बटर चिकन

युवा विवेक    10-Nov-2022
Total Views |

butter chikan
 
 
बटर चिकन
या जगात तीन प्रकारचे लोक आहेत. बटर चिकन आवडणारे, बटर चिकनला उगाच डोक्यावर चढवलंय या मताचे आणि बटर चिकन कधीही न खाल्लेले. मी तिसऱ्या प्रकारात मोडते आणि पहिल्या दोन प्रकारात मोडणाऱ्या लोकांचे वाद जवळून पाहिले आहेत. शाकाहारी लोकांना जे पनीर बटर मसाल्याबद्दल वाटतं तसंच काहीसं बटर चिकन आहे फक्त भावना जरा तीव्र! बटर चिकन करणं म्हणजे "परफेक्ट चव जमली पाहिजे नाहीतर ते गोड, आंबट, पांचट होतं आणि पाप लागतं." असं माझी एक मैत्रीण म्हणायची. पंजाब्यांनी बटर चिकनलाही ग्लॅमर मिळवून दिलंय (कमाल आहे या लोकांची, सगळे पदार्थ सुपरहिट!) बटर चिकनला मुर्ग मखनी पण म्हणतात पण ते दाल मखनी सारखं वाटतं.
 
हा पदार्थही पंजाबी लोकांचा आणि अजून एक सांगू, ज्यांनी तंदुरी चिकन केलं त्यांनीच बटर चिकन पहिल्यांदा केलं. हो, तेच ते कुंदन लाल गुजराल! (अधिक माहितीसाठी तंदुरी चिकनचा लेख वाचा) फाळणीनंतर चविष्ट रेसिपीज मेंदूत सेव्ह करून पेशावरमधून भारतात आले आणि दिल्लीत 'मोती महल' नावाचे रेस्टारंट सुरु केले. बटर चिकनची कल्पना त्यांना तंदुरी चिकनमुळेच सुचली. तंदुरी चिकन कधीकधी विकले जायचे नाही आणि बऱ्याचदा कोरडे पडायचे. त्याची चव लोकांना आवडायची नाही. त्यावर उपाय म्हणून गुजराल यांनी त्या चिकनचे तुकडे करून ग्रेव्हीत टाकले आणि बटर चिकनचा जन्म झाला. पंजाबी लोकांची ग्रेव्ही असल्याने त्यात भरपूर लोणी, क्रीम वगैरे होते. मोतीमहल मध्ये जितके तंदुरी चिकन प्रसिद्ध आहे तितकेच बटर चिकन किंबहुना थोडे जास्त. कारण या गोडसर, क्रिमी तरीही तिखट आणि मसाले यांचे योग्य मिश्रण असलेले बटर चिकन सगळीकडे मिळत नाही. काही ठिकाणी अति गोड तर काही ठिकाणी अती मसालेदार मिळते. हाच प्रॉब्लेम पनीर बटर मसाल्याचा पण आहे पण त्याला फार कोणी भाव देत नाही. आम्ही शाकाहारी लोक मुकाट्याने एक पनीर बटर मसाला आणि एक व्हेज कोल्हापुरी मागवतो. खूप गोड असले तर व्हेज कोल्हापुरीचा तिखटपणा बॅलन्स होतो! असो.
 
या पदार्थात चिकन मसाले आणि दह्यात मॅरीनेट केले जाते. २-३ तास फ्रिजमध्ये ठेवल्यास चांगली चव येते. मॅरीनेट केलेले चिकन तंदूर किंवा ओव्हनमध्ये भाजले जाते. त्यानंतर बटर लावून परत रोस्ट केले जाते. बटरची फोडणी असलेल्या ग्रेव्हीत हे चिकन काही वेळ शिजवतात आणि सर्व्ह करतात. ग्रेव्हीत जास्त तिखट नसते पण सगळ्या मसाल्यांची चव असते, विशेषतः विलायची. शेवटी यात थोडी साखर किंवा मध टाकतात. कसुरी मेथी आणि क्रीमचे गार्निश करतात. बटर चिकन बिर्याणी, भात, नान, रोटी असं कशासोबतही खाता येते. भरपूर प्रोटीन आणि फॅट असलेला हा पदार्थ किटो डायटमध्येही सामावला जाऊ शकतो, साखर फक्त कमी असावी किंवा नसावी. भारतीय पदार्थ खूप मसालेदार आणि तिखट असतात असं पाश्चात्य लोकांना वाटतं पण बटर चिकन याला थोडा अपवाद आहे. हा पदार्थ खाताना पाश्चात्य लोकांच्याही डोळ्यातून पाणी येत नाही आणि म्हणून त्यांना आपलासा वाटतो. बटर चिकनचे आता पिझ्झा वगैरेही येतात, फ्रँकी तर आहेच पण हा पदार्थ तंदुरी नान सोबत जास्त चांगला लागतो. चांगली बिर्याणी तर बऱ्याच ठिकाणी मिळते पण चांगले बटर चिकन मिळणारे रेस्टारंट शोधणे कठीण! आपल्या बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडलाही "मखना" म्हणणारे हे पंजाबी लोक, वरवर कठोर वाटत असले तरी मनाने लोण्याहून मऊ. हे सगळे गन त्यांच्या पदार्थातही सापडतात या केवळ योगायोग नसावा, नाही का?
 
 
 - सावनी