भवितव्य मराठी सिनेमाचे

युवा विवेक    14-Nov-2022
Total Views |

marathi cinema
 
 
 
 

भवितव्य मराठी सिनेमाचे

काही वर्षांपूर्वी मराठी चित्रपट वाहिन्यांवर TRP वाढवण्यासाठीचे प्रयत्न म्हणून एक फंडा वापरण्यात आला होता. ओशन ११, ग्लेडियेटर सारखे गाजलेले हॉलिवूडपट मराठीत डब करून दाखवण्याची टूम निघाली होती. पण लवकरच तो प्रकार बंद पडला. कारण अशा हॉलिवूडपटांची चटक मराठी प्रेक्षकांना लागली आणि त्यांचा ओढा हॉलीवूडपट पाहण्याकडे वाढला तर मराठी सिनेमांना सुद्धा स्वत:ची निर्मितीमुल्ये त्या दर्जाची करावी लागली असती किंवा प्रेक्षक विभक्त होण्याची शक्यता वाढली असती.

 

कोणत्याही परिस्थितीत हे मराठी चित्रपटसृष्टीच्या मुळावर उठण्यासारखं होतं. ही भीती अनाठायी नव्हती हे कोरोनाच्या संसर्गकाळात दिसून आले. मधल्या काळात डेटापॅक फ्री झाल्याने आणि OTT चे मार्केट वाढल्याने भारतीय प्रेक्षक जगभरातील विविध भाषांतील चित्रपट आणि वेबसिरीकडे ओढला गेला. त्याच त्या साचेबद्ध हिंदी सिनेमाला पाहून बहुतांश प्रेक्षक दाक्षिणात्य सिनेमाकडे ओढले गेले. या सर्वात गाफील राहिलेल्या हिंदी सिनेमाला ताज्या दमाच्या दाक्षिणात्य अभिनेत्यांनी इतके जेरीस आणले की, "बॉयकॉट बॉलिवूड" सारखी चळवळ मुळ धरू लागली.

 

बॉलिवूडला वेळीच शहाणपण सुचल्याने मोठं मोठ्या बॅनरचे बिग बजेट सिनेमे धडाधड बॉक्स ऑफिसवर आपटले. खरतर मराठी सिनेमांची अवस्था ह्या काळात त्याहून बिकट होती कारण महाराष्ट्राच्या सीमावर्ती प्रांतात दाक्षिणात्य सिनेमाने फार पूर्वीपासूनच पाय रोवण्यस सुरुवात केली होती. आर्या, मगधिरा, बोमरील्लू, हॅपी डेजने कोल्हापूर, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर भागात चांगला व्यवसाय केला होता. मराठवाडा भागात दीर्घकाळ निजामाचा अंमल राहिलेला असल्याने सांस्कृतिक आणि भाषिक तेलगू संस्कृती ही स्थानिक मराठीजणांना परकी वाटत नाहीस्वत:च्या हक्काच्या राज्यात हॉलिवूड, बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अशा तिहेरी आक्रमणात मराठी सिनेमा फसलाह्या साऱ्यातून मार्ग काढला नाही तर मराठी सिनेमाचे भवितव्य अधांतरी राहील.

 

मराठी सिनेमापुढचा यक्षप्रश्न म्हणजे "स्वत:चा प्रेक्षकवर्ग ओळखता येणं." सध्या गाजत असलेल्या मसालापटांची कॉपी करत ट्रेण्ड नुसार रहावे की, स्वत:चा परंपरागत प्रेक्षकवर्ग डोळ्यासमोर ठेवून तेच ते सिनेमे द्यावे? दोन्हीकडून देखिल व्यावसायिक धोके आहे कारण हिंदी किंवा दाक्षिणात्य सिनेमाप्रमाणे प्रचंड आर्थिक खर्चाची क्षमता आणि तेवढीच मजबूत वितरण प्रणाली मराठी सिनेमाकडे अद्याप नाहीयेस्वत:च्याच राज्यात स्क्रीन मिळावे म्हणून आटापिटा करावा लागत आहेत्याहून वाईट म्हणजे मराठी चित्रपटकर्ते दाखवत असलेले विषयाचं कल्पनादारिद्र्य! मणिरत्नम सारखा दिग्दर्शक चोळ साम्राज्यावर भव्यदिव्य सिनेमा काढतो पण मराठी सिनेसृष्टीला कधी राष्ट्रकूट, सातवाहन, शिलाहार ह्यांचा इतिहास दाखवावासा वाटला नाही. ३० वर्षापूर्वी बॉम्बे, रोझा सारख्या चित्रपटातून मुंबईतल्या दंगली किंवा काश्मीरमधील दहशतवाद असे विषय हाताळणाऱ्या मणिरत्नम सारख्या दिग्दर्शकाच्या बरोबरीने किमान विषय सुचणारे कलावंत आपल्याकडे नसावे ही शोकांतिका आहेमहाराष्ट्राच्या राजधानीवर झालेल्या २६/११ हल्ल्यावर हिंदी सिनेमे निघतात, पण मराठी भाषिकांची राजधानी असून मराठी कलावंतांनी अपवाद वगळता हा विषय कधी हाताळला आहे ?
 

