धमन्यांतल्या रुधिरास या खल भेदण्याची आस दे

युवा विवेक    18-Nov-2022
Total Views |

dhamanyaatalyaa rudhiraas yaa khal bhedanyaachee aasa de
 
 
 
 

धमन्यांतल्या रुधिरास या खल भेदण्याची आस दे

 

या आठवड्याची सुरुवातच झाली तीच मुळात एका हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने. दिल्लीत राहणाऱ्या श्रद्धा वालेकर हिचा तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब पूनावालाने केलेला खून आणि त्यानंतर मृतदेहाची अत्यंत कोल्ड ब्लडेड पद्धतीने लावलेली वासलात, याचे तपशील समोर आले आणि संपूर्ण देश अक्षरशः ढवळून निघाला. माणसाच्या क्रूरपणाचं एक वेगळंच, ज्याला खरं तर सायकोपॅथ म्हणता येईल असं भयानक उदाहरण आपण पाहिलं. या घटनेची माहिती आणि त्यावर घडणाऱ्या चर्चा यात समाज गुंतलेला असतानाच महाराष्ट्रात एका मुलीने रिक्षावाल्याच्या अश्लील वर्तणुकीच्या भीतीने धावत्या रिक्षातून उडी मारली. त्याच दिवशी उत्तर प्रदेशात निधी गुप्ता हिला धर्मांतरास नकार दिला म्हणून एका मुस्लीम युवकाने चौथ्या मजल्यावरून ढकलून दिलं आणि त्यात तिचा मृत्यू झाला. पुन्हा एकदा तरूणींच्या, मुलींच्या सुरक्षिततेचा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

 

सुरक्षेच्या दृष्टीने आज मुलींनी स्वयंपूर्ण स्वयंसिद्ध आणि स्वसंरक्षण करण्यास सक्षम होणं हे अत्यावश्यक झालं आहे. आज अनेक हिंदू मुलींना फसवून, त्यांचं लैंगिक शोषण करून, प्रलोभनं दाखवून, धाकदपटशांचा आधार घेत, पळवून नेऊन, जीवाची भीती घालून धर्मांतर करण्याची सक्ती केली जात आहे. कधी भुलून तर कधी नाईलाज म्हणून त्याही यास बळी पडतायत. पण या सगळ्याला आणखी एक वेगळा कोनही आहे, प्रेम प्रकरणातील असुरक्षिततेचा, आपल्या कुटुंबापासून तुटण्याचा, कुटुंबातील सूर बिघडल्याचा, स्त्रियांकडे दुय्यम म्हणून पाहण्याचा आणि हो, स्वातंत्र्य-स्वैराचारातील सीमारेषा पुसट झाल्याचाही.

 

आपल्या घटनेने स्त्रियांना समान दर्जा, जगण्याचा समान हक्क, मूलभूत गरजांच्या पूर्ततेचा समान हक्क दिलाय. (दुर्दैवाने यालाही काही अपवाद आढळतातच.) आज अनेक घरांत मुलींचं अधिक आनंदाने स्वागत होतंय. तिला जपलं जातंय, शिकवलं जातंय, स्वातंत्र्य दिलं जातंय हे स्वागतार्ह आहे. पण काही घरांत नाती बिघडलेली आहेत, मोकळा संवाद नाही. स्वातंत्र्य आहे पण मनातली भावना, भीती, वेदना व्यक्त करण्याइतका मोकळेपणा नाही. तरुणाईला आपल्या भावना मोठ्यांकडे व्यक्त कराव्याश्याच वाटत नाहीत. त्यापेक्षा आपापला मार्ग काढून सॉर्टेड राहणं आणि दुसऱ्याचं मत म्हणजे हस्तक्षेप आहे अशी मानसिकता असणं हे आज अनेक ठिकाणी दिसून येतं. यातच अनेकदा धोके संभवू शकतात. या भूमिकेच्या कारणांचा मागोवा घेणं आवश्यक आहे. आपला वेश, आपली जीवन एन्जॉय करण्याची पद्धती, शिक्षणाचा मार्ग, नोकऱ्यांची निवड, आपली मित्रमैत्रिणींची निवड ही केवळ आपल्याच व्यक्तिस्वातंत्र्याच्या अधिकारक्षेत्रात येते असं एक मत दिसून येतं. पण खरं म्हणजे घरच्यांशी याबाबत चर्चा करणं, त्यांचा सल्ला घेणं, त्यांच्या मार्गदर्शनाने वागणं हे अनेकदा आपल्या पथ्यावर पडतं, हे समजून घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे घरातल्या मुलींचं, एकूणच तरुणाईचं मनोगत ऐकणं, त्यांचे प्रश्न, आव्हानं समजून घेणं, त्यावर चर्चा करणं, त्यांना योग्य असा मार्ग सुचवणं, त्यांच्या मुद्द्यांना बालिश किंवा अल्लड असं लेबल न लावता त्यांच्याशी त्यांच्या वयाचे होऊन बोलणं, त्यांच्या समस्यांचं स्वरुप समजून घेणं, मुलींच्या(खरं तर मुलांच्याही) सुरक्षेचा प्रश्न उद्भवत असेल तर त्याबाबत कडक आणि कायदेशीर मार्ग स्वीकारणं आणि आम्ही तुझ्याबरोबर आहोत असा मानसिक आधार देणं खरोखरच आवश्यक झालंय.

