सॉफ्ट स्किल्सच्या युगात

युवा विवेक    11-Nov-2022
Total Views |

soft skills
 
 
 
सॉफ्ट स्किल्सच्या युगात
मॅट्रिक झालं की, कोणत्याही चांगल्या सरकारी कार्यालयात, बँकांमध्ये, कंपन्यांमध्ये नोकरी लागण्याचा पूर्वी एक काळ होता. म्हणजे पदवी, पदव्युत्तर उच्चशिक्षण घेऊन प्राध्यापक, वकील, डॉक्टर, अभियंते होणारेही लोक होते, पण त्याचं प्रमाण मर्यादित होतं. त्यानंतरचा टप्पा आला तो किमान ग्रॅज्युएट असण्याचा. त्यानंतर अजून पुढचा टप्पा होता तो पोस्ट ग्रॅज्युएट किंवा एखादे अपारंपरिक पण प्रोफेशन बेस्ड शिक्षण घेण्याचा. सध्याचं युग मात्र केवळ शिक्षणावर अवलंबून असणारं नाही. ते आहे सॉफ्ट स्किलचं जग. तुमचं शिक्षण, प्रोफेशनल शिक्षण, त्याचा कामातील उपयोग यात तुम्ही किती निपुण आहात यासह तुम्ही सॉफ्ट स्किलमध्ये कितपत तयार आहात हे देखील मुलाखतीच्या वेळी पाहिलं जातं. आज अनेक संस्था, प्रशिक्षक सॉफ्ट स्किलचं प्रशिक्षण देत आहेत.
 
सध्याचा काळ हा प्रेझेंटेशनचा आहे. तुमचं काम हे फक्त कागद पेन किंवा केवळ तुमचा डेस्क टॉपच्या चौकटीत सामावलेलं, खाली मान घालून करण्याचं काम उरलेलं नाही. देशांतर्गत कंपन्यांसह अनेक परदेशी कंपन्याही भारतीय उमेदवारांना रोजगार देत असतात. वेगवेगळी प्रेझेंटेशन, कम्युनिकेशन, रिलेशनशिप मेंटेनन्स, ऑनलाईन ऑफलाईन मीटिंग्स अशा वेगवेगळ्या आयामांचा समावेश आज जवळपास प्रत्येकाच्या कामात होतो. त्यामुळे एखादी कंपनी जॉईन करताना तुमचे शिक्षण, जनरल व्यक्तिमत्त्व या पलिकडे जाऊन तुमच्यातील अनेक सॉफ्ट स्कील्सही पाहिली जातात. प्रत्येक उमेदवाराकडे हार्ड स्कील म्हणजे जे त्याचे काम आहे त्यासंबंधीचे शिक्षण असणे आवश्यक असतंच, ते अपेक्षितच असतं. (हार्ड स्कील हा शब्द तंत्रज्ञानातील शिक्षणाशी संबंधित असला तरी तो आता त्याचा अर्थ थोडा विस्तारला असून तो जनरल शैक्षणिक स्कील्स या अर्थानेच वापरला जातो.) पण या पलिकडे जाऊन आता प्रत्येक उमेदवाराची सॉफ्ट स्कीलही महत्त्वाची ठरतात.
 
१. कम्युनिकेशन स्कील्स अर्थात संवाद साधण्याची कला – तुम्ही कशा पद्धतीने समोरच्याशी संवाद साधता ते पाहिले जाते. यात बोलणं आणि ऐकणं या दोन्हीचा अंतर्भाव होतो. समोरच्याचे ऐकून घेता का, त्याचप्रमाणे तुमचा मुद्दा तुम्हाला नीट आणि सुस्पष्ट मांडता येतो का हेही पाहिले जाते. तुमचा बोलण्याचा वेग, आवाजाची पट्टी हे सर्व यात पाहिलं जातं.
 
 
२. क्रिएटिव्ह थिंकिंग – तुमच्या कामात तुम्ही किती कल्पकता दाखवता ते ही महत्त्वाचं असतं. हल्ली बऱ्याच ऑफिसेसमध्ये पीपीटीज त्याचप्रमाणे व्हिडिओजचा आधार घेऊन विषयाची मांडणी केली जाते. विशेषतः मार्केटिंग क्षेत्रात क्रिएटिव्ह थिंकिंगला अधिक महत्त्व आहे. एखादा विषय तुम्ही किती कल्पकपणे मांडू शकता, आलेल्या मेल्सना किती क्रिएटिव्हली उत्तर देऊ शकता हे यात पाहिलं जातं. ऑफिसेसमध्ये चाकोरीबाहेर विचार करणाऱ्याकडे कायमच आदराने पाहिलं जातं.
 