इतिहासपट आणि तमाशापट ह्यावर शेकडो मराठी सिनेमे तयार होत असताना आज एकविसाव्या शतकात सुद्धा मराठी चित्रपटनिर्माते नटरंग, चंद्रा सारखे तमाशापट किंवा शिवकालीन कथानकाकडे धाव घेत आहेतमराठी कलावंतांनी आपलं प्रभावक्षेत्र देखील कमी करून ठेवले आहे. आपल्या पूर्वजांनी अटकेपार झेंडे लावले हे ऐकायलाच चांगलं वाटतं कारण ग्वाल्हेर, इंदोर, बडोदा, तंजावर ... इथला मराठी समुदाय डोळ्यासमोर ठेवून किती वेळा चित्रपटनिर्मिती झाली. तेही फार लांबच पण वर्धा, उस्मानाबाद, गडचिरोली, परभणी, गोंदिया... ह्यांच्या पार्श्वभूमिवर कथा असलेल्या किती कलाकृती तयार झाल्या?सलमान/आमिर वैगेरे स्टार लोकांनी स्वतःच स्टारडम रुजवताना अनेक वेशभूषा, केशभूषा लोकप्रिय केल्या. असं किती मराठी अभिनेत्यांना फॉलो केलं गेलं आहेकिती मराठी चित्रपट आपल्या तडाखेबंद संवादामुळे ओळखले गेलेमहाराष्ट्रात वर्षाला शेकडो इंजिनियर - डॉक्टर तयार होतात. हा वर्ग इंटरस्टेलर, इन्सेप्शन, सारखे चित्रपटपण पाहतो. आपला प्रेक्षकपण "सुबुद्ध" आहे ही भावना कधी रुजणार? चित्रपट पाहणारा मुख्य वयोगट कॉलेजवयीन असतो त्याला आजवर किती ध्यानात घेतल गेलंतेच ते कलावंत नाटक, वेबसिरिज, डेली सोप, चित्रपटमधून सामोरे येत असेल तर त्यांची फेसव्हॅल्यू किती राहील ? मराठीतले आघाडीचे कलावंत सुद्धा डेलीसोपमध्ये दिसतात मग तेच पुन्हा इतरत्र का पहावे?  डॉ. अमोल कोल्हेंंना छोट्या पडद्यावर शिवराय म्हणून बघितल्यावर ३०० - ४०० रुपये खर्चून तेच शिवकालाच माहिती असलेलं कथानक बघायला मल्टिप्लेक्समध्ये प्रेक्षकांनी का म्हणून जावे?

 

हिंदी अथवा तमिळ कोणत्याही भारतीय सिनेमाचं वैशिष्टय म्हणजे त्यातील गाणी! मराठीमध्ये मागणी तसा पुरवठा प्रकारच नाहीये. अजय - अतुल लोकप्रिय झाले कारण बेधुंद नाचायला मराठीत गाणी कमी आहे हे दुर्भिक्ष्य ओळखून त्यांनी गाणी रचली..ते इतरांना का जमू नये.? आणखी किती वर्षे आघाडीचे गायक तीच तीच गाणी गाणार आहेत.? शाहरुखने अमुक सिनेमासाठी केलेले सिक्स पॅक किंवा आमिरने वेषांतर करून केलेली भटकंती असे अनेक प्रमोशनचे फंडे चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढवतात. वयाच्या त्या टप्प्यावर यशस्वी झाल्यानंतर सुध्दा थकता काहीतरी नविन करण्याची उत्सुकता दाखवतात तर आपल्या मराठी स्टार्सना कशाचा कंटाळा आहे?

 

हॉलिवूड / बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमे असे आहेत की, फार कमी बजेटमध्ये झाले आहेत पण विषय वेगळा म्हणून त्यांची गणना क्लासिकमध्ये होते. आज मराठी मालिका जेवढ्या निर्मितीमूल्याच्या आहेत तसा सिनेमा पण तेवढ्याच निर्मितीमूल्याचा आहे. तेच अभिनेते, तेच कौटुंबिकपट किंवा प्रेमकथा पुन्हा पुन्हा पैसे खर्चून कोण पाहणार? मग इतर भाषिकांशी तुलना करायची की, स्वत:चं स्वतंत्र आस्तित्व ठेवत केवळ फेस्टीव्हलसाठी आशयघन सिनेमे करत उत्पन्न विसरायचं हे ठरवाव लागेल.
 

गेल्या अनेक वर्षात खान मंडळी आणि पंजाबी हिरोंचे प्राबल्य सिनेसृष्टीवर राहील आहे. तमिळ - तेलगूमधला अभिनेता हिंदीत गेला तरी तो मुख्य भुमिका करतो. मराठीत हे किती जणांना जमल आहेहिंदी सिनेमात दुय्यम भुमिका करू लागल्याने किंवा हिंदी रिऍलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून उभं राहिल्याने त्यांच्या स्टारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित होणारच.

 

महेश बाबू, प्रभास, रामचरण... अशा अनेकांपैकी किती जणांनी स्वत;चं अवमूल्यन केलेलं आजवर दिसल आहे(मान्य आहे. ....हे क्षेत्र स्पर्धेचे आणि पैशाच आहे..!! पण वारंवार दुय्यम विनोदी किंवा नोकरांच्या भुमिका टाळणे शक्य नाही का?) असे अनेक मुद्दे आहेत ज्यावर तोडगा निघत नाही तोवर दुर्दैवाने मराठी सिनेमाचे भवितव्य अधांतरीच असेल.

 

- सौरभ रत्नपारखी