स्वतः ला काही सांगूया का?

युवा विवेक    04-Oct-2022
Total Views |

swatahlaa kahi sanguyaa ka?
 
 
 
 
स्वतः ला काही सांगूया का?
एक झाड... दोन हात
दोन झाडं... चार हात
थोडासा विचार करुया का
जगण्याला हिरवी झालर देऊया का?
 
जगणं बरच कृत्रिम झालंय
थोडं सजीव करुया का ?
छोटंसं बी छोट्या हातांवर ठेवूया का ?
संस्कार थोडे रुजवाईचे मनात काही पेरुया का ?
इवल बीज रुजेल मातीत..
उगवून येईल,फुलेल फळेल
सावली धरेल माथ्यावरती..
 
होईल पानगळ.. होऊदे...
गळतील फुले.. गळू देत
धरतील फळे.. धरुदेत
अर्धे कच्चे.. तोडेल कोणी.. तोडू देत
उरली सुरली पिकतील छान..
उष्टावतील बिया
पडतील खाली..
रुजतील पुन्हा ..
प्रवास होईल सुरू नवा..
कृत्रिम थोडे सोडून देऊन
 
श्वास मोकळा घेऊया का?
कुंडीत बोन्साय ठीकच आहे
वड पिंपळही लावुया का ?
बेगड चढल्याअंगावरचा एक मुलामा ओढूया का श्वास मोकळा करुन थोडा भणान वारा होऊया का ?
 
अमिता पेठे पैठणकर