 
३. टीम वर्क – एक कार्यालय म्हणजे अनेक जणांची आवळ्याची मोट. वेगवेगळ्या पदांवर काम करणारी वेगवेगळ्या मानसिकतेची, स्वभावाची, शैक्षणिक विविधता असणारी माणसं प्रत्येक कार्यालयात असतात. अशा वेळी एका टीमचा भाग म्हणून तुमची वर्तणूक कशी आहे ते पाहिलं जातं. हे टीमवर्क ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही स्वरुपाचं असू शकतं किंवा तुम्ही टीम लीडर असाल तर तुम्ही तिचे नेतृत्व कसे करता हे देखील महत्त्वाचं असतं.
 
 
४. डिसिजन मेंकिंग अर्थात निर्णयक्षमता – एखाद्या बाबतीत तुम्ही कसा व किती वेळात निर्णय घेता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. या निर्णयापूर्वी तुम्ही सारासार विचार केला आहे का किंवा तुम्हाला निर्णय घेताच येत नाही का किंवा त्यासाठी तुम्ही दुसऱ्या कोणावर अवलंबून आहात हे पाहिलं जातं. 
 
 
५. नेतृत्वक्षमता – तुम्ही आपल्या विभागाचं किंवा आपल्या हाताखालील टीमचं कसं नेतृत्व करता, कशा पद्धतीने त्यांच्याकडून कामं करून घेता वा त्यांच्यासोबत कसं काम करता, त्यांना कशी वागणूक देता हे नेतृत्वक्षमता या स्कीलमध्ये पाहिलं जातं. अनेकदा काहीजण आपल्या कामात तरबेज असतात पण त्यांना हाताखालील माणसाकडून काम करून घेता येत नाही. तर काही जण अत्यंत कुशलपणे ते साधतात. तुम्ही तुमच्या टीमला इतरांसमोर कसे रिप्रेझेंट करता हेदेखील यात पाहिलं जातं.
 
 
६. वर्क एथिक्स – आपलं काम करताना काय करायचं आणि काय करायचं नाही, नैतिक काय आणि अनैतिक काय याची जाण व त्याप्रमाणे होणारी वर्तणूक म्हणजे वर्क एथिक्स. तुम्ही स्वयंस्फूर्तीने काम करता का, त्यात तुमचं नैपुण्य आहे का, तुमच्या डोळ्यासमोर काम करताना व्हिजन आहे का हे सारं वर्क एथिक्समध्ये पाहिलं जातं. हेल्दी स्पर्धादेखील या वर्क एथिक्सचाच एक भाग आहे. 
 
 
७. वेळेचे नियोजन – कामांच्या बाबतीत वेळेचं नियोजन फार महत्त्वाचं असतं. एखादं काम नीट करूनही वेळेत पूर्ण झालं नाही तर त्याला काही अर्थ नाही. विशेषतः प्रसारमाध्यमांत तर मिनिटा मिनिटाला फार महत्त्व असतं. त्यामुळे योग्य वेळेत किती व्यवस्थित काम तुम्ही करू शकता, किंवा एखाद्या गोष्टीला किती वेळ द्यावा याचं भान तुम्हाला आहे का हे वेळेचे नियोजन या स्कीलमध्ये पाहिलं जातं. 
 
 
८. चिकित्सकपणे विचार करण्याची क्षमता – कार्यालयात विविध महत्त्वपूर्ण विषयांवर तथ्ये, चर्चा, विश्लेषण याच्या आधारे तुम्ही चिकित्सक पद्धतीने विचार करू शकता का हे ही महत्त्वाचं असतं. विशेषतः कंपनीच्या वा कार्यालयाच्या धोरणात्मक निर्णयात याला फार महत्त्व असतं.
 
 
९. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अर्थात प्रश्नावर तोडगा काढण्याची क्षमता – तुम्ही एखाद्या प्रश्नात गुंतून पडता की त्याबाबत निर्णय घेता हे कंपनीच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं.
 
यांसह स्ट्रॅटेजिकल थिंकिंग किंवा धोरणात्मक विचार करण्याची क्षमता, इमोशनल इंटलिजन्स, लवचिकता, संशोधन करण्याची वृत्ती, तार्किक विचार करण्याची क्षमता, ग्रहणक्षमता, हलकाफुलका स्वभाव ही सॉफ्टस्किलही तितकीच महत्त्वाची आहेत. यासह तुमचा पेहराव, ते वागवण्याची पद्धत, आपल्याला काय शोभतं काय नाही याची जाण, कुठे काय परिधान करावं याचं भान या सगळ्या गोष्टीही स्किलच आहेत की. थोडा बारकाईने विचार केला तर आपल्या लक्षात येतं की ही सॉफ्ट स्किल केवळ कामाच्या ठिकाणी नव्हे तर कौटुंबिक आणि सार्वजनिक जीवनातही अत्यंत महत्त्वाची आहेत. महाविद्यालयीन जीवनापासूनच आपण या सॉफ्ट स्किलचा सकारात्मकतेने विचार केला तर त्याचा भविष्यात नक्कीच उपयोग होऊ शकतो.
 
 
- मृदुला राजवाडे