प्रोटीन

युवा विवेक    26-Nov-2022
Total Views |

protin
 
 
 
 प्रोटीन

नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुमच्यासमोर हजर आहे एक अत्यंत जिव्हाळ्याचा विषय घेऊन. तुम्ही जर नियमितपणे जिममध्ये जाऊन व्यायाम करत असाल, स्नायू बळकट करण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी व्यायाम करत असाल आणि तुम्ही तुमच्या जिम ट्रेनरकडून सल्ला घ्यायचं ठरवलं, तर एक सल्ला तुम्हाला नेहमीच मिळेल. तो म्हणजे, आहारात प्रोटीन वाढवण्याचा सल्ला. कोणत्याही जिमचा ट्रेनर सहजपणे तुम्हाला सांगेल, जेवढे तुमचे वजन किलोग्राममध्ये आहे, तितक्याच प्रमाणात ग्रॅममध्ये प्रोटीन तुम्ही दिवसभरात खायला हवेत. तरच वजन कमी होईल आणि स्नायू बळकट होतील. आला असेल ना हा अनुभव? खरंच हे प्रमाण प्रत्येकाला योग्य आहे का, हे आपण आज पाहू या.

 

शरीराला प्रोटीनची खूप जास्त गरज असते हे अगदी खरे. मात्र जर तुमच्या शरीरात काही कारणांनी प्रोटीन पचविण्याची क्षमता कमी असेल तर मात्र जास्त प्रमाणात प्रोटीन खाणे तुम्हाला महागात पडू शकते.
 

जितके वजन तितके प्रोटीन या समिकरणाबद्दल आता जरा खोलात जाऊन विचार करू. माझे वजन पन्नास किलो आहे. त्यामुळे मला या समिकरणानुसार, रोज किमान पन्नास ग्रॅम प्रोटीन खायला हवे. हे प्रमाण माझ्यासाठी फार जास्त नाही. शिवाय इतक्या कमी प्रमाणातील प्रोटीन माझे शरीर सहज पचवू शकेल. त्यामुळे माझ्यासाठी हे प्रोटीन समीकरण चांगले लागू होईल.

 

मात्र, समजा एखाद्याचे वजन शंभर किलो आहे. तर त्या व्यक्तीला या समिकरणानुसार रोज शंभर ग्रॅम प्रोटीन खावे लागेल. आता विचार करा, ज्या व्यक्तीचे वजन शंभर किलोवर पोहोचले आहे, तो शारीरिक दृष्ट्या पूर्णपणे निरोगी असेल का? अती वजनामुळे त्याला डायबेटिस, रक्तदाब असे काही रोग असण्याची शक्यता दाट आहे. अशा कोणत्याही रोगामध्ये आणि अती वजन असताना व्यक्तीचं metabolism मंद झालेले असते. पचनशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे दिवसाला शंभर ग्रॅम प्रोटीन खाणे म्हणजे त्याच्या पचनशक्तीवर अतिरिक्त ताण! जेव्हा असा ताण पचनशक्ती वर पडतो, तेव्हा पचन न झालेले प्रोटीन व्यक्तीच्या रक्तात तसेच राहून ते किडणी पर्यंत पोहोचते. असे सतत घडत राहिल्यास किडणीच्या कामात अडथळा येऊन किडणी खराब होऊ शकते.

 

माझ्या आतापर्यंतच्या अनुभवात मी एक केस अशी पाहिली आहे, जीची नुसती आठवण झाली तरीही अंगावर शहारा येतो. वीस वर्षांचा तरुण मुलगा बॉडी करण्यासाठी जिममध्ये गेला. जिमच्या ट्रेनरने त्याला आहारात प्रोटीन वाढवण्याचा सल्ला दिला. इतके जास्त प्रमाणात अतिरिक्त प्रोटीन सेवन करणे त्याला शक्य नसल्याने सोपा उपाय म्हणून प्रोटीन पावडर विकत घेण्याचा सल्ला दिला. त्याने ती पावडर रोज घेण्यास सुरुवात केली. तब्येत सुधारणे तर दूरच, सहा महिन्यात तो आजारी दिसू लागला. वीस वर्षाच्या वयात चेहरा अत्यंत निस्तेज दिसू लागला. जेव्हा घरच्यांनी काळजीने डॉक्टरकडे नेले आणि सर्व तपासण्या केल्या तेव्हा समजले दोन्ही किडणी खराब झाल्या होत्या. इतक्या कमी वयात डायलिसिस करण्याची वेळ त्याच्यावर आली. डॉक्टर म्हणाले, चुकीच्या आहारामुळे हे घडले आहे. या गोष्टीवर अजिबात विश्वास न बसून बिचारे आईबाप इतकेच म्हणत राहिले, “ शक्य नाही! तो तर खूप हेल्दी खात होता!”

 

हे अती हेल्दी खाणं त्याच्या जीवावर बेतलं होतं. कोणत्याही तज्ञाचा, डॉक्टरांचा सल्ला न घेता आहारात प्रोटीन अचानक वाढवल्याने हा अपाय त्याला झाला होता. महिन्यातले वीस वीस दिवस त्याला हॉस्पिटलमधे ठेवावे लागत होते. त्या मुलाचे पुढे काय झाले हे मी सांगणार नाही कारण ते वाचणे क्लेशदायक ठरेल.
 

मात्र या उदाहरणातून तुम्ही एक धडा घ्या.

प्रोटीन पावडर, कोणतीही असो, कुणीही दिलेली असो, आधी स्वतःच्या प्रकृतीचा अंदाज घ्या. तुम्हाला शक्य नसेल तर योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या. काही महत्त्वाच्या चाचण्या करून घ्या आणि मगच आहारात प्रोटीन वाढवा. वाढवताना अचानक वाढवू नका, हळूहळू वाढवत न्या. शक्यतो कोणतेही प्रॉडक्ट न घेता नैसर्गिक आहारातून प्रोटीनची मात्रा वाढवा. मांसाहार, पनीर, मोड आलेली कडधान्ये, शेंगदाणे, दूध असे पदार्थ आहारात वाढवा. नक्कीच फायदा होईल.

 

आयुष्य एकदाच मिळते. झटपट परिणाम मिळवण्याच्या घाईने त्याची माती करू नका.

पुन्हा भेटू असाच एखादा महत्त्वाचा विषय घेऊन.

Till then stay healthy be happy.

दीप्ती काबाडे

आहारतज्ञ