हुळहुळत्या काठाने

युवा विवेक    08-Nov-2022
Total Views |

hulhultya kathane
 
 
 
 
हुळहुळत्या काठाने
एका श्वासा पासून दुसऱ्या पर्यंतचा काळही अनेक युगांचा वाटावा
की,
अनेक युगेच आहेत!
जी एका श्वासात सरलीयेत
सरलं आहे ते उरलय
की जे उरलय ते सरत नाहिये
डबडबल्या तळ्यानेही ओघळता ओघळता अडखळावं..
जखडून घ्यावं स्वतःला
तू घातलेल्या एका शपथेमधे....
त्या शपथे खातर हे सारं..
की,
तळ्यालाही हवा आहे शपथेचा काठ
जिथे बसतय कुणीतरी येऊन जन्मोन जन्म
इच्छेचे खडे भिरकावत..
खड्यांनाही समजलंय
पैलाकडे कुणीतरी निघून गेल्याचं..
लाखमोलाचा ऐवज ऐलावर विसरून !
परतीच्या सगळ्या पाऊलवाटा उध्वस्त करुन...
तळ्याने काय करावं ?
समुद्रा सारखी येवू द्यावी
भरती ओहोटी ?
की घ्यावं आषाढ भरल्या नदिसारखं विध्वंसाचं रौद्र रुप?
जमणार आहे का त्याला ऐल पैल एक करणं !
अडखळलेल्या क्षणांना इच्छित स्थळी पोचवणं !!
ओघळू पाहतोय टीप त्याला
खुशाल ओघळू देणं ..
हुळूहुळत्या काठाने एवढी मोकळीक द्यावी त्यांना!
- अमिता पेठे पैठणकर