मनाचिये गुंती

युवा विवेक    29-Nov-2022
Total Views |

manaachiye guntee gumfiyalaa shelaa
 
 
 
 
 
 
मनाचिये गुंती (भाग तिसरा.. शेवटचा)
मनाचिये गुंती गुंफियेला शेला, बाप रखुमा देविवरु विठ्ठले अर्पिला ... मोगरा फुलला.. मोगरा फुलला
ज्ञानेश्वरांच्या केवढ्या भुरळ पाडणाऱ्या ओळी आहेत या
प्रेम, मोह, निर्धार तरीही समर्पण अशा अनेक भावनांना उत्पन्न करुन भावनिक, बौद्धिक वैचारिक कुवतीत स्वतःला पडताळून घेण्याची संधी देतात
मन आणि बुद्धीची अचाट देणगी या निसर्गाने मानवाला अगदी मुक्त हस्ताने दिली आहे. मन जेव्हा बुद्धीला साद घालतं तेव्हा बुद्धीही अशी काही कामाला लागते आणि परिणाम देते तेव्हा पाहणारा आश्चर्यचकित झाल्याशिवाय रहात नाही.
 
आज घडीतली एक लाडकी कवयित्री अरुणा दिवेगावकर म्हणते की,
मनाचे किनारे पसरलेत
अथांग.
त्याला नाही ठाव
नाही क्षितिज.
कधी शिरतात
काळोखाच्या गर्भात.
तर कधी
उमलणाऱ्या दिशात.
कधी ओले
सलज्ज…
तर कधी
निबीड निर्लज्ज.
जन्मलेल्या प्रत्येकालाच
लाभतात असे
पसरलेल्या समुद्रासारखे
अथांग
मनाचे किनारे...
 
बरोबर आहे ना अगदी!!
 
मन आपलं असो की परकं म्हणजे कुण्या दुसऱ्याचं.. पण आपण ते किती समजून घेतो माहीत नसतं.. एखाद्या व्यक्तीची एक कृती अनेक जणांना वेगवेगळी, किंवा चूक,बरोबर वाटू शकते आणि ती कृती करणाऱ्याच्या मनात आणखी वेगळ्या भावनेने घडलेली असू शकते
ती भावना किंवा त्यांना अभिप्रेत असलेले भाव, अर्थ आपल्याला समजतील किंवा समजणारही नाहीत, किमान तेवढ्या इंटेन्सिटीने तरी नक्कीच नाही !
 
पण...पण...
मन आणि बुद्धी जिथे जिथे एकत्र येऊन काम करते तिथे तिथे इतिहास घडलेला आहे हे काळाने वेळोवेळी सिद्ध केलेले आहे
हां पण मनाचा वारू बुद्धिने ताब्यात ठेवावा किंवा ठेवता यावा ही अट मात्र निश्चित असते
मनाचे सारथ्य बुद्धीने करावे, त्यांचे अलिखित अधिपत्य मनाने मानावे !
यातून जे नवीन निर्माण होते केवळ दर्जेदार असू शकते.
मानवी मन कायम वेगवेगळ्या अवस्थांमधून जात असते.. मानसिक,शारीरिक, बौद्धिकआणि आंतरिक विकास साधायचा असेल तर मनाची उंची, खोली,विस्तीर्णता अफाट असायला हवी हो ना!!
 
इंदिराबाई लिहितात
कांही योजून मनाशी
दणादणा रात्र आली
रिघे दारागजांतून
काळी हत्तीण मोकाट
देते भिंतींना धडक
कोसळला चिरा चिरा
उस्कटल्या कौलारांच्या
केला खापरीचा चुरा
नीट लाघट वस्तूंचा
डाव टाकला मोडून
इथे पलांगाचा खुर
तिथे भग्न पानदान
उधवस्तांत उभी तृप्त
काळ्या मत्सराची गोण
कशी तिला कळायाची
माझ्या श्रीमंतीची खूण
 
इंदिरा संत
मनाचा हा किती वेगळा कोपरा समोर उलगडून दाखवला आहे इंदिराबाईनी
रात्र सुधा मनाशी काहितरी योजते काहितरी कट कारस्थान करत असते
मनाच्या कोठडीतून काळ्या हत्तीणी इतकी प्रचंड ताकद मनाची असते हे नकळत इथे अधोरेखित होते
आणि शेवटचे कडवे तर मनाच्या एका अवस्थेला कमाल चिमटीत पकडले आहे
उध्वस्तांत उभी तृप्त
काळ्या मत्सराची गोण
तिला कशी कळायची
माझ्या श्रीमंतीची खूण
 
मनाच्या अंतरंगातले असंख्य भाव द्वैताद्वैताच्या पलीकडे नेणारे अनेक दुवे,धागे, मानवी मनात झालेले गुंता सोडवायला एक ना अनेक जन्मही अपुरे पडतील.. मानवी मनाच्या शेल्याची एक विण उकलत नाही तोवर दुसरीकडे ओढ बसलेली असते.. ती सुटते आहे सुटते आहे असे वाटे पर्यंत तिसरीकडे.. क्रमाने चौथी, पाचवीकडेही!
हा गुंता सोडवत सोडवत रेशमी शेला विणायचा असतो..
मनाच्या चौकटीत एक रोपटं लावायचं असतं त्याचं विचाराने, विवेकाने सदवर्तनाने सिंचन करायचं असतं.. त्याला फुलताना, फळताना, उंच जाताना अगदी गगनाला भिडेस्तोवर पाहून एकेक जन्म करत त्या जगदीश्वरा पर्यंत पोचायचं असतं
 
(जगदीश्वर ही संकल्पना व्यक्ती आणि प्रवृत्तीनिहाय बदलू शकते)
आपण जिथे पोचायचे आहे तिथे पोचू तेव्हा पोचू पण प्रवास सुंदर.. देखणा करणं आपल्या हातात आहे.. असतेच!
 
मनाचिये गुंती गुंफीयेला शेला..
बापरखुमा देवीवरु विठ्ठले अर्पीला
मोगरा फुलला.. मोगरा फुलला..
 
- अमिता पेठे पैठणकर