युवकांमधील वजन का वाढता वाढता वाढे?

युवा विवेक    25-Nov-2022
Total Views |

yuvakaanmadhil vajan kaa vaadhataa vaadhataa vaadhe?
 
 
 
युवकांमधील वजन का वाढता वाढता वाढे?
बाप रे केवढा झालाय हा? एका भाच्याच्या प्रकृतीकडे पाहून माझी अत्यंत स्वाभाविक प्रतिक्रिया उमटली. यात कोणतंही बॉडी शेमिंग नव्हतं. पण बालपणापासून मागच्या अगदी दोन तीन वर्षांपूर्वीपर्यंत सडपातळ, बांधेसूद असणारा बारावीतला भाचा ऋग्वेद चक्क स्थूल आणि बल्की दिसू लागला होता. हीच गत सीए करणाऱ्या भाचीची. अनेक वर्षं उंची वजनाचा छान रेशो असणारी, मेन्टेन्ड असणारी निशा आता वाढत्या वजनामुळे वयाच्या आधीच मोठ्या बाईसारखी दिसू लागली होती. गेल्या काही वर्षांत १५ ते २५ या वयोगटात वजन वाढण्याच्या समस्येने उग्र रूप धारण केलंय. कोविडनंतर तर शालेय मुलांच्या वाढत्या वजनावरही अनेक लेख प्रकाशित झाले, चर्चासत्रंही झाली. स्थूलत्वात बॉडी शेमिंग नक्कीच होऊ नये, कारण ती एकंदरीत ढब असू शकते. पण हे वजन अचानक वाढलेलं जाणवत असेल किंवा त्यामुळे शारिरीक त्रास होत असेल तर वेळीच सावध होणं आवश्यक आहे. कारण स्थूलत्व, विशेषतः बालकांमधील व युवकांमधील स्थूलत्व ही आता जागतिक समस्या होऊ पाहते आहे. पाश्चात्य जगात हिने पाय रोवले आहेत आणि भारतातही ही समस्या स्थिरावू पाहते आहे.
 
कोविड महामारीच्या काळात जवळपास दोन वर्षं आपण सगळे चार भिंतीत कैद झालो होतो. शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस, छंदवर्ग, मनोरंजन सारं काही घरातच संगणक, लॅपटॉप आणि मोबाईलच्या सहा इंची स्क्रीनमध्ये बंदिस्त झालेलं. त्यामुळे लॉकडाऊनमुळे साहजिकच बाहेर फिरण्यावर, चालण्यावर, व्यायाम करण्यावर बंधनं आलेली. शाळेत-कॉलेजात जाणं येणं, मित्रांसोबत खेळणं, सिनेमे पहायला जाणं, मैदानी खेळ खेळणं सारं काही दुरावलेलं. त्यात सुरुवातीच्या काळात हॉटेलं बंद असली तरी घरातल्या खाण्यातही मैदा, बटर, चीज, चॉकलेट्स, मॅगी, नूडल्स यांनी शिरकाव केला होता. त्या काळात या पदार्थांचं उत्पादन सर्वाधिक होतं. अशा बातम्याही आपण वाचल्या असतील. कालांतराने हॉटेलांच्या होम डिलिव्हरीज मिळू लागल्या आणि खाण्यापिण्याच्या चंगळीत भरच पडत गेली.
 
गेल्या काही वर्षांत युवकांचा कॅलरी इंटेक प्रचंड वाढला आहे. अगदी दैनंदिन रुटिनमध्ये रुजलेलं बाहेरचं आणि अनावश्यक खाणं. ज्यात चॉकलेट्स, केक्स, पेस्ट्रीज, कोक, चीज, पनीर, चिकनसारखा हाय प्रोटीन मांसाहार यांचा अंतर्भाव आहे. म्हणजे जे अनारोग्यकारक आहे नेमकं तेच आपण भरपूर खातोय. त्याचसोबतीला यात भर घालणारी जागरणं, तासंतास एका जागी बसून लेक्चर्स अटेंड करणं, ओटीटी पाहणं, चॅटिंग करणं हे आहेच. व्यायामाचा अभाव, आवश्यक झोपेचा अभाव आणि आरोग्यपूर्ण आहाराचा अभाव यामुळे अनेक युवकांचं वजन वाढलं असल्याचं दिसून येतं. यात गेल्या काही वर्षांत या तिन्हीच्या जोडीला हार्मोनल इम्बॅलन्स आणि बाहेरून घेतला जाणारा अतिरिक्त प्रोटिन इंटेक याचाही सहभाग आहे. मुलींमध्ये नववी दहावीतच सुरू होणारे थायरॉईड, पीसीओडी, अनियमित मासिकपाळीसारखे त्रास आहेत. या साऱ्याच्या जोडीला सध्याच्या स्पर्धात्मक युगात शालेय/महाविद्यालयीन अभ्यास, पुढे नोकरी या सगळ्यामुळे येणारा अनावश्यक ताण यामुळे वजनातला हा वसा वाढतच चालला आहे. पूर्वी साधारण पस्तिशी-चाळिशीनंतर दिसू लागणारं पोट आज १५-१६व्या वर्षीच दिसू लागलंय. विसाव्या वर्षी तिशीची शरिरयष्टी युवक गाठू लागलेत. काय बरं करता येईल या सगळ्यात?
 
