मनाचिये गुंती गुंफियला शेला - 2

युवा विवेक    22-Nov-2022
Total Views |

manaachiye guntee gumfiyalaa shelaa
 
 
 
 
 
मन वढाय वढाय
उभ्या पिकांतलं ढोर
किती हांकला हांकाला
फिरी येतं पिकांवर
मन मोकाट मोकाट
त्याले ठायी ठायी वाटा
जशा वाऱ्यानं चालत्या
पान्यावऱ्हल्या लाटा
भरून तरारून आलेल्या शेतात ढोर घुसल्यावर त्याला किती बाहेर काढले तरी ते काही बाहेर निघत नई असं बहिणाबाई सांगताना अगदी सहज त्याचा धागा मनाला जोडून जातात
शोधायला गेलो तर मन असते कुठे ठाम सांगता नाही येत ना!
तसेच मनाचा वेगही न मोजण्या सारखाच इथे आहे म्हणता तिथे, नी तिथे आहे म्हणता अजून कुठे
कुठे आहे म्हणता म्हणता आणखी कुठेच
आत्मा आणि देहाच्या मधला दुवा मन असावा
देहाने आत्म्याकडे केलेली एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी आत्म्याने धारण केलेले रूप म्हणजे मन असावे कदाचित
किंवा असं म्हणुया का की,मन मेंदूतील अशी क्षमता आहे जी माणसाची चिंतनशक्ती, कल्पनाशक्ती, बुध्दी, भाव, इंद्रियग्राह्यता , व्यवहार, अंतरदृष्टी यांच्यावर काम करते..
खरतर तसं पहायला गेलं तर...
चेतनांच्या अनेक छटा म्हणजे मन नाही का!
सचेतन, अचेतन, अर्धचेतन अशा कितीतरी अवस्थेतून मानवी मन प्रवास करत असते
खरोखर मन व्याख्येत बांधायचं ठरवलंच तर बांधता येईल का?
मृण्मयाला अमूर्त स्वरूपात चैतन्य प्रदान करणारा चिन्मय म्हणजे मन!
इतक्या सहज सोप्या तितक्याच तोकड्या व्याख्येत हे मन नावाचं स्वरूप बसवणं न्याय्य होणार नाही.
जितकं कोमल तितकंच बलदंड!
पराकोटीचा विरोधाभास सहज सामावून घेत आणि कोणतंही निश्चित स्वरूप नसताना स्वतःचं अस्तित्व जितकं बेमालूम तितकच ठामपणे अधोरेखित करणारं रसायन म्हणजे मन!
कदाचित म्हणूनच माउलींनी मनाचिये गुंती गुंफियेला शेला असं म्हणत मनाच्या गुंतागुंतीचं स्वरूप शब्दबध्द केलं असावं.
मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते
मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे
का होते बेभान, कसे गहिवरते
आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते
हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते
सावरते, बावरते, घडते, अडखळते का पडते ?
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते
मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते
अन्‌ क्षणात फिरुनी आभाळाला भिडते
रुणझुणते, गुणगुणते, कधी गुंतते, हरवते
कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते
तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते ?
कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते
जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते ?
भाबडे तरी भासांच्या मागून पळत
नक्की कुठे जातंय लिखाण ...? लिखाणालाही वेगळी उंची आणि वेगळे आयाम देणारही मनच की!
विचारबीज, विचार,पाठोपाठ येणारी विचारांची आवर्तनं...
कमलदलात अडकून ऐहिका पल्याड पोचू पाहणाऱ्या भ्रमाराच्या मनाचा वेध कुणी आणि कसा घ्यावा ?
किंवा मनाचिये गुंफी..उभ्या आडव्या सुख दुःखाच्या धाग्याने अनुभवाचे टाके घालून क्षणाक्षणांचे रंगीत रेशीमधाग्याने शेल्यावर राघुमैना विणून .. आयुष्य नावाच्या देहाला घ्यावे लपेटून नी त्या उबेला जगणं छान शेकून घ्यावं..
 
क्रमशः 
 
- अमिता पेठे पैठणकर