 

आज अनेकजण विवाहासारखी कमिटमेण्ट नको म्हणून लिव्ह इन रिलेशनशिपचा पर्याय निवडतात. अशा वेळेस आपण पार्टनरची सत्य पार्श्वभूमी, त्याची जडणघडण झालेली सामाजिक परिस्थिती समजून घेणं, त्याने सांगितलेली माहिती पडताळणं, नात्यातील संभाव्य धोके ओळखणं, भावना दूर ठेवून पालकांच्या-संबंधितांच्या सल्ल्याचा तार्किकपणे विचार करणं आवश्यक आहे. लिव्ह इन सारखे पर्याय निवडताना त्यातील कायदेशीर बाबींचा पूर्ण विचार करणं, त्याचप्रमाणे वेळ पडल्यास रोखठोक भूमिका घेणं, अन्याय सहन करण्याऐवजी तो बोलून दाखवणं, कायदेशीर आधार घेणं, पालकांनीही आपल्या मुलाच्या/मुलीच्या पाठीशी उभं राहणं, संवादाने प्रश्न सोडवणं याची आज खरोखर गरज आहे. त्यांचे मित्रमैत्रिणी, सोशल मीडियावरचा वावर याबाबत सजग आणि प्रसंगी कठोर असणंही आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पालकांच्या शंका या व्यक्तिस्वातंत्र्यावरचा घाला नसून त्यात काळजी आणि आपल्याच सुरक्षिततेचा विचार आहे हे आपणही ध्यानात घ्यायला हवं.

 

हा प्रश्न केवळ लिव्ह इन किंवा प्रेमप्रकरण यापुरता मर्यादित नाही. एकट्याने प्रवास करताना वैयक्तिक सुरक्षा, स्थल-कालसापेक्ष परिधान केलेले कपडे, प्रवासाचा मार्ग-माध्यमं याची निवड, पब्लिक किंवा वैयक्तिक ट्रान्सपोर्टचा काळजीपूर्वक वापर, प्रवासात स्वतःची घेतलेली काळजी याच्याशीही संबंधित आहे. प्रवासात कोणीही आपल्या मनाविरूद्ध चुकीचं वर्तन करत असेल तर त्याला वेळीच ठामपणे समज देणं. सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वसंरक्षणाचं तंत्र शिकून घेणं, कोणीही आपल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या आड येणार नाही याबाबत दक्ष असणं, स्वतःचे सामाजिक-आर्थिक-मानसिक व्यवहार काळजीपूर्वक हाताळणं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे शोषण सहन न करणं या सगळ्यांचा आजच्या तरुणाईने, विशेषतः स्त्रियांनी विचार करणं अत्यंत आवश्यक आहे.

 

आपला देश हा कुटुंबप्रधान आहे. संस्कारक्षम वातावरणात इथला पिढी मोठी होत असते. त्या संस्कारांचा वैयक्तिक आयुष्यात वापर करणं, ते संस्कार पुढच्या पिढीकडे नेणं आवश्यक आहेत. हे संस्कार धार्मिक तर आहेतच त्याचवेळी ते आत्मसन्मानाचेही आहेत. हे संस्कार जसे सरस्वतीचे आहेत तसेच ते आहेत दुर्गेचे, कालीचे, महिषासूर मर्दिनीचे आहेत, जिजाऊचे, राणी लक्ष्मीबाईचे, चेन्नम्माचे आहेत. स्त्रिच्या सुरक्षिततेचा जेव्हा प्रश्न उभा राहतो तेव्हा या स्त्रियांचं स्मरण आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन केलेलं आचरण अधिक उपयोगी ठरणार आहे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे या गाण्यातील खालील ओळी मला या दृष्टीने महत्त्वाच्या वाटतात.

 

जाणवाया दुर्बलांचे दु:ख आणि वेदना

तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना

धमन्यातल्या रुधिरास या खल भेदण्याची आस दे

सामर्थ्य या शब्दांस आणि अर्थ या जगण्यास दे


 - मृदुला राजवाडे