आपली आवड मॉडिफाय केली असेल. आपली पॅशन हीच आपली आवड आहे असं गृहीत धरलं असेल. या तीन स्टेप्सनंतर तुम्ही सर्व शक्यतांचा विचार कराल आणि जीवनाचं ध्येय निश्चित कराल.
 
आपल्या इकिगाईला अनुसरून छोटी छोटी ध्येय निश्चित करा, त्याचा ऍक्शन प्लान तयार करा, एक सपोर्ट सिस्टिम जनरेट करा व त्या ऍक्शन प्लानप्रमाणे काम करण्यास सुरुवात करा. आता स्वतःला विचारा मी कशावर फोकस करतोय? जे मला आवडतंय त्याच्यावर की जे मी करायला हवं त्याच्यावर? याची उत्तरं तुम्हाला तुमची इकिगाई शोधण्यास मदत करतील. अंशकालीन उद्दिष्टं तुम्हाला इकिगाई शोधण्यास मदत करतील व त्याचा उपयोग तुम्ही दीर्घकालीन उद्दिष्टं पूर्ण करण्यासाठी करू शकाल.
 
आपल्या आयुष्याला योग्य वळण लावण्यासाठी पुढील दहा नियमांचं पालन करा असं इकिगाई तत्त्वज्ञान सांगतं. आहेत तरी काय हे नियम?
1.  कार्यरत रहा, निवृत्त होऊ नका
2.  जीवनाचा वेग कमी करा
3.  पोटभर खाऊ नका, ८० टक्के पोट भरेल इतकंच खा
4.  चांगल्या मित्रमंडळींच्या सहवासात रहा
5.  पुढील वाढदिवसापर्यंत योग्य शेपमध्ये या
6.  हसा
7.  स्वतःला निसर्गाशी जोडा
8.  तुमचा दिवस संस्मरणीय करणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे आभार माना
9.  प्रत्येक क्षण जगा
10.  तुमची इकिगाई शोधा
आयुष्यातली इकिगाई शोधणं तितकसं कठीण नाही. पण निरामय आरोग्यासाठी आणि आनंदी जीवनासाठी ते करणं आवश्यक आहे. सध्याच्या तणावपूर्ण जीवनात अशा संकल्पना नक्की ऊर्जा मिळवून देतील.
 
-  मृदुला राजवाडे