तेजोमय!

युवा विवेक    01-Nov-2022
Total Views |

tejomay!
 
 
तेजोमय!
नाजुक स्वप्ने सुरेख रेखून
रंगांनी सजते,
रांगोळी ही मनांनातील
मने गुंफीत जाते.
रंग सुरेख तिच्यात भरुनी,
पुन्हा पुन्हा पहावे,
आपण ओढल्या रेषाना पाहून
आपणच हरखावे.
नक्षीदार मोर त्यातला
हिरवट पंखाचा,
राघू पोपटी नि गुलाब
लालवट रंगाचा.
नाजुक स्वप्ने सुरेख रेखली
नाजुक बोटांनी,
तेजाळलेले अंगण हसले
गुलाबी ओठांनी
रंग मनीचे उतरून खाली
धरा अशी सजते,
रांगोळी ही मना मनातली
मने गुंफीत जाते...
शेणाने सारवलेले हिरवेगार अंगण, अंगणाच्या मधोमध उभे वृंदावन, चारी बाजूने सोडलेल्या दिव्यांच्या देवळ्या, त्यात मंद तेवणाऱ्या पणत्या आणि पहाटसमयी अभ्यंगानंतर घरच्या लेकिबाळींनी ओसरी, ओटा,अंगणाच्या चौफेर तेज्याचे दिवे ओळीने मांडावेत त्यात त्यांचे चेहरेही कनक भारल्या तेजाने उजळून जावेत.. अंधाराचा माग घेत तेजाचे राज्य प्रस्थापित व्हावे..
सर्वदूर अनंतापर्यंत प्रकाशमय व्हावे..
पहाट समयी एक सुंदर दृश्य नजरेत तरळून जावे...!
नाजुक बोटांनी शेणाने शिंपलेल्या अंगणात सुंदर थेंबांची रांगोळी कुणी काढावी. थेंब थेंब ठेवताना चिमटीतनं तिच्या मायही पाझरवी. या मायावी स्पर्शानं थेंबांनी ही मोहरून जावं, तिच्या नाजूक बोटातून निसटताना खळखळून हसावं. थेंबना थेंब जोडताना तिच्या श्वासाचा मंद ताल त्यांना ही कळवा आणि त्या तालावर थेंबानीही अंगणभर फेर धरावा.
काळेशार तेजस्वी डोळे तिचे निरखून थेंबांकडे पाहताना, थेंबानाही हायस वाटावं, नी त्यांनीही एकमेकात कुजबुजावं ,काय सुरेख आहेत नाही तिच्या डोळ्यावरच्या रेखीव कमानी! तिचं मात्र मुळीच लक्ष नसावं यांच्याकडे, ती गुंतलेली असावी थेंबना एकमेकाशी जोडण्यात,थेंबानी मात्र चंग बांधावा तिचं सौन्दर्य डोळ्यात साठवण्याचा.
रेषा रेषा जोडून पानं फुलं काढताना तिच्या केसांची चुळबुळ वाऱ्याच्या झुळुके सरशी होत राहावी तिने पुन्हा पुन्हा त्यांना सावरण्याचा लटका अट्टहास करावा, हटवादीपणे त्यांचा छळत रहावं.
तिचं त्यांच्याकडेही दुर्लक्ष करून पुन्हा रांगोळी काढण्यात दंग रहावं.....
असं काहीसं सुखद पहाटेच डोळ्यासमोरून तरळून जावं..
बस इतकचं!
दिपावली, दीपोत्सवाची हार्दिक शुभेच्छा!
 
 
- अमिता पेठे पैठणकर.