सिनेसफरीतील मुके साक्षीदार

युवा विवेक    26-Dec-2022
Total Views |

cinema
 
 
 
 

सिनेसफरीतील मुके साक्षीदार

 

आपल्याला एखादा सिनेमा आवडतो, म्हणजे नक्की काय आवडतंं? कधी त्यातल्या अभिनेत्यांचा अभिनय आवडतो, कधी कथानक आवडतंं, कधी गाणी आवडतात, कधी चित्रपटातला संदेश आवडतो. हे सगळ आपल्याला वेळोवेळी आठवतंं. पण कधीकधी त्या सिनेमातली एखादी वस्तू आपल्याला आवडली आणि ती आपल्या भावविश्वाचा भाग होऊन गेली असंं कधी झालयंं का?

 

' दिलं चाहता है ' आठवतो का? त्यात क्लायमॅक्स सिनच्या आधी आकाश (आमिर) विचारमग्न होऊन स्वत:च्या बेडरूममध्ये उदासपणे बसलेला असतो. त्याच्या मनात उठणारे विचारांचे तरंग अधोरेखित करण्याचे काम टेबलवरचे शोपिस करत असते. आजही ते निळेशार शोपीस आठवते.

 

अमिताभच्या "डॉन"मध्ये सर्व क्लायमॅक्स होईपर्यंत सर्व प्रेक्षकांचा जीव ती लाल डायरी पोलिसांपर्यंत पोहोचावी म्हणून टांगणीला लागलेला असतो कारण विजयच्या सुटकेचा ती एकमात्र आधार असते.

 

' वेलकम ' मधील मजनूभाईने काढलेलं विचित्र पेंटिग पाहिलं की, हास्याचे फवारे उडतात. घोड्याच्यापाठी गाढव काढून भुतदयेचा संदेश देणार ते चित्र आठवलं तरी हसू येतंं.
 

"जिंदगी मिलेगी ना दोबारा" मधली फरहानची बॅग व ती आणि पिंक मोबाईल इतर कलावंतांच्या भाऊगर्दीत पण लक्षात राहतात.

 

"मेरा नाम जोकर" मधील जोकरचा आणि झपाटलेला मधील तात्या विंचुचा बाहुला निव्वळ निर्जीव बाहुले राहता सजिव वाटू लागतात.

 

इंटरस्टेलरमधील स्टार्क नावाचा रोबोट निर्वाणीच्या क्षणी अंतराळात सोडावा लागतो त्याची चुटपुट नायिकेसह आपल्यालाही लागून राहते. तर इन्सेप्शन मधील भिंगरी पिक्चर संपल्यानंतर पण डोक्यात गरगरत राहते.

 

कास्ट अवेचा नायक निर्जन बेटावर एकाकी सापडतो तेव्हा स्वत:च्या संवादाची भूक भागविण्यासाठी त्याने तयार केलेला विल्सन नंतर जेव्हा लाटेवर हरवतो तेव्हा आपल्यालाही वाईट वाटतंं.

 

वरची सगळी उदाहरणे कथानकाचा एक भाग होऊन येतात. पण अनेकदा कलाकाराची वेशभूषाच ट्रेण्ड होऊन जाते.

' लाडला' सिनेमातील अनिल कपूरची प्लेट असलेली कॅप किंवा "मैने प्यार किया" मधली सलमान खानची कॅप त्याकाळी फॅशन झाली  होती.

 

' दिलं है के मानता नहीं" मधली आमिरची कॅप कथानकातच एक चटका लावणारे दृश्य देऊन जाते.

 

शोलेमधील दोन्ही बाजू सारख्या असलेलं जयचंं नाणंं आणि माऊथ ऑर्गन, जंजीरमध्ये स्वप्नात दिसत राहणार ब्रेसलेट, मिस्टर इंडिया मधील गायब करणार गेजेट, अजुबाचा गॉगल, दीवार मधला नायकाचा लकी बिल्ला नंबर ७८६ …… अशी फार मोठी यादी आहे.

 

हेराफेरीमधला बाबुराव गणपतराव आपटेच्या स्टार गॅरेजचा 8881212 नंबरचा टेलिफोन त्याच्या रिंगटोन सकट आठवतो कारण सगळ कथानक त्याच्यावरच तर बेतल आहे.

 

3 इडियटस मधली चटणी, व्हायरस इन्व्हर्टर, आणि रांचोचे एकेक शोध पण आठवले तरी हसू येतंं.

 

कॅप्टन अमेरिकाची ढाल, हॅरी पॉटरची जादूची कांडी आणि थोरचा हातोडा अशा हॉलिवूडपटातील कित्येक गोष्टी आबालवृद्धात लोकप्रिय आहेत.

 

यारानामधला अमिताभचा लायटिंग ड्रेस आणि त्याच गाणं बॉलिवूडचा सिम्बॉल आहे.

 

अमर अकबर अँथनीमध्ये अमरने घरासमोर लहानपणी लपवलेले रिव्हॉल्व्हर आणि अँथनीच्या हातात दिलेले पत्र म्हणजे खास मनमोहन देसाई टच असलेल्या वस्तू.!!

 

तिरंगामधला ब्रिगेडियर सूर्यदेव सिंगने निकामी केलेले फ्यूज कंडक्टर, त्याचा धुरळा उडवणारा पाईप, आणि काहीच केलेला रुमाल सुद्धा लक्षात राहील असा आहे.

 

बाजिगरमध्ये शाहरुखचे आयलेन्स सापडत नाही तोवर प्रेक्षकांमध्ये सुद्धा धाकधूक सुरू होते. त्याने समुद्रात भिरकावलेली सुटकेस सापडते तेव्हांही असच वाटत आणि मदन चोप्राची खुर्ची तो गरागरा फिरवतो तेव्हा कथानकाला पण वेगळे वळण लागते.

 

संजय दत्तचां वास्तव म्हटल की, हात आपसूक गळ्याकडे जातो आणि "पच्चास तोला"चां डायलॉग तोंडी येतो.

 

' मेरी जंग ' मधील अनिल कपूर आणि नूतन ह्या माय लेकांच त्यांच्या घरात असलेल्या पियानोशी असलेले भावनिक नाते आणि त्यावर वाजणाऱ्या "जिंदगी हर कदम एक नई जंग है" ह्या गाण्याचा कथानकात देखील चपखल वापर करण्यात आला आहे.

 

हिंदी - मराठी - इंग्रजी अशा प्रत्येक भाषेतल्या सिनेमातील असंख्य गोष्टी आजही स्मरणात आहे. त्यांचं आपल्याशी एक वेगळं भावनिक नातं असत. ते सिनेमे हिट असो अथवा फ्लॉप पण आपल्या आजूबाजूच्या दैनदिन वापरातील गोष्टीचं पण नामकरण करून जातात.

 

चाकोरीबद्ध आयुष्य जगणाऱ्या आपल्या सारख्या सामान्य प्रेक्षकाला सुद्धा त्यामुळे कधीकधी हिरोपण दाखवण्याची संधी त्यांच्यामुळे मिळते त्यामुळे हे चार कृतज्ञतापूर्वक शब्द सिनेसफरीतील त्या निर्जीव सदस्यांसाठी जे आपल्या स्मरणरंजनाचा अविभाज्य भाग आहे

 
- सौरभ रत्नपारखी