वेश नसावा बावळा

युवा विवेक    23-Dec-2022
Total Views |

vesh nasava bavala
 
 
 
वेश नसावा बावळा
वेष असावा बावळा । परी अंतरी नाना कळा । सगट लोकांचा जिव्हाळा । मोडूं नये । ।
असं समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात म्हटलं आहे. बाह्यरुपात वेश बावळा असला तरी अंतरंगात मात्र आपण अनेक कलांनी संपन्न असावं, लोकांचे अंत :करण सांभाळण्याची आपल्याकडे कला असावी, असा याचा अर्थ आहे. त्यांनी जे म्हटलंय ते खरं आहेच. पण त्याचा मथितार्थ समजून घेणं आणि योग्य वेश करणंही तितकंच सोयीचं आहे. सध्याचं युग हे फॅशनचं युग आहे. अगदी फॅशन नाही तरी, स्वच्छ धुतलेले, व्यवस्थित मापाचे कपडे घालणं, स्थलसापेक्ष वेश करणं एवढं आपण नक्कीच करू शकतो. व्यवस्थित कपड्यांनी केवळ आपलं बाह्यरूपच छान दिसतं असं नाही; तर अंतर्मनही उत्साही आणि टवटवीत राहातं.
 
अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या आपल्या प्राथमिक गरजा. शेवटी आपण शिकतो, अभ्यास करतो, नोकरी करतो, पैसे मिळवतो ते या गरजा पूर्ण करण्यासाठीच, नाही का? पोटापुरते अन्न आणि लज्जारक्षणार्थ वस्त्र ही आपली प्राथमिक गरज झाली. या पलिकडे आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासात, आपल्या प्रभावशाली असण्यातही आपले कपडे मोलाची भूमिका बजावतात. हे मानसशास्त्रानुसारही सिद्ध झालंय. बघा ना, एखादा ड्रेस घातल्यावर आपल्याला खूप भारी वाटतं, आरशातही आपण स्वतःकडे बघत राहातो.आणि एखादा ड्रेस घातल्यावर, तो कितीही किमती असला तरी प्रसन्न वाटत नाही. एखादा वस्त्रप्रकार आपल्याला शोभतो, एखादा नाही. एखाद्या ठिकाणी भलत्याच प्रकारचे कपडे घालून जाणं हास्यास्पद वाटू शकतं. आपल्या मनाची स्थित्यंतरं आपल्या कपड्यांच्या निवडीतही उमटतात.
 
कपडे परिधान करताना आपण काही गोष्टी आपण आवर्जून लक्षात ठेवल्या पाहिजेत. आपल्या आवडीनुसार आणि वस्त्र परंपरांनुसार प्रत्येक प्रकारचा एक तरी ड्रेस शक्यतो आपल्याकडे असावा. म्हणजे तुमच्या कामाच्या ठिकाणी वापरले जाणारे फॉर्मल पेहराव, त्यात भारतीय प्रकारची वस्त्रे असावीत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कपडे व्यवस्थित मापाचे असावेत. श्वास कोंडेल किंवा विचित्र दिसतील इतके घट्ट नको आणि उगीचच अघळपघळही नकोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण त्या वस्त्रात कंफर्टेबल असलो पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे कपडे असावेत असं म्हटलं असलं तरी आपल्या कंफर्टशी त्याबाबत तडजोड करण्याची आवश्यकता नाही. एखाद्याला पाश्चात्य कपडे सुटसुटीत वाटतील तर कोणाला भारतीय. त्यात अवघडलेपण नसेल. त्यामुळे जो प्रकार आपण परिधान करणार आहोत, त्यात आपल्याला बरं वाटतं आहे का हे पाहणंही आवश्यक आहे. ते कपडे इथल्या वातावरणाशी सुसंगत आहेत का, हे ही पाहिलं पाहिजे. उदाहरणार्थ, परदेशात ओव्हरकोट नेहमी वापरत असले तरी भारतात तो घातला तर घामाच्या धारा लागतील. इथल्या वातावरणाला सुती कपडे किंवा स्थानिक उत्पादन होणाऱ्या कापडापासून तयार होणारे कपडे अधिक सोयीचे. बघा ना, पाश्चात्यांच्या प्रभावातून वापरात असलेला कंठलंगोट अर्थात नेकटाय आपण गेल्या काही वर्षांत फॉर्मल्समधून बाद करून टाकला. कारण, भारतासारख्या उष्ण कटिबंधातल्या नागरिकांसाठी उन्हाळ्यात टाय म्हणजे प्राण कंठाशी आणणारा प्रकार. अगदी त्याच पद्धतीने गेल्या काही वर्षांत साड्यांसारखे भारतीय पारंपरिक वस्त्रप्रकार अभिमानाने फॉर्मल्समध्ये जोडले गेले. गेल्या आठ दहा वर्षांत तर पुरुषांचेही अस्सल भारतीय वस्त्रप्रकार फॉर्मल्स म्हणून वापरले जाऊ लागलेत. कुर्त्यासारख्या, भारतीय जॅकेटसारख्या कपड्यांना फॉर्मल्सचं स्टाईल स्टेटमेंट प्राप्त झालंय. आठवा बरं वर्ल्ड कपची समालोचनं. कित्येक परदेशी समालोचक सुती कुर्ते आणि मोदी जॅकेटमध्ये समालोचन करताना आढळले.
 
