गंगा जमुना डोळ्यात उभ्या का?

युवा विवेक    05-Oct-2022
Total Views |

gangaa jamunaa dolyat ubhya kaa?
 
 
 
गंगा जमुना डोळ्यात उभ्या का?
आसवांनो…
का माहीत नाही पण झालंय खरं असं; तुम्ही हल्ली वहायला तयारच असता. पापणकाठी आणि तुम्हाला वहायला काही कारण पाहिजेच असतं असंही नाही. काय झालंय काय नक्की? माहितेय का तुम्हाला? कधी नुसतं अगदी मोकळ्या मनाने जरी बसलेले असले तरी डोळ्यांचा उंबरठा ओलांडून तुम्ही कधी बाहेर पडाल याचा नेम नसतो. काही काही जणांना आयुष्यातल्या एका टप्प्यावर होतं असतं असं म्हणे. असो…या 'का'चा जास्त विचार करायला नको. प्रत्येकवेळी त्याचं उत्तर मिळतंच असं नाही.
 
हल्ली या दोन वर्षात तर असं झालंय की, तुम्हाला डोळ्यात उभं रहायला कारणंच कारणं मिळताहेत. पेपरवरुन नजर फिरवता फिरवता समोरची अक्षरं कधी पुसट होतात कळतही नाही किंवा टीव्हीवर चॅनेल बदलायला जेवढा वेळ लागतो, तेवढा वेळही तुम्हाला डोळ्यात हजर व्हायला लागत नाही. डोळ्यांच्या अटकेत रहायला नको वाटतंय की काय आता तुम्हाला? त्यामुळं आता मीच पेपर वगैरे वाचणं टाळायला लागले आहे. अर्थात ही टाळता येणारी गोष्ट आहे. पण न टाळता येणाऱ्या कितीतरी गोष्टी आजूबाजूला घडत असतातच की. तेव्हा काय करणार? कसं अडवणार तुम्हाला? तरी तुमच्यावर परत कंट्रोल ठेवायला शिकतेय हळूहळू. पण असं काही कधी दृष्टीस पडलं तर कधी कधी मेंदूकडून तुम्हाला थांबवायची ऑर्डर जाईपर्यंत तुम्ही गालांवरुन पुढंही गेलेले असता. तुम्ही आणि मनानं काय संगनमत केलेलं आहे की काय? हल्ली त्या मनाचं तर काहीच कळत नाही मला. कसं विचित्र वागतंय बघताय ना तुम्ही? इकडून तिकडे इतक्या टणाटण उड्या मारत असतं की, त्याला सांभाळणं कठीण होऊन बसतं. आत्ता चेहऱ्यावर हसू आहे म्हणेपर्यंत डोळ्यातून तुम्हाला बरसायला लावतं आणि तुम्ही पण त्याच्या कह्यातच की नाही. जरा कधीतरी मनाला समजावता येतंय का बघा ना तुम्ही. लगेच काय त्याचं ऐकून वहायला लागायचं! मला माहितेय हे सगळं लिहितेय ते कळतंय मनाला. निदान त्यामुळं तरी सुधारतंय का बघू.
 
पण एक सांगू का? मला जेव्हा कधी एकटं एकटं वाटायला लागतं तेव्हा मात्र तुम्ही कधीतरी माझ्या सोबतीला येता. न बोलावताही तुम्ही लगेच समोर हजर असता. किती आधार वाटतो तेव्हा तुमचा! मनाला एकटं नसल्याचा जरा दिलासा मिळतो त्यामुळं. मनात काय असेल ते तुमच्यावाटे वाहून गेलं तर हलकंही वाटायला लागतं कधी कधी. कधी कधी म्हणतेय कारण मनातलं सगळंच काही नेहमी पूर्णपणे वाहून जात नाही ना! काही गोष्टी विसरायच्या म्हटल्या तरी विसरता येत नाहीत. मग नुसतेच कोरडे अश्रू बाहेर पडत राहतात. मनातला सल मनातच राहतो आणि याला उपाय काय करावा ते ही सुचत नाही. असो…हा 'असो' शब्द जेवढा तुटक आहे तेवढं तुटक, अलिप्त व्हायला जमायला हवं बहुतेक.
 
तुम्हाला आठवतंय का? पूर्वी माझा पूर्ण ताबा असायचा तुमच्यावर. तुम्हाला डोळ्याबाहेर पडू द्यायचं नाही असं जर मी ठरवलेलं असलं तर अज्जिबात पडू द्यायचे नाही. लग्नाआधी नवरा बऱ्याचदा चिडवायचा की, 'काय रडणे प्रोग्रॅम सुरु झाला की नाही?' तेव्हा निश्चय केला होता लग्नानंतर माहेरच्यांचा निरोप घेताना अजिबात रडायचं नाही आणि त्याप्रमाणे मनातून कितीही वाटलं तरी रडले नव्हतेही. बहुतेक आईनेही तसाच निश्चय केला होता. पण आज २१ वर्षांपूर्वीच्या त्या आठवणीने देखील डोळ्यात पाणी येतं. पूर्वीचा माझा वचक आता कमी झाला का? की तुम्ही जास्त मोंड झाला आहात?
 
मला वाटतंय थोडे दिवस होईल असं. मग तुम्ही तरी वहायला कंटाळून जाल किंवा मी तरी सगळ्याचा अलिप्ततेने विचार करायला लागलेली असेन. हसताय काय! पण खरंय…सगळंच मनावर अवलंबून. मला आठवतंय एकदा तुम्ही किती एक्साईट होऊन आनंदाने बाहेर पडला होतात. तेव्हाही आपण दोघंच होतो सोबत. तुमचाच हात धरुन नाचावंस वाटत होतं तेव्हा. त्या दिवशीसारखेच तुम्ही कायम माझ्या सोबत येणार असलात तर माझी बिलकुल आडकाठी नाहीये तुम्हाला. पण बाकी काही कारणं नकोत.
 
हे सगळं वाचून तुम्हाला वाटेल कदाचित काय पत्र लिहीत बसलेय ही! पत्र पोहोचणार नाहीये हे पक्कं माहितेय मला. पण मोकळं व्हायचं एक साधन मिळालंय मला हे आणि त्यातून आनंदही मिळतोय मला. म्हणून हा सगळा घाट घातलाय. बाकी पत्र एका बैठकीत लिहून झाली होती, पण तुम्हाला लिहिताना मात्र तुम्हीच अधेमधे डोकावून डिस्टर्ब करत होतात. काय लिहितेय वाचायची एवढी घाई झाली होती का? बरं.. आता बास करते लिखाण. मला भेटणाऱ्या प्रत्येकाने निरोप घेताना आनंदाने बाहेर पडावं असं वाटत असतं मला. तसंच तुम्हीही कायम आनंदानेच बाहेर पडा एवढीच छोटीशी अपेक्षा. बास बाकी काही नाही.
 
जस्मिन जोगळेकर.