हिमाचली धाम - १

युवा विवेक    02-Dec-2022
Total Views |

himaachali dhaam - 1
 
 
 
 
हिमाचली धाम - १
 
हिमाचल प्रदेशातील खाद्यपदार्थांबद्दल बोलतांना धामचा उल्लेख टाळून चालणार नाही. जसं केरळमध्ये ओणमसाठी सद्या तसंच हिमाचलमध्ये धाम आहे. या थाळीबद्दल शोधायला गेले तर मला चक्क सायन्स डायरेक्ट या प्रसिद्ध पब्लिशरच्या जर्नलमधील रिसर्च पेपर सापडला!  पेपरवर नजर टाकली आणि लगेच जर्नलच्या वेबसाईटवर गेले. मराठी, महाराष्ट्र असे शब्द टाकून जुने अंक पाहिले आणि प्रचंड वाईट वाटले. एकही पेपर मराठी पदार्थांवर नव्हता. आता ही जबाबदारी जितकी आपल्या सर्वांची तितकीच माझीही आहे असं मी समजते. आपलेही आहेत जुने पारंपरिक पदार्थ, आपणही लिहावे त्यावर रिसर्च पेपर्स. पुढच्या वेळी तिथे मराठी खाद्यपदार्थांवरही पेपर्स दिसतील अशी आशा करते. आता परत वळूया धामकडे.
 
हिमाचली धाम सुरवातीला फक्त देवळांमध्ये प्रसाद म्हणून दिली जायची त्यामुळे त्यात कांदा, लसूण, मांस यांचा वापर नसायचा. आयुर्वेदानुसार सात्विक, राजसिक आणि तामसिक असे आहाराचे तीन प्रकार आहेत. धाम देवळांमध्ये तयार केले जात असल्याने सात्विक आहारात मोडते. हळूहळू धाम सणसमारंभांना आणि लग्नकार्यातही केली जाऊ लागली. याचे अजून वैशिष्ट्य म्हणजे यात कोणत्याही भाजीचा वापर होत नाही केवळ धान्य, कडधान्ये आणि दुधाचे पदार्थ वापरून सगळे पदार्थ केले जातात. पहाडी भागात भाज्यांची कमतरता असतेच. खूप लोकांसाठी जेवण कराचे म्हणजे इतक्या भाज्या जमवणे कठीण जात असावे त्यामुळे ही प्रथा सुरु झाली असावी. धाममधील सगळ्या पदार्थाना जुना इतिहास आहे. सुश्रुत संहिता आणि इतर आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये सांगितल्याप्रमाणे काही पाककृती तयार केल्या जातात. भगवान श्रीराम यांचा मुलगा कुश, त्याच्या वंशजांनी म्हणजे राजा मेरूने अगदी लहान वयात अयोध्या सोडली आणि हिमाचल प्रदेशावर राज्य केले. धामची सुरवात कुठे झाली यात दुमत असले तरी वेदिक काळातील मंदिरे प्रथा, परंपरा या चंबा जिल्ह्यात सुरक्षित राहिल्या. अफगाण, इराक, इराण देशांमधील मुस्लिम आक्रमणांनी काश्मीरमधील विद्यापीठे, मंदिरे नष्ट झाली. चंबा आणि आसपासच्या गावांना धौलाधार पर्वतरांगांचे संरक्षण मिळाले त्यामुळे तिथल्या लोकांना आपला धर्म, परंपरा, वैदिक राहणीमान जपता आले. चंबा जिल्हा एकेकाळी राजमा, दूध आणि मसाल्यांसाठी प्रसिद्ध होता. या भागातील पद्धती आणि काश्मीरच्या पद्धती यांचे मिश्रणातून मद्रा हा पदार्थ तयार झाला जो धाममध्ये महत्वाचा असतो.
 