चांगले आणि योग्य मापाचे कपडे तुम्हाला काय मिळवून देतात? मध्यंतरी मी एक लेख वाचला ज्यात फॅशन सायकोलॉजी अशी संकल्पना मांडण्यात आली होती. सायकोलॉजीचा एक नवाच प्रकार यामुळे माझ्यासमोर आला. फॅशन सायकोलॉजी म्हणजे काय हे शोधण्याचा मी प्रयत्न केला. त्यातून जे सापडलं ते तुमच्या माझ्या हिताचच. या संकल्पनेनुसार आपले कपडे हे मूड सुधारतात. म्हणजे तुमच्या मनात नकारात्मक भावनांनी गर्दी केली असेल तर छानसे, चांगल्या फिटींगचे आपले आवडते कपडे मनात सकारात्मक विचारांची पेरणी करतात, मन हलकं करतात. व्यवस्थित बसलेले, आपल्याला आवडते असणारे, वातावरणाला साजेसे कपडे समोरच्या व्यक्तीवर चांगला प्रभाव पाडतात व संवाद सुकर होतो. आपली ड्रेसिंग स्टाईल किंवा कपडे घालण्याची पद्धती ही आपल्या एकाग्रतेत भर घालतात. बघा ना, व्यवस्थित मापात नसलेले, न शोभणारे, अवघडलेपण आणणारे कपडे आपल्याला एकाग्रतेत अडथळे आणतात. तुम्हीही घेतलाय का असा अनुभव? मी घेतलाय. चांगल्या दर्जाचे, चांगल्या रंगाचे, नीट शिवलेले, आयते असतील तर नीट बसणारे कपडे आपल्या कल्पकतेत, सर्जनशीलतेत भर घालतात. कधीतरी स्वतःचा मूड सुधारण्यासाठी वेगळ्या हटके रंगाचे, वेगळ्या प्रकारचे कपडे घालायला काहीच हरकत नाही.
 
पण या सगळ्यापलिकडे कम्फर्ट इज की असं फॅशन जगतात म्हटलं जातं. जे वस्त्र सोयीचं, सुटसुटीत ते अधिक प्रभावी. उगीचच अन्य कोणाच्या फॅशनच्या संकल्पनांमध्ये अडकून स्वतःचा कम्फर्ट गमावण्यात काहीच हशील नाही. नीटस, कम्फर्ट मिळवून देणारे कपडे आपल्याला वावरायला ही किती मदत करतात. बघा ना, काही माणसं काही कपड्यांमध्ये किती सहज वावरतात. अगदी साडीपासून, धोतरापासून ते बोल्डशा वेस्टर्न कपड्यांपर्यंत आजच्याच भाषेत सांगायचं तर तो प्रकार ते किती छान कॅरी करतात. आपणही आपला कम्फर्ट झोन शोधणं अत्यंत महत्त्वाचं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फॅशनचा विचार करताना आपली संस्कृती, आसपासची वस्ती, रंगांची निवड, घरातल्यांचा विचार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला आरसा आपल्याला काय सांगतो ते पाहणं फार फार महत्त्वाचं. तुम्ही एखादा नवा प्रकार घालून पाहिलात की सांग दर्पणा मी कशी दिसते हे विचारण्यापूर्वीच तो दर्पण तुम्हाला उत्तर देऊन मोकळा होतो. समोर बघताक्षणी आरसा आपल्याला सांगतो की छान दिसतंय हे, नाहीतर बाई गं किंवा बाबा रे हे घातलंयस ते काही फारसं चांगलं दिसत नाहीये असंही प्रांजळपणे सांगतो. त्याचा शब्द शिरसावंद्य मानायला काही हरकत नाही.
 
थोडक्यात आपले कपडे, आपली दैनंदिन किंवा विशेष प्रसंगी केली जाणारी वेशभूषा हा म्हटलं तर साधासोपा आणि म्हटलं तर अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी किती पैसा खर्च केला जातो ते महत्त्वाचं नाहीचे. कारण अत्यंत साधे सुती कपडेही अनेकदा विलक्षण प्रभावी असतात, दिसतात. मुद्दा आहे तो ते कपडे आपण कसे वापरतो याचा. त्यामुळे चला तर मग, कपड्यांकडेही लक्ष देऊया. अंतरंगातूनही प्रकाशमान होऊया आणि बाह्यरंगही उजळूया.
 
- मृदुला राजवाडे