दाम करी काम

युवा विवेक    23-Nov-2022
Total Views |

daam kari kaam
 
 
 
 
दाम करी काम…
आज मायना वेगळाच वाटतोय ना? इकडेतिकडे बघू नको...तुलाच पत्र पाठवलं आहे हे. आमच्याकडे 'दाम करी काम' असं सगळेच म्हणतात, त्या दामालाच म्हणजे तुलाच रे पत्र लिहिलंय. अरेच्या...तुझे सोबती छनछन करत नाचायला लागले की, खुश झालेत की काय पत्र पाहून? तुझ्या नावाची फार चर्चा असते सगळीकडे, सगळ्यांनाच तू हवा असतोस...हवा असतोस म्हणजे अगदी भरपूर मोठ्या प्रमाणात हवा असतोस. लोकं तुझ्या गादीवर लोळण्याची स्वप्नं पाहत असतात रे. किती वेडेपणा ना! मला माहितेय वेडेपणा म्हणतेय म्हणून तू कदाचित हसशील मला.
 
कसंय ना...दाम करी काम हे जरी हल्लीच्या जगात खरं असलं तरी काही गोष्टी अशा असतात की, त्या तुझ्या शिवायही होऊ शकतात. आयुष्यात तू महत्त्वाचा असलास तरी फक्त तूच महत्त्वाचा आहेस असं नाही वाटत मला. गरज भागेल इतपत तू सोबत असलास की, बास होतं मला तरी. अर्थात 'गरज' या शब्दाची व्याख्या माणसागणिक बदलती राहणार. पण मी बोलतेय ते मूलभूत गरजांबद्दल. मला सांग… बरोबर आहे ना माझं? हे सोडून इतर कशाची चटक लागली...अगदी तुझीही तर मात्र तू कितीही मोठ्या प्रमाणात जवळ असलास तरी लोकांना ते कमीच पडतं. एवढं तुझं महत्त्व कधी आणि कसं वाढलं ते तुला तरी कळलं का रे? पूर्वीच्या काळी कुठं होतास तू एवढा गरजेचा… आपल्याकडची वस्तू दुसऱ्याला देऊन त्याच्याकडची वस्तू आपण घ्यायची इतका साधा सोपा व्यवहार असायचा पूर्वी. दोघांनाही हवी ती वस्तू मिळाली की काम संपलं...दोघेही खुश. ही पद्धती बंद होऊन हळूहळू तुझा शिरकाव जसा होत गेला तशी सगळी परिस्थिती बदलत गेली बघ. गाल का फुगवतोयस? तुला बिलकुल दोष देत नाहीये मी. पण मानवी वृत्तीचं वाईट वाटतं. एकदा का हातात तुला खुळखुळताना पाहिलं की, माणसाची वृत्तीच बदलून जाते. तो सरडा कसे रंग बदलतो ना तशी यांची वृत्ती बदलते. किती उदाहरणं पाहिली असतील अशी आजूबाजूला. पण अर्थात याला अपवादही असतात बरं का. तुझा सदुपयोग करणारी मंडळी पाहिली की, आपोआपच त्यांच्यापुढे हात जोडले जातात. तू सोबत आहेस म्हणून त्यांना ना गर्व असतो ना माज. प्रत्येकाच्या मदतीला अगदी तत्पर असतात अशी मंडळी. जगातला प्रत्येक श्रीमंत त्यांच्यासारखाच झाला तर...असं मॅड सारखं काही मनात येत राहतं मग. ए...तुला पण जाणवत असेल ना प्रत्येकाच्या हाताचा स्पर्श आणि त्या स्पर्शामागचा अर्थ! तेव्हा काय वाटतं तुला? कोणाचा हात धरावा आणि कोणाचा सोडावा याचा चॉईस आपल्याला असावा असं वाटतं का कधी? पण म्हणतात ना 'पैशाकडेच पैसा जातो.' असं कसं असतं ना…
 
पण मला कधी कधी आश्चर्य वाटतं बरं का तुझं. काय जादू असेल तुझ्यात असं वाटून जातं. तुझ्यामुळे लोकांचा बँक बॅलन्स फुगायला लागला की, माणसात किती बदल होत जातो. अर्थात परत या मुद्द्यातही अपवाद असतातच असं म्हणेन मी. पण तुला सांगते….पूर्णपणे नास्तिक असलेली माणसेही आस्तिक झालेली पाहिली आहेत मी. नास्तिकचा आस्तिक होणं यात आश्चर्य वाटत नाही, पण जी गोष्ट प्रत्यक्ष देवही करु शकलेला नसतो ती गोष्ट तू अगदी लीलया करुन दाखवतोस रे. त्याचं आश्चर्य वाटतं. कसं काय जमतं रे तुला हे? पण एक सांगू...अशी लोकं आपल्या आस्तिकतेचा ढोल वाजवायला लागली की, अगदी नको होतं. मंदिरातल्या त्या दगडी मूर्तीवर तुला ओवाळून टाकण्यापेक्षा आजूबाजूच्या गरजूंच्या हाती तू गेलास तर किती जण सुखी होतील. खरं खरं सांग...तू ही अशाने समाधानी होशील की नाही? पण मी म्हणून काय कोणी बदलणार आहे का….त्यामुळं असो म्हणूया आणि विषय बदलूया.
 
हे सगळं वाचून तुला वाटेल कदाचित की मला तुझं महत्त्व नाहीये. पण तसं नाहीये. तू तर अत्यावश्यक गोष्टीतच मोडतोस आता. पण तू ज्याच्याजवळ आहेस तीच व्यक्ती फक्त श्रीमंत असं मात्र मी बिलकुल मानत नाही. तुलाही मान्य असेल हे. माझ्या दृष्टीने तू महत्त्वाचा असलास तरी माझ्यावर छाप मात्र पाडू शकणार नाहीस कधी. मोठी रक्कम तर मला लिहिणंही जड जातं, प्रचंड रकमेचा विचार जरी मनात आला तरी दडपण येतं….तुझ्या मागे लागून शारिरीक आणि मानसिक आजार, ताण ओढवून घेण्यापेक्षा आहे तेवढ्यात सुखी-समाधानी रहायला नक्कीच आवडतं मला. आहेसच की तू माझ्यासोबत. कुठं काय कमी पडू देतोयस मला. त्यामुळं तुझी भुरळ तर अजिबातच पडणार नाही मला. फक्त तू आहेस तसाच माझ्यासोबत रहा. पुढं-मागं कधी ओघ वाढलाच तर फक्त तो सत्कारणी लावायचा मार्ग दिसू दे एवढीच इच्छा.
 
- जस्मिन जोगळेकर.