धाम करण्याची पारंपरिक पद्धत खूप छान आहे. देवळातील प्रसाद करण्यासाठी बोटी या ब्राह्मण आचार्यांना पदार्थ करायला बोलावले जायचे. आजही बऱ्याच ठिकाणी तेच धाम करतात. या बोटी लोकांचे स्वच्छतेचे नियम खूप कडक असतात आणि ते सगळ्यांना पाळावे लागतात. हजारो वर्षे या सगळ्या पाककृती त्यांनी तोंडपाठ करून पुढच्या पिढीकडे सुपूर्त केल्या. आजही प्रत्येक गावात बोटी असतात आणि या पारंपरिक पदार्थांसाठी त्यांना बोलावले जाते. धामसाठी वेगळी पितळी मोठमोठी भांडी सगळ्या गावात असतात. यांचा आकार हंड्यांसारखा असतो त्यांना चारोटी म्हणतात. चारोटी किंवा बाटलोईमध्ये उसळी, वरण होते आणि कढईमध्ये मिठा (गोड भात) पर्वतांवर पाणी उकळणे आणि अन्न गरम ठेवणे कठीण जाते ते या अरुंद तोंड असलेल्या भांड्यांमुळे सोपे होते. एक दिवस आधी लहानसे तात्पुरते स्वयंपाकघर केले जाते. ६*२ चा खंदक खोदतात. या खंदकात लाकडांवर मोठ्या भांड्यात अन्न शिजवले जाते. धाम जे लाकूड वापरले जाते त्याला समिधा म्हणतात आणि ते कापण्यासाठी मुहूर्तही काढला जातो. गावातील लोक त्या मुहूर्तावर एकत्र येतात, गाणी गातात आणि समिधा तयार ठेवतात.
 
धाम तयार करणे कष्टाचे आणि कौशल्याचे काम आहे. त्यासाठी किमान १२ तास लागतात त्यामुळे आदल्या रात्रीच तयारी सुरु होते. गावातील व्यक्तींनी आणून दिलेले पदार्थ निवडायला सुरवात होते. त्यांना मदत करायला गावकरी येऊ शकतात पण सर्वांनी हातपाय स्वच्छ धुवून, अनवाणी सगळी कामे करायची, सांगितले तेच काम करायचे हे नियम! आचारी तर जेवण करण्यापासून ते पंगत वाढण्यापर्यंत सगळी कामे अनवाणी करतात. त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना पूर्वी धान्य दिले जायचे. आचारी स्नान करून, स्वच्छ कपडे घालून स्वयंपाकघरात शिरतात. चार म्हणजेच खंदकातील चुलीला नमस्कार करतात आणि स्वयंपाकाला सुरवात करतात. धाममधील पदार्थ प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे असतात. कांगरी धाम, मंड्याली धाम, चंब्याली धाम आणि बिलासपूरी धाम या प्रसिद्ध आहेत.
 
धामच्या निमित्ताने मला लहान गावात उत्सव, भंडारा व्हायचा ते दिवस आठवले. गावातील सर्वांनी धान्य जमा करायचे, एकत्र येऊन स्वयंपाक करायचा, एकत्र जेवायचे यापेक्षा चांगला एकजुटीचा उपक्रम कोणताच नसेल. या पंगतीत लहान-मोठे सगळे काम करायचे, पंगतीत श्लोक म्हटले जायचे आणि त्या प्रसादाची चव वेगळीच असायची. आपल्या भारतभर इतक्या छान प्रथा आहेत. लहानपणापासून अशा पंगतीत काम करण्याची सवय मुलामुलींना असली कि मोठेपणी त्याचा उपयोग होतो. टीम वर्क, इव्हेंट मॅनेजमेंट यांचे वेगळे शिक्षण पूर्वी आपोआप मिळायचे ते असे! धामची सुरवात वैदिक काळात झाली आणि अजूनही बरीचशी तशीच केली जाते, हे समजल्यापासून आता लिहितांना मीच त्या कधीही न अनुभवलेल्या काळाची चित्रे रंगवतेय. टाइममशीनमध्ये जाऊन वैदिक काळातील हे सगळे वातावरण अनुभवावे, या प्रथा कशा सुरु झाल्या ते पाहावे असे मला हा लेख लिहिण्याआधी कधीही वाटले नव्हते! या निमित्ताने तुम्हीही मनातल्या मनात ही सफर करून आला असालच. या वेगवेगळ्या धाममध्ये कोणते पदार्थ बनतात आणि कसे करतात ते मात्र आपण पुढील लेखात पाहू.
 
- सावनी