तुम्ही आहात का ‘चहा’चे चाहते?

युवा विवेक    16-Dec-2022
Total Views |

tumhi aahat ka chahache chahate?
 
 
 
तुम्ही आहात का ‘चहा’चे चाहते?
 
चहा.....ज्या पेयाशिवाय आपला दिवसच सुरू होत नाही तो म्हणजे चहा. आपली सर्वांची सकाळ गरमागरम, गोड चवीच्या, कडक स्वादाच्या, मन धुंद करणाऱ्या अरोमाच्या ताम्रवर्णी पेयाने होत असते. चहा या पदार्थाला किंवा पेयाला वेळेचं बंधन नाही. सकाळी चालतो, दुपारी जेवणाआधी चालतो; जेवणानंतरही चालतो. तीन वाजता चालतो, पाचलाही चालतो. दमून आल्यावर चालतो, काम सुरू करण्यापूर्वी उत्साह वाढवण्यासाठी चालतो. मित्रमंडळींमध्ये मध्यरात्रीच्या पोटभर गप्पांच्या मध्यंतराला चालतो, गप्पा संपल्यावर पहाटे बाय बाय करण्यापूर्वीही चालतो. थोडक्यात काय, तर चहा केव्हाही चालतो. चहा कोरा चालतो, दुधाचा चालतो, साखरेचा चालतो, बिनसाखरेचा चालतो, स्ट्राँग चालतो, सौम्य चालतो, घरचा चालतो, टपरीवरचा चालतो, टीजॉईंटमधला चालतो, ठराविक हॉटेलमधला चालतो. खरं म्हणजे चहा कोणालाही आणि कसाही चालतो. एवढ्या महत्त्वाच्या पेयासाठी एखादा आंतरराष्ट्रीय दिन नसता तरच नवल. आज १५ डिसेंबर म्हणजे आंतरराष्ट्रीय चहा दिन.
 
एखाद्या टपरीवर मोठ्या पितळी पातेल्यात आलेयुक्त चहा रटरटत असतो तेव्हा बाजूने चालत जाताना त्या वासानेही किती ताजंतवानं वाटतं. दिवसभर काम करून दमल्यावर मिळालेला अर्धा कटिंगही सगळी दमणूक पळवून लावतो. उत्पादनापासून ते उकळता वाफाळता चहा हाती येईपर्यंत अनेक श्रमांचे हात या चहामध्ये गुंतलेले असतात. या पेयाचं महत्त्व जाणूनच एक दिवसच त्याच्यासाठी समर्पित करण्यात आला. भारत, श्रीलंका, नेपाळ, व्हिएतनाम, इंडोनेशिया, बांग्लादेश, केन्या, मलावी, मलेशिया, युगांडा आणि टांझानिया या चहाउत्पादक राष्ट्रांच्या माध्यमातून १५ डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय चहा दिन म्हणून साजरा केला जातो. २००५ साली श्रीलंकेत सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा झाला. पुढे २०१५ साली भारताने चहा दिनाची व्याप्ती वाढवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या फूड अँड ऍग्रीकल्चर ऑर्गनायझेशनला प्रस्ताव दिला. त्यानंतर सर्व राष्ट्रांचा विचार करून २०२०पासून संयुक्त राष्ट्र संघटनेने २१ मे हा आंतरराष्ट्रीय चहा दिन म्हणून घोषित केला. पण तरीही महत्त्वाचं चहा उत्पादक राष्ट्र म्हणून १५ डिसेंबरचं महत्त्व आपण, भारतीय नाकारू शकत नाही.
 
चीनमध्ये चहा हे उत्तम पेय असल्याचा साक्षात्कार सर्वप्रथम झाला असं म्हटलं जातं. चिनी दंतकथेनुसार, तब्बल पाच हजार वर्षांपूर्वी. चीनमधील एक सम्राट शेननॉंग एकदा बागेत बसला असताना एका झाडाची पानं ही पिण्यासाठी उकळत ठेवलेल्या पाण्यात पडली व त्याच्या पाण्यात उतरलेल्या स्वादाने राजा खूश झाला आणि अशा रीतीने एका पेयाचा जगाला परिचय झाला. चीनमध्ये व्यापक स्वरुपात चहाचं उत्पादन घेतलं जाऊ लागलं. कालांतराने हे पेय पौर्वात्य राष्ट्रांमध्ये धार्मिक परंपरांची प्रतीकं आणि औषधं यामध्येही समाविष्ट झालं. तिबेटमध्ये चहाचा प्रसार चीनमधून सातव्या अगर आठव्या शतकात राजघराण्यामार्फत झाला आणि थोड्याच कालावधीत राष्ट्रीय पेय म्हणून चहाला मान्यता मिळाली. धार्मिक मठांत त्याचा सर्रास उपयोग होऊ लागला. चीन व अतिपूर्वेकडील देशांशी भारताचा इसवी सनाच्या पहिल्या दहा शतकांत भूमार्गाने आणि जलमार्गाने दळणवळण आणि व्यापारी संबंध होता. यावरून भारतात चहाचा वापर फार पूर्वीपासून प्रचलित असावा असे अनुमान काढल्यास ते चुकीचे होणार नाही. पण भारतात चहाचं सर्रास सेवन होत असल्याचे संदर्भ मात्र विशेष सापडत नाहीत. सतराव्या शतकाच्या सुरुवातीला डचांनी जावामार्गे युरोपात प्रथम चहा नेला. त्यानंतर युरोपात चहाचा खप वाढला. १८३५ च्या सुमारास चिनी चहाच्या बियांपासून भारतात आसामसारख्या काही भागांत चहाच्या लागवडीला सुरुवात झाली. नंतर आसाममध्ये पूर्वीपासून जंगलात वाढत आलेली चहाच्या जातीची झाडे ही मूळ चहाचीच झाडे असल्याचा निर्णय तज्ञांच्या समितीने दिला. १८३९ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या मळ्यांत तयार झालेला चहा लंडन येथील बाजारात प्रथमच लिलावाने विकला गेला. १८४० मध्ये आसाम टी कंपनीची स्थापना झाली. त्यानंतर ब्रह्मपुत्रचं खोरं, डेहराडून, हिमालयाचा पायथा, दार्जिलिंग अशा विविध ठिकाणी चहाचं उत्पादन होऊ लागलं. आणि पुढे हे पेय भारतीयांच्या जीवनाचा एक भागच होऊन गेलं. आजमितीस भारताच्या सुमारे ८० टक्के घरांमध्ये चहासेवन केलं जातं.
 