शक्य आहे, तुम्ही ठरवाल ते शक्य आहे. अनन्या चित्रपटातील हा संवाद मला फार फार आवडतो. त्यामुळे वाढत्या वजनाकडे समस्या म्हणून पाहण्यापेक्षा, त्याकडे आव्हान पाहणं आणि ते आव्हान पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणं हे जास्त स्वागतार्ह नाही का? या सगळ्यात महत्त्वाचा आहे तो आहार. तीनही वेळेस घरचं सात्विक, सकस आणि सुग्रास खाणं, तेल-चीज-बटर कमीत कमी खाणं, एरिएटेड ड्रींक्स म्हणजे कोकसारखी भरपूर साखर असणारी पेय घेण्याऐवजी घरी केलेलं सरबत किंवा ताक पिणं याला प्राधान्य देणं हे सहज शक्य आहे. मुळात आपण ज्या प्रांतात राहातो तेथील लोकल खाद्यपदार्थच आपण खावेत, असं अनेक वैद्य सांगतात. त्यामुळे आपण दैनंदिन ज्वारी, बाजरीची भाकरी, पालेभाज्या, आमटीभात, दूध, घरी केलेलं तूप या पारंपारिक खाद्यपदार्थांना अधिकाधिक स्थान दिलं पाहिजे. आहारासोबत आपलं पोट साफ राहातं ना, पित्त होत नाही ना याकडेही लक्ष दिलं पाहिजे. बाहेरचं खाणं शक्यतो खाऊच नये.
योग्य आहारासह योग्य व्यायामाचीही सवय लावून घेणं आवश्यक आहे. आज आपल्या स्मार्टफोन्समध्ये पेडोमीटर, कॅलरी काऊंटर अशी वेगवेगळी आयुधं आपल्या मदतीसाठी उपलब्ध आहेत. पेडोमीटरवर चालण्याचं/धावण्याचंआपलं टार्गेट सेट करा. रोज तेवढं टार्गेट पूर्ण झालं पाहिजे हे नक्की ठरवा. आवश्यकता असेल तर जिम, योगासनं, कार्डिओ वर्कआऊट, झुंबासारखे नृत्यप्रकार, भारतीय नृत्याचे क्लास याचाही आधार घेता येईल. आवश्यक प्रमाणात कॅलरीज जळू लागल्या की वजनही आपोआप कमी होण्यास सुरुवात होईल. वजन कमी होत नसेल तर डॉक्टरांचा, वैद्यांचा सल्ला जरूर घेता येतो. काहीवेळा हार्मोनल इम्बॅलन्समुळे, मासिक पाळीच्या बिघडलेल्या चक्रामुळे वजनाचा काटा हलतच नाही. अशा वेळा वैद्यकीय सल्ला नक्की उपयोगी पडू शकतो.
 
घरातली छोटी छोटी कामंही शरिराचं चलनवलन सुरू ठेवण्यात मोलाची भूमिका बजावतात. वाकून केर काढणं, वाकून लादी पुसणं, थोडाफार स्वयंपाक करणं, कपडे वाळत घालणं, वाळल्यावर त्यांच्या घड्या घालणं, कपाट आवरणं, घरात आईवडलांना आवश्यक ती मदत करणं, बाजारातून यामुळे आपलं आयुष्यही हॅपनिंग राहील आणि आरोग्यही. घरचेही खूष होतील. आपल्याला हल्ली सगळं हातात आणि जागेवर मिळण्याची सवय झाल्यामुळे शरिराला श्रम देणं हा प्रकार जवळजवळ बंद झालाय. आपल्याला त्याची खरी गरज आहे. अनेकजण वाढत्या वजनामुळे नैराश्याच्या गर्तेत जातात. मुळात वाढतं वजन ही समस्याच नाही. त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन ही खरी समस्या आहे. त्यामुळे त्यासाठी उपाशी राहणं, निराश राहणं, आयुष्याकडे हरल्याच्या दृष्टीने पाहणं, जागत राहाणं याने काहीच साध्य होणार नाही. स्थूलत्व किंवा वजनवाढ ही अनुवंशिकही असू शकते बरं का. त्यामुळे आपली घरातली सगळ्यांची एकंदर ढब कशी आहे, याचाही विचार केला पाहिजे. काही वेळा मुळातच तब्येत चांगली असेल तर जास्त सावधान राहावं लागतं आणि वजन कमी करण्यापेक्षा फिटनेस राखण्याचाही विचार अधिक करावा लागतो.
 
तुम्ही किंवा तुमचे मित्र मैत्रिणी जर या समस्येला तोंड देत असतील तर स्वतःला किंवा त्यांना चिडवण्यापेक्षा समजून घेणं आणि त्यावर तोडगा काढणं हे अधिक महत्त्वाचं आहे. यामुळे वजन कमी करण्यातला, फिटनेस राखण्यातला हुरूप वाढेल आणि परिणाम अधिक लवकर दिसू लागतील. कारण शक्य आहे, तुम्ही ठरवाल ते सगळं शक्य आहे.
(इंटरनेटवरील माहितीच्या आधारे हा लेख लिहिला आहे. प्रत्येकाने आवश्यकतेप्रमाणे वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा.)
 
 
- मृदुला राजवाडे