मर्यादित स्वरुपात चहापान करण्याचे अनेक फायदे आहेत. प्राण्यांवर केलेल्या संशोधनाअंती असं लक्षात आलं आहे की चहासेवनाने हृदयरोगाचा, रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका कमी होतो. सकाळी उपाशीपोटी नुसता चहा पिण्याऐवजी थोड्या खाण्यासोबत चहा घेतला तर सकाळी उत्साह वाढतो. सर्वसामान्यांमध्ये चहा हे स्ट्रेस बस्टर मानलं जातं. थकवा, ताण, निरूत्साह, मलूलपण या सगळ्यावर एकच उपाय असतो तो म्हणजे एक कप कडक चहा. चुकीच्या पद्धतीने एखादा पदार्थ करणं आणि त्याचं अतिसेवन हे दोन्हीही शरिराला हानीकारक असतं हे आपण विसरता कामा नये. म्हणूनच चहा प्या पण बेताने. आनंदासाठी प्या, अनारोग्यासाठी नाही. काही ठिकाणी लोणी घालून तर काही ठिकाणी लिंबू पिळून चहा करण्याची पारंपरिक पद्धत आहे. काही ठिकाणी कमी दुधाचा तर काही ठिकाणी केवळ दुधाचा चहा केला जातो. त्या त्या प्रदेशानुसार चहा करण्याच्या पद्धतीही बदलतात.
 
गरीब-श्रीमंत, अभिजन-बहुजन, क्लासेस-मासेस, उच्चाधिकारी-कामगार, कलाकार-राजकारणी, सर्व जातीपातीच्या, सर्व धर्मांच्या, सर्व प्रांतांच्या नागरिकांना सर्व भेदाभेद विसरून स्वीकारलेला पदार्थ म्हणजे चहा. कोणाकडे चाय पे चर्चा होते, कोणाकडे कार्यक्रमानंतरचं चहापान होतं, कोणाकडे दमून भागून आल्यावर वाईच कपभर चाय घेतली जाते, कोणाकडे विवाहासाठी कांदेपोह्यांना चहाची सोबत होते, कोणाकडे पार्टीत हाय टी घेतला जातो, कोणाकडे टी ब्रेकमध्ये गॉसिपिंग केलं जातं, कोणाकडे थकवा घालवण्यासाठी एक कटिंग मारली जाते, कुणी सहज म्हणून गप्पांत चहाला सोबत घेतात तर कोणी आवडत्या व्यक्तीशी गप्पा मारता याव्यात म्हणून चहाचं निमित्त शोधतात. कोणी ऑफिसमध्ये काम करून दमल्यावर एक छोटासा कप चहा घेऊन पुन्हा खिंड लढवायला तयार होतात.
 
चहा हे केवळ पेय नाही. तर ते एक रोजगार देणारं क्षेत्र सुद्धा आहे. आज कित्येक लोक केवळ चहा विकून घर चालवत आहेत. छोट्या टपरीपासून ते अमृततुल्य, येवले, वाघबकरी, चायोससारख्या टी जॉईंटपर्यंत याची व्यापकता आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत कॉफीला असणारं स्टॅंडर्ड आज टी जॉईंटच्या माध्यमातून चहालाही मिळालं आहे. अनेक टी जॉईंटच्या वेगवेगळ्या शाखाही तयार झाल्या आहेत. त्यामुळे चहा विकून माणूस करिअर करू शकतो यावरचा लोकांचा विश्वासही दृढ होत चालला आहे.
 
गरीब असो वा श्रीमंत, ज्याला चहा आवडतो त्याचं कुठेही अडत नाही. काहीच नसलं तरी एक चहा आणि वडापाव खाऊन दिवस काढणारे कामगार आपण जागोजागी पाहतो. खिशात पैसे आहेत, भूकही लागली आहे, पण आजूबाजूला काहीच मिळत नसतं तेव्हा चहाची एखादी छोटीशी टपरी पाहून जीवात जीव येतो. हीच तर आहे चहाची महती. काय मग घ्यायचा का कपभर चहा या चहादिनाच्या निमित्ताने? आपण निमित्त शोधतच असतो चहासाठी. चलो फिर, एक प्याली चाय हो ही जाय.
 
- मृदुला राजवाडे